::: आ दे श :::
( पारित दिनांक : 28/11/2016 )
आदरणीय अध्यक्षा, मा. सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार : -
- ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे,
तक्रारकर्ती ही मौजे पांगराबंदी, ता. मालेगांव जि. वाशिम येथील रहिवाशी असून, तिथे त्यांचे गट नं. 282 मध्ये 0 हे. 89 आर शेतजमीन आहे. तक्रारकर्तीने शेतात बोअर घेऊन त्यावर मोटार टाकून, विरुध्द पक्षाकडे थ्रि फेज, थ्रि एच.पी. (शेतीपंप) विज जोडणीसाठी अर्ज दिला. त्यासोबत आवश्यक कागदपत्रे दाखल करुन नियमाप्रमाणे रुपये 5,200/- पावती क्र. 3823121 , दिनांक 22/01/2014 प्रमाणे भरणा विरुध्द पक्ष यांच्या कार्यालयात केला. विरुध्द पक्षाने वरील रकमेचा भरणा केल्यानंतर चार दिवसात शेती पंपासाठी विद्युत पुरवठा चालू होईल, असे आश्वासन दिले होते परंतु नियमानुसार मुदतीच्या आत विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीच्या शेतात विजेचा पुरवठा न केल्यामुळे, तक्रारकर्तीच्या शेतातील 25 संत्र्याची झाडे, 4 निंबू झाडे, 4 फणसाची आणि 7 आंब्याची झाडे बोअरला पाणि असूनही लाईन न मिळाल्याने व पाणी न घालू शकल्याने वाळून गेली. तक्रारकर्तीने दि. 03/05/2016 रोजी विरुध्द पक्षाकडे विनंती अर्ज दिला होता. वरिष्ठाकडे तक्रार करुनही निरसन झाले नाही. म्हणून विरुध्द पक्षाकडून वीज जोडणी व रुपये 50,000/- नुकसान भरपाई मिळण्याकरिता तक्रारकर्तीने ही तक्रार दाखल केली.
तक्रारकर्तीने सदर तक्रार शपथेवर दाखल केली असून त्यासोबत एकुण 7 दस्तऐवज पुरावे म्हणुन जोडलेले आहेत.
2) विरुध्द पक्ष यांचा लेखी जबाब / लेखी युक्तीवाद -
विरुध्द पक्ष यांनी निशाणी-7 प्रमाणे त्यांचा लेखी जबाब मंचात दाखल केला. त्यानुसार त्यांनी तक्रारकर्तीचे तक्रारीतील बहुतांश कथन फेटाळले. विरुध्द पक्षाने अधिकच्या कथनात थोडक्यात नमुद केले की, तक्रारकर्ती यांनी खोटे प्रकरण दाखल केलेले आहे. शेतातील विद्युत पुरवठयासंबंधी प्रायव्हेट कंपन्यांना कंत्राट दिलेले असतात. त्यामुळे त्या पध्दतीने व सिरीयल नंबरप्रमाणे सदरहु कंत्राटदार विद्युत पुरवठयाचे कामे करतात त्यामुळे सदरहू त.क. यांना सिरीयल नंबरनुसार व वार्षिक अहवालानुसार संबंधीत काम प्रायव्हेट कंपन्यामार्फत केल्या जाईल. तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष यांना त्रास देण्याचे उदेशाने खोटी तक्रार दाखल केली आहे, त्यामुळे विरुध्द पक्षास तक्रारकर्तीकडून रुपये 50,000/- नुकसान भरपाई देण्याचा आदेश व्हावा तसेच इतर योग्य ती न्याय दाद विरुध्द पक्ष यांच्या हितावह व तक्रारकर्ती यांच्याविरुध्द देण्याबाबत आदेश व्हावा.
3) कारणे व निष्कर्ष -
या प्रकरणातील तक्रारकर्तीची तक्रार, सोबत दाखल केलेले दस्त, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, तक्रारकर्तीचे प्रतिऊत्तर, तक्रारकर्तीचा तोंडी युक्तिवाद व विरुध्द पक्षाचा लेखी युक्तिवाद, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देवुन पारित केला.
उभय पक्षाला हे मान्य आहे की, तक्रारकर्तीकडे शेतजमीन आहे व तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाकडे शेतीच्या विद्युत पुरवठयाकरिता कनेक्शन घेणेसाठी ता. 22/01/2014 रोजी रुपये 5,200/- ईतक्या रकमेचा भरणा केला आहे. अशा परीस्थितीत तक्रारकर्ती विरुध्द पक्षाची ग्राहक आहे, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
तक्रारकर्तीचा असा युक्तीवाद आहे की, विरुध्द पक्षाने वरील रकमेचा भरणा केल्यानंतर चार दिवसात शेती पंपासाठी विद्युत पुरवठा चालू होईल, असे आश्वासन दिले होते परंतु विरुध्द पक्षाने आजतागायत शेती पंपासाठी विद्युत पुरवठा दिला नाही. त्यामुळे तक्रारकर्तीचे आर्थिक, शारीरिक व मानसिक नुकसान झाले म्हणून प्रार्थनेनुसार प्रकरण मंजूर करावे.
यावर विरुध्द पक्षाचे कथन असे आहे की, शेतातील विद्युत पुरवठयासंबंधी प्रायव्हेट कंपन्यांना कंत्राट दिलेले असतात. त्यामुळे त्या पध्दतीने व सिरीयल नंबरप्रमाणे सदरहु कंत्राटदार विद्युत पुरवठयाचे कामे करतात. त्यामुळे तक्रारकर्तीला सिरीयल नंबरनुसार पुरवठा देण्यात येईल.
परंतु याबाबत विरुध्द पक्षाने रेकॉर्डवर कोणतेही दस्त दाखल केले नाही. याउलट तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तांनुसार तक्रारकर्तीकडे शेतजमीन असून त्यात बोअर आहे असे दिसून येते, त्यामुळे तक्रारकर्तीच्या युक्तिवादात मंचाला तथ्य आढळून आले आहे. प्रार्थनेतील नुकसान भरपाई तक्रारकर्तीने सिध्द केली नाही, म्हणून तक्रार अंशतः मंजूर करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित केला.
:: अंतीम आदेश ::
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला शेती पंपासाठी लागणारा विद्युत पुरवठा, दाखल अर्ज व पावतीनुसार ( रक्कम भरलेल्या ) चालू करुन द्यावा तसेच आर्थिक, शारीरिक व मानसिक नुकसान भरपाई व प्रकरण खर्चासह रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्त) द्यावे.
3. विरुध्द पक्षाने आदेशाचे पालन 45 दिवसाचे आत करावे.
4. उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
( श्री. ए.सी.उकळकर ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svgiri