(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 31/12/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 16.10.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याने नमुद केल्यानुसार गैरअर्जदाराचा कपडे शिवण्याचा व्यवसाय असुन तक्रारकर्त्याने दि.13.07.2010 रोजी कपडे शिवण्याकरता जमा केले होते व त्याकरीता रु.500/- सुध्दा गैरअर्जदारास दिले. तक्रारकर्ता गैरअर्जदाराने शिवलेले कपडे मागण्याकरता गेला असता त्याने ते देण्यांस नकार दिला व तक्रारकर्त्याचे कापड छोटे असल्यामुळे शिवून देण्यांस असमर्थता दर्शविली. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराचे म्हणण्यानुसारच कापड खरेदी करुन दिले असे असतांना गैरअर्जदाराने कापड शिवून न दिल्यामुळे तक्रारकर्त्याने दि.26.08.2010 रोजी वकील श्री. पी.डी. नौकरकर यांचे मार्फत कायदेशिर नोटीस बजावली. सदर नोटीस गैरअर्जदाराला मिळून सुध्दा त्यांनी सदर नोटीसला उत्तर दिले नाही. त्यामुळे गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास सेवेत त्रुटी दिली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्यामुळे सदर तक्रार दाखल केलेली असुन मागणी केली आहे की, त्याने गैरअर्जदाराकडे जमा केलेले एक पॅन्ट, एक शर्ट व एका सफारीच्या कपडयाची किंमत रु.1,500/- व शिलाईचा खर्च रु.500/- दि.13.07.2010 पासुन 24% व्याजासह मिळावे. तसेच शारीरिक व आर्थीक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार व नोटीसचा खर्च रु.5,000/- द्यावा अशी मागणी केलेली आहे. 3. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदाराला बजावण्यांत आली असता ती प्राप्त होऊनही ते मंचासमक्ष हजर न झाल्यामुळे मंचाने गैरअर्जदारा विरुध्द एकतर्फी आदेश दि.03.12.2010 रोजी पारित केला. तसेच सदर प्रकरण युक्तिवादाकरीता दि.21.12.2010 रोजी मंचासमक्ष नेमण्यांत आले त्यावेळी तक्रारकर्ता हजर होता त्याचा युक्तिवाद ऐकण्यांत आला, तसेच मंचासमक्ष दाखल दस्तावेज व तक्रारकर्त्याचे कथन यांचे निरीक्षण केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहोचले. -// नि ष्क र्ष //- 4. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे कपडे शिवण्याकरता टाकले होते ही बाब त्यांनी दाखल केलेल्या दस्तावेज क्र.1 वरुन स्पष्ट होते, त्यामुळे तक्रारकर्ता गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’ ठरतो, असे मंचाचे मत आहे. 5. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे दि.13.07.2010 रोजी कपडे शिवण्याकरता टाकले होते, त्यामधे एक पॅन्ट, एक शर्ट व एक सफारी होती, ही बाब दस्तावेजे क्र.1 वरुन स्पष्ट होते. तसेच सदर कपडे शिवुन देण्याची अंतिम मुदत दि.26.08.2010 होती ही बाब सुध्दा दस्तावेज क्र.1 वरुन सिध्द होते. 6. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडे कपडे शिवण्याकरता टाकले असता ते शिवून न देणे ही गैरअर्जदारांचे सेवेतील त्रुटी असुन अनुचित व्यापार पध्दत आहे. तक्रारकर्त्याने सदर तक्रार शपथपत्रावर दाखल केली असुन आपल्या तक्रारीचे पृष्ठयर्थ शपथपत्र दाखल केलेले आहे. 7. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना प्राप्त झाली ही बाब निशाणी क्र.6 वरुन स्पष्ट होते. तक्रारीची सुचना मंचाव्दारे गैरअर्जदारांना मिळाल्यानंतर सुध्दा ते मंचासमक्ष हजर झाले नाही व त्यांनी तक्रारकर्त्याचे तक्रारीतील आक्षेप नाकारले नसल्यामुळे गैरअर्जदारांविरुध्द दि.03.12.2010 रोजी मंचाने तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित केला. त्यामुळे तक्रारकर्त्याने तक्रारीत केलेले कथन हे प्रतिज्ञेवर असल्यामुळे ते ग्राह्य धरण्यांत येते. 8. मंचाच्या मते गैरअर्जदारांनी सेवेत त्रुटी दिलेली आहे व तक्रारकर्त्याने शिवण्याकरता दिलेले कपडे परत केलेले नाही ही अनुचित व्यापार पध्दती आहे. त्यामुळे कापडाची किंमत रु.1,500/- व शिलाईचा खर्च रु.500/- गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास द्यावी. सदर रक्कम आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसांत न दिल्यास सदर रकमेवर द.सा.द.शे. 18% दराने व्याज रक्कम अदा होईपर्यंत देय राहील. 9. तक्रारकर्त्याने मानसिक व आर्थीक त्रासाकरीता रु.10,000/- ची मागणी केलेली आहे सदर मागणी अवास्तव वाटत असल्यामुळे न्यायोचितदृष्टया तक्रारकर्ता हा रु.1,000/- मिळण्यांस पात्र ठरतो. तसेच तक्रारीचा खर्च रु.500/- मिळण्यांस पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. 10. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येतो की, त्याने तक्रारकर्त्यास कापडाची किंमत रु.1,500/- व शिलाईचे रु.500/- आदेश पारित झाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत अदा करावे. अन्यथा सदर रकमेवर दंडनीय व्याज म्हणून द.सा.द.शे. 18% दराने रक्कम अदा होईपर्यंत देय राहील. 3. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येतो की, त्याने तक्रारकर्त्याला मानसिक व आर्थीक त्रासापोटी रु.1,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.500 अदा करावे. 4. वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आत करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |