जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे
तक्रार क्र.१४३/११ रजि.तारीखः- ०६/०९/११
निकाल तारीखः-२५/०९/१२
१. श्रीमती भवनाबाई गुलाबसिंग गिरासे
उ.व. ३० वर्षे, धंदा - घरकाम,
रा.देऊर, ता.साक्री जि.धुळे .......तक्रारदार
विरुध्द
१. कबाल जनरल इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रा.लि.
४ ए, देहमंदिर को-ऑप-हौसिंग सोसायटी,
श्रीरंगनगर, पंपीग स्टेशन रोड,
गंगापुर रोड, नाशिक - ४२२००२.
२. दि. ओरिएंटल विमा कंपनी लि.,
नागपुर, विभागीय कार्यालय,
शुक्ल भवन, वेस्ट हायकोर्ट रोड,
धरम पेठ, नागपुर – ४४००१०.
३. दि. ओरिएंटल विमा कंपनी लि.,
धुळे. ......विरुध्द पक्ष
कोरम - श्री.डी.डी.मडके, अध्यक्ष
सौ.एस.एस.जैन, सदस्या
तक्रारदार तर्फेः- अॅड.डी.व्ही. घरटे
विरुध्द पक्ष तर्फेः- अॅड.सी.के. मुगुल
नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराचा विमा दावा चुकीचे कारण देऊन नामंजुर करून सेवेत त्रृटी केली म्हणुन तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांचे पती गुलाबसिंग रामसिंग गिरासे हे शेतकरी होते. महाराष्ट्र शासनाचे राज्यातील सर्वखातेदार शेतक-यांच्या कल्याणासाठी विम्याचे संरक्षण असावे यासाठी दि.१५ ऑगस्ट २००९ ते १४ ऑगस्ट २०१० या कालावधीसाठी विरुध्द पक्ष क्र.२ व ३ दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी (यापुढे संक्षिप्ततेसाठी विमा कंपनी असे संबोधण्यात येईल) यांच्याकडे प्रती शेतकरी रु.८/- प्रमाणे प्रिमियमभरुन प्रत्येक शेतक-याचा रु.१,००,०००/- चा विमा उतरवला आहे. सदर योजनेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी विरुध्द पक्ष क्र.१ कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस यांची नियुक्ती केली आहे.
३. तक्रारदार यांनी पुढे असे म्हटले आहे की, त्यांचे पती दि.३०/०४/२०१० रोजी नंदुरबार दोंडाईचा रोडवर, मोटार सायकलने जात असताना लक्झरी क्रं.जी.जे.-१९ टी/८९८९ च्या ड्रायव्हरने हलगर्जीपणे वाहन चालवून अपघात घडवला. सदर अपघातास लक्झरीचा ड्रायव्हर कारणीभुत ठरला. कै.गुलाबसींग हे शेतकरी असल्यामुळे तक्रारदार यांनी तालुका कृषी अधिकारी साक्री यांच्याकडे सर्व कागदपत्रांसह विमा प्रस्ताव दाखल केला. कृषी अधिकारी यांनी तो कबालकडे पाठवला. परंतु विमा कंपनीने दि.२९/१२/२०१० रोजी चुकीचे कारण देऊन विमा दावा नाकारल्याचे पत्र दिले व सेवेत त्रुटी केली आहे.
४. तक्रारदार यांनी शेवटी विरुध्द पक्ष यांच्याकडून विम्याची रक्कम रु.१,००,०००/- व त्यावर १८ टक्के दराने व्याज, मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु.५०,०००/- आणि तक्रार अर्जाचा खर्च रु.५०००/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
५. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.३ वर शपथपत्र तसेच नि.६ वरील कागदपत्रांच्या यादीनुसार ६ कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.६/१ वर फिर्याद, नि.६/२ वर घटनास्थळ पंचनामा, ६/३ वर मरणोत्तर पंचनामा, नि.६/५ विमा दावा नाकारल्याचे पत्र आणि ६/६ वर ८/अ चा उतारा दिला आहे.
६. विरुध्द पक्ष क्र.१ कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस यांनी आपला खुलासा नि.८ वर दाखल केला आहे. त्यात कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हीसेस प्रा.लि. ही बीमा विनियामक और विकास प्राधिकरण भारत सरकार यांची अनुज्ञत्पि प्राप्त विमा सल्लागार कंपनी आहे. महाराष्ट्र राज्य शासनाला सदरील विमा योजना राबवण्यासाठी विना मोबदला सहाय करतो. यामध्ये मुख्यत्वे शेतक-यांचा विमा दावा अर्ज तालुका कृषी अधिकारी/तहसीलदार यामार्फत आमच्याकडे आल्यावर विमा दावा अर्ज योग्यपणे भरला आहे का? सोबत जोडलेली कागदपत्रे विमा कंपनीने मागणी केल्या प्रमाणे आहेत का? नसल्यास तालुका कृषी अधिकारी तहसीलदार यांना कळवून त्यांची पुर्तता करवून घेणे व सर्व योग्य कागदपत्रे मिळाल्यावर योग्य त्या विमा कंपनीकडे पाठवून देणे व विमा कंपनीकडून दावा मंजूर होवून आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे एवढाच आहे. यासाठी आम्ही राज्य शासन वा शेतकरी यांच्याकडून कोणताही मोबदला घेत नाही, तसेच कोणताही विमा प्रिमियम घेतलेला नाही असे म्हटले आहे.
७. कबाल इन्शुरनस कं. यांनी पुढे असे म्हटले आहे की, मयत गुलाबसिंग रामसिंग गिरासे रा.देऊर, ता.साक्री, जि.धुळे यांचा विमा प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवणेत आला होता. तो विमा कंपनीने नाकारला आहे व तसे तक्रारदारास कळवले आहे.
८. ओरिएन्टल विमा कंपनीने आपला खुलासा नि.१३ वर दाखल करुन तक्रारदार यांची तक्रार मुदतीत नाही, अर्जातील मागणी खोटी व बेकायदेशीर आहे तसेच मयत शेतकरी नव्हता त्यामुळे ती रद्द करावी अशी विनंती केली आहे.
९. विमा कंपनीने पुढे असे म्हटले आहे की, अपघात झाल्यानंतर योजनेचा फायदा घेणेकरीता तक्रारदार यांनी तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फत प्रस्ताव कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेसकडे पाठवणे आवश्यक आहे. तक्रारदार यांचा विमा प्रस्ताव कबाल मार्फत विमा कंपनीकडे आलेला नाही. त्यामुळे तयांनी सेवेत त्रुटी केली असे म्हणता येणार नाही. प्रस्ताव पाठवण्याबद्दल कुठलाही पुरावा तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही.
१०. विमा कंपनीने पुढे असे म्हटले आहे की, अपघात समयी कै. गुलाबसिंग हे मोटार सायकल क्र.एमएच-३९ डी/९०३४ चालवत होते. त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा वैध परवाना नव्हता. नियमानुसार त्यांच्याकडे परवाना असणे आवश्यक आहे. त्याबाबत शासनाने दि.२५/०५/०९ रोजी अटीमध्ये दुरुस्ती केली आहे.
११. विमा कंपनीने पुढे असे म्हटले आहे की, तक्रारदाराने मोटार अपघात न्यायाधिकरण येथे क्लेम दाखल केला होता. तो लायसन्स नाही म्हणून नामंजूर झाला आहे. शेवटी तक्रार अर्ज रद्द करावा अशी त्यांनी विनंती केली आहे.
१२. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे खुलासे व सबंधीत वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही
सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्दे उत्तर
१. विरुध्द पक्ष यांनी सेवेत त्रुटी
केली आहे काय? होय.
२. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिम आदेशा प्रमाणे.
३. आदेश काय? खालील प्रमाणे.
विवेचन
१३. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांचे पती कै.गुलाबसिंग यांचा मोटार अपघातामध्ये मृत्यु झाला व त्यांनी विमा प्रस्ताव कृषी अधिकारी साक्री मार्फत कबाल जनरल इन्शुरन्स सर्व्हिसेस व त्यांचेकडून विमा कंपनीकडे पाठवला. विमा कंपनीने सदर प्रस्ताव नामंजुर केल्याचे पत्र दि.२९/१२/१० रोजी पाठविले हे नि.६/६ वरून दिसुन येते. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार विमा कंपनीने चुकीचे कारण देऊन विमा दावा नाकारला आहे तर विमा कंपनीने सदर कारण योग्य आहे असा युक्तीवाद केला.
१४. वरील परस्पर विरोधी म्हणणे पाहता विमा कंपनीने विमा नाकारण्यासाठी दिलेले कारण काय आहे हे पाहणे आपश्यक ठरते. सदर पत्र नि.६/६ वर आहे. त्यात पुढील मजकुर आहे.
The above claim has been repudiated due to following reason. At the time of accident victim was having learners licence & drive without pillion rider having knowledge & holding permanent licence. Hence it comes under policy exclusion.
१५. आम्ही महाराष्ट्र शासनाचे दि.०६/०९/०८ च्या परिपत्रकाचे व त्यातील नियम व अटींचे अवलोकन केले आहे. त्यात असे नमुद आहे.
ई) विमा कंपन्या
५) अपघातग्रस्त वाहनचालकाचे चुकीमुळे शेतक-यांचा मृत्यु झाल्यास/ अपंगत्व आल्यास दोषी वाहनचालक वगळता सर्व शेतक-यांना प्रपत्र ‘ड’ मध्ये नमुद केलेल्या बाबींमुळे मृत्यु/ अपंगत्व आल्यास केवळ अपघात झाला या काणास्तव भरपाई दावे मंजुर करण्यात येतील.
६) अपघाती मृत्यु संदर्भात दुर्घटना घडल्याचे सिध्द झाल्यास अनावश्यक धोका पत्कारला या कारणास्तव एकही प्रकरण नाकारता येणार नाही.
तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेल्या नि.६/१ वरील फिर्याद दि.३०/०४/१० चे अवलोकन केले असता त्यात पुढील मजकुर आहे.
१६. तरी आज दि.३०.०४.२०१० रोजी सायंकाळी ६.३० वाजता नंदुरबार दोंडाईचा रोडवर चौपाळे शिवारात लक्ष्मण गवळी यांचे शेताजवळ नंदुरबार कडुन दोंडाईचाकडे जात असलेला मोटार सायकल स्वार गुलाब रामसिंग गिरासे वय ३५ यास दोंडाईचा गावाकडुन भरधाव वेगात येणारी लक्झरी बस क्रं. जी.जे.१९ टी/८९८९ वरील स्वार हिलाल भंगासे वय ३३ रा.दबाने ता.सिंदखेडा जि.धुळे याने ठोस मारुन त्याचे मरणास कारणीभुत झाला असा उल्लेख आहे. तसेच मरणास पोलीस स्टेशन नंदुरबार तालुका येथे लक्झरीच्या चालकाविरुध्द गुन्हा क्र.२५/१० कलम ३०४(अ) ४२७ भ.दं.वि. व मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवुन चार्जशिट दाखल केले आहे. यावरून सदर अपघात बसचालकाच्या चुकीमुळे झाल्याचे दिसुन येते.
१७. मा.सर्वोच्च न्यायालय, मा.राष्ट्रीय आयोग आणि मा.महराष्ट्र राज्य आयोग यांनी अनेक न्यायिक दृष्टांतामध्ये तांत्रिक कारणावरुन विमा दावे नाकारु नयेत असे मत व्यक्त केलेले आहे.
१८. या संदर्भात आम्ही खालील न्यायिक दृष्टांताचा आधार घेत आहोत.
१. 2008 CTJ 680National Insurance Company Ltd. V/s Nitin Khandelwal
२. (2003)6 SCC 420 Jitendra Kumar Vs Oriental Insurance Co.Ltd.
१९. वरील विवेचनावरुन विमा कंपनीने तक्रारदार यांना विम्याचे लाभ न देऊन सेवेत त्रुटी केली आहे या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
२०. मुद्दा क्र.२ - तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून विम्याची रक्कम रु.१,००,०००/- व त्यावर १८ टक्के दराने व्याज, मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु.५०,०००/- आणि तक्रार अर्जाचा खर्च रु.५०००/- मिळावे अशी मागणी केली आहे. कबाल इन्शुरन्स यांनी मा.राज्य आयोग अपील क्र.१११४/०८ कबाल इन्शुरन्स विरुध्द सुशिला सोनटक्के हा न्यायिक दृष्टांत दाखल केला आहे व ते रक्कम देण्यास जबाबदार नाहीत असे म्हटले आहे. आम्ही सदर निकालपत्राचे बारकाईने अवलोकन केले आहे. त्यात मा.राज्य आयोग यांनी कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांना पॉलिसीची रक्कम देण्यास जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्व वीषद केले आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.१ यांच्या विरुध्द रक्कम देण्याचा आदेश करता येणार नाही. आमच्या मते तक्रारदार हे विमा कंपनीकडून विमा रक्कम रु.१,००,०००/- मिळण्यास पात्र आहेत. तसेच तक्रारदार यांना तक्रार दाखल करण्यास खर्च व मानसिक त्रास होणे साहजिक आहे. म्हणून तक्रारदार मानसिक त्रासापोटी रु.३०००/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.२०००/-मिळण्यास पात्र आहेत.
२१. मुद्दा क्र.३ - वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. विरुध्द पक्ष ओरिएन्टल इन्शुरन्स कं.लि. यांनी तक्रारदारास रक्कम रु.१,००,०००/- या आदेशाच्या प्राप्ती पासून ३० दिवसाच्या आत द्यावेत.
३. विरुध्द पक्ष ओरिएन्टल इन्शुरन्स कं.लि. यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.३०००/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.२०००/- या आदेशाच्या प्राप्ती पासून ३० दिवसाच्या आत द्यावेत.
४. विरुध्द पक्ष ओरिएन्टल इन्शुरन्स कं.लि. यांनी उपरोक्त आदेश मुदतीत रक्कम न दिल्यास रु.१,००,०००/- वर दि.२५/०९/२०१२पासून द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज दयावे.
(सौ.एस.एस.जैन) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे.