न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या यानी पारित केला
1. तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.
तक्रारदार हया वर नमूद केले पत्त्यावर पूर्वीपासून त्यांची नात कु.ऋतुजा शंकर शिंदे हिचेबरोबर रहातात.
जाबदार पतसंस्था ही सहकार कायदयाप्रमाणे स्थापन झालेली सहकारी संस्था असून ग्राहकाकडून ठेवी स्वरुपात रक्कम स्विकारुन मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी ग्राहकांनी रक्कम मागितलेस, सदरची रक्कम त्याना परत देणे अशा स्वरुपाचे हेतूने जाबदार पतसंस्था ही स्थापन झालेली आहे. ऋतुजा हिचे भविष्यातील शैक्षणिक खर्चाची तरतूद म्हणून कु.ऋतुजा हिचे नावे जाबदार पतसंस्थेत रक्कम रु.3,00,000/- ची ठेव पावती ठेवलेली होती. सदरच्या ठेवीची रक्कम तक्रारदारानी जाबदारांकडे वेळोवेळी मागितली असता जाबदारानी तक्रारदारांची ठेव रक्कम परत देणेचे हेतूने तक्रारदारांकडून सदरची मूळ ठेवपावती परत घेऊन ठेवपावतीवरील रक्कम तक्रारदारांचे बचत खाते क्र.1094/11/6 या खात्यावर दि.18-12-2013 रोजी जमा वर्ग केलेली आहे. तक्रारदारांनी वारंवार व वेळोवेळी जाबदारांकडे कु.ऋतुजा हिच्या शैक्षणिक खर्चासाठी लागणारी रक्कम परत मागितली असता, जाबदारांनी तक्रारदार हिस सदरची रक्कम अदयापपर्यंत अदा केलेली नाही. दि.30-5-2014 अखेरपर्यंत तक्रारदारांचे जाबदारांकडील बचत खात्यावर रक्कम रु.2,82,049/- इतकी शिल्लक आहे.
सदर बचत खात्यावरील शिल्लक रक्कम ज्यावेळी परत मागतील त्यावेळी जाबदारांनी तक्रारदारांना सदरची रक्कम आज अखेर होणा-या व्याजासह देणे जाबदारांवर बंधनकारक होते व आहे. तक्रारदारांनी जाबदारांचे शब्दावर विश्वास ठेवून कु.ऋतुजा हिचे शैक्षणिक खर्चाची तरतूद म्हणून जाबदार पतसंस्थेत सदरची रक्कम गुंतवली आहे. तथापि तक्रारदारांना सदर रक्कम परत मिळत नसल्याने तक्रारदाराना अत्यंत आर्थिक अडचणींना तोंड दयावे लागत आहे. तक्रारदारानी वेळोवेळी रक्कम मागूनही जाबदारानी तक्रारदाराना बचत खात्यावरील रक्कम दिली नाही व खोटी आश्वासने देवून मुदत मागून घेतली व शेवटी रक्कम देणेस नकार दिला, त्यामुळे तक्रारदाराना जाबदारांनी सदर तक्रार मे.मंचात दाखल करणे भाग पाडले आहे. तक्रारदारानी या मंचाशिवाय अन्य कोणत्याही कोर्टात जाबदारांविरुध्द तक्रारअर्ज वा वसुली अर्ज दाखल केलेला नाही. तक्रारदारांची तक्रार मुदतीत आहे.
तक्रारदाराना भयंकर मानसिक त्रास सोसावा लागलेला आहे. त्यामुळे तक्रारदाराना मानसिक व शारिरीक त्रासापोटी नुकसानभरपाई मागणेचा हक्क प्राप्त झाला आहे. तक्रारीस कारण दि.22-5-14 रोजी तक्रारदार जाबदारांकडे रक्कम मागणेस गेले असता जाबदारांनी तक्रारदारांची ठेवरक्कम परत देणेस स्पष्ट नकार दिला त्यावेळी मे.मंचाचे अधिकार स्थळसीमेत घडलेले आहे. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असून जाबदारांनी सेवेत त्रुटी कमतरता केली असल्याने सदर तक्रारीची दखल घेणेचा मे.मंचास अधिकार आहे.
जाबदारानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदाराना बचत खात्यावरील शिल्लक रक्कम रु.2,82,049/- एक महिन्याचे आत सव्याज अदा करावेत असे आदेश करणेत यावेत. मुदत संपले तारखेपासून रक्कम रु.2,82,049/- वर प्रत्यक्ष रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे.18 टक्के दराने व्याज जाबदारानी तक्रारदारास देणेचे आदेश करणेत यावेत, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- तसेच तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.10,000/- तक्रारदाराना जाबदाराकडून मिळणेचे आदेश व्हावेत याप्रमाणे तक्रारदारानी विनंतीकलमामध्ये मागण्या केलेल्या आहेत.
2. जाबदार क्र. 6 यांनी त्यांचे म्हणणे खालीलप्रमाणे दाखल केले आहे-
तक्रारदारांचे अर्जातील अन्य सर्व मजकूर जाबदार हे स्पष्टपणे नाकारीत आहेत. अर्जाच्या कलम 1 मधील मजकुराबाबत जाबदाराना काहीही माहिती नाही. कलम 2 मधील मजकूर खोटा व बनावट असून खरी वस्तुस्थिती लपवून नमूद केलेला आहे. तथाकथित रकमेची जी ठेवपावती ठेवलेचे सांगत आहेत त्यात तक्रारदारानी ती रक्कम कोणते दिवशी, किती तारखेला वा किती दिवसासाठी ठेवली आहे किंवा कसे याचा तपशील अर्जात दिलेला नाही. तसेच मूळ ठेवपावतीही दाखल केलेली नाही. यावरुन तक्रारदारांची लबाडी स्पष्ट होते. याच कारणासाठी तक्रारदारांचा अर्ज रद्द होणेस पात्र आहे. दि.30-5-14 रोजीच्या बचत खात्यावर जी रक्कम दाखवलेचे तक्रारदारानी कथन केले आहे ते जाबदाराना मान्य व कबूल नाही. अर्ज कलम 4 मधील मजकूर खरा नसून तो जाबदाराना मान्य व कबूल नाही. बचत खाते क्र.1094/11/6 या खात्यातून तक्रारदारानी बरीच रक्कम काढून घेतली आहे, त्याचा तपशील खालीलप्रमाणे-
दि.24-6-14 अखेर तक्रारदारानी वेळोवेळी त्यांचे खात्यातून एकूण रु.1,40,700/- काढलेले आहेत व तशा नोंदी संस्थेच्या रजिस्टरला आहेत. त्यामुळे कलम 4 मधील कथने ही पूर्ण लबाडीची व मंचाचे मत कलुषित करणेचे हेतूने केलेली आहेत. जाबदारानी तक्रारदाराना कधीही पैसे देणेचे नाकारले अगर अपशब्द वापरुन अपमान केलेला नाही. अर्ज कलम 5 मधील कथने खरी नसून ती जाबदाराना मान्य व कबूल नाहीत. तक्रारदारांचे बचत खात्याचे पासबुक पाहिल्यास जाबदारानी तक्रारदार मागतील तेव्हा त्यांची रक्कम परत केलेली आहे. तक्रारदार हे मुद्दाम त्यांचे पासबुक दाखल करीत नाहीत. तक्रारदारांची नात ऋतुजा शंकर शिंदे हिचे गाव कोणते व ती कोणते शिक्षण घेते हे स्पष्टपणे नमूद केलेले नाही. केवळ खोटे कारण सांगून तक्रारदारानी अर्ज दाखल केलेला आहे, तो रद्द होणेस पात्र आहे तसा तो रद्द करणेत यावा. तक्रारदाराना अर्ज दाखल करणेस काहीही कारण घडलेले नाही. कलम 6 मधील मजकूर संपूर्ण खोटा व बनावट असून तो जाबदाराना मान्य व कबूल नाही. तक्रारदारानी वेळोवेळी रकमेची मागणी केलेप्रमाणे जाबदारानी तक्रारदाराना रकमा दिलेल्या आहेत. ही बाब तक्रारदारांचे बचत खात्याचे पासबुक पाहिल्यास लक्षात येते. जाबदारानी तक्रारदाराबरोबर कधीही भांडणे काढलेली नाहीत, त्यामुळे तक्रारदाराना शारिरीक, मानसिक त्रास झालेला नाही. सदर तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही, सबब तक्रारअर्ज रद्द करणेत यावा. अर्ज कलम 7 मधील विनंती चुकीची व बेकायदेशीर असून ती फेटाळणेत यावी. येणेप्रमाणे म्हणणे दाखल आहे.
नि.3 वर तक्रारदारांचा अँड.कदम यांची सदर कामी नियुक्ती करणेकामी परवानगीचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.1 वर तक्रारअर्ज, नि.2 वर त्यासोबतचे प्रतिज्ञापत्र, नि.4 वर अँड.कदम यांचे वकीलपत्र, नि.5 वर कागदयादीने कागद दाखल, नि.5/1 ते 5/7 वर तक्रारदारांचे पासबुकची झेरॉक्स, नि.6 वर तक्रारदारांचा पत्ता मेमो, नि.7 वर जाबदाराना मंचातर्फे पाठवलेली नोटीस, नि.7/1 वर जाबदार क्र.3, 7/2 वर जाबदार क्र.13, 7/3 वर जाबदार क्र.4, 7/4 वर जाबदार क्र.12, 7/5 वर जाबदार क्र.7, 7/6 वर जाबदार क्र.2 यांच्या नोटीसीचे परत आलेले लखोटे, नि.8 वर जाबदार क्र.4 व 5 तर्फे वकीलपत्र व म्हणणे देणेसाठी अर्ज, अर्ज मंजूर. नि.9/1 वर जाबदार क्र.5 चे नोटीसची पोहोचपावती, नि.9/2 वर जाबदार क्र.8च्या नोटीसची पोहोचपावती, नि.9/3 वर जाबदार क्र.6च्या नोटीसची पोहोचपावती, नि.9/4 वर जाबदार क्र.9ची पोहोचपावती, नि.9/5 वर जाबदार क्र.10च्या नोटीसची पोहोचपावती, नि.9/6 वर जाबदार क्र.11ची पोहोचपावती, नि.16 वर जाबदार क्र.4 व 5 चा म्हणणे देणेसाठी मुदतीचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.7/1 वर जाबदार क्र.4 व 5 तर्फे अँड.काटकर यांचे वकीलपत्र दाखल. नि.9 वर जाबदार 4 व 5 यांचा पत्ता मेमो, नि.10 वर मुदतीचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.11 वर जाबदार क्र.6 तर्फे अँड.एम.डी.जाधव यांचे वकीलपत्र, नि.12 वर पत्तामेमो, नि.13 वर जाबदार 6 यांचा मुदतीचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.15 वर तक्रारदारांचा जाबदार क्र.1 ते 3 व 12,13 यांना जाहीर समन्ससाठीचा अर्ज दाखल, अर्ज मंजूर. नि.17 कडे जाबदार 6 यांचे म्हणणे, नि.18 वर जाहीर नोटीसीसाठी मे.मंचाचे संपादकांना पत्र, नि.18/1 वर जाहीर समन्सचा मसुदा, नि.18/2 वर तक्रारदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.19 कडे तक्रारदाराची पुरावा संपलेची पुरसीस, नि.21 वर तक्रारदाराचा कागदपत्रे दाखल करुन घेणेचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.22 कडे तक्रारदाराची कागदयादी, नि.23 कडे जाहीर समन्स प्रसिध्द केलेल्या वृत्तपत्राचा अंक, नि.24 कडे जाबदार क्र.5 यानी कागदयादी व सोबत कागदपत्रे दाखल, नि.24/1 वर जाबदार क्र.5 यांनी दिलेल्या राजीनाम्याचे स्थळप्रतीची झेरॉक्स, नि.24/2 कडे जाबदार पतसंस्थेच्या सभेच्या नोटीसची प्रत, नि.24/3, 24/4, 24/5, 24/6 वर जिल्हा उपनिबंधक, सहा.निबंधक याना जाबदार 5 यानी पत्र पाठवलेच्या पोस्टाच्या पावत्या, नि.25 कडे जाबदार क्र.5 चे प्रतिज्ञापत्र, नि.26 वर जाबदार क्र.5 चे म्हणणे दाखल, सदर म्हणण्यावर मे.मंचाचा आदेश की, जाबदार क्र.5 विरुध्द दि.10-12-14 रोजी नो से आदेश पारित झाला आहे. सबब म्हणणे दाखल करुन घेणे न्यायोचित होणार नाही व नो से आदेश रद्द करणेचे अधिकार मे.मंचास नाहीत. त्यामुळे जाबदार क्र.5 यानी दिलेले म्हणणे हे दाखल करुन घेतले गेले आहे पण ते सदर कामी विचारात घेता येणार नाही. नि.27 कडे तक्रारदाराची पुरसीस की, तक्रारदारानी दाखल केलेला तक्रारअर्ज व त्यासोबतचे प्रतिज्ञापत्र, पुराव्याचे प्रतिज्ञापत्र यातील मजकूर हाच तक्रारदारांचा लेखी युक्तीवाद समजणेत यावा. नि.28 कडे जाबदार क्र.5 यांचा लेखी युक्तीवाद, नि.29 कडे तक्रारदारांचा जाबदार क्र.14 याना वगळणेचा अर्ज. अर्ज मंजूर. नि.30 कडे दि.13-4-2015 रोजीची मूळ पासबुक व्हेरिफाय करुन ते परत मिळणेबाबतची तक्रारदाराची पुरसीस, कागद व्हेरिफाय करुन परत केले.
तक्रारदारांची तक्रार, त्यासोबतचे प्रतिज्ञापत्र, पुरावे, जाबदारांनी दाखल केलेले म्हणणे व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद व उभय विधिज्ञांचा युक्तीवाद यांचा विचार करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार हे जाबदार पतसंस्थेचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार हे तक्रारदार यांचे सेवापुरवठादार
आहेत काय? होय.
3. जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय? होय.
4. जाबदार हे तक्रारदारांच्या रकमा देणे लागतात काय? होय.
5. अंतिम आदेश काय? शेवटी नमूद केलेप्रमाणे.
विवेचन-
6. मुद्दा क्र.1 ते 4 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. जाबदार पतसंस्था ही लोकांचे पैसे विविध खात्यांवर ठेवून घेते व त्यावर ठेवीदारास व्याज देते. तसेच ती लोकांना कर्जरुपाने पैसे देते व त्यावर व्याज घेते अशा प्रकारे जाबदारांचा व्यवहार-व्यापार चालतो. तक्रारदाराने जाबदार पतसंस्थेत रक्कम रु.3,00,000/- ची ठेव ठेवली होती. जाबदारानी मूळ ठेवपावती स्वतःकडे ठेवून वरील रक्कम तक्रारदारांच्या बचत खाते क्र.1094/11/6 वर दि.18-12-13 रोजी वर्ग केली आहे. तक्रारअर्जासोबत दिलेल्या पासबुकावरुन दि.30-5-14 या दिवशी रु.2,82,049/- इतकी शिल्लक दिसून येते. परंतु दि.13-4-15 रोजी तक्रारदारानी मूळ पासबुक मंचात हजर केले व ते व्हेरिफाय करुन घेतले गेले तेव्हा तक्रारदारानी दि.24-6-14 रोजी रक्कम रु.42,000/- काढलेचे दिसून येतात त्यामुळे तक्रारदारांच्या जाबदार पतसंस्थेतील सेव्हींग पासबुकवर दि.24-6-14 रोजी रु.2,40,049/- शिल्लक दिसून येते. यावरुन तक्रारदार जाबदार पतसंस्थेचे ग्राहक असून त्यांचा व जाबदार पतसंस्थेचा व्यवहार होता हे सिध्द होते. तसेच जाबदार पतसंस्था रकमा ठेवून घेते व त्यावर व्याज देते त्यामुळे जाबदार पतसंस्था ही ग्राहकाना सेवा पुरवठा देणारी संस्था ठरते. तक्रारदारांची जाबदार संस्थेत सेव्हींग खात्यावर रक्कम जमा असलेली दिसते. तक्रारदारानी जेव्हा जाबदाराकडे सेव्हींग खात्यावरील जमा रकमेची मागणी केली तेव्हा ती त्याना मिळाली नाही. तक्रारदारास बचत खात्यावरील रक्कम सव्याज परत करणे हे जाबदारांचे कर्तव्य होते व आहे. परंतु ती त्यानी परत केली नसल्यामुळेच त्यांचेकडून त्यांच्या-(जाबदारांच्या) कर्तव्यात कसूर झाली आहे व ग्राहकाला दयावयाच्या सेवेत त्रुटी झाली आहे. आजपावेतो जाबदारांनी तक्रारदारांची रक्कम सव्याज परत केलेली नाही, ती त्यांनी त्यांना सव्याज परत केली पाहिजे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 ते 4 चे उत्तर होकारार्थी देत आहोत. त्यामुळे सदर तक्रारअर्जात तक्रारदारांचे पैसे परत करणेस co-operate corporate veil नुसार जाबदार क्र.1 ते 13 यांना हे मंच वैयक्तिक व संयुक्तीकरित्या जबाबदार धरीत आहे. जाबदार क्र.14 यांना तक्रारदारांच्या अर्जानुसार वगळणेत आलेले आहे.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-
-ः आदेश ः-
1. तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. तक्रारदार हिस दि.24-6-14 पासून रक्कम रु.2,40,049/- व त्यावर आदेश पारित तारखेपर्यंत जाबदार पतसंस्थेच्या नियमाप्रमाणे होणारे व्याज अशी होणारी एकूण रक्कम जाबदार क्र.1 ते 13 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अदा करावी.
3. वरील आदेशाचे पालन जाबदार क्र.1 ते 13 यानी 45 दिवसात करावे, तसे न केल्यास आदेश पारित तारखेपासून होणा-या सव्याज रकमेवर रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.10 टक्क्याने व्याज अदा करावे.
4. तक्रारदार हिला जाबदार क्र.1 ते 13 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- अदा करावेत.
5. वरील आदेशाचे पालन जाबदार क्र.1 ते 13 यानी आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत करावे. तसे न केल्यास आदेश पारित तारखेपासून रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत एकूण रकमेवर द.सा.द.शे.10 टक्केप्रमाणे व्याज दयावे लागेल.
6. वरील आदेशाचे पालन जाबदारानी विहीत मुदतीत न केलेस तक्रारदारांना त्यांचेविरुध्द कलम 25 व 27 नुसार मंचाकडे दाद मागणेची मुभा राहील.
7. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
8. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.16-4-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.