(घोषित दि. 21.11.2011 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष)
विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तिचे पती वामनराव घायवट हे शेतकरी होते. तिच्या पतीचे दिनांक 24.05.2010 रोजी उष्माघाताने निधन झाले. तिच्या पतीचे निधन झाले त्यावेळी महाराष्ट्र शासनाने सर्व शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 2 युनायटेड इन्शुरन्स कंपनी लि. यांच्याकडे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा पॉलीसी अंतर्गत विमा उतरविलेला होता. सदर विमा पॉलीसीच्या कालावधीमध्येच तिच्या पतीचे अपघाती निधन झाल्यामुळे तिने तालुका कृषी अधिका-या मार्फत गैरअर्जदार विमा कंपनीकडे दिनांक 11.11.2010 रोजी विमा दावा दाखल केला होता. शेतकरी अपघात विमा पॉलीसीमधील तरतुदीनुसार गैरअर्जदार विमा कंपनीने विमा दावा प्राप्त झाल्यानंतर तो एक महिन्याच्या आत निकाली काढणे बंधनकारक आहे. परंतू गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीने तिचा विमा दावा दिनांक 11.11.2010 रोजी दाखल झालेला असुनही अद्याप विमा रक्कम अदा केली नाही. अशा प्रकारे गैरअर्जदारांनी त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, तिला गैरअर्जदार विमा कंपनीकडून विमा रक्कम रुपये 1,00,000/- व मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी नुकसान भरपाई देण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 1 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्याचे म्हणणे असे आहे की, वामन घायवट यांच्या अपघाती मृत्युबाबत त्यांच्याकडे कोणताही विमा दावा दाखल झालेला नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन सदर प्रकरण अपघाती मृत्यू संदर्भातील नसुन नैसर्गिक मृत्यू संदर्भातील आहे आणि पॉलीसीनुसार केवळ अपघाती मृत्यू असेल तरच विमा संरक्षण लागू आहे. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदाराने केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. विमा कंपनीचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने तिच्या पतीचा अपघाती मृत्यू झाल्याबाबत कोणताही अहवाल दाखल केलेला नाही. तक्रारदाराच्या पतीचे नाव 7/12 अभिलेख्यामध्ये पॉलीसी सुरु झाल्यानंतर नमूद करण्यात आलेले असुन, शेतकरी अपघात विमा पॉलीसीचे संरक्षण ज्या शेतक-याचे नाव पॉलीसी सुरु झाली त्या दिवशी 7/12 अभिलेख्यामध्ये नमूद केलेले होते त्यांनाच लागू आहे. तक्रारदाराच्या पतीने स्वत: विमा उतरविलेला नसुन महाराष्ट्र शासनाने शेतक-यांचा विमा उतरविलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाला या प्रकरणात पक्षकार करणे आवश्यक होते. परंतू तक्रारदाराने शासनाला पक्षकार केलेले नसल्यामुळे प्रस्तुत तक्रार आवश्यक पक्षकारा अभावी अयोग्य आहे. तसेच तक्रारदाराने पॉलीसीमधील तरतुदीनुसार घटनेबाबत त्वरीत माहिती दिलेली नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी विमा कंपनीने केली आहे.
दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1.गैरअर्जदार विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? नाही
2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणे
मुद्दा क्रमांक 1 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड.आर.व्ही.जाधव आणि गैरअर्जदार विमा कंपनीच्या वतीने अड.संदिप देशपांडे यांनी युक्तीवाद केला.
तक्रारदाराचे पती वामनराव घायवट यांचे उष्माघाताने निधन झाल्याचे सिध्द् करण्यासाठी तक्रारदाराने पोलीसांनी केलेला घटनास्थळ पंचनामा आणि शवविच्छेदन अहवाल व रासायनिक विश्लेषण अहवाल दाखल केलेला आहे. परंतू सदर पुराव्यावरुन तिच्या पतीचे निधन उष्माघाताने झाल्याचे सिध्द् होत नाही. उलटपक्षी सदर पुरावा पाहता तिच्या पतीचे निधन ह्दयास झटका बसल्याने झाल्याचे दिसुन येते. तक्रारदाराने दाखल केलेल्या शवविच्छेदन अहवालामध्ये कोठेही तिच्या पतीचे निधन उष्माघाताने झाल्याचे नमुद केलेले नाही. यावरुन तक्रारदाराच्या पतीचे निधन नैसर्गिकरित्या झाल्याचे दिसते. म्हणून ती शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यास पात्र नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीने तिचा विमा दावा फेटाळून त्रुटीची सेवा दिल्याचे म्हणता येणार नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले.
म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.