जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १३४/२०११
तक्रार दाखल दिनांक – १३/०७/२०११
तक्रार निकाली दिनांक – ३०/०९/२०१३
श्रीमती फुलाबाई संपत सोनवणे
उ.वय.३४ धंदा – घरकाम
रा.शेलबारी, ता.साक्री, जि.धुळे.
विरुध्द
१. मा. शाखाधिकारी
कबाल जनरल इ.सर्व्हीसेस प्रा.ली.
४ अे. देहमंदीर को.ऑप. हॉसिंग सोसायटी,
श्रीरंगनगर, पंपीग स्टेशन रोड, गंगापुर रोड,
नाशिक ४२२००२.
२. मा.शाखाधिकारी सो.
ओरिएन्टल इ.कं.ली. नागपुर,
प्रादेशिक कार्यालय, शुक्ला भवन,
वेस्ट हायकोर्ट रोड, धरमपेठ नागपुर – ४४००१०.
३. मा.शाखाधिकारी सो.
ओरिएन्टल इ.कं.ली. धुळे.
ग.नं.५, भावसार कॉम्प्लेक्स, २ मजला, धुळे – ४२४००१.
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.ए.आय.पाटील)
(सामनेवाला तर्फे – वकील श्री.सी.के. मुगूल)
निकालपत्र
(दवाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
तक्रारदार यांनी, सामनेवाला क्र.१, २ व ३ यांनी, महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे, तक्रारदारांचा शेतकरी जनता अपघात विमा दावा नाकारल्याने विमा क्लेम रक्कम मिळणेकामी सदरची तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांचे थोडक्यात असे म्हणणे आहे की, त्यांचे पती संपत मंगळया सोनवणे यांचे दि.२५/०१/२०१० रोजी रस्ते अपघातात निधन झाले. त्यानंतर तक्रारदार यांनी शेतकरी अपघात विमा योजनेनुसार रक्कम मिळावी म्हणून विमा प्रस्ताव मे. तहसिलदार, साक्री यांचेकडे कृषी अधिकारी यांचे मार्फत दाखल केला होता. सदर प्रस्ताव मे. तहसिलदार यांच्याकडून सामेवाला यांना पाठविण्यात आला. त्या प्रस्तावावर काहीएक कारवाई पुढे झाली नाही म्हणून तक्रारदार यांनी सामनेवाला यांना नोटीस पाठवली. सदर नोटीस मिळून सुध्दा तक्रारदार यांना आजपर्यंत क्लेम मिळाला नाही. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून विमा क्लेमपोटी रू.१,००,०००/- व त्यावर दि.०७/०३/२०१० पासुन १८ टक्के दराप्रमाणे व्याज. तसेच मानसिक, आर्थिक व शारिरिक त्रासापोटी रू.५०,०००/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रू.५०००/- सामनेवाला यांचेकडून मिळावा याकामी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.
तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ, नि.२ वर फिर्याद, नि.५ सोबत ५/१ वर प्रथम खबर, नि.५/२ वर घटनास्थळ पंचनामा, ५/३ वर मरणोत्तर पंचनामा, नि.५/४ वर पी.एम. रिपोर्ट, नि.५/५ मृत्यु दाखला, नि.५/६ वर ७/१२ चा उतारा, ५/७ हक्काचे पत्रक, नि.५/८ वर खाते उतारा, इत्यादी कागदपत्रे दाखल केले आहे.
२. सामनेवाला क्र.१ यांनी पोष्टामार्फत खुलासा दाखल केला आहे. त्यात त्यांनी असे नमुद केले आहे की, सदर सामनेवाले क्र.१ हे केवळ शासनाचे मध्यस्थ व सल्लागार आहेत व शासनास विना मोबदला सहाय्य करतात. तक्रारदार हे आमचे ग्राहक नाहीत. त्यामुळे त्यांना सदर तक्रारीतून निर्दोष मुक्त करावे. सामनेवाला क्र.१ यांनी पुढे असे म्हटले आहे की, मयत संपत मंगळया सोनवणे यांचा विमा प्रस्ताव आमच्या कार्यालयास प्राप्त न झाल्याने सदरील प्रस्तावाबाबत आम्ही काहीही सांगण्यास असमर्थ आहेात.
३. सामनेवाला नं.२ यांना मंचाची नोटीस मिळूनही ते हजर न झाल्याने सामनेवाला यांचे विरूध्द `एकतर्फा’ आदेश करण्यात येत आहे
४. सामनेवाला क्र.३ ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. यांनी आपल्या लेखी खुलाश्यात असे म्हटले आहे की, तक्रारदार यांचे पती संपत मंगळया सोनवणे हे शेतकरी असल्याबाबतचा कोणताही पुरावा नाही. सदर विमा क्लेम हा तालुका कृषी अधिकारी अथवा म. तहसिलदार यांच्यामार्फत पाठवावा लागतो. परंतु अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव विरुध्द पक्ष कबाल इन्शुरन्स अथवा त्यांच्या मार्फत कंपनीकडे आला नाही.
तसेच तक्रारदार यांचे मयत पती हे मोटर सायकल चालवित होते. त्यांच्याकडे मोटर सायकल चालविण्याचे कोणतेही ड्रायव्हींग लायसन्स नव्हते. या योजनेचा लाभ घेणारा शेतकरी जर अपघाताच्या वेळी वाहन चालवित असेल तर त्याच्याकडे ड्रायव्हींग लायसन्स असणे कायदयाप्रमाणे आवश्यक आहे. त्यामुळे ड्रायव्हींग लायसन्स नसल्याकारणाने तक्रारदार यांना विमा क्लेम देता येणार नाही.
५. तक्रारदारांचा तक्रार अर्ज, शपथपत्र व पुराव्यासाठी दाखल कागदपत्रे पाहता तसेच सामनेवाला नं.१ व ३ यांचा खुलासा आणि दोन्ही पक्षांच्या विदवान वकीलांनी केलेला युकितवाद ऐल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
१. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
२. सामनेवाला क्र.१ यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कमतरता केली आहे काय ? नाही
३. सामनेवाला क्र.२ व ३ यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कमतरता केली आहे काय ? होय
४. तक्रारदार हे सामनेवाला क्र.२ व ३ यांच्याकडून विᛂमा क्लेम
व त्यावरील व्याज मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
५. तक्रारदार हे सामनेवाला क्र.२ व ३ यांच्याकडून मानसिक
त्रास व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम वसुल होऊन
मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
६. अंतिम आदेश ? आदेशाप्रमाणे
विवेचन
६. मुद्दा क्र.१- सामनेवाले यांनी त्यांच्या जबाबात सदर शेतकरी अपघात विमा योजना नाकरलेली नाही. तसेच तक्रारदार या मयत संपत मंगळया सोनवणे यांच्या पत्नी आहेत ही बाब नाकरलेली नाही. तक्रारदार या मयत संपत मंगळया सोनवणे यांचे वारस असल्याने सामनेवाला क्र.२ व ३ यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुददा क्र.’१’ चे उत्तर होकारार्थी देण्यात आले आहे.
७. मुद्दा क्र.२ - सामनेवाला क्रं.१ यांनी त्यांच्या लेखी खुलाश्यामध्ये असे नमुद केले आहे की, तक्रारदाराने या योजनेअंतर्गत लाभासाठी प्रस्ताव सादर केला आहे व तो प्रस्ताव सामनेवाला क्रं.१ यांनी सामनेवाला क्र.२ व ३ यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर केला आहे.
सामनेवाला क्र.१ यांनी त्यांच्या जबाबामध्ये असे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य शासनाला सदरील विमा योजना राबवण्यासाठी विना मोबदला सहाय करतो. यामध्ये मुख्यत्वे शेतक-यांचा विमा दावा अर्ज तालुका कृषी अधिकारी/तहसीलदार यामार्फत आमच्याकडे आल्यावर विमा दावा अर्ज योग्यपणे भरला आहे का? सोबत जोडलेली कागदपत्रे विमा कंपनीने मागणी केल्या प्रमाणे आहेत का? नसल्यास तालुका कृषी अधिकारी तहसीलदार यांना कळवून त्यांची पुर्तता करवून घेणे व सर्व योग्य कागदपत्रे मिळाल्यावर योग्य त्या विमा कंपनीकडे पाठवून देणे व विमा कंपनीकडून दावा मंजूर होवून आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे एवढाच आहे. यासाठी आम्ही राज्य शासन वा शेतकरी यांच्याकडून कोणताही मोबदला घेत नाही, असे नमूद केले आहे.
याचा विचार होता सामनेवाला क्रं.१ यांच्यावर केवळ विमा प्रस्ताव स्विकारणे व त्याची तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी विमा कंपनीकडे पाठवणे एवढीच जबाबदारी दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यावर विमा क्लेम देण्याची जबाबदारी नाही. सबब सामनेवाला क्रं.१ त्यांचे विरूध्द सदर तक्रार अर्ज नामंजूर करण्यात यावा असे या न्यायमंचाचे मत आहे. म्हणून मुददा क्रं. २ चे उत्तर नकारार्थी देण्यात आले आहे.
८. मुद्दा क्र.३ - सामनेवाला क्रं.३ यांनी त्यांच्या खुलाश्यामध्ये कलम ४ मध्ये तक्रारदार यांचा प्रस्ताव हा कबाल इन्शुरन्स कंपनीकडुन प्राप्त झालेला नाही, त्यामुळे त्याबाबात कोणतीही माहीती नाही. तसेच कलम क्रं.६ मध्ये मयताकडे ड्रायव्हींग लायसन्स नव्हते या कारणाने तक्रारदाराचा क्लेम देता येत नाही, असे नमुद आहे. वरील दोन्ही कलमातील कथन पाहता सामनेवाला यांचा खुलासा हा परस्पर विरोधी दिसत आहे.
याबाबत तक्रारदार यांनी तक्रर अर्जामध्ये कलम (४) मध्ये तहसिलदार सो. साक्री यांचेकडे कृषी अधिकारी यांचेमार्फत प्रस्ताव दाखल केला होता व त्यांनी दि.०७/०३/२०१०. रोजी सामनेवाला १,२,३ यांचेकडे पाठविला आहे असे नमुद केले आहे. यावरून सामनेवाला यांना प्रस्ताव प्राप्त झाला असे दिसून येते. यावरून या तांत्रिक कारणाचा सामनेवाला यांनी आधार घेतला आहे व तो योग्य नाही असे आमचे मत आहे.
तसेच तक्रारदारचे पती हे स्वतः अपघाताच्या वेळी वाहन चालवत असतांना अपघात झाला असे कुठेही फिर्यादीमध्ये किंवा पंचनाम्यामध्ये नमूद केलेल नाही. त्यामुळे सदर मयत व्यक्ती ही स्वतःचे वाहन चालवत असतांना अपघात झाला असे स्पष्ट होत नाही. याबाबत महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकाचा विचार करणे आवश्यक आहे. सदरचे परिपत्रक नि.१५/१ वर दाखल केलेले आहे. सदर परिपत्रकातील प्रपत्र ‘ड’- अपघाताच्या पुराव्यासाठी सादर करावयाचे कागदपत्र, यामध्ये क्रं.१ रस्ता अपघात, या कलमाखाली दाखल करावयाचे आवश्यक असलेले कागदपत्र मध्ये ड्रायव्हींग लायसन्स नमुद केलेले नाही. तसेच मयत व्यक्ती ही स्वतः वाहनचालवत होती हे सिध्द न झाल्याने त्याबाबतची सामनेवाले यांची ड्रायव्हींग लायसन्सची मागणी करणे व त्याकामी बचाव घेणे रास्त नाही.
तक्रारदार यांनी ५/७ हक्काचे पत्रक, नि.५/८ वर खाते उतारा दाखल केलेला आहे. या वरील नोंदी पाहता अर्जदाराचे नाव वारस म्हणून लागलेले आहे. सबब मयत हे अपघाताच्या वेळी शेतकरी होते हे स्पष्ट होत आहे.
वरील सर्व कारणांचा व परिपत्रकांचा विचार होता सामनेवाले यांनी केवळ तांत्रिक बाबींचा आधार घेऊन तक्रारदार यांचा क्लेम नाकारला आहे. त्यामूळे सामनेवाला यांनी सेवा देण्यात कमतरता केली आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून मुददा क्रं. ३ चे उत्तर होकारार्थी देण्यात आले आहे.
९. मुद्दा क्र.४ - शासन परिपत्रकाप्रमाणे शेतक-यांचा अपघाती मृत्यु झाल्यास सामनेवाला क्र.३ यांनी रक्कम रू.१,००,०००/- ची विमा जोखीम स्वीकारलेली आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार हे सदर रक्कम व्याजासह मिळण्यास पात्र आहेत. याचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाला क्रं.३ यांचेकडून विमा क्लेमपोटी रक्कम रू.१,००,०००/- सदर आदेश तारखे पासून रक्कम फीटेपर्यंत द.सा.द.शे.९ टक्के दरा प्रमाणे व्याजासह अशी एकूण रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे या न्यायमंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्रं.४ चे उत्तर होकारार्थी देण्यात आले आहे.
१०. मुद्दा क्र.५ - तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून मानसिक, आर्थिक, शारिरिक त्रास व अर्जाच्या खर्चाची मागणी केली आहे. सामनेवाला क्रं.२ व ३ यांनी कोणत्याही तांत्रीक बाबीचा आधार न घेता तक्रारदाराचा विमा क्लेम योग्य वेळेत मंजूर केलेला नाही. त्याकामी तक्रारदार यांना या ग्राहक मंचात दाद मागावी लागलेली आहे. वरील कारणामुळे तक्रारदारास निश्चितच मानसिक त्रास व खर्च सहन करावा लागलेला आहे याचा विचार होता, तक्रारदार हे सामनेवाला क्र.२ व ३ यांचेकडून मानसिक त्रासापोटी रू.१,०००/- व अर्जाचा खर्च रू.५००/- मिळण्यास पात्र आहेत असे या न्यायमंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.५ चे उत्तर होकारार्थी देण्यात आले आहे.
११. मुद्दा क्र.६ तक्रारदार व सामनेवाले यांचे अर्ज, प्रतिज्ञापत्र व दाखल केलेली सर्व कागदपत्रे व दोन्ही वकीलांचा युक्तिवाद तसेच वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाला क्रं.१ यांच्या विरूध्द अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
३. सामनेवाला क्रं.२ व ३ यांनी, सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांचे आत, तक्रारदारांना खलील प्रमाणे रक्कमा दयाव्यात.
(१) विमा क्लेमपोटी रक्कम रू.१,००,०००/- (अक्षरी रूपये एक लाख मात्र)
व या रकमेवर आदेश दिनांकापासुन द.सा.द.शे. ९ टक्के दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत व्याज दयावे.
(२) मानसिक त्रासापोटी रक्कम रू.१,०००/- (अक्षरी रू. एक हजार मात्र) व
अर्जाचे खर्चापोटी रक्कम रू.५००/- (अक्षरी रू. पाचशे मात्र) दयावेत.
धुळे.
दि.३०/०९/२०१३.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.