निकालपत्र :- (दि.29/07/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. दि.17/01/2010 च्या आदेशान्वये सामनेवाला क्र.1 यांनी रक्कम रु.500/-कॉस्ट भरुन त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.2यांना संधी देऊनही त्यांनी वेळेत आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही.सबब पुन्हा दिलेल्या मुदतीचा अर्ज हा तक्रारदार ही विधवा असून तिचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद पूर्ण झालेनंतर आलेने दि.19/07/2010 रोजी नामंजूर केला आहे. तक्रारदाराचे वकील व सामनेवाला क्र.1 चे वकील यांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार तक्रारदाराचा न्याय्य व योग्य विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-अ) तक्रारदार हे मौजे भेडसगांव ता.शाहूवाडी येथील कायमचे रहिवाशी असून त्यांची नमुद गांवी स्थावर व जंगम मालमत्ता आहे. सामनेवाला ही विमा कंपनी असून ती विमा व्यवसाय करते. तक्रारदाराचे पतीचा विमा शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत सामनेवालांकडे उतरविला होता.प्रस्तुत तक्रारदाराचे पतीचा मुख्य व्यवसाय शेती हाच होता. तक्रारदाराचे पतीचे वडील हे सन 1959-60 चे दरम्यान मयत झाले असून त्यांचे नांवे असणा-या शेतजमीनी वारस या नात्याने यातील तक्रारदारचे पती व अन्य वारस यांचे नांवे नोंद होणेबाबतची वारसा डायरी ही मंजूर झालेली होती व आहे. त्यानुसार तक्रारदाराचे पती शामराव पाटील हे शेती करत होते. तसेच शेतीबरोबर ते नमुद गांवी ग्रामपंचायतीकडे शिपाई म्हणून काम पाहत होते. तसेच पाणी पुरवठा विभागाकडे काम पहात होते. दि.21/10/2006 रोजी पहाटे 5 वाजता घरातून त्यांचे दैनंदिन कामासाठी म्हणजे पाणी पुरवठा करणेसाठी वारणा नदी काठावरील सार्वजनिक जॅकवेलमधील मोटरपंप सुरु करणेसाठी गेले असता पाण्याचे पात्रात पडल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. त्याबाबतची वर्दी ही शाहूवाडी पोलीस ठाणे यांचेकडे दिली होती. तपास झालेला आहे. मयताच्या प्रेताचे शवविच्छेदन प्राथमिक आरोग्य केंद्र भेडसगांव येथे डॉक्टरांनी केले असून पाण्यात बुडून मयत झालेचा दाखला दिलेला आहे. पतीचे मृत्यूनंतर तक्रारदाराने योग्य त्या कागदपत्रांसहीत क्लेम मागणी केली असता दि.26/10/2007 चे पत्राने 7/12 पत्रकी नावाची नोंद नसलेने बेकायदेशीरपणे दावा नाकारलेचे कळवले आहे. तक्रारदाराचे पतीचे वडीलांचे मृत्यूनंतर वारसाहक्काने त्यांची नावची डायरी मंजूर झाली होती व आहे. तक्रारदाराचे पती शेतीच करत होते. तक्रारदार ही गरीब विधवा असून ती दूर्गम भागात राहणारी आहे. तिचे कुटूंब शेतीवरच अवलंबून होते व आहे. तथापि, पतीचे निधनानंतर तिचेवर विमा दावा न मिळालेस उपासमारीची वेळ येणार आहे. मुदतीत विमा रक्कम न मिळालेने शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे. म्हणून प्रस्तुत तक्रार मंचात दाखल करावी लागली. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करुन तक्रारदारास विमा रक्कम रु.1,00,000/-द.सा.द.शे.18 टक्के व्याजदराने क्लेम दाखल तारखेपासून मिळावेत व मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-,तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/-सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत सामनेवाला क्र.1 यांचे क्लेम नाकारलेचे दि.26/10/07 चे पत्र, सामनेवाला क्र.2 यांचे क्लेम नाकारलेचे दि.22/10/07 चे पत्र, शाहूवाडी पोलीसांनी तक्रारदारचे मयत पतीच्या मृत्यूबाबत केलेला तपास अहवाल, रहिवाशी दाखला, शामराव बिरा पाटील यांचा जन्म दाखला, मौजे भडसगांव ता.शाहुवाडी येथील गट नं;258 चा 8अ उतारा, गट नं.1267, गट नं.1321, गट नं.1302, गट नं.1223, गट नं.705 चा 7/12 उतारा, डायरी उतारा नं.1046 चा उतारा इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रार अर्जातील संपूर्ण मजकूर खोटा, चुकीचा रचनात्मक असून तो सामनेवालांना मान्य व कबूल नाही. सामनेवाला त्याचा स्पष्टपणे इन्कार करतात. प्रस्तुत अर्ज कायदेशीर नसलेने चालणेस पात्र नाही. सदर कामी रिलायन्स जनरल इन्शुर कंपनी लि;मुंबई व महाराष्ट्र शासन यांना पक्षकार करणे आवश्यक आहे. त्यांना पक्षकार केलेले नाही.त्यामुळे Non Joinder of Necessary Party ची बाधा येते.
प्रस्तुत अर्ज तक्रारदाराने ''शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना'' अंतर्गत महाराष्ट्र शासन मार्फत उतरविलेला विमा रक्कम मिळणेबाबत दाखल केली आहे. सदरची विमा हप्त्याची रक्कम महाराष्ट्र शासन हे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे भरत असते. विम्याचे हप्ते न भरल्यास महाराष्ट्र शासन देणे लागते व हप्ते भरले असल्यास रिलायन्स इन्शुरन्स कंपनी देणे लागते. नमुद योजनेखाली शासनाने सामनेवालांची ब्रोकर्स/कन्सलटंट म्हणून दि.20/05/2006 रोजी नेमणूक केली आहे. सबब विमा रक्कमा देण्याची जबाबदारी सामनेवाला क्र.1 यांची नाही. सामनेवाला क्र.1 यांना चुकीचे पक्षकार केले असल्याने तक्रार अर्ज नामंजूर करणेत यावा. सदर योजनेखाली नुकसानभरपाई मिळणेसाठी मयत व्यक्ती ही शेतकरी असणे आवश्यक आहे व सदर व्यक्तीचे शेतकरी म्हणून 7/12 पत्रकी मालक म्हणून नाव नोंद होणे आवश्यक आहे. परंतु मयत शामराव बिरा पाटील हा शेतकरी असलेबाबत कोणताही पुरावा विमा कंपनीकडे दाखल केलेला नाही. म्हणून सामनेवाला यांनी दि.26/10/2007 रोजीचे पत्राने 7/12 पत्रकी शेतकरी म्हणून तक्रारदाराचे पतीचे नांव नोंद नसलेने विमा दावा नाकारला आहे. तसेच रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांनी तलाठी व तहसिलदार शाहूवाडी यांना कळविले आहे. तक्रारदाराने 8-अ, 7/12 व डायरी दाखल केलेले आहेत. या कागदपत्रांवर कोठेही शामराव विरा पाटील यांचे नांव नोंद नाही. मयत व्यक्ती शेतकरी असली पाहिजे ही आवश्यक अट आहे. ती पूर्ण केलेली नसल्याने कंपनीने विमा दावा नाकारला आहे. तो योग्य व बरोबर आहे. सामनेवाला क्र.1 पुढे असे प्रतिपादन करतात की, जर तक्रारदारास काही रक्कम देणे लागत असलेस सदरची रक्कम देणेची जबाबदारी ही सामनेवाला क्र.1 ही ब्रोकर/कन्सलटंट कंपनी असल्यामुळे त्यांची नाही तर रक्कम देणेबाबतचे आदेश महाराष्ट्र शासन व रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांना व्हावेत. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा. तसेच प्रस्तुत सामनेवाला यांचा कोर्ट कामाचा खर्च तक्रारदाराकडून वसुल होऊन मिळावा. तक्रारदारास रक्कम देणे लागत असेल तर ती रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांनी देणेबाबतचा हुकूम व्हावा अशी विंनती सामनेवाला क्र.1 यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला क्र.1 यांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ कोणतेही कागदपत्र दाखल केलेली नाहीत. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला क्र.1 यांची लेखी म्हणणे, तक्रारदार व सामनेवाला क्र. 1 व 2 यांचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) प्रस्तुत तक्रारीस Non Joinder of Necessary Party ची बाधा येते का ? --- नाही. 2) सामनेवालांनी सेवात्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 3) तक्रारदार हे विमा रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? --- होय. 4) काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे
मुद्दा क्र.1 :- सामनेवाला क्र.1 यांनी Non Joinder of Necessary Party ची बाधा येत असल्याने तक्रार कायदयाने चालणेस पात्र नसलेचे प्रतिपादन केले आहे. दि.20/09/2008 चे मंचाचे आदेशानुसार क्लेम रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने नाकारलेमुळे त्यांना आवश्यक पक्षकार म्हणून समाविष्ट केले आहे. महाराष्ट्र शासनाने विमा हप्ता दिलेला असल्यामुळे महाराष्ट्र शासनास आवश्यक पक्षकार करणेचा आक्षेप हे मंच फेटाळत आहे. सबब नमुद तत्वाची बाधा सदर तक्रारीस येत नसलेने प्रस्तुतची तक्रार कायदयाने चालणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- तक्रारदाराचे मयत पती शामराव बिरा पाटील यांचे नांवे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेखाली सामनेवाला क्र.1 मार्फत सामनेवाला क्र.2 यांचेकडे विमा उतरविला होता. तसेच तक्रारदाराने विमा दावा दाखल केलेला होता. दि.26/10/2007 रोजी सामनेवाला क्र.2 यांनी विमा दावा नाकारला आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदाराचा क्लेम नं.2071028473 असून तक्रारदाराचे पतीचे नावे उतरविलेला विमा पॉलीसी क्र.11/30/11/0001/06 असा आहे. तक्रारदाराचे पतीचा दि.21/11/2006 रोजी पहाटे 5 चे सुमारास पाणी योजनेसाठी मोटर चालू करणेकरिता नदीवर गेले असता पाण्यात पडून मृत्यू झाल्याचे दाखल F.I.R., पंचनामा व पोस्ट मार्टेम रिपोर्टवरुन निर्विवाद आहे. तक्रारदाराचे पतीचा अपघाती मृत्यू झाला याबाबत वाद नाही. जर तक्रारदाराचे पतीचे नांव 7/12 पत्रकी नोंद नसलेमुळै दि.26/10/2007 रोजी विमा दावा नाकारला आहे. मुद्दा उपस्थित होतो तो तक्रारदाराचे पती हा शेतकरी आहे किंवा नाही ? तक्रारदाराने दाखल केलेल्या 7/12 पत्रकाचे अवलोकन केले असता तक्रारदाराचे भाऊ नामदेव बिरा पाटील यांचे नाव नमुद असून 1/2 हिश्याची नोंद आहे. तसेच डायरी उतारा नं.1046 चे अवलोकन केले असता तक्रारदाराचे सासरे मयत शामराव पाटील यांचे वडील बिरा रामा पाटील हे दि.23/11/1959 रोजी मयत झाले असून त्यांचे वारस म्हणून नामदेव, शामू व बाळाबाई यांची नांवे नमुद असून त्यांची वये अनुक्रमे 11, 4 व 7 अशी आहेत. सदर नांवे शामराव पाटील त्यांचे चुलते शंकर रामा पाटील यांचे वर्दीवरुन चढवणेत आली आहेत. सद नांवे डायरीत नोंद झाली तेव्हा तक्रारदाराचे वय 4 वर्षे होते. तक्रारदाराचे वयाचा पुरावाही कामात दाखल असून त्याची जन्मतारीख दि.21/03/1956 आहे. सबब एकत्रीत कुटूंबात मोठया वडीलधारी भावाचे/कर्त्याचेच नाव नोंद होते अन्य नांवे नोंदवली जातीलच असे नाही. सबब तक्रारदाराचे पती व त्याचे वाडवडीलांपासून शेती हा व्यवसाय असल्याचे निर्विवाद सिध्द होते. सबब तक्रारदाराचे पती हे शेतकरीच होते ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सबब पॉलीसीच्या योजनेचा मूळ हेतू लक्षात न घेता तांत्रिक कारणाचा आधार घेवून तक्रारदाराचा योग्य व न्याय क्लेम नाकारून सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र.2 हे विमा रक्कम देणेस जबाबदार आहेत. सामनेवाला क्र.1 हे ब्रोकर कन्सल्टंट असलेने त्यांना जबाबदार धरता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.3 :- सदरी योजना ही शेतक-यांचे अपघाती मृत्यू झालेस त्यांचे कुटूंब उघडयावर पडू नये हा हेतू आहे. मात्र तक्रारदाराचे पती शेतकरी असूनही सामनेवालांनी तांत्रिक कारण देऊन तक्रारदाराचा क्लेम नाकारला आहे. पतीच्या निधननंतर तक्रारदार या निराधार झाल्या त्यांच्यावर त्यांच्या मुलांची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत वेळेत विमा रक्कम मिळणे गरजेचे आहे. सबब तक्रारदार हे विमा पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.1,00,000/- व्याजासहीत मिळणेस पात्र आहेत. मुद्दा क्र.4 :- मुद्दा क्र. 1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला क्र. 2 यांचे सेवात्रुटीमुळे तक्रारदार हे झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. (2) सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास विमा पॉलीसीप्रमाणे विमा रककम रु.1,00,000/- (रु.एक लाख फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर दि.26/10/2007 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज अदा करावे. (3) सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |