निकालपत्र :- (दि.17/08/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) तक्रार स्विकृत करुन सामनेवालांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीस लागू होऊन ते वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले.सामनेवाला तर्फे लेखी युक्तीवाद दाखल. तक्रारदाराचा युक्तीवाद ऐकणेत आला.युक्तीवादाच्या वेळेस सामनेवाला गैरहजर. सदरची तक्रार ही सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या ठेवीच्या रक्कमेवरील व्याज न दिलेने दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-अ) सामनेवाला क्र.1 ही महाराष्ट्र सहकारी कायदयानुसार नोंद झालेली सहकारी संस्था असून तीच्या विविध ठिकाणी शाखा आहेत. मुख्य कार्यालय कोडोली येथे असून पैकी एक शाखा शिरोळ येथे आहे. नमुद संस्थेचा मुख्य उद्देश ठेवी स्विकारणे व त्याचा पुरवठा करणे असा आहे. तक्रारदार हे शिरोळ येथील कायमचे रहिवाशी आहेत.
ब) तक्रारदाराचे चुलते पांडूरंग तुकाराम माने हे मिलीटरीमध्ये नोकरीस होते. ते सेवानिवृत्त झालेनंतर प्रॉव्हीडंट फंड, ग्रॅज्युएटी व इतर रक्कमा मिळाल्या होत्या. त्या त्यांनी सामनेवाला क्र.1यांचे शिरोळ शाखेत म्हणजेच सामनेवाला क्र.2यांचेकडे मुदत बंद ठेव, सेव्हींग, रिकरींग खाते यामध्ये ठेवलेल्या होत्या. नमुद शाखाधिका-यांनी एकाच व्यक्तीच्या नांवे रक्कमा ठेवू नका असा सल्ला दिल्याने सदर रक्कमा त्यांचे स्वत:चे नावे व इतर नातेवाईकांचे नांवावर ठेवल्या होत्या. मात्र खात्यावर व्यवहार करणेचे अधिकार स्वत:कडे राखून ठेवले होते व सर्व पावत्या त्यांचेकडे ठेवल्या होत्या. त्यांना मुलगा नलसेने सख्या भावाच्या मुलांनाच म्हणजे तक्रारदारांना मुलांप्रमाणे वागणूक देत होते व ते त्यांचेकडे राहत होते व त्यांचेकडे राहत असताना दि.24/02/2005रोजी मयत झालेले आहेत.त्यांचे मृत्यू नंतर ठेव पावत्या घेवून तक्रारदार सामनेवाला शाखाधिकारी यांचेकडे जाऊन तक्रारदार हे नॉमिनी असलेने त्यांचेंकडे ठेवीची मागणी केली असता रक्कमा दिल्या नाहीत. त्याबाबत ग्राहक न्यायालयात त्यांनी दाद मागितली व रितसर तक्रार अर्ज दाखल केला. ठेव पावत्या तक्रारदाराच्या नांवे असलेने मे.मंचाने त्यांना रक्कम देणेचा आदेश केला व सदर आदेशा प्रमाणे ठेवीच्या रक्कमा व्याजासह परत दिल्या. मात्र प्रस्तुत प्रकरणातील काही ठेव पावत्या हया पांडूरंग तुकाराम माने, ऋतुजा गुंडुराव बादल, अस्मिता गुंडराव बादल यांचे नांवे होत्या व त्या ठेव पावत्यांच्या बाबतीत मे.मंचाने 106/2007चे कामी दि.27/02/2007रोजी आदेश पारीत करुन दिवाणी न्यायालयातून वारस दाखला घेणेबाबत सुचविले होते. त्याप्रमाणे जयसिंगपूर येथे दिवाणी न्यायालयात अर्ज क्र.14/2007 दाखल केला व त्यावर दि.05/09/2009 रोजी तक्रारदारांना व खालील नमुद ठेवीदार यांना वारस दाखला दिलेला आहे. अ. क्र. | खाते पान | ठेवीदाराचे नांव | मुदत संपलेला दि. | ठेव रक्कम | होणारे व्याज | एकूण रक्कम | 01 | 282/9 | पाडूरंग तुकाराम माने | 07/05/05 | 25,000/- | 3,254/- | 28,254/- | 02 | 284/9 | पाडूरंग तुकाराम माने | 07/05/05 | 10,000/- | 1,302/- | 11,302/- | 03 | 289/9 | ऋतुजा गुंडा बादल | 07/05/05/ | 25,000/- | 3,254/- | 28,254/- | 04 | 291/9 | अस्मिता गुंडा बादल | 07/05/05/ | 25,000/- | 3,254/- | 28,254/- | 05 | 294/9 | अस्मिता गुंडा बादल | 07/05/05/ | 25,000/- | 3,254/- | 28,254/- | 06 | 295/9 | ऋतुजा गुंडा बादल | 07/05/05/ | 25,000/- | 3,254/- | 28,254/- | 07 | 298/9 | अस्मिता गुंडा बादल | 07/05/05/ | 25,000/- | 3,254/- | 28,254/- | 08 | 170/7 | पाडूरंग तुकाराम माने | 07/05/05 | 25,000/- | 3,254/- | 28,254/- | 09 | 172/7 | पाडूरंग तुकाराम माने | 07/05/05 | 25,000/- | 3,254/- | 28,254/- | 10 | 94/1 | पांडूरंग तुकाराम माने | रिकरींग | 21,000/- | 1,575/- | 22,575/- | 11 | 194/1 | पांडूरंग तुकाराम माने | सेव्हींग | 5,970/- | 149/- | 6,119/- | | | | एकूण - | 2,36,970/- | 29,058/- | 2,66,028/- |
क) सदर वारस दाखला घेतलेची कल्पना सामनेवाला क्र.2 चे शाखाधिकारी यांना दिली त्यावेळी त्यांनी अस्सल ठेव पावत्या व पासबुके घेऊन या तुमच्या रक्कमा देतो असे सांगितलेने तक्रारदार हे सामनेवाला क्र.2 यांचेकडे गेले सामनेवालांनी सदर कागदपत्र ताब्यात घेऊन हिशोब करुन रक्कम रु.2,66,028/- इतकी रक्कम दिली. मात्र तदनंतर तक्रारदाराने हिशोबाची पडताळणी केली असता तक्रारदारांना ठेव पावत्यांची मुदत संपलेनंतर म्हणजेच दि.07/05/2005 पर्यंतचे 12 टक्के प्रमाणे व्याजाचा हिशोब करुन मुदत बंद ठेवीची रक्कम दिली. तसेच सेव्हींग व रिकरिंग खातेवर एक वर्षाचे 6 टक्के दराने होणारे एक वर्षाची व्याजची रक्कम दिली. वास्तविक दि.27/11/2009 पर्यंत मुदत बंद ठेव पावत्यांवर व्याजासह होणारी रक्कम तसेच सेव्हींग व रिकरींग खातेवर दि.27/11/2009पर्यंत होणारी व्याजाची रक्कम देणे आवश्यक असतानाही ती दिलेली नाही. सामनेवाला यांनी अनुचित व्यवसायिक पध्दतीचा अवलंब करुन तक्रारदाराची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे तक्रारदारास शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे. दि.08/01/2010 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवून नमुद व्याजाची मागणी केली असता दि.25/01/2010 रोजी सामनेवाला यांनी त्यास उत्तर दिलेले आहे. त्यामुळे प्रस्तुतचा अर्ज दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करून मुदत बंद ठेव पावत्यांवरील दि.27/11/2009 पर्यंतची व्याजाची रक्कम रु.1,14,953/-,सेव्हींग खाते वर नमुद तारखेअखेर व्याजाची रक्कम रु.1,462/-,रिकरिंग खातेवरील व्याजाची रक्कम रु.7,560/-,शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-,नोटीसीचा खर्च रु.1,500/-असे एकूण रक्कम रु.1,35,475/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत मे.दिवाणी न्यायाधिश, वरिष्ठ स्तर जयसिंगपूर यांचे न्यायालयातून घेतलेला वारसाचा दाखला, सामनेवाला संस्थेने तक्रारदार यांना कै.पांडूरंग तुकाराम माने यांचे ठेवी व होण-या व्याजाच्या रक्कमेबाबत दिलेली माहिती पत्रकाची प्रत, सामनेवाला यांना वकीलांमार्फत पाठविलेली नोटीस, त्यास सामनेवाला यांनी दिलेले उत्तर इत्यादी कागदपत्रे व रिजॉइन्डर दाखल केला आहे. (4) सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणेत तक्रारदाराचे ठेवीच्या, सेव्हींगच्या व रिकरींगच्या रक्कमां वगळता इतर कथने नाकारलेली आहेत. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे असे सांगतात, पांडूरंग माने हे दि.24/02/2001 रोजी मयत झाले व सदरच्या नमुद ठेव पावत्या, सेव्हींग व रिकरींग खातेवरील रक्कमा तक्रारदार यांनी मागितल्या होत्या. परंतु सामनेवाला प्रस्तुत तक्रारदार यांना वारसा दाखला देणेबाबत सांगितले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी मे.सिव्हील जज्ज, सिनियर डिव्हीजन जयसिंगपूर यांचे कोर्टात 14/2007 चा दावा दाखल करुन वारसा दाखला मिळवलेला आहे. सदर वारसा दाखला मिळालेनंतर तक्रारदार यांना मुदत बंद ठेव पावत्यांवरील व्याजासह रक्कम रु.2,37,334/- तसेच सेव्हींग खातेवरील 6 टक्के व्याजासह होणारी रक्कम रु.6,272/-व रिंकरींग खातेवरील व्याजासह होणारी रक्कम रु.22,575/-असे एकूण रक्कम रु.2,66,181/- मधून स्टेशनरीचे रु.60/- वजा जाता उर्वरित रक्कम रु.2,66,221/-भरत अर्बन को ऑप बँकेकडील चेक क्र.055375 अन्वये रक्कम रु.2,66,000/-तक्रारदारास आदा केले आहेत व उर्वरित रक्कम रु.161/- खातेवर शिल्लक आहेत. तक्रारदाराने मुदत ठेव पावतीवर दि.27/11/2009 अखेर 12 टक्के व्याज मागणी केलेली आहे. सामनेवाला हे ठेवीची रक्कम देणेस तयार होते परंतु तक्रारदारास वारसा दाखला व अन्य कागदपत्रे वेळेत उपलब्ध करु शकले नाहीत. त्यामुळेच त्यांना रक्कम देता येत नव्हत्या. त्यामुळे सामनेवाला यांचा कोणताही दोष नाही. तसेच मुदत बंद ठेवीच्या मुदतीनंतरही 12 टक्के व्याज देणेचे काहीही कारण नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत यावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणेसोबत पांडूरंग तुकाराम माने यांचा रिकरींग ठेव खतावणी व सेव्हींग खातेचा उतारा इत्यादीच्या प्रती दाखल केल्या आहेत. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्हणणे व लेखी युक्तीवाद, दाखल कागदपत्रे तसेच तक्रारदाराचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. अ) सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. ब) तक्रारदार सदर ठेवीवर व्याज मिळणेस पात्र आहेत काय ? --- होय. क) काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र. अ व ब :- सामनेवाला यांनी आपले म्हणणेमध्ये तक्रारदाराने तक्रारीत नमुद ठेवी मागितलेचे मान्य केले आहे. मे.मंचासमोर दाखल अर्ज क्र.106/2007 चे कामी केलेल्या आदेशानुसार तक्रारदाराने दिवाणी न्यायालय जयसिंगपूर येथे वारस दाखला मिळणेबाबत केलेला अर्ज क्र.14/2007 वर नमुद न्यायालयाने दि.05/09/2009 रोजी आदेश पारीत करुन तक्रारदारांना मयत पांडूरंग तुकाराम माने यांचे वारस ठरवलेले आहे हे मान्य केले आहे. त्याप्रमाणे तक्रारदाराने तक्रारीतील नमुद ठेव पावत्यांच्या रक्कमा नमुद मुदतीतील व्याजासह अदा केलेल्या आहेत. तक्रारदाराकडूनच वारस दाखला देणेबाबत विलंब झालेला आहे. सबब तक्रारदारास कोणतीही रक्कम देणे लागत नसलेने कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही असे प्रतिपादन केलेले आहे याचा विचार करता पांडूरंग तुकाराम माने हे दि.24/05/2005 रोजी मयत झालेले आहेत. तर ठेवीच्या मुदती या दि.07/05/2005 रोजी संपलेल्या आहेत. 106/2007 तक्रार दाखल होऊन दि.05/09/2009 रोजी आदेश पारीत केलेला होता. वारसा दाखला दि.05/09/2009 रोजी मिळालेला आहे. सदर कालावधीत तक्रारीतील नमुद ठेवी सामनेवालांच्याकडेच होत्या. सामनेवालांनी तक्रारदारास रिकरींग व सेव्हींग वरील रक्कम ही दि.27/11/2009 रोजी व्याजासहीत अदा केलेचे दाखल खातेउता-यावरुन दिसून येते. नमुद रिकरींगबाबत 12 महिन्यापैकी फक्त सातच महिने दरमहा रक्कम जमा केलेचे दिसून येते. सदरचे रिकरींग वर्षभर नियमित नाही. सबब सामनेवालांनी नियमानुसार व्याज अदा केलेले आहे. सबब रिकरींगच्या व्याजाची मागणी मान्य करता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सेव्हींग खातेवरील दाखल उता-यावरुन दि.10/09/2009 अखेर व्याज जमा दिसून येते. दोन महिन्याचे व्याज दिलेले नाही. सबब सदर दोन महिन्याचे व्याज रु.63/- होते. सदरची रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत.
तक्रारदाराने सामनेवालांकडे ठेवीची मागणी केली असता सामनेवालांनी वारसा दाखल्याचा वाद उपस्थित केलेला आहे. सदर वारसा दाखला दिल्यावरच रक्कमा अदा करणे सोईचे होईल त्याप्रमाणे प्रस्तुत मंचाने आदेश पारीत केला. तक्रारदार हे सर्वसामान्य व्यक्ती असून त्याला कायदयातील खाचाखोचा माहित असतील असे नाही. तक्रारदाराने वारसा दाखला सामनेवाला यांना दिलेला आहे व दिवाणी न्यायालयातील एकंदरीत प्रक्रिया पाहता झालेला विलंब हा तक्रारदाराची चुक म्हणता येणार नाही. ठेव पावती क्र.5819, 5821, 5828, 5835, 5837, 5840, 5841, 5844 प्रत्येकी रक्कम रु.25,000/-व ठेव पावती क्र.5830 रक्कम रु.10,000/-असे एकूस रक्कम रु.2,10,000/-मुदत बंद ठेवींची मुदत संपले दि.07/05/2005 पासून ते रक्कम अदा करेपर्यंत म्हणजे दि.27/11/2009 पर्यंत सदर रक्कमा सामनेवालांच्या ताब्यात होत्या. सदर रक्कमांचा वापर सामनेवाला यांनी आपल्या व्यवहारात केलेला आहे. ठेवीच्या मुदतीसाठी असणारे नमुद व्याज तक्रारदारांना मिळालेचे मान्य केलेले आहे व सामनेवाला यांनीही मान्य केले आहे. वादाचा मुद्दा उपस्थित होतो ते दि.07/05/2005 पासून ते 27/11/2009 पर्यंत जवळजवळ साडेचार वर्षे नमुद ठेव रक्कमा सामनेवालांच्या ताब्यात असलेने सदर रक्कमेवर नमुद कालावधीसाठी तक्रारदारास स्वत:हून सामोचाराने रक्कम वापरल्यामुळे सर्वसाधारण व्यवहाराचा विचार करुन व्याज दयावयास हवे होते ते दिलेले नसलेने प्रस्तुतची तक्रार दाखल झालेली आहे. सबब तक्रारदार द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे नमुद मुदत बंद ठेव रक्कमांवर व्याज मिळणेस पात्र आहेत. प्रस्तुतच्या व्याज रक्कमांची मागणी करुनही सामनेवालांनी सदर रक्कमा वकील नोटीस देऊनही अदा केलेल्या नाहीत.सबब तक्रारदारांच्या रक्कमांचा वापर व्यवहारात केला मात्र त्यावर व्याज देणेचे टाळून सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.क :- सामनेवालांच्या सेवात्रुटीमुळे तक्रारदार हे मानसिक वशारिरीक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत. आदेश (1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला यांनी तक्रारदारास सेव्हींग खातेवरील व्याज रक्कम रु.63/- अदा करावेत. तसेच मुदत बंद ठेव पावती क्र.5819, 5821, 5828, 5835, 5837, 5840, 5841, 5844 प्रत्येकी रक्कम रु.25,000/- व ठेव पावती क्र.5830 रक्कम रु.10,000/- असे एकूण रक्कम रु.2,10,000/- वर दि.07/05/2005 पासून ते दि.27/11/2009 पर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. (3) सामनेवाला यांनी तक्रारदारस मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |