(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
(पारित दि. 30 ऑगस्ट, 2014)
तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडून रू. 50,000/- नुकसानभरपाई मिळण्यासाठी सदरहू तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता हा विरूध्द पक्ष महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, गोंदीया यांचा ग्राहक असून तक्रारकर्त्याने दिनांक 18/02/2012 रोजी विद्युत पुरवठा मिळण्यासाठी विरूध्द पक्ष यांच्याकडे अर्ज केला होता. त्यानुसार दिनांक 24/07/2012 रोजी तक्रारकर्त्याला विरूध्द पक्ष यांचेकडून विद्युत मीटर देण्यात आले. सदरहू विद्युत मीटर हे दिनांक 27 सप्टेंबर 2012 रोजी तक्रारकर्त्याकडे लावण्यात आले. तक्रारकर्त्याचा विद्युत मीटर क्रमांक 75642032 असा असून ग्राहक क्रमांक 430010339477 असा आहे.
3. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला विद्युत मीटर लावून दिले तेव्हापासून मीटर रिडींग हे 14680 युनिट दाखवित होते. तक्रारकर्त्याला प्रथम बिल 14680 युनिट ते 14729 युनिट याप्रमाणे एकूण 49 युनिटचे रू. 262/- चे बिल विरूध्द पक्ष यांनी न देता ते रू. 710/- व्याजासह जोडून देण्यात आले. तक्रारकर्त्याला देण्यात आलेल्या बिलामध्ये दुस-या व्यक्तीचे थकित बिल रू. 18,646.23 व त्यावरील व्याज हे तक्रारकर्त्याच्या नवीन देण्यात आलेल्या विद्युत कनेक्शनच्या बिलामध्ये विरूध्द पक्ष यांचेकडून बेकायदेशीररित्या लावण्यात आले. विद्युत पुरवठा खंडित होऊ नये म्हणून तक्रारकर्त्याने रू. 710/- चे बिलाचा भरणा दिनांक 23/11/2012 रोजी विरूध्द पक्ष यांच्याकडे केला.
4. तक्रारकर्त्याने दिनांक 01/11/2012 रोजी विरूध्द पक्ष यांच्याकडे विद्युत मीटर हे दोषपूर्ण असल्यामुळे ते बदलून देण्यासाठी अर्ज केला. त्यानंतर सुध्दा मीटर बदलून देण्यासाठी व बिल दुरूस्त करण्यासाठी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडे लेखी व तोंडी विनंती केली. परंतु विरूध्द पक्ष यांनी त्याची कुठलीही दखल घेतली नाही. उलट तक्रारकर्त्याला वेळोवेळी जास्त रकमेचे बिल देऊन व दुस-या मीटर मालकाचे व्याज मागील थकित बिला पोटी तक्रारकर्त्याच्या बिलामध्ये लावल्यामुळे तक्रारकर्त्याला मानसिक त्रास सहन करावा लागला. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याची तक्रार वारंवार विनंती करून सुध्दा दूर न केल्यामुळे तक्रारकर्त्याने सदरहू प्रकरण न्याय मंचात दाखल केले असून मानसिक त्रासापोटी रू. 50,000/- नुकसानभरपाई मिळावी अशी विनंती केली आहे.
5. तक्रारकर्त्याची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 22/04/2013 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतरही विरूध्द पक्ष हे मंचासमक्ष हजर झाले नाहीत अथवा त्यांचा लेखी जबाब सुध्दा त्यांनी सदरहू प्रकरणात दाखल केला नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्याविरूध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 25/02/2014 रोजी मंचाद्वारे पारित करण्यात आला.
6. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत दिनांक 01/11/2012 रोजी विरूध्द पक्ष यांच्याकडे केलेली तक्रार पृष्ठ क्र. 10 वर दाखल केली असून विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचा विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबत दिलेली नोटीस पृष्ठ क्र. 11 वर दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याने ऑक्टोबर 2012 चे बिल पृष्ठ क्र. 14 वर दाखल केले असून तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडे नवीन मीटर मिळण्यासाठी भरणा केलेल्या रकमेबाबतची पावती पृष्ठ क्र. 15 वर दाखल केली आहे. तसेच नोव्हेंबर 2012 चे बिल पृष्ठ क्र. 18 वर दाखल केले असून तक्रारकर्त्याचे सप्टेंबर 2012 ते फेब्रुवारी 2013 या कालावधीचे विद्युत मीटरचे लेजर पृष्ठ क्र. 21 वर, तक्रारकर्त्याचे 549 युनिटचे revised bill पृष्ठ क्र. 22 वर आणि फेब्रुवारी 2013 चे बिल पृष्ठ क्र. 23 वर दाखल केलेले आहे.
7. तक्रारकर्त्याने असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याने विद्युत पुरवठा मिळण्याकरिता विरूध्द पक्ष यांच्याकडे अर्ज केला व पैसे भरल्याच्या पावतीची प्रत सदरहू प्रकरणात पृष्ठ क्र. 16 वर दाखल केली आहे तसेच तक्रारकर्त्याकडे विद्युत मीटर हे दिनांक 27/09/2012 रोजी लावण्यात आले. तक्रारकर्त्याकडे लावण्यात आलेले मीटर हे दुस-या व्यक्तीच्या नावावर होते व त्याचे रिडींग 14680 युनिट इतके होते. तक्रारकर्त्यास येणा-या बिलामध्ये मागील मालकाच्या थकबाकीच्या बिलाचे व्याज तक्रारकर्त्याच्या बिलामध्ये लावण्यात आले होते. तक्रारकर्त्याने वारंवार विनंती करून सुध्दा व दिनांक 01/11/2012 रोजी लेखी अर्ज देऊन सुध्दा तक्रारकर्त्याच्या दोषपूर्ण विद्युत मीटरचे निराकरण न झाल्यामुळे तक्रारकर्त्याला मानसिक त्रास व हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. करिता तक्रारकर्त्याला रू. 50,000/- नुकसानभरपाई देण्यात यावी.
8. तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे तसेच तक्रारकर्त्याने स्वतः केलेला युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | विरूध्द पक्ष यांच्या सेवेत त्रुटी आहे काय? | होय |
2. | तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
9. तक्रारकर्त्याला प्रथम देण्यात आलेल्या विद्युत बिलावर नमूद केलेले मागील रिडींग हे 14680 युनिट व चालू रिडींग 14729 युनिट असे एकूण 49 युनिट विद्युत वापराचे असून त्यावरून असे सिध्द होते की, तक्रारकर्त्याकडे लावण्यात आलेले विद्युत मीटर हे दुस-या व्यक्तीच्या मालकीचे विद्युत मीटर आहे. तक्रारकर्त्याचे विद्युत मीटर हे दोषपूर्ण असून ते बदलून देण्यात यावे तसेच विद्युत देयकामध्ये विद्युत मीटरचे रिडींग चुकीचे दाखवित असून बिलामध्ये मागील थकीत बिलाचे व्याज लावण्यात येत असल्यामुळे ते दुरूस्त करून देण्यासाठी तक्रारकर्त्याने दिनांक 01/11/2012 रोजी तसेच दिनांक 30/07/2013 रोजी विरूध्द पक्ष यांच्याकडे अर्ज दिले होते. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याकडून Meter Testing Charges म्हणून रू. 150/- दिनांक 12/03/2013 रोजी घेतले व त्यासंबंधात पावती सुध्दा तक्रारकर्त्याला दिलेली आहे जी पृष्ठ क्र. 20 वर दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या मागील बिलांवरून असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्याच्या घरी बसविण्यात आलेले विद्युत मीटर हे चुकीचे रिडींग दर्शवित असून युनिटप्रमाणे येणारे बिल सुध्दा चुकीचे दर्शवित आहे.
10. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचा अर्ज प्राप्त झाल्यावर Electricity Act, 2003 नुसार कार्यकारी अभियंता यांच्यासमक्ष व तक्रारकर्त्यास नोटीस देऊन तक्रारकर्त्याच्या विद्युत मीटरची तपासणी करून सकृतदर्शनी त्यात दोष आढळल्यास ते विद्युत मीटर Laboratory Testing करिता पाठविणे आवश्यक असून त्याप्रमाणे विरूध्द पक्ष यांनी कार्यवाही करणे गरजेचे होते. परंतु अशी कुठलीही कार्यवाही विरूध्द पक्ष यांनी केल्याचे आढळून न आल्यामुळे व त्यासंबंधी कुठलेही कागदपत्र सदरहू तक्रारीमध्ये किंवा तक्रारकर्त्यास न दिल्यामुळे तसेच तक्रारकर्त्याने वारंवार विनंती करून सुध्दा त्याला विद्युत बिलासंबंधी लावण्यात आलेले युनिटचे दर याबद्दलचे statement न देणे म्हणजेच सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1, 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याच्या विद्युत मीटर मधील दोष त्वरित दूर करून द्यावा. जर तक्रारकर्त्याच्या विद्युत मीटरमधील दोष दूर होऊ शकत नसेल तर सदरहू सदोष विद्युत मीटर बदलून तक्रारकर्त्याला नवीन दोषरहित विद्युत मीटर देण्यात यावे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारकर्त्याला देण्यात आलेली मागील सर्व देयके समायोजित करून त्यांनी तक्रारकर्त्याला सुधारित देयक द्यावे व तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांनी दिलेल्या सुधारित देयकाचा भरणा करावा.
4. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रू. 3,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्त्याला रू. 2,000/- द्यावे.
6. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.