जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/175 प्रकरण दाखल तारीख - 25/06/2010 प्रकरण निकाल तारीख – 25/10/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या श्री.सुमनबाई भ्र.बळीराम राठोड, वय वर्षे 35, धंदा घरकाम, रा.उमरी ता.उमरी जि.नांदेड. अर्जदार. विरुध्द. 1. कनिष्ठ अभियंता, म.रा.वि.वि.कंपनी लि, गैरअर्जदार शाखा उमरी ता.उमरी जि.नांदेड. 2. कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कंपनी लि, विभागीय कार्यालय, भोकर, ता.भोकर जि.नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.व्ही.चौधरी. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड. व्हि.व्हि.नांदेडकर. निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.एस.आर.देशमुख, सदस्या) गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटीबद्यल अर्जदार हे आपल्या तक्रारीत म्हणतात, अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडुन मिटर क्र.553020195346 घेतला. अर्जदाराला घरगुती वापरासाठीचे विद्युत मिटर व विद्युत जोडणी करुन देण्यात आली. परंतु अचानक दि.30/08/2001 रोजी अर्जदारास गैरअर्जदार यांचेमार्फत विद्युत मिटर आर चे असुन सी चे बिल देयक देण्यात आले व तेंव्हापासुन सन 2001 ते आजपर्यंत ब-याचवेळेस अर्जदारास सी चेच बिल देण्यात आलेले आहे. अर्जदारांनी दि.31/01/2003 रोजी गैरअर्जदार यांना होत असलेल्या परीस्थीतीबाबत सविस्तर अर्ज दिला. अर्जदारास आर चे मिटर देऊनही सी प्रमाणे पहीले बील 160 दुसरे 1800 तीसरे 3200 चे देण्यात आले. जास्तीचे बिले दिलेली दुरुस्त करुन देण्याची विनंती केली असता, कुठलीही कार्यवाही न करता अर्जदाराचा विद्युत पुरवठा त्या काळात खंडीत केला होता. अर्जदाराने दि.23/07/2009 रोजी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना लेखी अर्ज दिला. ज्यामध्ये अर्जदारास येत असलेली चुकीची बिले जोपर्यंत दुरुस्त करुन दिली जाणार नाही तोपर्यंत अर्जदारास सदरची बिले भरण्यास अडचण येईल जेण करुन अर्जदारास मिटर बदलून दिल्यास कृपा राहील. अर्जदार यांना दर महिन्यास 400 ते 500 युनीटचे बिल म्हणजे जवळपास दरमहा रु.1800/- ते 2000 विद्युत देयके येत आहेत. अर्जदाराने दि.26/02/2010 रोजी गैरअर्जदार यांना विद्युत मिटर बदलून देण्यासाठी आग्रह धरला व त्यानुसार अर्जदारास रु.100/- आकारुन गैरअर्जदार यांनी मिटरची तपासणी करुन नवीन मीटर दि.28/02/2010 रोजी दिले. गैरअर्जदार यांनी 3- 4 महिन्याचे काळात कुठलीच बिले दिले नसुन अचानक दि.04/06/2010 रोजी रु.9,980/- चे बिल दिले जे की, मीटर बदलूनही तेवढेच बिल चार महिन्याचे मिळाल्यामुळे अर्जदार अत्यंत चिंतीत व भयभीत झाला. सदरचे बिल न भरल्यास आपला विद्युत पुरवठा खंडीत केला जाईल, अशी तंबी दिली. केवळ रु.2000/- भरणे शक्य झाले जे दि.15/06/2010 रोजी भरले आहे. गैरअर्जदार यांनी चुकीचे दिलेले बिल दुरुस्त करुन न देऊन सेवेत त्रुटी केली. म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, मीटर क्र.553020195346 दि.04/06/2010 चे देयक वरील अवाजवी बिल रु.10,000/- दुरुस्त करुन मिळावे व अर्जदारास देण्यात आलेली देयके सन 2001 पासुन दिलेली बिले दुरुस्त करुन देण्यात यावे. तसेच अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व दावा खर्च म्हणुन रु.5,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावे. तसेच अर्जदाराच विद्युत पुरवठा खंडीत न करण्याचे आदेश गैरअर्जदारांना देण्यात यावे, अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले त्यांचे म्हणणे असे की,अर्जदाराचा अर्ज खोटा असून तो फेटाळण्यात यावा. अर्जदाराचे हे म्हणणे चुकीचे आहे की, दि.30/08/2001 रोजी अर्जदारास गैरअर्जदार यांनी विद्युत मीटर आर चे असतांनाही सी चे बिल देण्यात आले. सदरील व्यक्तिस सुरुवातीपासून आजतागायत घरगुती वापराच बिज बिल देण्यात आलेले आहे व त्यांना कधीही व्यवसायीक म्हणजे सी या दर्जाचे बिल देण्यात आलेले नाही. दि.31/01/2003 रोजी सविस्तर अर्ज दिला हे म्हणणे चुकीचे आहे. अर्जदार 2010 साली तक्रार दाखल करुन जर त्यात तथाकथीत 2001 सालातील बिलाचा उहापोह करीत असेल तर ती तक्रार मुदतीच्या आंत असू शकत नाही या कारणाने तक्रार खारीज करण्या योग्यतेची आहे. अर्जदाराचे म्हणणे की, सी प्रमाणे पहिले बिल 160 दुसरे 1800 तिसरे 3200 अशा प्रकारे त्यापुढील बिले वाढीव प्रमाणात येत आहे हे चुकीचे आहे. अर्जदारास आलेली सर्व बिले दुरुस्त करुन विद्युत मिटरसुध्दा बदलून देण्याची विनंती केली हे अर्जदाराचे म्हणणे चुकीचे व खोटे आहे. अर्जदारास रु.100/- आकारुन अर्जदारास दि.28/02/2010 रोजी नवीन विजेचे मीटर देण्यात आले याबाबत वाद नाही. अर्जदाराला हे प्रकरण दाखल करण्याचे कोणतेही कारण उदभवले नव्हते मीटर बदलल्या नंतर अर्जदाराला जे बिल देण्यात आले होते ते बिल कमी करण्यात येवून दुरुस्त करुन नवीन बिल अर्जदाराला देण्यात आलेले असल्या कारणाने आता त्यांना मागावयाची आणी मिळावावयाची कोणतीही बाब शिल्लक राहीलेली नाही. म्हणुन अर्जदारास गैरअर्जदारांनी कोणतीही सेवेतील त्रुटी दिलेली नाही या कारणास्तव अर्जदाराचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा, असे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन खालील मुद्ये उपस्थीत होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास जास्तीचे विद्युत बिल दिले हे अर्जदार सिध्द करतात काय? नाही. 3. काय आदेश? अंतीम आदेशाप्रमाणे. कारणे. मुद्या क्र.1 - अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडुन विज जोडणी घेतली होती याबद्यल उभय पक्षात वाद नाही व अर्जदाराने कोटेशन फॉर्म व विज बिल दाखल केलेले आहे त्यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत म्हणुन मुद्या क्र. 1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मुद्या क्र. 2 – अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, दि.04/03/2000 रोजी अर्जदार हीने गैरअर्जदाराकडुन विज जोडणी घेतली होती. अर्जदार हीचे म्हणणे असे आहे की, तीने घरगुती वापरासाठी विद्युत जोडणी घेतलेली होती तरी सुध्दा तीला व्यवसायीक बिले देण्यात येत होते. 2001 ते आजपर्यंत गैरअर्जदाराने ब-याच वेळेस अर्जदारास व्यवसायीक बिले दिलेले होते, याबद्यल अर्जदाराने तोंडी विनंत्या करुन अर्जही दिले होते व गैरअर्जदारांनी बिल दुरुस्त करुन दिले नाही व प्रत्येक बिल वाढतच येत होते, या म्हणण्याच्या पुष्टयार्थ अर्जदार हीने गैरअर्जदार यांनी दिलेले व्यवसायीक बिल कुठेही दाखल केलेले नाही तसेच तोंडी विनंत्या केलेल्या आहेत ही बाब कुठेही स्पष्ट होत नाही किंवा सिध्द होत नाही. अर्जदार यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 400 ते 500 युनिटचे म्हणजे 1800 ते 2000 रुपयाचे विद्युत देयक येत होते, एवढा वापर नसतांना ते बिल अर्जदारास भरावे लागत आहे, असे अर्ज करुन व संपुर्ण तक्रार संपेपर्यंत अर्जदाराने कुठल्याही प्रकारचे व्यवसायीक बील मंचासमोर दाखल केलेले नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांनी व्यवसायीक बिले दिले याबद्यल पुरावा नसल्यामुळे गैरअर्जदार यांनी त्रुटीची सेवा दिली असे म्हणता येणार नाही. अर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र पहाता कोटेशन रक्कम रु.2,140/- भरल्याची पावती त्यानंतर दि.18/09/2001 या तारखेचे रु.600/- चे बिल तेही घरगुती वापराचे बिल होते. त्यानंतर दि.18/09/2002 रोजी रु.590/- या रक्कमेचे बिल गैरअर्जदारांनी अर्जदारास घरगुती वापरासाठी दिलेले होते. त्यापैकी रु.300/- भरल्याची पावती अर्जदाराने दाखल केलेली आहे. त्यानंतर दि.29/06/2009, 23/07/2009, 31/01/2003 हे अर्ज अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दाखल केलेले प्रत सादर केले आहेत, ज्यामध्ये असे नमुद केलेले आहे की, दि.08/09/2001 पासुन व्यवसायीक बिल दिलेले आहे व तशा प्रकारचे बिल वसुल करण्यात आलेले आहे ते बिल घरगुती वापराचे म्हणजे आर करण्यात यावे व बिल दुरुस्त करण्यात यावे तसे मीटरवर नोंद घेण्यात यावे अशा प्रकारचे विनंत्या केलेले अर्ज मंचासमोर दाखल केलेले आहे. त्यानंतर दि.26/02/2010 रोजी मिटर तपासणी फीस रु.100/- भरल्याची पावती अर्जदाराने दाखल केलेले आहे. त्यानंतर दि.24/06/2010 रोजीचे रु.10,000/- चे बिल दाखल केलेले आहे दि.15/05/2010 रोजी अर्जदाराने रु.2,000/- बिला पोटी भरलेले आहे हे एक बिल दाखल केलेले आहे. या व्यतिरीक्त कुठलेही बिल जे की, व्यवसायीक स्वरुपाचे आहे असे अर्जदाराचे म्हणणे आहे असे कोणतेही बिल अर्जदाराने मंचासमोर दाखल केलेले नाही तसेच 2001 रोजीचे एक बिल 2002 चे एक बिल या व्यतिरिक्त अर्जदाराने कुठलेही बिल मंचासमोर दाखल केलेले नाही. यावरुन असे स्पष्ट होते की, आजवर मधल्या काळात बिल भरले किंवा नाही याबद्यल शंका येत आहे. गैरअर्जदार यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे ज्यामध्ये त्यांचे म्हणणे असे आहे की, दि.30/01/2001 रोजी अर्जदारास गैरअर्जदार यांच्या मार्फत विद्युत मिटर आर चे असतांना सी चे विद्युत देयक देण्यात आले आहे हे म्हणणे खोट आहे. याउलट सुरुवाती पासुनच अर्जदारासस घरगुती वापराचे विज बिले देण्यात आलेले होते, व्यवसायीक बिल त्यांना कधीही देण्यात आले नाही हे म्हणणे खरे वाटते. अर्जदार यांनी दि.28/02/2010 रोजी रु.100/- फीस भरुन विद्युत मीटर तपासणी करुन बदलून देण्याचा आग्रह धरला व याबद्यल ते बदलून देण्यात आले होते त्यानंतर रु.9,980/- चे बिल अर्जदारास संपुर्ण कालावधीतील आलेले आहे त्यापैकी केवळ रु.2,000/- अर्जदाराने भरलेले आहे. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे तीला विद्युत मिटर बदलून देण्यात आले आहे व अर्जदाराला जे बिल देण्यात आले होते ते बिल कमी करुन नवीन बिल देण्यात आले होते. त्यामुळे अर्जदारास गैरअर्जदार यांनी कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही. गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या जबाबातील मजकुर सत्य वाटत आहे व अर्जदार यांनी कुठलेही बिल मंचासमोर दाखल केले न केल्यामुळे प्रत्यक्ष बिल किती युनिटचे व कोणत्या महिन्यात काय आले याबद्यल कुठलाही उहापोह करणे शक्य नाही म्हणुन गैरअर्जदार यांनी दिलेले रु.10,000/- चे दि.24/06/2010 चे बिल ते योग्य आहे या निर्णयापर्यंत हे मंच आलेले आहे. सदरील बिलातुन रु.2,000/- ची रक्कम वजा करुन उर्वरित रक्कम गैरअर्जदार वसुल करु शकतात. कुठलेही कागदपत्र व बिल मंचा समोर दाखल न केल्यामुळे अर्जदाराचा दावा फेटाळण्यात येत आहे. आजच्या तारखेमध्ये 2001 पासुनची विद्युत देयके बरोबर करुन द्यावी ही अर्जदाराची मागणी कालबाहय आहे व तो मुद्या यावेळी चर्चा केला जाऊ शकत नाही. म्हणुन अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात येतो. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज फेटाळण्यात येत आहे. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार.लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |