आदेश पारित द्वारा मा. सदस्य श्री. एन. व्ही. बनसोड 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अंतर्गत विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 (के.सी.इलेक्ट्रीकल्स–वितरक आणि गोल्ड स्टार बॅटरी-उत्पादक) यांच्या विरूध्द दाखल करून मंचास मागणी केली की, तक्रारकर्त्याने खरेदी केलेली सदोष बॅटरी बदलून नवीन बॅटरी तक्रारकर्त्याला द्यावी किंवा बॅटरीची किंमत रू. 13,000/- परत करावी. तसेच शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रू. 10,000/- आणि तक्रारीचा, वकील नोटीसचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रारकर्त्याचे म्हणणे थोडक्यात खालीलप्रमाणेः- 2. तक्रारकर्ता हा शेअर्स मार्केटमधील शेअर दलालीचा खाजगी स्वयंरोजगार व्यवसाय ‘’वैष्णवी इन्व्हेस्टमेंट’’ या नावाने तुमसर येथे करीत आहे व सदर व्यवसाय संगणक व इंटरनेटवर पूर्णपणे अवलंबून असतो. तक्रारकर्त्याने दिनांक 21/07/2010 ला गोल्डस्टार कंपनीची (इन्वा स्टार मॉडल नंबर आय.एस.टी.-1800) बॅटरी त्याच्या कार्यालयातील युपीएस इन्व्हर्टरला जोडण्याकरिता रू. 13,000/- मध्ये विकत घेतली. त्या बॅटरीवर एक संगणक, 5 वॅटचे सीएफएल लाईट यांना लोडशेडिंगचे वेळी विद्युत पुरवठा व्हावा या हेतूने लावली होती व पावतीवर नमूद असल्याप्रमाणे अडीच वर्षाची गॅरन्टी होती. 3. विरूध्द पक्ष क्र. 1 ने बॅटरीच्या बॅकअपबाबत 5 ते 6 तास चालण्याचे आश्वासन दिले होते. परंतु बॅटरी लावल्यानंतर काही दिवसांनी लोडशेडिंगच्या अवधीत बॅटरी आवश्यक बॅकअप देत नसून फक्त 5 मिनीटांचाच बॅकअप देत आहे असे लक्षात आल्यामुळे तक्रारकर्त्याने संपर्क साधून विरूध्द पक्ष क्र. 1 ला कळविले. विरूध्द पक्ष क्र. 1 ने इन्व्हर्टर व बॅटरीची पाच-सहा वेळा तपासणी केली, परंतु बॅटरी मधील दोष दुरूस्त करू शकला नाही व निष्पन्न केले की, बॅटरीमध्ये दोष आहे. बॅटरीची अडीच वर्षाची गॅरन्टी असल्यामुळे विरूध्द पक्ष क्र. 1 यांना बदलून देण्याची मागणी केली, परंतु त्यांनी टाळाटाळ केली. तक्रारकर्त्याने दिनांक 27/10/2010 ला विरूध्द पक्ष क्र. 1 ला मोबाईलवर बोलणी करून बॅटरी बदलवून मिळण्याची विनंती केली, परंतु त्यांनी नकार दिला व धोखाधडीच्या हेतूने बहाणे करून वेळ घालविला आणि तक्रारकर्त्याला मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान झाले. 4. तक्रारकर्त्यानुसार विरूध्द पक्ष यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सेवा पुरविण्याची त्यांची कायदेशीर जबाबदारी असतांना सुध्दा त्यांनी सेवा पुरविली नाही. तक्रारकर्ता हा त्याच्या व्यवसायाकरिता विद्युत पुरवठा नसतांना संगणक व इंटरनेटकरिता बॅटरी व इन्व्हर्टर वर सर्वस्वी अवलंबून असतो. तक्रारकर्त्याने वकिलामार्फत दिनांक 01/11/2010 ला नोटीस पाठविली, परंतु त्याचे उत्तर न पाठविता तक्रारकर्त्याची नोटीस प्राप्त होताच विरूध्द पक्ष क्र. 2 कंपनीचे लोक तक्रारकर्त्याच्या कार्यालयात आले व बॅटरी तपासली, मात्र त्याबाबत तक्रारकर्त्यास काहीही कळविले नाही. तक्रारकर्त्याने बॅटरी आपल्या कार्यालयात लावलेली असल्यामुळे तक्रारकर्त्यास त्याच्या व्यवसायात शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागले. तक्रारकर्त्याने आपल्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ एकूण 5 दस्तऐवज अनुक्रमे पृष्ठ क्र. 8 ते 13 वर दाखल केले आहेत. 5. मंचाने तक्रार दाखल करून विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 यांच्यावर नोटीस बजावली. विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचे त्यांच्या संयुक्त उत्तरात म्हणणे खालीलप्रमाणेः- 6. विरूध्द पक्ष यांनी तक्रारीचा परिच्छेद क्र. 1 सोडता संपूर्ण तक्रारच नाकारलेली आहे. विरूध्द पक्ष यांनी आपल्या विशेष कथनात नमूद केले की, तक्रारकर्त्याने दिनांक 21/07/2010 रोजी बॅटरी खरेदी केली असून दिनांक 22/07/2010 रोजी विरूध्द पक्ष यांचे विद्युत फिटर श्री. विनोद देशमुख यांच्याद्वारा तक्रारकर्त्याच्या परिसरात बॅटरी बसविण्यात आली व ती योग्य प्रकारे काम करीत होती. विरूध्द पक्ष यांनी म्हटले की, त्यांच्या विद्युत फिटरने तक्रारकर्त्यास त्याच वेळेस सांगितले की, विद्युत कनेक्शन बरोबर नाही. तसेच तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र. 2 ला असेही सांगितले होते की, तक्रारकर्त्याच्या विद्युत कनेक्शनमध्ये सीएल व डीएल संबंधी अडचण आहे. त्यामुळे मेन विद्युत लाईनमध्ये इलेक्ट्रीकल व्होल्टेज फ्रिक्वेन्सीमध्ये फरक आहे तो लवकरच दुरूस्त करून घ्यावा लागणार. परंतु त्याबाबत दुरूस्ती न करताच तक्रारकर्त्याने बॅटरीचा वापर निष्काळजीपणे सुरू ठेवल्यामुळे बॅटरीमध्ये बिघाड आला असेल. मात्र त्याकरिता विरूध्द पक्ष कोणत्याही प्रकारे जबाबदार नाहीत. 7. विरूध्द पक्ष यांनी पुन्हा नमूद केले की, तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र. 2 जवळ बॅटरी कधीही दुरूस्तीकरिता आणलेली नाही किंवा बॅटरीच्या बिघाडाबाबत कोणत्याही प्रकारची सूचना दिलेली नाही. बॅटरीची विक्री करते वेळेस विरूध्द पक्ष क्र. 2 ने तक्रारकर्त्याला वॉरन्टी कार्ड दिलेले होते, परंतु त्यातील दिशानिर्देशांचे तक्रारकर्त्याने पालन केलेले नाही. तसेच तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दाखल केलेल्या बिलामध्ये खोडतोड करून स्वतःच्या हस्ताक्षरात मजकूर लिहिलेला आहे व मंचाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 8. विरूध्द पक्ष यांच्यानुसार तक्रारकर्त्याचा दिनांक 30/10/2010 रोजीचा खोटा नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी ग्राहकाचे समाधान करण्यासाठी दिनांक 30/11/2010 रोजी आपल्या बॅटरी तज्ञाला पाठविले होते व त्याला बॅटरी सुरळितपणे कार्य करीत असल्याचे समजले आणि तक्रारकर्त्याला बॅटरी तज्ञाने विरूध्द पक्ष क्र. 1 यांच्या वतीने दिनांक 30/11/2010 रोजी बॅटरी व्यवस्थित काम करीत असल्याबद्दल अहवाल दिला होता व तक्रारकर्त्याच्या खोट्या नोटीसचे उत्तर देण्यात आले. तक्रारकर्ता हा बॅटरीचा वापर व उपभोग वाणिज्य उपयोगाकरिता करीत असल्यामुळे सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2(1)(डी) मध्ये बसत नाही व सदर तक्रार खारीज करण्याची मागणी केली. 9. विरूध्द पक्ष यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ तक्रारकर्त्याला दिलेल्या बिलाची कार्बन प्रत, वॉरन्टी कार्ड इन्व्हाईसची प्रत, दिनांक 30/10/2010 रोजीच्या नोटीसचे उत्तर इत्यादी अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 23 ते 25 वर दाखल केले. 10. विरूध्द पक्ष क्र. 1 ने notice to produce document ची नोटीस दिनांक 07/03/2011 ला दिल्यानंतर तक्रारकर्त्याच्या वकिलांनी दिनांक 14/03/2011 ला मूळ बिल व तुलना करण्याकरिता आरती ट्रेडर्सचे दिनांक 31/05/2010 चे बिल दाखल केले असून ते अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 37 व 38 वर आहे. विरूध्द पक्ष यांनी श्री. विनोद नारायण देशमुख यांचा हलफनामा दाखल केला असून तो अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 32 वर आहे. 11. मंचाने, दिनांक 16/03/2011 ला तक्रारकर्त्याच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला तसेच दोन्ही पक्षाने दाखल केलेल्या लेखी युक्तिवादाचे व दस्तऐवजांचे सुक्ष्म अवलोकन केले. कारणमिमांसा व निष्कर्ष 12. तक्रारकर्त्याने, विरूध्द पक्ष क्र. 2 द्वारा उत्पादित वरील वर्णनाची बॅटरी विरूध्द पक्ष क्र. 1 यांच्यामार्फत दिनांक 21/07/2010 रोजी खरेदी केली याबाबत दोन्ही पक्षामध्ये वाद नाही. तक्रारीच्या सुरूवातीलाच तक्रारकर्त्याने खाजगी स्वयंरोजगार म्हणून ‘वैष्णवी इन्व्हेस्टमेंट’ नावाने शेअर दलालीचा व्यवसाय करीत असल्याचे नमूद केले आहे. त्यास विरूध्द पक्ष यांनी आक्षेप घेऊन म्हटले की, तक्रारकर्ता बॅटरीचा वापर व उपभोग वाणिज्य उपयोगाकरिता करीत असल्यामुळे सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 (1)(डी) अंतर्गत बसत नाही. विरूध्द पक्ष यांच्या या म्हणण्याशी मंच सहमत नाही, कारण स्वतःच्या उदरनिर्वाहाकरिता स्वयंरोजगार म्हणून वैष्णवी इन्व्हेस्टमेंटच्या खाजगी व्यवसायाकरिता खरेदी केलेल्या वस्तूचा वापर करीत असल्यास ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2(1)(डी)(2) च्या स्पष्टीकरणानुसार तक्रारकर्ता ग्राहक ठरतो. त्याबाबत विरूध्द पक्ष यांचे म्हणणे वस्तुनिष्ठ पुराव्याअभावी मंचाने नाकारले. तसेच तक्रारकर्ता हा बॅटरीचा वापर निव्वळ लोडशेडिंगच्या वेळी करीत असल्यामुळे सदर बॅटरीचा प्रत्यक्ष व्यापाराशी व त्यावरील उत्पन्नाशी उत्तरोत्तर पर्यंत संबंध आढळत नाही. त्यामुळे सुध्दा विरूध्द पक्ष यांचे म्हणणे असंयुक्तिक ठरते. 13. तक्रारकर्त्यानुसार विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी बॅटरीचे बॅकअप हे 5 ते 6 तास राहील असे आश्वासन दिलेले होते. परंतु बॅटरी लावल्यानंतर काही दिवसात प्रत्यक्षात लोडशेडिंगच्या काळात बॅटरी 5 मिनीटाचाच बॅकअप देत आहे असे लक्षात आल्यानंतर तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांना सूचना दिल्याप्रमाणे विरूध्द पक्ष यांनी 5-6 वेळा बॅटरी तपासली आणि बॅटरीमध्ये दोष आहे असे निष्पन्न केले. तसेच तक्रारकर्त्याने दिनांक 27/10/2010 ला बॅटरी बदलून देण्याची मागणी केली. तक्रारकर्त्याने दिनांक 01/11/2010 ला वकिलामार्फत नोटीस पाठविल्यानंतर विरूध्द पक्ष क्र. 2 कंपनीचे लोक बॅटरी तपासणी करून गेले, मात्र त्याबाबत त्यांनी तक्रारकर्त्याला काहीही कळविले नाही. विरूध्द पक्ष यांनी त्यांच्या विशेष कथनात मान्य केले की, विरूध्द पक्ष यांचे विद्युत फिटर श्री. विनोद देशमुख यांनी तक्रारकर्त्याच्या परिसरात बॅटरी बसविली होती व बॅटरी योग्य प्रकारे समाधानकारकपणे कार्य करीत होती. विरूध्द पक्ष यांचेनुसार विद्युत कनेक्शन बरोबर नसल्याचे तक्रारकर्त्यास सांगितले होते व विद्युत कनेक्शनमध्ये सीएल, डीएल मध्ये अडचण आहे व विद्युत लाईनमध्ये इलेक्ट्रीकल व्होल्टेज फ्रिक्वेन्सीमध्ये फरक आहे व तो दुरूस्त करण्याची सूचना केली होती. परंतु त्याप्रमाणे ती दुरूस्त न करताच तक्रारकर्त्याने वापर केल्यामुळे बॅटरीमध्ये बिघाड झाला असे निष्पन्न केले. 14. विरूध्द पक्ष क्र. 1 चे विद्युत फिटर श्री. विनोद देशमुख यांनी दाखल केलेल्या दिनांक 06/03/2011 च्या हलफनाम्यात खालीलप्रमाणे नमूद आहेः- ‘’विवादित बॅटरी खरेदी केल्यानंतर तक्रारकर्त्याच्या कार्यालयात विद्युत पुरवठा कायद्यानुसार शक्य नसल्यामुळे त्याच्या घरून रस्ता ओलांडून लावण्यात आले आहेत व अंतर जास्त लांब असल्यामुळे व्होल्टेज फ्लक्चुएशनचा नेहमी त्रास होतो’’. विरूध्द पक्ष क्र. 1 च्या विशेष कथनातील बयान व विरूध्द पक्ष क्र. 1 यांचे विद्युत फिटर विनोद देशमुख यांच्या हलफनाम्यातील परिच्छेद क्र. 3 मधील कथन यामध्ये पूर्णतः भिन्नता असून ते विरोधाभासी असल्यामुळे मंचास ते विश्वसनीय वाटत नाही. मंचाने ते नाकारले. 15. तक्रारकर्त्याने तक्रारीच्या परिच्छेद क्र. 9 मध्ये नमूद केले की, दिनांक 01/11/2010 ला वकिलामार्फत नोटीस पाठविल्यानंतर विरूध्द पक्ष क्र. 2 चे लोक बॅटरीची तपासणी करून गेले, परंतु त्याबाबत त्यांनी तक्रारकर्त्याला काहीच कळविले नाही. याबाबत विरूध्द पक्ष यांनी म्हटले की, तक्रारकर्त्याचा दिनांक 30/10/2010 रोजीचा नोटीस प्राप्त झाल्यानंतर ग्राहकाच्या समाधानाकरिता स्वतःच्या बॅटरी तज्ञाला तक्रारकर्त्याकडे पाठविले. त्या वेळी बॅटरी तज्ञाला सदर बॅटरी सुरळितपणे काम करतांना समजली. तक्रारकर्त्याला बॅटरी तज्ञाने विरूध्द पक्ष क्र. 1 च्या वतीने बॅटरी योग्य काम करीत असल्याबद्दलचा अहवाल दिला होता. विरूध्द पक्ष यांनी विशेष कथनात सदर बाब नमूद करून सुध्दा त्यांच्या बॅटरी तज्ञाचा अहवाल मंचासमोर दाखल केलेला नाही. तसेच सदर बॅटरी तज्ञाचे शपथपत्र सुध्दा मंचासमोर नाही. त्यामुळे बॅटरी तज्ञाच्या अहवालाबाबत व बॅटरी योग्य प्रकारे काम करीत असल्याबाबत विरूध्द पक्ष यांचे म्हणणे पूर्णतः असंयुक्तिक व अविश्वसनीय स्वरूपाचे असल्यामुळे मंचाने नाकारले. 16. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षास दिनांक 30/10/2010 ला वकिलामार्फत नोटीस पाठविली व ती विरूध्द पक्ष क्र. 1 यांस दिनांक 02/11/2010 व विरूध्द पक्ष क्र. 2 ला दिनांक 06/11/2010 ला प्राप्त झाली. परंतु निष्पन्न न झाल्यामुळे सदर तक्रार दिनांक 10/01/2011 ला दाखल करण्यात आली. सदर नोटीसला विरूध्द पक्षांनी तक्रार दाखल झाल्यानंतर दिनांक 31/01/2011 ला उत्तर पाठविले. ह्यावरून सुध्दा विरूध्द पक्षाच्या कार्यपध्दतीतील खोडसाळपणा व उत्तर पाठविल्याचा बेबनाव केला आहे असे मंचाचे मत आहे. 17. तक्रारकर्त्यानुसार अनुक्रमे पृष्ठ क्रमांक 8 तसेच पृष्ठ क्रमांक 37 वरील दिनांक 21/07/2010 च्या मूळ बिलाची तुलना केली असता दोन्ही बिले व त्यावरील विरूध्द पक्षाची सही सारखीच आहे असे स्पष्टपणे दिसते. विरूध्द पक्ष यांनी आक्षेप घेतला की, तक्रारकर्त्याने बिलावर स्वतःच्या हाताने 2.5 years guarantee असे नमूद केले आहे व त्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ विरूध्द पक्ष यांनी पृष्ठ क्रमांक 23 वर तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या मूळ बिलाची कार्बन कॉपी म्हणून दस्तऐवज दाखल केला. पृष्ठ क्रमांक 23 वरील मूळ बिलाची कार्बन कॉपीवरून स्पष्ट होते की, विरूध्द पक्ष क्र. 1 यांचे विद्युत फिटर यांनी वॉरन्टी कार्ड व बिल प्राप्त केले होते. विद्युत फिटर विनोद देशमुख यांनी त्यांच्या हलफनाम्यात नमूद केले आहे की, बॅटरी खरेदी केल्यानंतर वॉरन्टी कार्ड व बिल माझेद्वारा तक्रारकर्त्याला दिनांक 22/07/2010 रोजी देण्यात आले होते. सदर बाब हलफनाम्यावर नमूद केलेली असतांना सुध्दा विरूध्द पक्ष क्र. 1 तसेच त्यांचे विद्युत फिटर विनोद देशमुख यांनी वॉरन्टी कार्ड दिले त्याबाबतची पोचपावती मंचासमोर नसल्यामुळे सदर कथन मंचास विश्वसनीय वाटत नाही. जेव्हा की, मूळ बिल हे तक्रारकर्त्याच्या ताब्यात होते व ते त्याने विरूध्द पक्ष क्र. 1 यांच्या मागणीनुसार मंचासमोर दाखल केले. 18. विरूध्द पक्ष यांनी आपल्या लेखी उत्तरासोबत डॉक्युमेंट 2 वॉरन्टी कार्ड इन्व्हॉईसची प्रत दिनांक 22/07/2010 तक्रारकर्त्याच्या नावाने म्हणून दाखल केली. त्या दस्तऐवजावरून असे स्पष्ट होते की, सदर दस्तऐवज विरूध्द पक्ष क्र. 2 यांस विरूध्द पक्ष क्र. 1 मार्फत 7 दिवसात दाखल केल्यानंतर वॉरन्टीची वैधता सुरू होते. तक्रारकर्त्यानुसार बिलावरील नोंदीप्रमाणे अडीच वर्षाची गॅरन्टी दिलेली होती. विरूध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजावरून बॅटरीची वॉरन्टी किती होती हे काहीही स्पष्ट होत नाही. विरूध्द पक्ष यांनी आपल्या लेखी बयानात, विशेष कथनात, लेखी युक्तिवादात तक्रारकर्त्याने खरेदी केलेल्या बॅटरीची वॉरन्टी/गॅरन्टी किती वर्षाची होती किंवा वॉरन्टी नव्हती हे नमूद करणे हेतूपुरस्सर टाळलेले आहे असा मंचाचा निष्कर्ष असून त्याबाबत मंच विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 यांच्याविरूध्द Adverse inference काढत आहे. जेव्हा की, सामान्यपणे नवीन खरेदी केलेल्या बॅटरीची वॉरन्टी ही सरासरी दोन ते अडीच वर्षे असते. The Sale of Goods Act, 1930 च्या कलम 14 (बी) नुसार तक्रारकर्त्यास खरेदी केलेल्या वस्तूंच्या योग्य वापराकरिता implied warrantee प्राप्त होते. तसेच The Sale of Goods Act, 1930 च्या कलम 16 (1) नुसार तक्रारकर्त्याने बॅटरी खरेदी करते वेळी बॅटरीच्या वापराचा हेतू खरेदी करण्यापूर्वीच विरूध्द पक्ष क्र. 1 ला माहीत केलेला असल्यामुळे तक्रारकर्त्याने खरेदी केलेली वस्तू ही त्या कामासाठी reasonably fit असून व त्याच्या गुणवत्तेबाबत implied conditions तक्रारकर्त्याच्या बाजूने प्राप्त होतात. 19. तक्रारकर्त्याने बॅटरी खरेदीचा हेतू स्पष्ट केल्यानंतर व विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास वॉरन्टी दिल्याचे मान्य केल्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 (1)(आर)(7) नुसार विरूध्द पक्ष यांची ही जबाबदारी होती की, बॅटरी ही आवश्यक चाचणी नंतरच विक्रीस आलेली आहे व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही विरूध्द पक्ष यांचीच होती असे मंचाचे स्पष्ट मत आहे. करिता विरूध्द पक्ष यांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे तसेच बॅटरीच्या खरेदीनंतर अल्पावधीतच बॅटरीने विरूध्द पक्ष यांच्या आश्वासनाप्रमाणे लोडशेडिंगच्या काळात बॅकअप देणे बंद केल्यामुळे तक्रारकर्त्यास पुरविण्यात आलेली बॅटरी ही सदोष होती असे मंचाचे स्पष्ट मत आहे व विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास सेवा दिल्याबाबत एकही वस्तुनिष्ठ पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. 20. वरील विवेचनावरून हे स्पष्ट होते की, विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास सदोष मालाचा पुरवठा करून अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे व त्यांच्याच वॉरन्टीनुसार सदर बॅटरी दुरूस्तही करून दिली नाही किंवा जुनी बॅटरी परत घेऊन त्या बदल्यात नवीन बॅटरी न दिल्यामुळे विरूध्द पक्ष यांच्या सेवेत गंभीर स्वरूपाची त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. विरूध्द पक्षाने अवलंबिलेल्या अनुचित व्यापार पध्दती व ग्राहक सेवेतील त्रुटीमुळे तक्रारकर्त्याने खरेदी केलेल्या बॅटरीचा लोडशेडिंगचे काळात उपभोग घेऊ शकला नाही त्यामुळे त्याला मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागला या तक्रारकर्त्याच्या म्हणण्यास मंचाला तथ्थ्य वाटते. म्हणून तक्रारकर्ता हा नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. करिता आदेश. आदेश तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 1. विरुद्ध पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास जुनी बॅटरी बदलून नवीन बॅटरी बदलून द्यावी. अन्यथा बॅटरीची किंमत रू. 13,000/- तक्रारकर्त्यास परत करावी. किंमत दिल्यास जुनी बॅटरी विरूध्द पक्षास परत करावी. 2. तक्रारकर्ता हा लोडशेडिंगच्या वेळी बॅटरीचा आवश्यकतेनुसार योग्य प्रकारे वापर करू न शकल्यामुळे तक्रारकर्त्यास मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. त्याकरिता विरुद्ध पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास रू. 2,000/- नुकसानभरपाई द्यावी. 3. प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी रू. 1,000/- तक्रारकर्त्यास द्यावे. 5. विरुद्ध पक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्त वा पृथकरित्या सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत करावे.
| HONABLE MR. N. V. BANSOD, MEMBER | HONABLE MRS. R. D. KUNDLE, PRESIDENT | HONABLE MRS. Geeta R Badwaik, Member | |