जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 65/2012 तक्रार दाखल तारीख – 17/04/2012
निकाल तारीख - 16/05/2015
कालावधी - 03 वर्ष , 29 दिवस.
मुस्तफा पिता तुराबखॉ पटेल,
वय – 40 वर्षे, धंदा – शेती,
रा. शिरोळ, ता. उदगीर, जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
- कनिष्ठ अभियंता उदगीर (ग्रा)
महाराष्ट्र राज्य विदयुत महावितरण कं. मर्या.
अंबेडकर चौक, जागृती सिनेमाजवळ, उदगीर,
ता. उदगीर, जि. लातुर.
- उपकार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विदयुत महावितरण कं. मर्यादीत.
- कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विदयुत महावितरण कं. मर्यादीत
दोघे रा. ग्रेन मार्केट, जुना पॉवर हाऊस, लातुर. .... गैरअर्जदार.
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. ए.एम.शेख.
गैरअर्जदारातर्फे :- अॅड. के.जी.साखरे.
निकालपत्र
(घोषितव्दारा – श्री अजय भोसरेकर,मा.सदस्य )
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हा शिरोळ (जा) ता. उदगीर जि. लातुर येथील रहिवाशी असून गट क्र. 350 मध्ये 46 जमीन तक्रारदाराच्या नावे आहे. सदर जमिनीत एक विहीर व बोअर आहे. सदर विहीरीवर व बोअरवर सामनेवाले यांच्याकडे रितसर अर्ज करुन डिमांड भरुन शेतीसाठी विज कनेक्शन प्राप्त केले होते. त्याचा ग्राहक क्र. 622720000416 असा सामनेवाले यांनी दिला असल्याचे म्हटले आहे.
तक्रारदाराच्या सदर गट क्रमांकामध्ये ऊस या पिकाचे उत्पादन गेल्या 3 वर्षापासुन घेतले असून, त्यात दि. 05/02/2011 रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास ऊसावरुन गेलेल्या विज तारांचे घर्षण होवून त्याच्या ठिणग्या ऊसात पडल्यामुळे ऊसाने पेट घेतला. सदर ऊस जळाल्यामुळे तक्रारदाराचे रु. 1,20,000/- चे नुकसान झाले असे तक्रारदाराने म्हटले आहे.
तक्रारदाराने सामनेवाले यांना सदर ऊस जळीताची लेखी तक्रार दिली होती. तसेच तहसील कार्यालय उदगीर यांना ऊस जळीताचा पंचनामा करण्याबाबत कळविले होते. तहसीलदाराने दि. 08/02/2011 तक्रारदाराच्या जळीत ऊसाचा पंचनामा करुन रु. 1,00,000/- नुकसान झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. सामनेवाला यांना दि. 11/03/2011 रोजी वकीला मार्फत कायदेशीर नोटीस पाठवली, ती त्यांना मिळाली असून, त्याचे उत्तर दिले नाही, व सामनेवाले यांनी तक्रारदाराची ऊस जळीताची रक्कम न दिल्यामुळे सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे. तक्रारदाराने ऊस जळीताची रक्कम रु. 1,20,000/- 12 टक्के व्याज दराने तसेच शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु. 5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 2,000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ शपथपत्र व एकुण 12 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाले यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून त्यानी त्यांचे वकीलपत्र दि. 06/03/2013 रोजी दाखल केले असून त्यांनी लेखी म्हणणे उशीराने दाखल केले. म्हणून रु. 200 कॉस्ट आकारुन त्यांचे लेखी म्हणणे दि. 31/07/2014 रोजी दाखल करुन घेतले. त्यात त्यांनी तक्रारदारांची घटना दि. 05/02/2011 रोजी सायंकाळी 5.30 वाजता गट क्र. 350 मधील 46 आर ऊस जळाल्याबद्दलची माहिती कनिष्ठ अभियंता यांनी दिल्यावरुन त्यांनी दि. 07/02/2011 रोजी सदर ऊस जळीताची घटना पाहणी केली. त्यात त्यांनी तक्रारदाराचा ऊस हा 3 महिन्याचा असल्याचे आढळले व 30 टक्के ऊस जळालेला आहे असे म्हटले आहे.
तक्रारदाराने दि. 11/03/2011 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली असे म्हटले आहे हे चुकीचे आहे. तक्रारदाराचा जळाला ऊस 3 महिन्याचा असल्यामुळे तो अपरिपक्व होता. त्यामुळे तक्रारदार कोणतीही नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. आमच्याकडुन कोणताही हलगर्जीपणा झाला नसल्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी मागणी केली आहे.
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, सोबतची कागदपत्रे, सामनेवाले यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे व तक्रारदाराने दि. 21/06/2014 रोजी केलेला तोंडी युक्तीवाद याचे बारकाईने अवलोकन केले असता. तक्रारदाराचा ऊस जळाल्या बाबतची घटना तक्रारदाराच्या तक्रारीवरुन व सामनेवाले यांच्या कनिष्ठ अभियंता यांच्या दि. 07/02/2011 च्या स्थळ पाहणीवरुन दिसुन येते..
तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदयानुसार, कलम 2 नुसार तक्रारदार हा सामनेवाले यांचा ग्राहक आहे हे सिध्द करणे हे प्रथमत: आवश्यक आहे. याबाबत तक्रारदार हा सामनेवाले यांचा ग्राहक होतो याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदाराचा ऊस हा सामनेवाले यांच्या विज तारांच्या घर्षणाच्या ठिणगीमुळे जळाला ही बाब सिध्द करण्यासाठी विदयुत निरीक्षकाचा अहवाल तोही या न्याय मंचासमोर सादर केला नाही. तक्रारदाराने त्याच्या ऊसाची लावण तारीख कोणती होती या बाबत स्पष्ट खुलासा करणारे प्रमाणपत्र किंवा सहकारी साखर कारखान्याचे सभासदाची नोंद केलेली लावण तारीख प्रमाणपत्र ज्यामुळे तक्रारदाराच्या ऊसाचे आयुष्यमान ठरवणे योग्य झाले असते. या बाबींचा विचार करता तक्रारदारास सामनेवाले यांच्याकडुन प्राप्त होणा-या सेवेत कसुर झाला आहे, ही बाब ग्राहक संरक्षण कायदयानुसार सिध्द न केल्यामुळे तक्रारदाराची तक्रार रद्द करणे योग्य व न्यायाचे होईल असे या न्यायमंचाचे मत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
2) खर्चाबाबत काही आदेश नाही.
(श्री. अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.