जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 159/2013 तक्रार दाखल तारीख – 10/10/2013
निकाल तारीख - 19/03/2015
कालावधी - 01 वर्ष , 05 म. 09 दिवस.
वसंत मुरारी मनाळे,
वय – सज्ञान, धंदा-शेती,
रा. मंगरुळ, ता. औसा,
जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
1) कनिष्ठ अभियंता,
महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी लि.,
किल्लारी ता. औसा, जि. लातुर.
2) कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी लि.,
निलंगा, ता.निलंगा, जि. लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. बी.व्ही.मिटकरी.
गैरअर्जदारातर्फे :- अॅड. आर.बी.जानते.
निकालपत्र
(घोषितव्दारा – श्रीमती रेखा जाधव,मा.सदस्या )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदारास मौजे मंगरुळ ता. औसा, जि. लातुर येथे गट क्र. 26/अ मध्ये शेतजमीन आहे. सदरील ठिकाणचा रहिवाशी आहे. अर्जदाराचा ग्राहक क्र. 626200277011 आहे. अर्जदाराच्या शेतातुन विदयुत पुरवठा तार गेलेली असून, सदरील विदयुत खांबावरुन अर्जदारास विदयुत पुरवठा दिलेला आहे. अर्जदाराचे शेतात दि. 14/10/11 रोजी विदयुत तार तुटुन गायी व म्हशीच्या अंगावर पडल्यामुळे विदयुत शॉक लागुन त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद पोलीस स्टेशन किल्लारी यांना दिली आहे त्यांनी पंचनामा केला. अर्जदाराच्या मयत गायीची किंमत रु. 35,000/- व म्हशीची किंमत रु. 40,000/- असुन एकुण रु. 75,000/- चे अर्जदाराचे नुकसान झाले आहे. अर्जदाराने दि. 08/08/13 रोजी गैरअर्जदारास वकीला मार्फत नोटीस दिली.
अर्जदाराने तक्रारी अर्जात रक्कम रु. 75,000/- त्यावर 9 टक्के व्याज घटना घडल्यापासुन व मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु. 10,000/- तक्रारी अर्जाच्या खर्चा पोटी रु. 5,000/- ची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत पुरावा म्हणून शपथपत्र दिले आहे, व त्यासोबत एकुण – 07 कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदाराने दि. 09/02/2015 रोजी म्हणणे नाही आदेश दिला आहे.
अर्जदाराचा तक्रारी अर्ज व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, व पुरावा म्हणून दिलेले शपथपत्र तसेच गैरअर्जदाराचे लेखी युक्तीवाद, अर्जदार व गैरअर्जदार यांचा तोंडी युक्तीवाद याचे अवलोकन केले असता खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? नाही
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? नाही
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर अर्जदाराने गैरअर्जदाराकडे मोबदला देवून विदयुत पुरवठा घेतलेला आहे. त्याचा ग्राहक क्र; 626200277011 आहे. सदरचा मोबदला गैरअर्जदाराने स्विकारल्यामुळे अर्जदार ग्राहक या संज्ञेत येतो, म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर अर्जदाराचे शेतात गट क्र. 26/अ मध्ये मंगरुळ येथे दि. 14/10/11 रोजी विदयुत तार पडुन गाय व म्हैस मयत झाली. सदरच्या घटनेबद्दल गैरअर्जदारास माहिती दिल्याचा पुरावा नाही. अर्जदाराने दि. 08/08/2013 रोजी सदर घटनेची माहिती नोटीसद्वारे 01 वर्ष 08 महिन्यानी गैरअर्जदारास दिल्याचे दिसुन येते. अर्जदाराने सदरची घटना घडल्यानंतर गैरअर्जदारास सदर घटनेची माहिती 24 तासाच्या आत दिली नाही, हे दाखल केलेल्या पुराव्यावरुन दिसुन येते. गैरअर्जदारास सदर घटनेची माहिती 1 वर्ष 08 महिन्यानी कळविल्यामुळे गैरअर्जदारास सदर घटनेची सत्यता त्याला माहित नसल्यामुळे गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केल्याचे दिसुन येत नाही. अर्जदाराने दि. 15/10/11 रोजी सदर घटनेचा घटनास्थळ पंचनामा मधील मुद्दा क्र. 09 मध्ये घटनास्थळाचा नकाशा दर्शविलेला नसुन कोरा आहे. त्यामुळे सदरची घटना घडल्याबद्दलची सत्यता दिसुन येत नाही. अर्जदाराने पशु विक्री किंवा परिवर्तनाचा ग्राम पंचायत मंगरुळचा मुळ दाखल दिला आहे. घटनास्थळ पंचनाम्यात गायीचा रंग जांभळा काळा असल्याचे दिसते व शवविच्छेदन अहवालात ब्राऊन रंगाचा उल्लेख आहे, घटनास्थळ पंचनामा, व शवविच्छेदन अहवाल परस्पर विरोधाभास निर्माण करणारे आहेत. अर्जदाराने सदरची गाय व म्हैस कधी खरेदी केल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केली याबद्दलचा सबळ असा पुरावा दिसुन येत नाही. म्हणून मुद्दा क्र. 2 चे उत्तर नाही असे आहे.
मुद्दा क्र. 3 चे उत्तर अर्जदाराने कागदोपत्री पुरावा देवून सदरचा तक्रारी अर्ज सिध्द केला नाही. सदरची घटना घडली व त्यात अर्जदाराचे रु. 75,000/- चे नुकसान झाले हे सिध्द होत नसल्यामुळे अर्जदार हा अनुतोषास पात्र नाही. हे सदर न्यायमंचाचे मत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
2) खर्चाबाबत काही आदेश नाही.
(श्री. अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.