नि.23
मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्या – सौ मनिषा कुलकर्णी
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 149/2015
तक्रार नोंद तारीख : 10/06/2015
तक्रार दाखल तारीख : 14/08/2015
निकाल तारीख : 22/01/2016
श्री गुलाब आजमुद्दीन मुलाणी
रा.घर नं.4509, जत रोड, बेघर वसाहत,
कवठेमहांकाळ, जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. कनिष्ठ अभियंता
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसीठी डिस्ट्रीब्यूशन कं.लि.
कवठेमहांकाळ, मु.पो.कवठेमहांकाळ
ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
2. सहायक अभियंता
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसीठी डिस्ट्रीब्यूशन कं.लि.
उपविभाग कवठेमहांकाळ,
ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
3. कार्यकारी अभियंता, सं.व सु.
विभागीय कार्यालय कवठेमहांकाळ,
मु.पो. कुची रोड, अंबिका थिएटरमागे,
ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
4. एक्झीक्युटीव्ह इंजिनिअर
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसीठी डिस्ट्रीब्यूशन कं.लि.
सर्कल ऑफिस, विश्रामबाग, सांगली ....... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड श्री ए.एच.पवार
जाबदार तर्फे : अॅड यू.जे. चिप्रे
- नि का ल प त्र -
द्वारा : मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने, ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 खाली, त्याच्या मागणीप्रमाणे विद्युत कनेक्शन न देवून त्यास जाबदारांनी दिलेल्या दूषित सेवेबद्दल दाखल केली असून, तक्रारदारास त्याचे दि.7/3/15 च्या कोटेशनप्रमाणे त्याचे राहते घरात वीज कनेक्शन देण्याची व्यवस्था करावी व त्यास झालेल्या नुकसानीची रक्कम रु.38,000/- व त्यावर द.सा.द.शे.18 टक्के दराने व्याज देण्याचा आदेश व्हावा अशी मागणी केली आहे.
2. थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार कवठेमहांकाळ या गावी घर क्र.4509 या घरामध्ये रहात आहे. सदरची मिळकत तक्रारदाराने कायम खूषखरेदीने घेतलेली असून तो त्याचा मालक आहे. सदरचे घर तक्रारदाराने विकत घेण्यापूर्वी आजमुद्दीन हसन मुलाणी याचे नावावर होते. घर खरेदीवेळी आजमुद्दीन हसन मुलाणी याचे नावे असणारे वीज कनेक्शन त्याने संपूर्ण वीज बिलाची फेड केल्याची खात्री करुन तोडण्यात आले होते. सदर घरामध्ये वीज कनेक्शन घेण्याकरिता दि.7/2/15 रोजी तक्रारदाराने अर्ज क्र.6768824 ने अर्ज दिला व त्यास रक्कम रु.575/- चे कोटेशन देण्यात आले. सदरची रक्कम तक्रारदाराने जाबदारचे कार्यालयात दि.7/3/15 रोजी जमा केली व त्याप्रमाणे जाबदारचे कार्यालयाने 2212713 या नंबरची पावती दिली. त्याप्रमाणे तक्रारदारास 011295017 असा ग्राहक क्रमांक देण्यात आल्याने तक्रारदार हा जाबदारचा ग्राहक झाला. लाईट कनेक्शन मिळण्याकामी तक्रारदारांनी जाबदारचे कार्यालयात वेळोवेळी भेट दिली, जाबदारांना समक्ष भेटले तरीपण जाबदारांनी कनेक्शन देण्याचे टाळले आणि अजूनपर्यंत तक्रारदारास वीज कनेक्शन दिलेले नाही. त्यामुळे तक्रारदार, त्याची मुले व पत्नी यांना लाईटविना अंधारात दिवस काढावे लागत आहेत. लाईट नसल्याने रात्रीचा डासांचा त्रास होवून तक्रारदाराची अपत्ये आजारी पडली व तक्रारदारांना दवाखाना कामी बरेच पैसे खर्च करावे लागले. तक्रारदाराची सुरक्षा व आरोग्य वीज कनेक्शन अभावी धोक्यात आले आहे. जाबदारची वीज कनेक्शन देण्याची कायदेशीर जबाबदारी होती व आहे व ती त्यांनी पार पाडलेली नाही व त्यायोगे जाबदारने तक्रारदारास दूषित सेवा दिली आहे. तक्रारदाराला दवाखान्याचा खर्च रु.10,000/- व इतर अनुषंगिक खर्च सुमारे रु.3,000/- करावा लागला व त्याद्वारे त्याचे नुकसान झाले आहे. वीज कनेक्शन न दिल्यामुळे तक्रारदाराला शारिरिक व मानसिक त्रासाला देखील सामोरे जावे लागले आहे व त्याकरिता तक्रारदाराला रु.10,000/- ची नुकसान भरपाई मिळण्याचा हक्क प्राप्त झाला आहे व ती नुकसान भरपाई देण्यास जाबदार क्र.1 ते 4 हे संयुक्तरित्या व वैयक्तिकरित्या जबाबदार आहेत. या व अशा कथनांवरुन तक्रारदाराने जाबदारांकडून रक्कम रु.38,000/- ची मागणी केली आहे.
3. तक्रारदाराने आपल्या तक्रार अर्जातील कथनांचे पुष्ठयर्थ नि.2 ला आपले शपथपत्र दाखल केले असून नि.4 च्या फेरिस्तसोबत 6 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये जाबदार कंपनीने त्यास दिलेले कोटेशन, कोटेशनप्रमाणे रक्कम भरल्याची पावती, तक्रारदाराने जाबदारांना दिलेली नोटीस दि.7/3/15 ची प्रत, ती नोटीस जाबदारांना मिळाल्याबाबत पोस्टाच्या पावत्या व पोचपावत्या, सदर घरमिळकतीवर आपला मालकी कब्जा दाखविणारा ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा इ. कागदपत्रे दाखल केली अहे.
4. जाबदारांनी नि.14 ला आपली संयुक्त लेखी कैफीयत दाखल केली असून त्यात त्यांनी तक्रारदाराच्या संपूर्ण मागण्या स्पष्टपणे अमान्य केल्या आहेत. त्यांचे कथनानुसार तक्रारदार या मंचासमोर स्वच्छ हाताने आलेला नाही व कायदा यंत्रणेचा दुरुपयोग करण्याकरिता त्याने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे व त्याने जाणीवपूर्वक या प्रकरणातील काही महत्वाच्या बाबी या मंचापासून लपवून ठेवल्या आहेत. ज्या मिळकतीमध्ये विद्युत कनेक्शनची मागणी तक्रारदाराने केली आहे, त्या मिळकतीसंबंधीचा वाद तक्रारदार आणि दस्तगीर अजमुद्दीन मुलाणी यांच्यामध्ये दिवाणी न्यायालयात चालू असल्याचे तक्रारदाराने कथन केलेले नाही. सांगली येथील जिल्हा न्यायालयाने सदर मिळकतीत दस्तगीर अजमुद्दीन मुलाणी यांच्या असण-या कब्जास तक्रारदाराने हरकत व अडथळा करु नये असा मनाई आदेश दि.3/5/13 रोजी पारीत केला असल्याचे तक्रारदाराने दडवून ठेवलेले असून त्याची कोणतीही माहिती जाबदारांना न देता तक्रारदार व त्याचे वडील अजमुद्दीन हसन मुलाणी यांनी संगनमताने सदर मिळकतीतील वीज पुरवठा खंडीत करण्यासंबंधीचा अर्ज देवून त्याच मिळकतीमध्ये आपला मुलगा चि.गुलाब याचे नावे जाबदारकडे वीज पुरवठा मिळण्यासाठी अर्ज केला आहे. सदर अर्जानुसार कोटेशन देवून त्याचेकडून रक्कम जमा करुन घेतली आहे. त्यानंतर दि.7/2/15 रोजी श्री दस्तगीर अजमुद्दीन मुलाणी यांनी आपल्या वकीलामार्फत जाबदारांना नोटीस पाठवून तक्रारदारास वीज कनेक्शन देण्यात येवू नये असे कळविले व त्या नोटीसीसोबत जिल्हा न्यायालय, सांगली यांनी दिलेल्या निकालपत्राची प्रत देखील जोडली आहे. त्या निकालाचे अवलोकन करता तक्रारदार व दस्तगीर अजमुद्दीन मुलाणी यांचेमध्ये सदर मिळकतीसंबंधीचा वाद सन 2012 पासून चालू असल्याचे दिसून येते. मात्र सदर बाबीचा उल्लेख न करता व दस्तगीर अजमुद्दीन मुलाणी, जे हरकतदार आहेत, त्यांना पक्षकार न करता दिशाभूल करुन प्रस्तुतची तक्रार केली आहे व विनाकारण जाबदारांना नाहक त्रास देवून अडचणीत आणण्याकरिता प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. सदरची मिळकत दस्तगीर अजमुद्दीन मुलाणी यांच्या ताब्यात असल्याचे नमूद करुन जिल्हा न्यायालयाने दस्तगीर अजमुद्दीन मुलाणीच्या कब्जा वहीवाटीस अडथळा करु नये असा आदेश केला आहे व त्या आदेशाचे विरुध्द विद्युत पुरवठा करणे होते. त्यामुळे कोर्टाच्या हुकूमाचा अपमान होणार नाही याचा विचार करुन जाबदारांनी वीज कनेक्शन दिलेले नाही ही वस्तुस्थिती तक्रारदारांचे निदर्शनास दि.9/4/14 रोजी आणली असताना देखील तक्रारदाराने त्याची काहीही दखल न घेता व त्यासंबंधी काहीही खुलासा न करता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारास वीज कनेक्शन न देण्यामागे जाबदार यांनी कोणत्याही प्रकारे सेवेतील त्रुटी केलेली नाही किंवा अकार्यक्षमता दाखविलली नाही. उलटपक्षी कायदा यंत्रणेचा मान राखला आहे. या सर्वांच्या उल्लेख न करता ग्राहक कायद्याचा दुरुपयोग करण्याच्या हेतूने तक्रारदाराने प्रस्तुतची खोटया स्वरुपाची तक्रार दाखल केली आहे व जाबदारांविरुध्द खोटेनाटे आरोप केलेले आहेत. त्यामुळे प्रस्तुत तक्रार तक्रारदारावर रु.5,000/- ची कॉम्पेनसेटरी कॉस्ट बसवून फेटाळण्यात यावी अशी मागणी जाबदारांनी केली आहे. वाद मिळकतीवर कब्जा तक्रारदार याचा असल्याबाबत कोणताही पुरावा तक्रारदाराने याकामी दाखल केलेला नाही. त्यामुळे जाबदारांना विनाकारण गोवून पैसा उकळण्याच्या हेतूने तक्रार दाखल केली असून तक्रारदाराने नमूद केलेल्या रकमा देण्यास जाबदार जबाबदार नाहीत. या कथनांवरुन जाबदारांनी प्रस्तुतची तक्रार फेटाळून लावावी अशी मागणी केली आहे.
5. आपल्या लेखी कैफियतीतील कथनांचे पुष्ठयर्थ जाबदारांनी आपले सहायक अभियंता श्री भास्कर अरुणकुमार मुदलीयार यांचे शपथपत्र सदर कैफियतीखालीच दाखल केले आहे.
6. तक्रारदाराने प्रस्तुत प्रकरणी पुराव्याचे कामी आपले पुराव्याचे शपथपत्र नि.15 ला दाखल केले असून नि.17 या फेरिस्त सोबत पुराव्यामध्ये आजमुद्दीन हसन शेख यांनी जाबदारकडे दि.12/8/14 रोजी सदर मिळकतीतील त्याचे नावाचे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडण्याकरिता दिलेल्या अर्जाची प्रत तसेच तो अर्ज पोस्टाने पाठविल्याची पोस्टाची पावती, जाबदारची सही असलेली पोस्टाची पावती, तक्रारदाराच्या मुलाच्या आजारपणाकरिता विकत घेतलेल्या औषध खरेदीच्या पावत्या इ. कागदपत्रे हजर केलेली आहेत व नि.18 ला पुरसीस सादर करुन आपला पुरावा संपविला आहे. जाबदारांनी नि.20 या फेरिस्त सोबत तक्रारदाराने दि.9/4/15 रोजी तक्रारदाराचा खुलासा मागविणा-या पत्राची प्रत, दस्तगीर अजमुद्दीन मुलाणी यांच्या मार्फत त्यांचे वकील श्री आर.एस. जामदार यांनी जाबदारांना दिलेल्या दि.31/1/15 च्या नोटीशीची प्रत, जिल्हा न्यायालय, सांगली यांनी किरकोळ दिवाणी अपिल क्र.32/12 मध्ये दि.3/5/13 रोजी पारीत केलेल्या आदेशाची प्रमाणीत प्रत इ. कागदपत्रे दाखल करुन नि.21 या पुरसीस अन्वये प्रस्तुत प्रकरणात त्यांना तोंडी पुरावा द्यायचा नाही असे नमूद करणारी पुरसीस दाखल केली आहे.
7. प्रस्तुत प्रकरणात आम्ही उभय पक्षकारांचे विद्वान वकीलांचा युक्तिवाद ऐकून घेतला आहे. आपले युक्तिवादाचे दरम्यान तक्रारदाराचे विद्वान वकील श्री एच.ए.पाटील यांनी इलेक्ट्रीसीटी अॅक्ट 2003 च्या कलमांचा आधार घेत असे प्रतिपादन केले की, सदर कलमान्वये विद्युत वितरण कंपनीवर कोणत्याही मिळकतीच्या मालकाचा किंवा ताबेदाराचा वीज कनेक्शन मागणीचा अर्ज आल्यानंतर एका महिन्याचे आत त्यास विद्युत पुरवठा करण्याचे बंधन घातले आहे व विहीत मुदतीत विद्युत कनेक्शन न दिल्यास झालेल्या विलंबाच्या प्रत्येक दिवसाकरिता रु.1,000/- चा दंड भरणेची जबाबदारी सदर तरतुदीनुसार केली असल्याचे सांगितले. त्यांनी असेही प्रतिपादन केले आहे की, कायद्याच्या सदर कलमानुसार कोणत्याही कारणाकरिता मिळकतधारकास किंवा मिळकतीचे ताबेदारास विद्युत कनेक्शन नाकारण्याचा अधिकार सदर कलमानुसार नाही व ज्या कारणाकरिता जाबदार तक्रारदारास विद्युत पुरवठा देण्यास नकार देत आहेत, ते कारण योग्य व कायदेशीर नाही आणि तीच तक्रारदाराला देण्यात आलेली सेवेतील त्रुटी आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यांनी हे देखील या मंचाचे निदर्शनास आणून दिले की, जिल्हा न्यायालय यांचेसमोर चालू असलेल्या तक्रारदार व दस्तगीर अजमुद्दीन मुलाणी व इतर यांचेमधील वादास प्रस्तुत जाबदार हे पक्षकार नसून जो काही तथाकथित मनाई हुकूम सदरचे प्रकरणात पारीत झाला आहे. तो मनाई हुकूम जाबदारवर कोणत्याही प्रकारे बंधनकारक नाही. त्या मनाई आदेशाने जाबदारांना, तक्रारदारांना वाद मिळकतीमध्ये विद्युत पुरवठा करण्यापासून कोणतीही मनाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या आदेशाला पुढे करुन तक्रारदाराला विद्युत पुरवठा नाकारण्याचे जाबदारांना कारण नाही. सबब, जाबदार हे तक्रारदारास कोणत्याही योग्य व कायदेशीर कारणाशिवाय विद्युत पुरवठा देण्याचे नाकारत आहेत आणि त्यामुळे तक्रारदारांना दूषित सेवा देण्यात येत आहे. याउलट जाबदार विद्युत वितरण कंपनीचे विद्वान वकीलांनी तक्रारदाराला या प्रकरणात असलेल्या एकूण वस्तुस्थितीमुळे विद्युत पुरवठा दिल्यास जिल्हा न्यायालय, सांगली यांच्या वर नमूद केलेल्या आदेशाचा भंग होण्याची शक्यता असल्याने तक्रारदाराकडून खुलासा मागितला असता तक्रारदाराने अद्यापही कोणताही खुलासा न दिल्याने त्यास कोणताही विद्युत पुरवठा अद्यापही करण्यात आलेला नाही. त्यामुळे जाबदारांनी कोणतीही सेवेतील त्रुटी केली आहे असे म्हणता येत नाही. सबब, प्रस्तुतची तक्रार ही खोडसाळपणाची आहे व ती खारीज करण्यास पात्र आहे. सबब, ती खारीज करावी अशी त्यांनी मागणी केली आहे.
8. सदर प्रकरणी खालील मुद्दे आमच्या निष्कर्षाकरिता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हा ग्राहक होतो काय ? होय.
2. जाबदार क्र.1 ते 4 यांनी तक्रारअर्जात विशद केल्याप्रमाणे विद्युत
पुरवठा न देवून जाबदारांनी तक्रारदारास दूषित सेवा दिली आहे काय ? होय.
3. तक्रारदाराने तक्रारअर्जात मागितलेल्या दादी त्यास मिळण्यास तो पात्र
आहे काय ? अंशतः होय.
4. अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
9. आमच्या वरील निष्कर्षाची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
- < > - आदेश
1. तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार क्र.1 ते 4 यांनी या आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांचे आत तक्रारदाराला त्याचे घराचे राहत्या भागात त्याचे दि.7/2/15 चे अर्जानुसार विद्युत कनेक्शन द्यावे.
3. जाबदार क्र.1 ते 4 यांनी वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदारास मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.1,000/- या आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत द्यावी.
4. विहीत मुदतीत हया आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास तक्रारदारास ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 25(3) वा 27 खाली योग्य ती कारवाई करण्याची मुभा राहील.
5. सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना विनामूल्य द्यावी व प्रकरण दफ्तर दाखल करावे.
सांगली
दि. 22/01/2016
सौ मनिषा कुलकर्णी ए.व्ही.देशपांडे
सदस्या अध्यक्ष