निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 11/10/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 18/10/2011
तक्रार निकाल दिनांकः- 14/05/2013
कालावधी 01 वर्ष 06 महिने 26 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
राहीबाई भ्र.अंबादास देशमुख. अर्जदार
वय 60 वर्षे. धंदा.घरकाम/मजुरी अड.एम.आर.क्षिरसागर.
रा.आंबेडकर नगर,सिटी फंक्शन हॉलच्या जवळ,
जिंतूर रोड, परभणी ता.जि.परभणी.
विरुध्द
1 मा.कनिष्ठ अभियंता. गैरअर्जदार
म.रा.वि.वि.कंपनी,जिंतूर रोड,परभणी अड.एस.एस.देशपांडे.
2 मा.अभियंता शहर विभाग, परभणी.
म.रा.वि.वि.कंपनी मर्यादित,जिंतूर रोड,परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर.सदस्य.)
गैरअर्जदारांनी अर्जदाराच्या घरी घरगुती वापरासाठी विद्युत मिटर बसविण्याच्या कामात दिरंगाई केली व अर्जदारास ग्राहक म्हणून सेवा दिली नाही, म्हणून सदरची तक्रार अर्जदाराने मंचासमोर दाखल केलेली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा 20 ते 25 वर्षां पासून आंबेडकर नगर जिंतूर रोड, परभणी येथे राहत असून अर्जदाराचे घर वार्ड क्रमांक 19 मध्ये आहे आणि घराचा नंबर 227/1/A असा आहे. अर्जदार नगर परिषद परभणीच्या रिव्हीजन रजिस्टर मध्ये तीच्या नावाची अनेक वर्षां पासून नोंद असून घर पट्टी देखील भरते. म्हणून अर्जदाराचे म्हणणे की, ती सदरील घराची कायदेशिर मालक व ताबेदार आहे. अर्जदाराचे पुढे म्हणणे असे की, ती एक विधवा असून तीस दोन मुली असून दोन्हीचे लग्न झालेले आहे, त्यामुळे अर्जदारास तीच्या राहत्या घरी विद्युत कनेक्शन हवे होते, म्हणून त्यामुळे अर्जदाराने 20/01/2009 रोजी घरगुती कनेक्शनसाठी विद्युत कोटेशन भरले. अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, अर्जदाराच्या घरा पासून दोन ते तीन घरे सोडून अशोक अंभुरे या व्यक्तिचे रमाबाई आंबेडकर वस्तीगृह आहे. अशोक अंभुरे याचा अर्जदार ही विधवा व निराधार असल्यामुळे तीचे सदरील घर हडप करण्याचा हेतू होता. तो अर्जदाराच्या मालकी ताब्यात अडथळा निर्माण करत होता, म्हणून अर्जदाराने दिवाणी न्यायालयात कनिष्ठस्तर येथे अशोक अंभुरे विरुध्द अर्जदाराच्या ताब्यात असलेल्या घरा मध्ये अडथळा करु नये व कायमचा मनाई हुकूम मिळावा म्हणून दावा दाखल केलेला असून त्या दाव्याचा क्रमांक आर.सी.एस. नं. 392/06 असून तो प्रलंबित आहे. सदरील दाव्यात अर्जदाराने तात्पुरता मनाई हुकूम मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता. सदरचा अर्ज न्यायालयाने 13/01/2010 रोजी मंजूर केला व अशोक अंभुरे यांस अर्जदाराच्या सदरील घरामध्ये हस्तक्षेप व अडथळा करु नये म्हणून तात्पुरता मनाई हुकूम अर्जदाराच्या हक्कामध्ये केला होता. सदरचा अर्ज विद्यमान न्यायालयाने 13/01/2010 रोजी मंजूर केला. अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, विद्युत कनेक्शनसाठी कोटेशन भरल्यानंतर गैरअर्जदारांचे कर्मचारी कनिष्ठ अभियंता श्री.हाई व त्यांच्या हाताखालचे कर्मचारी हे अर्जदाराच्या घरी विद्युत मिटर बसविण्यासाठी आले असता, अशोक अंभुरे यांनी अर्जदाराच्या घरा समोर येवुन धिंगाना घालू लागला. तरी अभियंता साहेबांच्या सांगण्यावरुन अर्जदाराने मिटर बसविण्या करीता लागणारे वायर विकत घेवुन दिले व मिटर बसविण्याचे काम चालु असतांना अशोक अंभुरे परत एकदा अर्जदाराच्या घरी येवुन धिंगाना सुरु केल्यानंतर अभियंता व त्यांचे कर्मचारी अर्जदाराच्या घरी मिटर न बसविताच निघुन गेले.अभियंता व ईतर कर्मचारी निघुन जाते वेळी अर्जदाराने संबंधीत अभियंतास सांगितले की, तुम्ही घाबरण्याचे कारण नाही व आमच्या हक्कात दिवाणी कोर्टाचा हुकूम आहे. तेव्हा आपण मिटर बसवा असे सांगीतले, परंतु अभियंताने एकले नाही व अगोदर आपले व अशोक अंभुरे यांचे भांडण मिटवा नंतर मिटर बसवु. असे सांगीतले. अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, रु.30/- इतके गैरअर्जदारांनी बिल दिले व ते अर्जदाराने भरले. त्यामुळे अर्जदार ही गैरअर्जदारांची ग्राहक आहे. आजपर्यंत गैरअर्जदारांनी अर्जदाराच्या घरी कायदेशिररित्या विद्युत मिटर न बसविल्यामुळे अर्जदारास अंधारात राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अर्जदारास सदरची तक्रार ही गैरअर्जदारा विरुध्द दाखल करुन मंचास ही विनंती केली आहे की, गैरअर्जदारांनी अर्जदारास नुकसान भरपाई म्हणून रु. 25,000/- देण्याचे आदेश करावेत व दाव्याच्या खर्चापोटी रु.3,000/- देण्याचे आदेश करावेत.व तसेच विद्युत मिटर कनेक्शन तात्काळ देण्याचा आदेश करणेस मंचास विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि. क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे व तसेच नि.क्रमांक 5 वर कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतीसह एकुण 5 कागदपत्रे अर्जदाराने दाखल केले आहेत.ज्यामध्ये 5/1 वर अर्जदाराचे नमुना नंबर 8-अ व तसेच 5/2 वर अर्जदाराचे घरी मिटर बसविण्यास नगर परिषद परभणी यांनी दिलेले नाहरकत प्रमाणपत्र व तसेच 5/3 वर अर्जदाराने विद्युत कनेक्शन मिळणेसाठी दिलेल्या अर्जाची पोच व तसेच 5/4 वर अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिलेला अर्ज व 5/5 वर रु.30/- रक्कम भरल्याची पावती.
गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीस पाठवल्या नंतर नि.क्रमांक 15 वर गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी आपला लेखी जबाब सादर केला त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, प्रस्तुत प्रकरणातील अर्जदार ही गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांची ग्राहक नाही व तसेच आम्ही तक्रारदारास कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही व गैरअर्जदाराचे हे म्हणणे आहे की, अर्जदार व अशोक अंभुरे यांच्यात राहत्या घरा संबंधी दिवाणी न्यायालय व कनिष्ठ स्तर येथे दावा प्रलंबीत असल्यामुळे विज कंपनीस दिवाणी न्यायालयाचे आदेश मिळाले शिवाय अर्जदारास विज कनेक्शन देणे शक्य नाही. व सदरची तक्रार ही अर्जदाराने दिवाणी कोर्टात दाखल करणे आवश्यक होते आणि जर दिवाणी न्यायालयाने गैरअर्जदारास आदेश दिल्यास विज कंपनी ताबडतोब अर्जदारास विज कनेक्शन देईल. त्यामुळे सदरच्या मंचास तक्रार अर्ज चालविण्याचा कायदेशिर अधिकार नाही.व ती तक्रार फेटाळण्यात यावी,म्हणून मंचास विनंती केली आहे.त्यांचे यापुढे असे म्हणणे आहे की, दिवाणी कोर्टात वाद चालू असल्यामुळे व सदरच्या दाव्या बाबत गैरअर्जदारास कोणतीही माहिती नसल्यामुळे विज कंपनीने अर्जदारास विज कनेक्शन देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अशोक अंभुरेनी हस्तक्षेप करुन गैरअर्जदारास निदर्शनास आणून दिले आहे की, सदरच्या जागी बाबत दिवाणी कोर्टात वाद चालू आहे व तसेच तक्रारदार ही आमची ग्राहक होवु शकत नाही तसेच केवळ कोटेशन भरले म्हणून तक्रारदार विज कंपनीचा ग्राहक होवु शकत नाही, या कारणास्तव सदरची तक्रार फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदारांनी आपले लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 16 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
दोन्ही बाजुंचे कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदाराने अर्जदाराच्या घरी विद्युत मिटर न बसवुन
सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
अर्जदाराचे म्हणण्या प्रमाणे गैरअर्जदारांचे कर्मचारी व कनिष्ठ अभियंता श्री.हाई व कर्मचारी विद्युत मिटर बसविण्यासाठी अर्जदाराच्या घरी आले होते.त्यावेळेस अशोक अंभुरे नावाच्या त्रेयस्त व्यक्तिने धिंगाना घातला त्यामुळे गैरअर्जदाराचे कनिष्ठ अभियंता व हाताखालचे कर्मचारी हे मिटर न बसवताच परत गेले. यावरुन व गैरअर्जदाराच्या म्हणण्या प्रमाणे की, त्यांचे कनिष्ठ अभियंता यांनी अर्जदाराच्या घरी विज कनेक्शन देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अशोक अंभुरे यांनी त्यावेळी हस्तक्षेप करुन विज कनेक्शन देण्यास उजर घेतले व विज कनेक्शन देवु दिले नाही. यावरुन असे सिध्द होते की, गैरअर्जदारांनी त्याच्या सेवेत कोठल्याही प्रकारची त्रुटी दिलेली नाही.अर्जदाराचे म्हणणे की, दिवाणी न्यायालयाचा तात्पुरता मनाई हुकूम त्याच्या हक्कात झालेला आहे ही बाब अर्जदाराने दिनांक 08/05/2013 रोजी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते, पण अर्जदाराने या मनाई हुकूमच्या आधारे पोलिस संरक्षण मागणे गरजेचे होते व त्या पोलिस संरक्षणाखाली गैरअर्जदारांकडून विद्युत कनेक्शन करुन घेणे अभिप्रेत होते व त्याने तसे न करता सदरची तक्रार मंचात दाखल केली आणि गैरअर्जदारांनी सेवेत त्रुटी दिली आहे असे म्हंटले आहे, हे तीचे म्हणणे मंचास योग्य व कायदेशिर वाटत नाही.
म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर हे मंच नकारार्थी देवुन खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यांत येत आहे.
2 दाव्याचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष