(आदेश पारित द्वारा मा. सदस्या, कु. वर्षा ओ. पाटील)
- आदेश -
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता हा मौजा आमगांव, ता. आमगांव, जिल्हा गोंदीया येथील रहिवासी असून विरूध्द पक्ष क्र. 2 यांचेकडून तक्रारकर्त्याने इन्व्हर्टर (यु.पी.एस. 825 व 1400 व्ही.ए. असे खरेदी केले. विरूध्द पक्ष क्र. 1 हे ‘व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज’ चे व्हॉईस चेअरमन आहेत आणि विरूध्द पक्ष 3 हे सर्व्हीस सेंटर आहे. तसेच विरूध्द पक्ष क्र. 4 हे व्हिडिओकॉन कंपनीचे डीलर आहेत.
3. तक्रारकर्त्याने दिनांक 02/02/2010 आणि दिनांक 12/03/2010 रोजी इन्व्हॉईस नंबर AA/77/09-10 आणि AA/110/9/10 हे विरूध्द पक्षाकडून घेऊन खालीलप्रमाणे काही वस्तूंची खरेदी केली.
अ) ड्युअल टेक – UPS H 825 रू. 4,350/-
डिजीटल 10509104212553
ब) 1400 VASQ WAVE रू. 6,000/-
NO. 10609104302028
4. तक्रारकर्त्याने सदर ‘व्हिडिओकॉन’ इन्व्हर्टर No. Duel Tech UPS 825 हा दिनांक 12/03/2010 रोजी विरूध्द पक्ष 2 कडून रू. 4,350/- मध्ये खरेदी केला. तक्रारकर्त्याने त्याच्या घरी व दुकानाच्या उपयोगाकरिता सदरहू इन्व्हर्टर खरेदी केला. परंतु सदर इन्व्हर्टर दिनांक 17/02/2012 रोजी अचानक बंद पडला. त्यानंतर तक्रारकर्त्याने आपली तक्रार विरूध्द पक्ष क्र. 1 कंपनी यांचेकडे तक्रार क्रमांक 1502120184 दिनांक 17/02/2012 रोजी टोल फ्री नंबर वर केली आणि सदर तक्रार विरूध्द पक्ष क्र. 3 यांच्याकडे इन्व्हर्टर घेऊन जा असे सांगितले. विरूध्द पक्ष क्र. 2 व 4 यांनी सुध्दा सांगितले की, सर्व्हीस सेंटरवरून दुरूस्त करून घ्या. तक्रारकर्त्याने सदर इन्व्हर्टर दुरूस्तीकरिता विरूध्द पक्ष क्र. 3 यांच्याकडे दिला. परंतु सदर इन्व्हर्टरचे सुटे भाग गोंदीयामध्ये उपलब्ध नसल्यामुळे सदर इन्व्हर्टर दुरूस्त होणार नाही असे विरूध्द पक्ष 3 यांनी तक्रारकर्त्यास सांगितले. म्हणून तक्रारकर्त्याने 2102120222 या टोल फ्री नंबरवर पुन्हा तक्रार नोंदविली. परंतु त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि इन्व्हर्टर विरूध्द पक्ष 3 यांच्याकडेच पडून आहे. सदरची तक्रार ही वॉरन्टी पिरियडच्या आतच आहे.
5. त्यानंतर तक्रारकर्त्याने पुन्हा दुसरा इन्व्हर्टर नंबर 1400 VASQWAVE विरूध्द पक्ष क्र. 4 कडून दिनांक 02/02/2010 रोजी घरच्या आणि दुकानाच्या उपयोगाकरिता खरेदी केला. परंतु तो इन्व्हर्टर देखील दिनांक 29/10/2010 रोजी अचानक बंद पडला. त्याबाबतची तक्रार खाली दिलेल्या टोल फ्री नंबरवर करण्यात आली.
तक्रार नंबर तक्रारीचा दिनांक
MH 41404100217 29.10.2010
NAG 2710100195 29.10.2010
NAG 0603110021 06.03.2011 & 14.03.2011
NAG 080110364 08.08.2011
NAG 1711110082 18.11.2011
NAG 2111110222 21.11.2011
NAG 0312110065 03.12.2011
NAG 1712110056 17.12.2011
NAG 2701120025 27.01.2012
NAG 2102120223 21.02.2012
NAG 2802120138 28.02.2012
तक्रारकर्त्याने सदर तक्रार करूनही तक्रारकर्त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. तक्रारकर्त्याने दिनांक 24/02/2012 रोजी विरूध्द पक्ष क्र. 3 यांच्याकडे सदर इन्व्हर्टर दुरूस्तीकरिता दिला. परंतु गोंदीयामध्ये त्याचे पार्टस् उपलब्ध नाहीत असे तक्रारकर्त्याला सांगण्यात आले. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला योग्य सेवा पुरविली नाही.
6. तक्रारकर्त्याने सदर इन्व्हर्टरचे दस्तावेज सदर तक्रारीसोबत दाखल केलेले आहेत. Duel Tech UPSH 825 digital 10509104212553 रू. 14,470/- चे बिल पृष्ठ क्र. 11 वर आहे. IT 500 305747, 305745, 15325, 1400 VASQ WAVE No. 10609104302028, 800 VASQ WAVE No. 10509104212506 एकूण रू. 40,710/- चे पृष्ठ क्र. 12 वर आहे. तक्रार रजिस्ट्रेशन टोल फ्री नंबर पृष्ठ क्र. 13 वर असून वॉरन्टी पावती पृष्ठ क्र. 15 वर असे दस्तावेज तक्रारकर्त्याने सदर तक्रारीसोबत दाखल केलेले आहेत.
7. तक्रारकर्त्याची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 07/12/2012 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतरही विरूध्द पक्ष हे मंचासमक्ष हजर झाले नाहीत अथवा त्यांनी आपले लेखी उत्तर देखील मंचात दाखल केलेले नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष यांच्याविरूध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दिनांक 19/08/2014 रोजी पारित करण्यात आला.
8. तक्रारकर्त्याचे वकील वारंवार संधी देऊन सुध्दा युक्तिवादास अनुपस्थित राहिल्यामुळे प्रकरण आदेशाकरिता बंद करण्यात आले.
9. तक्रारकर्त्याचा तक्रार अर्ज व तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकनावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
10. तक्रारकर्त्याने दोन इन्व्हर्टर विरूध्द पक्ष क्र. 2 यांच्याकडून क्रमशः रू. 4,350/- व रू. 6,000/- या किमतीत खरेदी केले. सदर इन्व्हर्टर हे वॉरन्टी कालावधीत असतांना त्यात बिघाड झाला म्हणून तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष यांचा ‘ग्राहक’ आहे. सदर इन्व्हर्टर खरेदी केल्याच्या बिलाच्या पावत्या तक्रारकर्त्याने सदरहू प्रकरणात दाखल केलेल्या आहेत.
11. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला योग्य ती सेवा पुरविली नाही व त्यांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे आणि सदरहू प्रकरणामध्ये त्यांनी आपल्या बाजूने कुठलेही लेखी उत्तर सादर केलेले नाही अथवा आपले म्हणणे मांडले नाही. म्हणून मंचाने सदर प्रकरण एकतर्फी निकालात काढले.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला सदर इन्व्हर्टरची रक्कम परत करावी.
3. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 10,000/- तक्रारकर्त्याला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्त्याला रू. 3,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
6. विरूध्द पक्ष 2 व 4 च्या विरोधात ही तक्रार खारीज करण्यात येते.