न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून Audi AGOMFPRSTADAT Germany या कंपनीने उत्पादित केलेली AUDI Q-7 Diesel रजि.नं. एमएच 09-इयू-8888 ही कार दि. 20/01/2018 रोजी खरेदी केलेली होती व आहे व सदरची कार खरेदी करणेकरिता तक्रारदार यांनी अॅक्सीस बँक लि. शाखा कोल्हापूर यांचेकडून कर्ज घेतलेले होते व आहे व सदर कर्जास रक्कम रु.1,15,000/- इतका मासिक हप्ता आहे. दि. 23/7/2021 व दि. 27/7/2021 रोजी कोल्हापूरमध्ये ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाली. सदर पावसामध्ये तक्रारदार यांची कार त्यांचे गेट समोर पार्कींग केलेली होती. कोरोना महामारीमुळे शहरातील वाहतूकही बंद होती तसेच पुणे–बंगलोर नॅशनल हायवे देखील पाण्याखाली असलेमुळे पूर्ण वाहतूक बंद होती. तक्रारदार यांनी सर्व परिस्थिती स्थिीरस्थावर झालेनंतर दि.11/8/2021 रोजी ऑफिसला जाणेकरिता कारचा दरवाजा उघडला असता कारमध्ये सर्वत्र पाणी भरलेले होते व कारच्या छतातून पिलरवरुन पाणी गळत होते. तक्रारदार यांनी कार सुरु करणेपूर्वी वि.प. कंपनीस फोनवरुन सर्व परिस्थिती कळविलेनंतर वि.प. कंपनी तक्रारदार यांची कार टोईंग व्हॅनमधून आहे त्या परिस्थितीत घेवून गेले व कारला वि.प. कंपनीने लॅपटॉप लावून चेक केली असता अतिपावसामुळे गाडीचे सर्व नुकसान तसेच वायरिंग फॉल्टी दाखवत आहे व कारचा ए.सी. बंद आहे असे निदर्शनास आले. सदरची कार तक्रारदार यांचे वॉरंटी कालावधीमध्ये असलेने कारची सर्वस्वी दुरुस्ती करणे ही वि.प. यांची जबाबदारी होती व आहे. सदरची कार ही ऑगस्ट 2021 मध्येच वि.प. यांचेकडे दुरुस्तीकरिता सोडलेली आहे. मात्र अद्यापही वि.प. यांनी सदरची कार दुरुस्त करुन दिलेली नाही. कार ही लक्झुयिस व सर्व सोयींनी युक्त असलेने तक्रारदार यांनी वैयक्तिक वापरासाठी खरेदी केलेली होती. मात्र सन 2021 पासून आजअखेर तक्रारदार यांना कारचा वापर करता आलेला नाही. तसेच त्यांना रिक्षाने प्रवास करावा लागत आहे व गाडीचे कर्जाचा हप्ताही भरावा लागत आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड असा मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागत आहे. सबब, दि.1/09/2021 पासून कर्जाचे परतफेडीपोटी दरमहा रक्कम रु.1,15,000/- भरलेली हप्त्याची रक्कम व तक्रारदार यांना प्रवास करणेसाठी द्यावे लागणारे वाहनाचे दरमहा भाडे रक्कम रु.25,000/- देणेबाबत तसेच तक्रारदार यांची कार दुरुस्त होऊन मिळेपर्यंत तक्रारदार यांना नवीन ऑडी कार देणेबाबत किंवा सदरचे कारची रक्कम रु.57 लाख देणेबाबत तक्रारदार यांनी दि. 23/12/2021 रोजी वि.प. यांना रजि.पोस्टाने नोटीस पाठविलेली आहे. मात्र अद्यापही सदरची रक्कम वि.प. अदाही करीत नाहीत व गाडी दुरुस्त करुनही देत नाहीत. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारदार यांची गाडी त्यांचे ताब्यात मिळेपर्यंत म्हणजेच ऑगस्ट 2021 पासून प्रतिमाह कर्जाचे परतफेडीपोटी दरमहा रक्कम रु. 1,15,000/- भरलेली हप्त्यांची रक्कम वि.प. कडून वसूल करुन मिळावी तसेच तक्रारदार यांना प्रवास करणेसाठी द्यावे लागणारे वाहनाचे दरमहा भाडे रक्कम रु.25,000/- देणेबाबत आदेश व्हावेत व अर्जात नमूद कार दुरुस्त होवून मिळेपर्यंत तक्रारदार यांना नवीन ऑडी कार देणेबाबत वि.प. यांना आदेश व्हावेत, शारिरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/- वि.प. यांचेकडून मिळावी अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र दाखल केले आहे. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांना प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत व त्यांनी आपले म्हणणे दाखल केले नाही. सबब, वि.प. यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश करण्यात आला.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम व मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांनी वि.प. कंपनी कडून Audi AGOMFPRSTADAT Germany या कंपनीने उत्पादित केलेली AUDI Q-7 Diesel रजि.नं. एमएच 09-इयू-8888 ही कार दि. 20/01/2018 रोजी खरेदी केलेली होती व आहे. सदर वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र तक्रारदार यांनी याकामी दाखल केले आहे. वि.प. यांनी याकामी हजर होवून सदरची बाब नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी त्यांचे तकारअर्जात, दि. 23/7/2021 व दि. 27/7/2021 रोजी कोल्हापूरमध्ये ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाली. सदर पावसामध्ये तक्रारदार यांची कार त्यांचे गेट समोर पार्कींग केलेली होती. दि.11/8/2021 रोजी ऑफिसला जाणेकरिता कारचा दरवाजा उघडला असता कारमध्ये सर्वत्र पाणी भरलेले होते व कारच्या छतातून पिलरवरुन पाणी गळत होते. तक्रारदार यांनी कार सुरु करणेपूर्वी वि.प. कंपनीस फोनवरुन सर्व परिस्थिती कळविलेनंतर वि.प. कंपनी तक्रारदार यांची कार टोईंग व्हॅनमधून आहे त्या परिस्थितीत घेवून गेले. सदरची कार तक्रारदार यांचे वॉरंटी कालावधीमध्ये असलेने कारची सर्वस्वी दुरुस्ती करणे ही वि.प. यांची जबाबदारी होती व आहे. सदरची कार ही ऑगस्ट 2021 मध्येच वि.प. यांचेकडे दुरुस्तीकरिता सोडलेली आहे. मात्र अद्यापही वि.प. यांनी सदरची कार दुरुस्त करुन दिलेली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे. वि.प. यांनी याकामी हजर होवून तक्रारदाराची सदरची कथने नाकारलेली नाहीत. तक्रारदारांनी सदर कथनांचे पुष्ठयर्थ पुरावा शपथपत्र दाखल केले आहे.
8. तक्रारदार यांनी त्यांचे पुरावा शपथपत्रात वादातील वाहन दुरुस्त करुन वि.प. यांचेकडून ताब्यात मिळाल्याचे शपथेवर कथन केले आहे. तसेच लेखी युक्तिवादामध्येही दि. 11/4/2022 रोजी तक्रारदारांनी वि.प. यांचेकडून वाहन ताब्यात मिळाल्याचे मान्य केले आहे. परंतु तक्रारदारांनी दि. 1/6/22 रोजी शपथपत्र दाखल केले असून सदरचे शपथपत्रासोबत वि.प. यांनी वाहन परत देताना दिलेले टॅक्स इन्व्हॉइस दाखल केलेले आहे. सदर टॅक्स इन्व्हॉईसचा दिनांक दि. 12 मार्च 2022 आहे. याचा अर्थ तक्रारदारांना त्यांचे वाहन हे वि.प. यांचेकडून दि. 12 मार्च 2022 रोजी परत मिळाले आहे. सदरची बाब विचारात घेता सदरचे वाहन दुरुस्त करुन तक्रारदारास परत करण्यास वि.प. यांनी विलंब केला आहे हे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. वि.प. यांनी वाहन दुरुस्त करुन तक्रारदाराचे ताब्यात न दिल्यामुळेच तक्रारदार यांना प्रस्तुतची तक्रार दाखल करावी लागली हे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. तक्रारदाराने याकामी त्यांना अन्य वाहनाने प्रवास करणेसाठी दरमहा द्यावी लागणारी भाडयाची रक्कम रु. 2,50,000/- ची मागणी केली आहे. सदरची बाब शाबीत करण्यासाठी तक्रारदाराने वि.प. यांचे ईमेलद्वारे पाठविलेले पत्र दाखल केले आहे. सदर ईमेलमध्ये वि.प. ने तक्रारदाराला वाहन ताब्यात देणेसाठी उशिर होत असलेने तक्रारदारांनी प्रवासासाठी दररोज रु. 6,000/- भाडयाने वाहन घ्यावे असे स्पष्ट नमूद केले आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांना भाडयाची रक्कम देण्याचे मान्य केले आहे ही बाब सदरचे ईमेलवरुन स्पष्टपणे दिसून येते. सबब, दि. 13/08/2021 रोजीपासून म्हणजे तक्रारदाराने वि.प. यांचेकडे वाहन दुरुस्तीस दिले तारखेपासून ते दि. 12/3/2022 पर्यंत म्हणजे वि.प. यांनी वाहन दुरुस्त करुन तक्रारदाराचे ताब्यात दिले तारखेपर्यंत दररोज रु. 6,000/- प्रमाणे होणारी रक्कम वि.प. कडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
9. तक्रारदाराने विलंब काळात भरलेल्या कर्जाच्या हप्त्यांची रक्कम वि.प. कडून मागणी केली आहे. तथापि सदरचे वाहन तक्रारदाराचे ताब्यात मिळाले आहे व तक्रारदाराने घेतलेले कर्ज हे सदरचे वाहन खरेदीसाठी घेतलेले आहे. सबब, सदरची कर्ज हप्त्यांची रक्कम मिळण्यास तक्रारदार पात्र नाहीत असे या आयोगाचे मत आहे. तक्रारदारास दि. 11/4/2022 रोजी गाडी दुरुस्त करुन ताब्यात मिळाली असलेने गाडी तक्रारदाराचे ताब्यात देणेबाबत वि.प. यांना आदेश करण्यात येत नाहीत.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. कंपनीने तक्रारदार यांना दि. 13/08/2021 पासून ते दि. 12/3/2022 पर्यंत प्रवास भाडयाचे रकमेपोटी दररोज रु. 6,000/- प्रमाणे होणारी रक्कम अदा करावी.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींप्रमाणे कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.