(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक असून, त्यांना देण्यात आलेल्या चुकीच्या वीज बिलाविरुध्द मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्यांचे सरासरी वीज बिल 400 ते 500 रुपयापर्यंत येत असते. ऑक्टोबर 2009 मध्ये गैरअर्जदार यांच्यातर्फे त्यांचे वीज मीटर (2) त.क्र.397/10 बदलण्यात आले. नोव्हेंबर 2009 मध्ये त्यांना 12390/- रुपयाचे बिल व डिसेंबर 2009 मध्ये 5000/- रुपयाचे बिल आकारण्यात आले. अर्जदारास आकारण्यात येत असलेल्या वाढीव वीज बिलामुळे त्यांनी मीटर टेस्ट करुन देण्यासाठी गैरअर्जदार यांना विनंती केली व त्यासाठी चाचणी फी रु.100/- देखील भरले. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे मीटर तपासल्यानंतर त्यात कोणताही दोष नसल्याचा अहवाल दिला. अर्जदारास जानेवारी 2010 मध्ये 450/- रुपयाचे वीज बिल देण्यात आले. नोव्हेंबर, डिसेंबर 2009 मध्ये देण्यात आलेल्या वाढीव वीज बिलाविरुध्द त्यांनी गैरअर्जदार यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली, पण गैरअर्जदार यांनी त्याची दखल घेतली नाही. मार्च 2010 मध्ये अर्जदारास गैरअर्जदार यांच्याकडून 9336/- रुपयाचे बिल देण्यात आले. या वीज बिलाविरुध्द केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली नसल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. अर्जदारास त्यांच्या सरासरी वापराप्रमाणे बिल देण्यात यावे व वाढीव वीज बिलापोटी भरलेली रक्कम व्याजासह परत करण्यात यावी, तसेच नुकसान भरपाईची मागणी अर्जदाराने केली आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराकडे आधी लावण्यात आलेले जुने मीटर सप्टेंबर 2009 मध्ये बदलण्यात आले व त्या जागी नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात आले. अर्जदाराने या मीटरबाबत केलेल्या तक्रारीवरुन त्यांच्या मीटरची तपासणी करण्यात आली, तेव्हा ते योग्य रितीने वीज वापराची नोंद घेत असल्याचे चाचणीत आढळून आले. जानेवारी 2010 मध्ये अर्जदाराकडे त्यांच्या मागणीनुसार नवीन मीटर (क्र.4111951) बसविण्यात आले. अर्जदारास देण्यात आलेली वीज बिले ही मीटरवरील नोंदीप्रमाणे असून, अर्जदार यांनी दुकानासाठी देखील याच वीज मीटरवरुन पुरवठा घेतलेला आहे. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार चुकीची असून, खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन मंचास असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. जानेवारी 2009 ते ऑगस्ट 2009 या काळात अर्जदाराकडे 00093198 या क्रमांकाचे वीज मीटर होते व वरील काळासाठी अर्जदारास सरासरीवर आधारीत वीज बिल आकारण्यात आले. सप्टेंबर 2009 मध्ये त्यांचे जुने मीटर बदलून त्या जागी 04111312 या क्रमांकाचे नवीन मीटर बसविण्यात आले. ऑक्टोबर 2009 ते डिसेंबर 2009 या तीन महिन्यात अर्जदारास अनुक्रमे 545, 1683, 688 युनिट वीज वापराचे बिल देण्यात आलेले दिसून येते. जानेवारी 2010 मध्ये अर्जदाराकडे लावण्यात आलेले 04111312 या क्रमांकाचे मीटर बदलून पुन्हा त्या ठिकाणी 04111951 (3) त.क्र.397/10 या क्रमांकाचे मीटर बसविण्यात आले. फेब्रुवारी 2010 मध्ये या मीटरवर 317 युनिट वीज वापराची, तसेच मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट 2010 या काळात अनुक्रमे 1172, 443, 674, 951, 390, 539 वीज वापराची नोंद झालेली दिसून येते. अर्जदाराचे 0004111312 क्रमांकाचे मीटर दि.12.01.2010 रोजी चाचणी विभागात तपासण्यात आले जे ओ के असल्याचे म्हटले आहे. अर्जदारास जानेवारी 2009 ते ऑगस्ट 2009 या काळात मीटर बंद असल्यामुळे सरासरीवर आधारीत बिल आकारण्यात आले, जे 400 ते 600 रुपयापर्यंत आहे. यावरुन अर्जदारास त्याचे वीज बिल 400 ते 500/- रुपये असल्याचे वाटते. पण प्रत्यक्षात नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर लावल्यानंतर अर्जदाराचा वीज वापर जास्त असल्याचे दिसून येते. अर्जदाराकडे स्थळ पाहणी केली असता, त्यात डिफ्रीजर असल्याचे नमूद केले आहे. डिफ्रीजरच्या वापरामुळे अधिक वीज वापराची शक्यता नाकारता येत नाही. वरील सर्व निरीक्षणांवरुन अर्जदाराची तक्रार अमान्य करण्यात येते. आदेश 1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येते. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |