निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 31/05/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 16/06/2010 तक्रार निकाल दिनांकः- 07/02/2011 कालावधी 07 महिने 22 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. गजानन पिता भिवाजी वाघमारे. अर्जदार वय 35 वर्षे. अड.जे.एन.घुगे. रा.धर्मापूरी.ता.जि.परभणी. विरुध्द 1 महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन कं.लि. गैरअर्जदार. (एम.एस.इ.डि.सी.एल.) व्दारा- ज्युनियर इंजिनियर.(आर.-II) अड.एस.एस.देशपांडे. परभणी रुरल रिजन.परभणी ता.जि.परभणी. 2 सुप्रिन्टेंडेंट इंजिनियर (एस.इ.) परभणी डिस्ट्रीक्ट. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन कं.लि. (एम.एस.इ.डि.सी.एल.) विद्युत भवन. जिंतूर रोड.परभणी जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे.अध्यक्ष. ) अवास्तव विज बिलाबाबत प्रस्तुतची तक्रार आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत. अर्जदार धर्मापूरी येथील रहिवासी असून गैरअर्जदाराकडून घरगुती वापरासाठी घेतलेल्या विज कनेक्शनचा ग्राहक नंबर 534270407476 आहे.माहे जानेवारी 2010 चे अचानकपणे 133 युनिट वीज वापराचे रु.704.39 चे अवास्तव रक्कमेचे बील दिले.त्यामध्ये मागील बाकी 157.33 नमुद केली आहे. त्यानंतर फेब्रुवारी 2010 चे रुपये 1339.42 चे बील दिले ते सुध्दा चुकीचे व भरमसाठ रक्कमेचे दिले. अर्जदाराचे म्हणणे असे की, त्याचे घरी दरमहा किमान 35 ते कमाल 50 युनिट पेक्षात जास्त कधीही वीज वापर होत नाही त्यामुळे दिलेली बीले चुकीची असल्यामुळे ती रद्द करुन नवीन दुरुसत बीले देण्याबाबत गैरअर्जदारास लेखी व तोंडी तक्रार दिली. परंतु त्यांनी त्याची दखल घेतली नाही त्यामुळे 24/02/2010 रोजी गैरअर्जदारांना वकिला मार्फत नोटीस पाठविली होती नोटीस स्विकारुनही त्यांनी त्यालाही दाद दिली नाही.म्हणून ग्राहक मंचात प्रस्तुतची तक्रार दाखल करुन माहे जानेवारी 2010 व फेब्रुवारी 2010 ची दिलेली बीले चुकीची असल्याचे जाहिर करुन रद्द करावीत आणि बिलावरील मागील विज वापराच्या रेकॉर्ड प्रमाणे नवीन दुरुस्त बील देण्याचा गैरअर्जदारास आदेश व्हावा.या खेरीज मानसिकत्रासापोटी रु.90,000/- तक्रार अर्जाचा खर्च रु.8,000/- व अर्जाचा खर्च रु.2000/- गैरअर्जदाराकडून मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर तारीख 23/09/2010 रोजी एकत्रितरित्या लेखी जबाब ( नि.13 ) सादर केला.त्यामध्ये तक्रार अर्जातील परिच्छेद 1 मधील वर्णन केले प्रमाणे अर्जदाराला घरगुती वापराचे विज कनेक्शन दिल्याचा मजकूर त्यांनी नाकारलेला नाही. वादग्रस्त बिलाबाबत त्यांनी असा खुलासा केला आहे की, माहे जानेवारी 2010 चे बिल चालू रिडींग आणि मागील रिडींगची वजावट करुनच दिलेले आहे. त्या महिन्याचे बिलात अर्जदाराकडे मागील थकबाकी रु.157.33 होती त्यासह रु.704.39 चे बील असून ते प्रत्यक्ष रिडींग प्रमाणे बरोबर आहे.तसेच माहे फेब्रुवारी 2010 चे बील देखील प्रत्यक्ष रिडींग प्रमाणेच 291 युनीट विज वापर केल्याचे दिलेले आहे. अर्जदाराला पुर्वी दिलेली बिले त्यांने कधीही वेळेवर भरली नाहीत.त्या बीलातही मागील थकबाकी रु.714.49 होती.ती धरुन रु.2043.85 चे बील दिले आहे ते बरोबर आहे.अर्जदाराने वकिला मार्फत दिलेल्या नोटीसी नंतर स्पॉट इन्सपेक्शन तारीख 03/03/2010 रोजी करुन अर्जदाराला सविस्तर उत्तर दिले होते.ही बाब अर्जदाराने मंचापासून लपवली आहे. बिलाच्या बाबतीत गैरअर्जदाराकडून कोणत्याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही किंवा चुकीची व अवास्तव रक्कमेची बिले दिलेली नाहीत.सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी विनंती केली आहे. लेखी निवेदनाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार तर्फे असिसटंट इजिनीयर यांचे शपथपत्र ( नि.14) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.17 लगत अर्जदाराच्या ग्राहक क्रमांकाचा सि.पी.एल.उतारा, दोन स्पॉट इन्सपेक्शन रिपोर्टस, व नोटीस उत्तर अशी 5 कागदपत्रे दाखल केली आहेत. प्रकरणाच्या अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदारातर्फे अड.जे.एन.घुगे आणि गैरअर्जदार तर्फे अड.एस.एस.देशपांडे यांनी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदारांनी माहे जानेवारी 2010 व फेब्रुवारी 2010 ची दिलेली वादग्रस्त बीले चुकीची व अवास्तव रक्कमेची देवुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवात्रुटी केली आहे काय ? नाही. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशा पमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदारने गैरअर्जदाराकडून घरगुती वापराचे ग्राहक क्रमांक 534270407476 या नंबरचे विज कनेक्शन घेतलेले आहे. ही अडमिटेड फॅक्ट आहे. त्याचे म्हणणे असे की, सन 2009 अखेर गैरअर्जदाराकडून आलेल्या विज बिला बाबत त्याची तक्रार नव्हती घरी दरमहा साधारणपणे किमान 35 युनीट ते कमाल 50 युनीट एवढाच विज वापर होत असतो असे असतांना गैरअर्जदाराकडून जानेवारी 2010 चे बील अचानक 133 युनिटचे रु.704.39 अवास्तव रक्कमेचे दिले. तसेच फेब्रुवारी 2010 चे बील देखील 291 युनीटचे रु.1339.42 असे अवास्तव व चुकीचे बील दिले.या वादग्रस्त बिलाबाबत अर्जदाराची प्रामुख्याने तक्रार आहे.तक्रार अर्जासोबत दाखल केलेल्या नि.4/1 वरील या वादग्रस्त बिलाचे अवलोकन केले असता अर्जदाराने जानेवारी 2010 या महिन्यात केलेल्या विज वापराचे बिल ( देयक तारीख 06/02/2010 ) असून चालू रिडींग 1140 युनीट व मागील रिडींग 1007 युनीटची वजावट करुन 133 युनीटची आकारणी रु.546.61 + मागील थकबाकी रु.157.78 असे मिळून एकुण 704.39 रुपयेचे बील आहे बिलामधील रिडींगची नोंद चुकीची आहे किंवा काय याची पडताळणी करण्यासाठी गैरअर्जदारतर्फे पुराव्यात नि.17/5 वर दाखल केलेल्या अर्जदाराच्या ग्राहक क्रमांकाचा माहे ऑक्टोबर 09 ते डिसेंबर 09 या कालावधीतील नोंदलेल्या रिडींगचे अवलोकन केले असता तिन्हीही महिन्यात मागील व चालू रिडींगची नोंद आहे. एवढेच नव्हेतर जानेवारी 2010 ते जुलै 2010 पर्यंत देखील सी.पी.एल.मध्ये मागील व चालू रिडींगच्या नोंदी दिसतात त्यामुळे गैरअर्जदारांनी माहे जानेवारी किंवा त्यापूर्वी काळातील दिलेली बिले चुकीची आहे असे मुळीच वाटत नाहीत.नि.4/1 वरील माहे जानेवारी 2010 च्या बिलात मागील विज वापर या शिर्षका खालील टेबल मध्ये फेब्रुवारी 09 ते डिसेंबर 09 मधील विज वापर किमान 35 ते कमाल 106 युनीट दरमहा विज वापर केल्याची नोंद दिसून येत असली तरी फेब्रुवारी 2009 मध्ये 106 युनीटचा वापर केलेला दिसतो. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.अर्जदारने जानेवारी 2010 च्या बिलाबाबत केलेल्या तक्रारीच्या बाबतीतही पुराव्यातील सी.पी.एल मधील नोंदीतून असे दिसते की,माहे डिसेंबर 09 चे एकुण बिल 304.62 पैकी अर्जदारने फक्त रु.150/- जमा केल्याची नोंद आहे.तसेच जानेवारी 2010 चे बिल रु.704.39 असले तरी ती रक्कम डिसेबर 2009 च्या मागील थकबाकीसह आहे.अर्जदारने तक्रार अर्जामध्ये त्याच्याकडे मागील थकबाकी कसलीही नाही. असे म्हंटलेले आहे. परंतु डिसेंबर 2009 अखेर त्याने सर्व बिले पूर्ण रक्कमेची भरली होती या संबंधीचा कसलाही ठोस पुरावा प्रकरणात दाखल केलेला नसल्यामुळे अर्जदाराचे म्हणणे ग्राह्य धरता येणार नाही.तसेच त्याने पुराव्यात दाखल केलेल्या मार्च 2010 च्या नि.4/2 वरील बिलाचे (देयक तारीख 11/4/2010) अवलोकन केले असता असे दिसून येते की, सदरचे बिल चालू रिडींग व मागील रिडींग वजा जाता 39 युनीटची आकारणी रु.162.65 केलेली आहे.परंतु त्यापूर्वीची माहे फेब्रुवारी 2010 चे 291 युनीटचे बिल रु.2097.92 अर्जदाराने भरलेले नसल्यामुळे त्या थकबाकीसह एकुण रु.2240 चे बील दिलेले आहे. अर्जदारने माहे डिसेंबर 2009 पासूनची बिले भरलेली नसल्यामुळे मागील थकबाकीसह पुढील महिन्यात बिलाच्या रक्कमा वाढत गेल्या आहेत. त्याला अर्जदारच स्वतः कारणीभुत आहे हे सि.पी.एल.मधील नोंदीतून स्पष्ट दिसते.वादग्रस्त बिलाबाबत गैरअर्जदाराकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या असेही अर्जदाराने तक्रार अर्जातील परिच्छेद क्रमांक 5 मध्ये म्हंटलेले आहे. परंतु त्यासंबंधीचा देखील एकही पुरावा उदा.अर्जाच्या स्थळप्रती मंचासमोर दाखल केलेल्या नाहीत.गैरअर्जदारास वकिला मार्फत तारीख 24/02/2010 रोजी पाठवलेल्या नोटीसीची स्थळप्रत ( नि.4/3) दाखल केलेली आहे. त्या नोटीसी वरुनच गैरअर्जदाराच्या अधिका-याने तारीख 03/03/2010 आणि तारीख 29/06/2010 रोजी अर्जदाराच्या घरातील मिटरची प्रत्यक्ष तपासणी केली होती. त्याचे रिपोर्ट प्रकरणात नि.17/1 व 17/2 वर दाखल केलेले आहेत. त्यामध्ये मिटर ओ.के.असल्याचाच रिपोर्ट आहे.मिटर सदोष आहे. अशी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे पूर्वी तक्रार केलेली होती असाही पुरावा मंचापुढे अर्जदारने सादर केलेला नसल्यामुळे रिपोर्ट मधील अभिप्राय खोटा म्हणता येणार नाही.माहे जानेवारी 2010 व फेब्रुवारी 2010 मध्ये अर्जदारने जेवढा प्रत्यक्ष विज वापर केला होता त्याप्रमाणेच मिटर मधील रिडींग आलेली आहे.कदाचित नेहमीच्या वापरा व्यतिरिक्त अन्य विशेष कारणासाठीही त्या काळात अर्जदाराने जादा विज वापर केला असला पाहिजे ही शक्यता नाकारता येत नाही. व त्यानुसारच गैरअर्जदारांनी बिलाची आकारणी केलेली असल्याचे पुराव्यातील वस्तुस्थितीवरुन स्पष्ट दिसते. त्यामुळे गैरअर्जदाराने जानेवारी 2010 चे चुकीचे व अवास्तव रक्कमेचे बिल दिले. या अर्जदाराच्या तक्रारीस काहीही तथ्य नाही.व तक्रार मान्यही करता येणार नाही.याबाबतीत गैरअर्जदाराकडून कोणत्याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही असे मंचाचे मत आहे. सबब,मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे. 2 पक्षकारांनी आपला खर्च आपण सोसावा. 3 पक्षकारांना निकालाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |