श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्यक्ष यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 27 एप्रिल 2012
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणार क्र.1, 2 व 3 यांच्याकडून रो हाऊस एफ 1, ग्रीन वुड्स, धायरी, पुणे विकत घेण्यासाठी करारनामा केला. रो हाऊसची किंमत रुपये 9,82,300/- ठरली होती. कराराच्या वेळी जाबदेणार क्र.1, 2 व 3 यांनी ग्रीन वुड्स मधील रो हाऊस श्री सुवर्ण सहकारी बँकेकडे तारण ठेवलेल्या आहेत त्यामुळे सुवर्ण सहकारी बँकेकडून जाबदेणार तारण रद्य केल्याचे पत्र आणतील असे सांगितले. त्यामुळे तक्रारदारांनी रो हाऊस घेण्याचे ठरविले. याव्यतिरिक्त रो हाऊस वर कुठलाही बोजा नाही असेही जाबदेणार यांनी तक्रारदारांना सांगितले होते. म्हणून तक्रारदारांनी जाबदेणार यांना रुपये 1,21,000/- देऊन नोंदणीकृत करारनामा करण्यात आला. त्यानंतर तक्रारदारांनी रजिस्ट्रेशन चार्जेस, सोसायटी रजिस्ट्रेशन चार्जेस, डेव्हलपमेंट चार्जेस, शेअर मनी पोटी म्हणून रुपये 25,000/- दिले. मेंटेनन्स पोटी तक्रारदारांनी रुपये 31,020/- जाबदेणार यांना दिले. स्टॅम्प डयुटी पोटी रुपये 32,880/- व रजिस्ट्रेशन साठी रुपये 9880/- जाबदेणार यांना तक्रारदारांनी दिले. तक्रारदार मध्यमवर्गीय असून जाबदेणार यांना उर्वरित रक्कम अदा करण्यासाठी त्यांनी जाबदेणार क्र.4 यांच्याकडून गृहकर्ज घेण्याचे ठरविले. प्रोसेसिंग चार्जेस, सर्च रिपोर्ट पोटी रुपये 5000/- दिले. त्यानुसार जाबदेणार क्र.4 यांनी तपास करुन, सर्च घेऊन तक्रारदारांनी नोंदणी केलेले रो हाऊसचे टायटल क्लिअर आणि मार्केटेबल असल्याचे सांगितले. जाबदेणार क्र.4 यांच्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी जाबदेणार क्र.4 यांच्याकडून रुपये 8,75,000/- अर्थसहाय घेतले. रुपये 8,75,000/- चा चेक जाबदेणार क्र.4 यांनी जाबदेणार क्र.1 यांच्या नावे दिला आणि जाबदेणार क्र.1 यांना ती रक्कम मिळाली. त्यानंतर जाबदेणार क्र.1 यांनी दिनांक 02/02/2006 रोजी रो हाऊसचा ताबा तक्रारदारांना दिला. रो हाऊसचा ताबा मिळाल्यानंतर तक्रारदारांनी अधिकची कामे – इंटेरिअर पॉलिशिंग, इंटेरिअर फिटींग, गार्डन डेव्हलपमेंट करुन घेतली. त्यासाठी रुपये 3,50,000/- खर्च केला. डिसेंबर 2006 ते जानेवारी 2007 पर्यन्त पोस्ट ऑफिस आणि कुरिअर मधून तक्रारदारांच्या घरी माणसे येत होती. त्यांना श्री. सुदेश मधुकर आव्हाड यांच्या नावे कॅनरा बँकेचे असलेले पत्र दयावयाचे होते. तक्रारदारांच्याच पत्त्यावर बँकेकडून पत्रे येत होती. सारख्या पत्रांमुळे तक्रारदारांना काळजी वाटू लागली. म्हणून तक्रारदारांनी कॅनरा बँक, बिबवेवाडी शाखेत चौकशी केली असता तक्रारदारांच्याच रो हाऊस वर श्री. सुदेश मधुकर आव्हाड यांनी रुपये 10,47,000/- कर्ज घेतल्याचे तक्रारदारांना कळले. तक्रारदारांचे रो हाऊस कॅनरा बँकेकडे तारण ठेवण्यात आले होते. ही माहिती कळल्यानंतर तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे चौकशी केली. जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारांना असे सांगितले की यापुर्वी श्री. सुदेश मधुकर आव्हाड यांच्याशी अॅग्रीमेंट टू सेल झालेले होते. परंतु त्यांनी बाकीची रक्कम दिली नाही म्हणून त्यांच्या बरोबरचे अॅग्रीमेंट/बुकिंग रद्य केले गेले. त्याचवेळी जाबदेणार क्र.2 व 3 यांनी स्वत:ही रक्कम कॅनरा बँकेमध्ये भरुन प्रकरण मिटविण्याचे तक्रारदारांना आश्वासन दिले. जाबदेणार क्र.2 व 3 यांनी तक्रारदारांना दिनांक 21/08/2007 रोजीचे पत्र देऊन कॅनरा बँकेचे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकीट घेऊ असे सांगितले. जर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकीट प्राप्तच झाले नाही तर जाबदेणार यांनी तक्रारदारांना त्याच भागामध्ये दुसरे रो हाऊस देऊ असे आश्वासन दिले. किंवा रो हाऊसची किंमत देऊ आणि तक्रारदारांनी जे इंटेरिअरचे काम केले होते त्याची सुध्दा किंमत देऊ असेही आश्वासन दिले होते. तक्रारदारांना पत्र देऊन सुध्दा जाबदेणार यांनी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकीट प्राप्त करुन घेतले नाही. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे वारंवार विनंती करुनही उपयोग झाला नाही. जानेवारी 2010 च्या दुस-या आठवडयात तक्रारदारांना मा. Debt Recovery Tribunal पुणे यांच्याकडून तक्रारदारांच्या पत्त्यावर श्री. सुदेश मधुकर आव्हाड यांच्या नावाचे पत्र प्राप्त झाले. त्या पत्रासोबत मा. Debt Recovery Tribunal पुणे यांनी दिलेल्या आदेश दिनांक 07/12/2009 ची प्रत होती ज्याद्वारे कॅनरा बँकेस रिकव्हरी सर्टिफिकीट देऊन रुपये 10,38,376/- 8.50 टक्के व्याजासह श्री. सुदेश मधुकर आव्हाड व श्री. गगन सत्पाल मेहता यांच्याकडून वसूल करण्याचे आदेश दिले होते. या निकालपत्रामध्ये मा. Debt Recovery Tribunal पुणे यांनी असे सुध्दा पुढे नमूद केले होते की ही रक्कम पूर्ण देईपर्यन्त रो हाऊसवर चार्ज ठेवण्यात यावा. श्री. सुदेश मधुकर आव्हाड व श्री. गगन सत्पाल मेहता यांनी रक्कम न भरल्यास कॅनरा बँकेस निकालाच्या तारखेच्या दोन महिन्यानंतर रो हाऊस विकण्याचा अधिकार राहिल असेही त्यात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर कॅनरा बँकेने रिकव्हरी चालू केल्याचे तक्रारदारांना समजले. मा. Debt Recovery Tribunal पुणे यांच्या निकालानुसार तक्रारदारांचे रो हाऊस जप्त करुन त्याचा लिलावही होऊ शकतो. म्हणून तक्रारदार जाबदेणार यांच्याकडे अनेक वेळा गेले व त्याबद्यलची माहिती घेतली, कॅनरा बँके कडून टायटल क्लिअर करण्यासाठी विनंती केली. परंतु जाबदेणार यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही, रक्कमही भरली नाही. त्यामुळे तक्रारदारांना अशी भिती वाटते की त्यांचे रो हाऊस केव्हाही कॅनरा बँकेकडून काढून घेतले जाऊ शकते, त्यांना घराबाहेर पडावे लागेल. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार क्र.1 ते 3 यांच्याकडून त्यांच्या सोबत केलेल्या करारानुसार क्लिअर टायटल रो हाऊस दयावे, दिनांक 02/06/2005 च्या करारनाम्यातील अटींचे पालन करुन त्याप्रमाणे कृती करावी अशी मागणी करतात. तसेच जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी श्री. सुदेश मधुकर आव्हाडां बरोबर केलेला करारनामा दिनांक 16/03/2005 रद्य करावा, रो हाऊस बोजारहित करुन मिळावे. जाबदेणार क्र.1 ते 4 यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रुपये 2,50,000/- दयावेत, तक्रारीचा खर्च व इतर दिलासा मिळावा अशी मागणी तक्रारदार करतात. तक्रारदारांनी शपथपत्र आणि मोठया प्रमाणात कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार क्र.1 ते 5 यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार क्र.1 ते 5 यांच्याविरुध्द मंचाने एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी जाबदेणार क्र.1, 2 व 3 यांच्या सोबत रो हाऊस एफ 1, ग्रीन वुड्स, धायरी, पुणे विकत घेण्यासंदर्भात दिनांक 02/06/2005 रोजी करार केला होता. जाबदेणार क्र.4 यांच्याकडून रुपये 8,75,000/- अर्थसहाय घेऊन जाबदेणार यांना रक्कम अदा केली होती. रक्कम प्राप्त झाल्यानंतर जाबदेणार यांनी रो हाउसचा ताबा तक्रारदारांना दिला होता. तक्रारदार रो हाउस मध्ये रहावयास गेल्यानंतर कॅनरा बँकेकडून रिकव्हरी संदर्भात जाबदेणार क्र.5 यांच्यासाठी पत्रे येत होती. पत्रावरील पत्ता तक्रारदारांचाच होता. त्यामुळे तक्रारदारांनी त्याचा शोध घेतल्यानंतर, जाबदेणार क्र.1, 2 व3 यांनी तक्रारदारांच्या रो हाउस संदर्भात जाबदेणार 5 यांच्याशी अॅग्रीमेंट टू सेल केलेले होते. रो हाऊसवर जाबदेणार क्र.5 यांनी 10,47,000/- चे कर्ज कॅनरा बँकेकडून घेतले होते. त्यामुळे कॅनरा बँकेने मा. Debt Recovery Tribunal पुणे यांच्याकडे केस केली होती. मा. Debt Recovery Tribunal पुणे यांनी जाबदेणार क्र.5 यांच्याविरुध्द आदेश दिले. जाबदेणार क्र.5 अॅबस्कॉन्ड असल्यामुळे मा. Debt Recovery Tribunal पुणे दिनांक 07/12/2009 च्या आदेशानुसार रो हाऊसची विक्री करुन ती रक्कम वसूल करावी असाही आदेश दिला होता. त्यामुळे तक्रारदारांना भिती आहे.
जाबदेणार क्र.1, 2 व 3 यांनी तक्रारदारांना याबद्यल दिनांक 21/08/2007 रोजीचे पत्र देऊन कॅनरा बँकेमध्ये रक्कम भरुन रो हाऊस वरील बोजा संपवू असे सांगूनही तसे केले नाही. हे सर्व पत्रव्यवहार, कॅनरा बँकेचे पत्र, मा. Debt Recovery Tribunal पुणे यांचे आदेश यावरुन जाबदेणार क्र.1, 2, 3 व 5 हे यात दोषी ठरतात. जाबदेणार क्र. 1, 2 व 3 यांनी तक्रारदारांना अंधारात ठेवून त्यांच्याशी अॅग्रीमेंट टू सेल केले. त्यामुळे तक्रारदारांना त्यांचे रो हाऊस रिकामे करण्याची वेळ आली. ही जाबदेणार क्र.1, 2 व 3 यांच्या सेवेतील त्रुटी आहे व जाबदेणा-यांनी अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केला आहे. जाबदेणार क्र.4 आय सी आय सी आय बँकेने तक्रारदारांच्या रो हाऊस बद्यल सर्च रिपोर्ट दिला, प्रोसेस फी घेऊनही कुठलाही बोजा नाही, टायटल क्लिअर असल्याचे कळविले ही जाबदेणार क्र.4 यांच्या सेवेतील त्रुटी आहे. जाबदेणार क्र.5 आणि तक्रारदार यांचा कुठलाही करार झालेला नव्हता, म्हणून त्यांच्याविरुध्द कुठलाही आदेश नाही. जाबदेणार क्र.1, 2 व 3 यांनी कॅनरा बँकेचे कर्ज लगेचच फेडावे, नो डयुज सर्टिफिकीट घेऊन तक्रारादारांना दयावे असा जाबदेणार क्र.1 ते 3 यांना मंच आदेश देत आहे. जाबदेणार क्र.1, 2 व 3 यांनी जाबदेणार क्र.5 यांच्याबरोबर केलेला करारनामा दिनांक 16/03/2005 रद्य करावा असाही मंच आदेश देत आहे. तसेच जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी संयुक्तिकरित्या आणि वैयक्तिकरित्या तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रुपये 50,000/- दयावेत आणि जाबदेणार 4 यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रुपये 5,000/- दयावेत असाही मंच आदेश देत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे.
:- आदेश :-
[1] तक्रार जाबदेणार क्र.1 ते 4 यांच्याविरुध्द अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
जाबदेणार क्र.5 यांच्याविरुध्द आदेश नाही.
[2] जाबदेणार क्र. 1, 2 व 3 यांनी संयुक्तिकरित्या आणि वैयक्तिकरित्या
जाबदेणार क्र.5 यांच्याबरोबर केलेला करारनामा दिनांक 16/03/2005 आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत रद्य करावा.
[3] जाबदेणार क्र.1, 2 व 3 यांनी संयुक्तिकरित्या आणि वैयक्तिकरित्या कॅनरा बँकेचे कर्ज फेडून तक्रारदारांना नो डयुज सर्टिफिकीट आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावे.
[4] जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी संयुक्तिकरित्या आणि वैयक्तिकरित्या तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रुपये 50,000/- व जाबदेणार क्र.4 यांनी नुकसान भरपाई पोटी रुपये 5,000/- तक्रारदारांना आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
[5] जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी संयुक्तिकरित्या आणि वैयक्तिकरित्या तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रुपये 1000/- अदा करावा.
आदेशाची प्रत दोन्ही पक्षांस विनामूल्य पाठविण्यात यावी.