निकालपत्र
(द्वारा- मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी)
(१) सामनेवाले यांनी वीजपुरवठा खंडीत करुन सेवेत त्रुटी केली या कारणावरुन तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये सदरची तक्रार या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची तक्रार अशी आहे की, ते दि.१५-०५-१९७९ पासून सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार हे पिठाची गिरणी चालवितात आणि त्यासाठीच त्यांनी सामनेवाले यांच्याकडून वीजपुरवठा घेतला होता. काहीही कारण नसतांना सामनेवाले यांनी दि.१५-०५-२०१३ रोजी नोटीस देऊन तक्रारदार यांचा वीजपुरवठा खंडीत केला. वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा वीजपुरवठा सुरळीत केला नाही. अनावश्यक कारणे सांगून सामनेवाले हे वीजपुरवठा खंडीत ठेवीत असल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. सामनेवाले यांच्या या कृतीमुळे व्यवसायाचे नुकसान होत असून मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे, असेही तक्रारदार यांनी नमूद केले आहे. वीजपुरवठा विनाअट पूर्ववत करण्यात यावा, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.३,३०,०००/-, तक्रारीचा खर्च रु.२५,०००/- मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
(३) तक्रारदार यांनी तक्रारीसोबत सामनेवाले यांची दि.१५-०५-२०१३ रोजीची नोटीस, दि.१८-०५-२०१३ रोजीचे पत्र, सामनेवाले यांना वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, चिंचखेडे ग्रामपंचायतीने दि.३१-०७-१९९८ रोजी दिलेला दाखला, दि.१४-०८-१९९८ रोजीचा ग्रामपंचायतीचा ठराव, घराचा उतारा, रमेश त्रंबक पाटील यांनी लिहून दिलेले संमतीपत्र, सामनेवाले यांचा दि.१६-११-१९९८ रोजीचा कार्यालयीन आदेश, सामनेवाले यांच्याकडे भरलेल्या अनामत रकमेची पावती, सामनेवाले यांनी वेळोवेळी दिलेली वीज देयके, सामनेवाले यांचे दि.०६-०६-२०१३ चे पत्र, सामनेवाले यांचे दि.१०-०६-२०१३ चे पत्र, सामनेवाले यांच्या वकिलांनी पाठविलेले नोटीस उत्तर आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
(४) सामनेवाले क्र.१ व २ यांनी हजर होऊन संयुक्त खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार खोटी आणि कपोलकल्पीत आहे. त्यांच्या तक्रारीस नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरीज ऑफ पार्टीज या तत्वाची बाधा येते. या मंचास सदर तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र नाही. तक्रारदार यांची मागणी खोटी आणि बेकायदेशीर आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांची परवानगी न घेता वीज मिटर स्थलांतरीत केले. तक्रारदार यांनी हे वीज मिटर मोकळया जागेत आणि खांबावर बसवून कायद्याचा भंग केला आहे. त्यामुळे सामनेवाले यांना त्यांचा वीजपुरवठा बंद करुन कायदेशीर कारवाई करावी लागली. वीजपुरवठा पुन्हा सुरु करण्यासाठी तक्रारदार यांना काही कागदपत्रांची पुर्तता करण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी त्याप्रमाणे पुर्तता न केल्याने त्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. ज्या जागेत तक्रारदार यांना वीज मिटर बसवून हवे आहे त्या जागेच्या मालकाचे संमतीपत्र, ग्रामपंचायतीचा ना-हरकत दाखला, चक्कीचा चाचणी अहवाल, शेजारी राहणा-या दहा ग्राहकांचे ना-हरकत दाखले, आदी कागदपत्रांची तक्रारदार यांनी पुर्तता करणे आवश्यक होते. ती त्यांनी केली नाही. तक्रारदार यांनी घरातील मिटर विजेच्या खांबावर स्थलांतरीत करुन तेथेच पिठाची गिरणी सुरु केली होती. त्याबाबत ग्रामस्थांकडून तक्रारी आल्या होत्या. या प्रकारामुळे जिवित हानी होण्याची भीती होती. याच कारणामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडीत करावा लागला, असे सामनेवाले यांनी म्हटले आहे.
(५) सामनेवाले यांनी खुलाशासोबत चिंचखेडे येथील ग्राहकांनी अधीक्षक अभियंता यांना पाठविलेले पत्र, तक्रारदार यांनी नमूद केलेल्या मालमत्तेबाबत धुळे येथील दिवाणी न्यायालयात दाखल असलेली तक्रार आणि त्यावर मा.न्यायालयाने दिलेला स्थगनादेश, चिंचखेडा ग्रामपंचायतीने दिलेले दि.१२-०३-२०१३ चे पत्र, चिंचखेडा येथील ग्रामसेवकाने दि.२५-०४-२०१३ रोजी केलेला पंचनामा, तक्रारदार यांनी विजेच्या खांबाला लावलेल्या मिटरची छायाचित्रे, वीज कायदा २००३ मधील कलम १३८ च्या तरतुदी आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
(६) तक्रारदार यांची तक्रार व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, तसेच सामनेवाले यांचा खुलासा, त्या सोबत दाखल केलेली कागदपत्रे आणि तक्रारदार यांच्या विद्वान वकिलांनी केलेला युक्तिवाद यांचा विचार करता, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय |
(ब) सामनेवाले यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | : नाही |
(क) आदेश काय ? | : अंतिम आदेशाप्रमाणे |
| | | |
विवेचन
(७) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून त्यांच्या पिठ गिरणीच्या व्यवसायासाठी वीजपुरवठा घेतलेला होता. त्याबाबतची वीज देयके आणि सामनेवाले यांनी दि.१६-११-१९९८ रोजी काढलेला कार्यालयीन आदेश दाखल केला आहे, ही बाब सामनेवाले यांनी नाकारलेली नाही. यावरुन तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र. अ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – सामनेवाले यांनी कोणतेही कारण नसतांना दि.१५-०५-२०१३ रोजीच्या नोटीशीअन्वये हेतुपुरस्सर वीजपुरवठा खंडीत केला अशी तक्रारदार यांची मुख्य तक्रार आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे हे म्हणणे स्पष्टपणे नाकारले आहे.
तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारीसोबत दि.१५-०५-२०१३ रोजी सामनेवाले यांनी पाठविलेल्या नोटीसची प्रत दाखल केली आहे. या नोटीसीत म्हटले आहे की, “आपल्या चक्कीचे मिटर कनेक्शन म.रा.वीज वितरण कंपनीची कुठलीही परवानगी न घेता घराबाहेर पोलवर लावून तसेच पिठाची चक्की, मोटार इत्यादी घराबाहेर ठेवून चालू करुन घेतलेली आहे व चक्की होती त्या जागी पक्के बांधकाम सुरु केलेले आहे. या बांधकामास ग्रामपंचायतीची ना-हरकत आहे. म्हणून आपला चक्कीचा वीजपुरवठा मिटर, सर्व्हीस पाईप इत्यादी काढून तात्पुरता बंद करण्यात येत आहे. अनधिकृतपणे उघडयावर असलेल्या चक्कीचा वीजपुरवठा पुढील दुर्घटना होऊ नये म्हणून बंद केला आहे”
तक्रारदार यांनी दि.१८-०५-२०१३ रोजी सामनेवाले यांनी पाठविलेले पत्र दाखल केले आहे. त्यात म्हटले आहे की, “कृपया आपण खालील बाबींची पुर्तता करावी (१) बाळू नामदेव पाटील यांचे घरात आपले चक्कीचे कनेक्शन स्थलांतरीत/सुरु ठेवणेस ना हरकत दाखला. (२) आपले शेजारचे १० घरांचे मालकांचे चक्की सुरु ठेवण्याबाबत संमतीपत्र. (३) सदर पिठ गिरणीचे चाचणी अहवाल”
तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे दि.०६-०६-२०१३ रोजीचे पत्र दाखल केले आहे. त्यात तक्रारदार यांच्या वीज जोडणीसाठी छोटू श्रावण पारधी व समाधान संतोष देसले यांनी हरकत घेतल्याचे म्हटले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे दि.१०-०६-२०१३ रोजीचे पत्र दाखल केले आहे. त्यात सामनेवाले यांनी तक्रारदार यांना छोटू श्रावण पारधी, समाधान संतोष देसले यांच्यासह ग्रामपंचायतीचा ना-हरकत दाखला आणि ग्रामपंचायतीचा ठराव सादर करण्यास सांगितले आहे.
सामनेवाले यांनीही तक्रारीच्या कामकाजादरम्यान काही कागदपत्रे दाखल केली. त्यात चिंचखेडे येथील ग्रामस्थांनी अधीक्षक अभियंता यांना दि.०६-०५-२०१३ रोजी दिलेल्या पत्राचा समावेश आहे. या पत्रात ग्रामस्थांनी तक्रारदार यांच्याविरुध्द सविस्तर तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, “चिंचखेडे येथील सिटी सर्व्हे नं.५३५ (ग्राम पंचायत घर क्र.३५८) ही मालमत्ता आमची वडिलोपार्जीत मिळकत असून सदर मिळकतीत बाळू नामदेव पाटील यांनी रमेश त्रंबक पाटील यांच्याकडून बेकायदेशीर व खोटया नावाच्या खरेदी खतानेखरेदी केली आहे. त्याविरुध्द आम्ही सर्वांनी मे.दिवाणी न्यायाधीश यांच्या कोर्टात १०८/२०११ क्रमांकाचा दावा दारखल केला आहे. बाळू नामदेव पाटील यांनी सदर जागेवर नवीन घराचे बांधकाम चालविले असून आम्ही त्यावर मनाई हुकूम मिळविला आहे. विश्वास नामदेव पाटील यांच्या नांवे ग्रामपंचायत हद्दीत कुठलेही घर नसतांना त्यांनी फसवणूक करुन वीज कोटेशन घेतले आहे. विश्वास नामदेव देसले यांच्या नांवे घर असेल तर बिलावर घर क्रमांक का दिलेला नाही. वरील दाव्यातील ग्रामपंचायत घर क्रमांक ६५८ वर पिठाच्या गिरणीचे कोटेशन बसविण्यास परवानगी देऊ नये. बाळू नामदेव पाटील हे ग्रामपंचायतीच्या खांबावर मिटर लावून भर रस्त्यात पिठाची गिरणी चालवत आहेत.”
सामनेवाले यांनी दि.१५-०५-२०१३ रोजी चिंचखेडे येथे केलेला पंचनामा दाखल केला आहे. त्यात म्हटले आहे की, बाळू नामदेव पाटील यांचे नांवे असलेले घर क्रमांक ६५८ चे बांधकाम चालू असून सदर घर आमदड-चिंचखेडा रस्त्यावर आहे. घराबाहेर पिठाची गिरणी शिफ्ट करुन ठेवण्यात आली आहे, तसेच इलेक्ट्रीक मिटर पोलवर बांधून आढळलेले आहे. म्हणून धोक्याची परिस्थिती असल्यामुळे मिटर, पाईप, पेटी, सर्व्हीस वायर जमा करुन वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे.
सामनेवाले यांनी सदर तक्रारीत नमूद घराच्या बांधकामाबाबतची छायाचित्रे दाखल केली आहेत. त्यातील पहिल्या छायाचित्रात घराच्या बांधकामाशेजारी असलेल्या वीज खांबावर वीज मिटर बसविण्यात आल्याचे आणि त्याच्याजवळच उघडयावर पिठाची गिरणी ठेवली असल्याचे दिसत आहे. दुस-या छायाचित्रातही बांधकामाशेजारी उघडयावर पिठाची गिरणी ठेवल्याचे दिसत आहे. याच छायाचित्रात बांधकामाच्या समोर असलेल्या एका पत्र्याच्या टपरी मागेही पिठाची गिरणी ठेवलेली दिसत आहे. त्यापुढील तिस-या आणि चौथ्या छायाचित्रात वीज मिटर आणि त्याच्या वायर्स उघडयावर असल्याचे दिसत आहे.
सामनेवाले यांनी वीज कायदा २००३ चे कलम १३८ मधील तरतुदींची प्रत दाखल केली आहे. त्यात पुढील प्रमाणे तत्व विशद केले आहे.
138 : Interference with meters or works of licensee.- Whoever.-
- Unauthorisedly connects any meter, indicator or apparatus with any electric line through which electricity is supplied by a licensee or disconnects the same from any such electric line : or
- Unauthorisedly reconnects any meter, indicator or apparatus with any electric line or other works being the property of a licensee when the said electric line or other works has or have been cut or disconnected :
तक्रारदार आणि सामनेवाले यांनी दाखल केलेल्या वरील कागदपत्रांचे मंचाने अवलोकन केले असता, त्यावरुन असे स्पष्ट होते की तक्रारदार यांनी सामनेवाले यांची कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या चक्कीचे वीज मिटर घराबाहेर स्थलांतरीत करुन मोकळया जागेवरील विजेच्या खांबावर लावले आणि पिठाची गिरणीही मोकळया जागेत ठेवली. तक्रारदार यांच्या या कृतीमुळे आणि अनधिकृतपणे केलेल्या मिटरच्या स्थलांतरामुळे भाविष्यात काही दुर्घटना होऊ नये या हेतूने सामनेवाले यांनी दि.१५-०५-२०१३ रोजी नोटीस देवून त्यांचा वीजपुरवठा खंडीत केला. तक्रारदार यांचा वीजपुरवठा पुन्हा सुरु करण्याचे सामनेवाले यांनी नाकारलेले नाही किंवा वीजपुरवठा पुर्ववत करण्यास नकार दिलेला नाही, असेही वरील कागदपत्रांवरुन दिसून येते. मात्र वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी सामनेवाले यांनी दि.१८-०५-२०१३ रोजी आणि दि.१०-०६-२०१३ रोजी पत्र पाठवून काही कागदपत्रांची तक्रारदार यांच्याकडे मागणी केली. त्यात बाळू नामदेव पाटील यांचा ना हरकत दाखला, १० शेजा-यांचे संमतीपत्र, चक्कीचा चाचणी अहवाल, ग्रामपंचायतीचा ना-हरकत दाखला, ग्रामपंचायतीचा ठराव, छोटू श्रावण पारधी आणि समाधान संतोष देसले यांचा ना-हरकत दाखला आदी कागदपत्रांचा समावेश होता. तथापि, तक्रारदार यांनी या कागदपत्रांची पुर्तता केल्याचे दिसत नाही. तक्रारदार यांच्या तक्रारीत आणि त्यानंतर दाखल केलेल्या कागदपत्रांमध्येही पुर्तता केल्याचा उल्लेख नाही.
वरील विवेचनाचा विचार करता तक्रारदार यांनी अनधिकृतपणे आणि बेकायदेशीरपणे चक्कीचे मिटर आणि चक्की उघडयावर बसविली आणि त्यामुळे भविष्यात दुर्घटना होऊ नये याच हेतूने सामनेवाले यांनी त्या वीज मिटरचा वीजपुरवठा खंडीत केला हे स्पष्ट होते. सामनेवाले यांची ही कृती म्हणजे सेवेतील त्रुटी आहे असे मंचाला वाटत नाही. म्हणूनच मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(९) मुद्दा क्र. ‘‘क’’ – वरील सर्व मुद्यांचा आणि विवेचनाचा विचार करता, सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची केलेली कृती म्हणजे सेवेतील त्रुटी ठरत नाही. सामनेवाले यांनी भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी तक्रारदार यांच्या चक्कीचा वीजपुरवठा कायद्यातील तरतुदीनुसार खंडीत केला. त्यानंतरही सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा वीजपुरवठा सुरळीत करुन देण्याची तयारी दाखविली हे उपलब्ध कागदपत्रांवरुन दिसून येते. त्यासाठी तक्रारदार यांच्याकडे मागणी करण्यात आलेल्या कागदपत्रांची त्यांनी पुर्तता केली नाही हेही दिसून येते. तक्रारदार यांनी कागदपत्रांची पुर्तता न केल्यामूळे त्यांचा वीजपुरवठा सुरुळीत होऊ शकला नाही, असे मंचाचे मत आहे. अशा परिस्थितीत सामनेवाले यांना दोषी ठरविता येणार नाही, असे आम्हाला वाटते. म्हणूनच तक्रारदार यांची तक्रार मंजूर करता येणार नाही या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. सबब आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
(१) तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
(२) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांक : १३-११-२०१४
(सौ.के.एस.जगपती) (श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.