(मंचाचे निर्णयान्वये, श्री.सादिक मो.जव्हेरी, मा.सदस्य) (पारीत दिनांक : 22.09.2011) अर्जदार हिने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 1. अर्जदाराचे पती शेतकरी होते. शासकीय नियमानुसार शेतकरी जनता विमा योजनेअंतर्गत अर्जदाराचे पती गैरअर्जदार क्र.1 ते 3 चे ग्राहक आहेत. अर्जदाराचे पती, श्री गुरुदेव महादेवराव बोदलकर यांचा दि.28.12.09 रोजी अपघाती मृत्यु झाला. त्यामुळे, या विमा योजनेचा विमा क्लेम अर्जदाराला मिळावे म्हणून अर्जदाराने आपलया पतीचे मृत्युचे सर्वच कागदपञ गैरअर्जदार क्र.3 नी दि.12.3.2010 रोजी स्विकारल्यानंतर त्यांचे मुख्य कार्यालयात गैरअर्जदार क्र.2 कडे पाठविले. त्यानंतर, गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदारास दि.29.2.10 रोजी लेखी पञ देवून प्रतिज्ञापञ रुपये 20/- च्या स्टॅम्पवर गैरअर्जदार क्र.2 चे कार्यालयास अर्जदाराने नेवून दिले. ड्रायव्हींग लायसन्स संबंधी अर्जदारास त्यांचे पतीचे कागदपञे मिळून आले नाही असे गैरअर्जदार क्र.2 यास अर्जदाराकडून सांगण्यात आले. 2. शेतकरी जनता अपघात विमा योजनेचा अर्जदाराचा विमा क्लेम मिळण्याचा प्रस्ताव गैरअर्जदार क्र.4 यांनी घाईगडबडीने व बेकायदेशीरपणे नाकारला, ही बाब गैरअर्जदार क्र.4 ची अनुचीत व्यापार पध्दत आहे. त्यामुळे, विमा क्लेमवर गैरअर्जदार क्र.4 यांनी पुर्नरविचार करुन अर्जदार यास विमा क्लेम देणे गरजेचे आहे. 3. अर्जदाराने, गैरअर्जदार क्र.2 व 3 यास प्रस्तावासंबंधी माहिती विचारले असता, गैरअर्जदार क्र.2 यांनी, तसेच गैरअर्जदार क्र.3 यांनी विमा क्लेम मिळण्याचा प्रस्ताव गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे पाठविला आहे, तेंव्हा विमा क्लेम मिळण्यासंबंधी अर्जदारास गैरअर्जदार क्र.1 कडून पञ येणार असे अर्जदारास सांगितले. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी वेळेवर गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे विमा क्लेम मिळण्याचा प्रस्ताव पाठविला नाही. तसेच, गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराचे पतीच्या अपघाती मृत्युचे शेतकरी जनता विमा योजना नुसार विमा क्लेमच्या प्रस्तावावर विमा क्लेम अर्जदारास वेळेवर मिळाला नाही, ही तीनही गैरअर्जदार यांची सेवेतील न्युनता आहे. अर्जदाराचे प्रकरणात नुकसान भरपाई देतांना गैरअर्जदार क्र.4 हे समप्रमाणात दोषी असल्याने त्यांना सुध्दा नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे. 4. अर्जदारास तीच्या पतीचा विमा क्लेम तातडीने न दिल्याने अर्जदार ही मिळणा-या विमा क्लेमपासून वंचीत राहीली. त्यामुळे, अर्जदारास शारीरिक व मानसिक ञास झाला. त्यामुळे, अर्जदाराने पतीचा अपघाती मृत्यु झाल्याने शेतकरी जनता विमा योजनानुसार विमा क्लेम अर्जदारास मिळण्याचा आदेश व्हावा. अर्जदारास शारीरिक व मानसिक ञासापोटी रुपये 50,000/- व तक्रार खर्च रुपये 10,000/- गैरअर्जदार क्र.1 ते 3 कडून संयुक्त व वेगवेगळेपणे मिळण्याचा आदेशा व्हावा, अशी मागणी केली आहे. 5. अर्जदाराने निशाणी क्र.5 नुसार 20 दस्ताऐवज दाखल केले आहे. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 ने निशाणी क्र.9 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 व 3 ने निशाणी क्र.8 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.4 ने निशाणी क्र.17 नुसार लेखी उत्तर दाखल केले.
6. गैरअर्जदार क्र.1 ने लेखी बयानात नमूद केले की, गैरअर्जदार केवळ सल्लागार आहेत व राज्य शासनास विना मोबदला साह्य करतो. कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि. ही बिमा विनियामक और विकास प्राधिकरण भारत सरकार यांची अनुज्ञत्पि प्राप्त विमा सल्लागार कंपनी आहे. यामध्ये, मुख्यत्वे शेतक-यांचा विमा दावा अर्ज तालुका कृषि अधिकारी/तहसिलदार या मार्फत आंमच्याकडे आल्यावर विमा दावा अर्ज योग्यपणे भरला आहे कां ? सोबत जोडलेली कागदपञे विमा कंपनीने मागणी केल्याप्रमाणे आहेत कां ? नसल्यास तालुका कृषिअधिकारी, तहसिलदार यांना कळवून त्यांची पुर्तता करवून घेणे व सर्व योग्य कागदपञे मिळाल्यावर योग्य त्या विमा कंपनीकडे पाठवून देणे व विमा कंपनीकडून दावा मंजूर होवून आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे, एवढाच आहे. यासाठी गैरअर्जदार राज्य शासन वा शेतकरी यांच्याकडून कोणताही मोबदला घेत नाही, तसेच यासाठी कोणताही विमा प्रिमियम घेतलेला नाही. मय्यत गुरुदेव महादेव बोधलकर, गाव – जांब, तालुका – सावली, जिल्हा – चंद्रपुर सदरील अपघात हा दिनांक 28.12.09 रोजी झाला व सदरी प्रस्ताव हा कार्यालयास दि.18.11.2010 रोजी प्राप्त झाला. सदरील प्रस्ताव हा 19.11.2010 रोजी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, नागपुर यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला. सदर प्रस्ताव हा विमा कंपनीने नामंजुर केला असून, तसे अर्जदाराला दि.31.12.2010 च्या पञानुसार कळविले आहे. गैरअर्जदारास, कारण नसतांनाही तक्रारीस सामोरे जाण्यास भाग पाडल्याने अर्जाचा खर्च योग्यत्या दोषीकडून रुपये 5000/- देण्याचा आदेश व्हावा. गैरअर्जदाराची तक्रारीतून निर्दोष मुक्तता करण्यात यावी, अशी विनंती केली. 7. गैरअर्जदार क्र.2 व 3 ने लेखी बयानात नमूद केले की, शेती व्यवसाय करतांना होणारे रस्त्यावरील अपघात, तसेच विज पडणे, विजेचा शॉक बसणे, पुर, सर्पदंश, विंचु दंश व वाहन अपघात, तसेच कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, त्यामुळे ब-याच शेतक-यांचा मृत्यु ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्ता व्यक्तीस झालेल्या सदर अपघातामुळे कुंटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होत असल्याने अशा अपघात ग्रस्त शेतक-यास त्याच्या कुंटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता शेतकरी अपघात विमा योजना दिनांक 10 जानेवारी 2005 पासून राज्यात सुरु केली आहे. राज्यातील 12 ते 75 वयोगटातील नोंदणीकृत शेतक-यांना अपघाती मृत्यु आल्यास रुपये 1,00,000/- किंवा अपंगत्व आल्यास प्रकरण परत्वे रुपये 50,000/- ते 1,00,000/- पर्यंत नुकसान भरपाई अदा करण्यात येते. 8. अर्जदाराचे पती मय्यत गुरुदेव महादेव बोधलकर यांचा दि.28.12.2009 रोजी मोटार सायकल अपघातात मृत्यु झाला असल्याने मय्यत गुरुदेव महादेव बोधलकर यांचा विमा प्रस्ताव सन 2009-10 या कालावधीत येतो. अर्जदार वर्षा गुरुदेव बोधलकर यांचा प्रस्ताव गैरअर्जदार क्र.2 कडे आवक क्र.2203 दि.15..3.2010 ला प्राप्त झाला, त्यानुसार शासन निर्णयाच्या अटी व शर्तीनुसार प्रस्तावाची छानणी केला असता, प्रस्तावामध्ये 1) रुपये 20/- स्टॅम्पवर विहीत नमुन्यात प्रतिज्ञापञ (प्रपञ ग), 2) वाहन चालविण्याचा परवाना प्रस्तावामध्ये ञुटी होत्या, त्यामुळे यांचा प्रस्ताव गैरअर्जदार क्र.3 कडे पञ क्र.1162/2010 दि.29.3.2010 अन्वये ञुटीची पुर्तता करण्याकरीता प्रस्ताव परत करण्यात आला. त्यानंतर, अर्जदाराने ञुटीची पुर्तता न करताच फक्त प्रतिज्ञापञ (प्रपञ ग) जोडून पुन्हा प्रस्ताव दि.12.11.2010 ला गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे सादर केला. गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदाराचा प्रस्ताव पञ क्र.3683/2010 दि.15.11.2010 अन्वये गैरअर्जदार क्र.1 कबाल इन्शुरन्स बोकिंग सर्व्हीसेस प्रा.लि.,नागपुर या सल्लागार कंपनीकडे पाठविण्यात आला. शासन निर्णय क्र.शेअवि-2009/प्र.क्र.268/11अ, दि.12.8.2009 प्रधान सचिव (कृषि) यांचे कृषि व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग मंञालय, मुंबई-32 दि.30.9.09 चे मार्गदर्शक सुचना मधील मुद्दा क्र.21. नुसार जर शेतक-याचा मृत्यु वाहन अपघातामुळे झाला असेल व अपघात ग्रस्त शेतकरी स्वतः वाहन चालवित असेल तर अशा प्रकरणी वैध वाहन चालविण्याचा परवाना सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे, मय्यत गुरुदेव महादेव बोधलकर यांचेकडे वैध वाहन चालविण्याचा परवाना नसल्यामुळे युनाईटेड इन्शुरन्स कंपनीने मय्यत गुरुदेव महादेव बोधलकर यांचा विमा प्रस्ताव नाकारल्याचे विमा सल्लागार कंपनीच्या अहवालावरुन दिसून येते. यामध्ये गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचा कुठेही विलंबाबाबत संबंध नसल्याने त्यांनी तक्रारद यांना दिलेल्या सेवेत न्युनता दिसून येत नाही. शेतकरी अपघात विमा योजनेचा क्लेम मिळण्यासाठी आवश्यक कागदपञाची संबंधिताकडून पुर्तता करुन घेणे म्हणजेच तक्रारदारास मानसिक व शारीरिक ञास झाला असे म्हणता येत नाही. त्यामुळे, अर्जदाराच्या वक्तव्यास गैरअर्जदार सहमत नाही. 9. गैरअर्जदार क्र.4 ने लेखी बयानातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदाराकडून क्लेम फार्म सादर करण्यांत आला नाही. तसेच, पॉलिसीच्या अटी व शर्थीप्रमाणे अर्जदाराचा क्लेम नियमबाह्य असल्यामुळे नामंजूर करण्यात आला व तसे लेखी कळविण्यात आले. गैरअर्जदार ही पब्लीक सेक्टर कंपनी आहे. पब्लीक मनीचा गैरवापर होऊ नये म्हणूनच पॉलिसीच्या अटी व शर्तीचे अधीन राहून संपूर्ण कामकाज सुचारु पध्दतीने केल्या जाते. पॉलिसीमधील लिमिटेशन क्लॉज हा महत्वपूर्ण असून तो सर्वांवर बंधनकारक आहे. मय्यताचा मृत्यु मोटार वाहन चालवितांना झालेला आहे. मोटार वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेला परवाना मृतकाकडे नव्हता व त्यामुळे, त्याच्या वारसांनी क्लेम पेपर्स सहीत वारंवार मागणी करुनही सादर केलेला नाही. ज्याअर्थी, मृतकाकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता, त्याअर्थी तो मोटार वाहन चालविण्यास सक्षम व पाञ नव्हता. म्हणून अर्जदाराची मागणी गेरअर्जदार इंशुरन्स कंपनीने अमान्य केलेली आहे व तसे संबंधिताना कळविले आहे. महाराष्ट्रातील कोणताही शेतकरी जातीने स्वतः कधीच प्रिमियमची रक्कम विमा कंपनीकडे भरणा करीत नाही. त्यामुळे, त्याचे वारसांना सकृतदर्शनी नुकसान भरपाई फक्त विमा कंपनीकडून मागण्याचा हक्क व अधिकार नाही. अर्जदाराची तक्रार मुळतः नियमबाह्य असल्यामुळे खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली आहे. 10. अर्जदाराने निशाणी क्र.22 नुसार अतिरिक्त शपथपञ दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 व 3 ने यापूर्वीच मुद्देनिहाय अभिप्राय सादर करण्यात आला आहे, त्यालाच शपथपञाचा भाग समजण्यात यावा अशी पुरसीस निशाणी क्र.19 नुसार दाखल केली. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, लेखी बयान, शपथपञ, तसेच उभय पक्षांनी व त्यांच्या प्रतिनिधी/वकील यांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. @@ कारणे व निष्कर्ष @@ 11. अर्जदार बाईने सदर तक्रार शेतकरी अपघात विमा दाव्यासाठी दाखल केली असून, अर्जदार बाईने तिचे मय्यत पती गुरुदेव महादेव बोदलकर यांचा दि.18.2.2009 रोजी मोटर सायकल स्वतः चालवीत असतांना अपघात होऊन मृत्यु झाल्यानंतर अर्जदार बाईने, गैरअर्जदार क्र.2 कडे दि.15.3.2010 ला विमादावा सर्व दस्तवेज सोबत दाखल केलेला आहे. 12. गैरअर्जदार क्र.2 ने सदर प्रस्ताव दाखल झाल्यानंतर अर्जदारास शासन निर्णयाच्या अटी व शर्तीनुसार प्रस्तावाची छाननी करुन प्रस्तावामध्ये असलेली ञुटी (1) रुपये 20/- चे स्टॅम्पवर विहीत नमुन्यात प्रतिज्ञापञ (प्रपञ-ग) व (2) वाहन चालविण्याचा परवानासाठी, हे दोन दस्ताऐवजाची पुर्तता करण्यासाठी पञ गैरअर्जदार क्र.3 मार्फत दिले असून सुध्दा, अर्जदाराने फक्त प्रतिज्ञापञ जोडून पुन्हा प्रस्ताव दि.12.11.2010 ला गैरअर्जदार क्र.2 कडे सादर केला. 13. गैरअर्जदार क्र.2 ने, सदर प्रस्ताव गैरअर्जदार क्र.1 मार्फत गैरअर्जदार क्र.4 विमा कंपनीकडे पाठविलेला आहे. गैरअर्जदार क्र.1, 2 व 3 ने नियमानुसार प्राप्त झालेल्या शेतकरी अपघात विमा दावा गैरअर्जदार क्र.4 कडे पाठविलेला आहे व त्यांनी कुठेही अर्जदारास सेवा देण्यात न्युनता केलेली नाही, असे दाखल दस्ताऐवजा वरुन दिसून येते. 14. गैरअर्जदार क्र.4 ने] गैरअर्जदार क्र.1, 2 व 3 कडून, प्राप्त झालेल्या विमा दावा अर्जदाराने मय्यत गुरुदेव बोदलकर याचा वाहन चालविण्याचा परवाना दाखल न केल्यामुळे, अर्जदाराचा विमा दावा मुदतीत नसल्यामुळे खारीज केल्याचे कळविले आहे. गैरअर्जदार क्र.4 ने आपल्या लेखी उत्तरात व युक्तीवादात असे म्हटले आहे की, शासन निर्णय क्र.शेअवि-2009/प्र.क्र.268/11अ, दि.12.8.2009 प्रधान सचिव (कृषि) यांचे कृषि व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग मंञालय, मुंबई-32 दि.30.9.09 चे मार्गदर्शक सुचना मधील मुद्दा क्र.21. नुसार जर शेतक-याचा मृत्यु वाहन अपघातामुळे झाला असेल व अपघात ग्रस्त शेतकरी स्वतः वाहन चालवित असेल तर अशा प्रकरणी वैध वाहन चालविण्याचा परवाना सादर करणे आवश्यक आहे. अर्जदाराने शासन निर्णयानुसार अटीचे पालन केलेले नाही, हे सिध्द होते. 15. एकंदरीत, अर्जदार बाईस, गैरअर्जदार क्र.2 व 3 व्दारे कळविल्यानंतर ही अर्जदार बाईने शासन निर्णयाचे अटीनुसार वाहन चालविण्याचा परवाना नसल्याबद्दल कुठलेही दस्तावेज, शपथपञ पुरावा दिलेला नाही. शासन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने दाखल केलेली ही तक्रार गृहीत धरण्यासारखी नाही, असे या न्यायमंचाचे मत असून, या तक्रारीचा अंतिम आदेश खालील प्रमाणे देण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार खारीज. (2) अर्जदार व गैरअर्जदारांनी आपआपला खर्च सोसावा. (3) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
| [HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member | |