::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 15/09/2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारदारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 यांच्याकडून .नळ जोडणी घेतली असून त्यांचा ग्राहक क्र.3491 असा आहे. विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी पाणी वापराकरीता आकारलेली देयके तक्रारकर्ता नियमीतपणे भरतो. तक्रारकर्त्याला एप्रिल,2015 ते जूलै,2015 या कालावधीत सरासरी 140 रूपये प्रमाणे दरमहा देयक येत होते, परंतु त्यानंतर मीटर बंद पडल्यामुळे विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी ऑगस्ट,2015 ते ऑक्टोबर,2015पर्यंत दरमहा 172.70 या सरासरीने देयके पाठविली व तक्रारकर्त्याने त्यांचा भरणा केला. नवीन मीटर लावून देण्याबाबत तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांना विनंती केली असता, आमच्याकडे मीटर उपलब्ध नाहीत सबब तुम्हीच खाजगीरीत्या मीटर खरेदी करून, आमच्याकडून चेक करून घेवून नोंदणीकृत प्लंबरकडून लावून घ्यावे असे सांगितले. विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे कार्यालयीन कर्मचारी श्री.नामदेव शास्त्रकार यांनी तक्रारकर्त्याकडून मीटरचे पैसे घेवून खासगी दुकानातून मीटर आणून,ते विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्या कार्यालयात रजिस्टरला जमा केले व तेथून चेक झाल्यावर तक्रारकर्त्याकडे ते मीटर लावण्यांत येईल असे तक्रारकर्त्याला सांगितले. नोव्हेंबर, 2015 च्या पहिल्या आठवडयात तक्रारकर्त्याकडे त्यांनी नवीन मीटर बसवून दिले व जूने मीटर ते घेवून गेले. त्यानंतर नोव्हेंबर,2015 ला रू.235.50 एवढया जास्त रकमेचे देयक आले व ते तक्रारकर्त्याने भरले. यानंतर डिसेंबर, 2015 ला रू.477.50 व जानेवारीला 477.50 एवढे वाढीव देयक आले व तक्रारकर्त्याने ते भरले. यानंतर फेब्रुवारी,2016 ला त्याला 1434.50 एवढे अवाजवी मासीक देयक पाठविण्यांत आले व त्यात जानेवारी,2016 चे देयक थकीत दाखविण्यात आले. यापैकी तक्रारकर्त्याने दिनांक 3/3/2016 रोजी रू.490/- भरले. मार्च,2016 मध्ये तक्रारकर्त्याला रू.510..50 एवढे मासीक देयक विरूध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी पाठविले. नोव्हेंबर,2015 पासून सातत्याने अवाजवी येणा-या मासीक देयकांमुळे तक्रारकर्त्याला धक्का बसला. गेल्या पाच वर्षांत तक्रारकर्त्याला एवढया तफावतीची देयके कधीही आली नाहीत व विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी मीटर लावण्यापूर्वी त्यात फेरबदल करून त्याचा वेग वाढविल्यामुळे अवाजवी देयके आली आहेत. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 29/3/2016 रोजी सदर अवाजवी देयकांबाबत विरूध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे तक्रार करून मीटर हायस्पीड असून ते दुरूस्तकरून द्यावे अशी विनंती केली व त्याची प्रत विरूध्द पक्ष क्र. 2 यांना दिली. परंतु दखल घेण्यांत न आल्यामुळे तक्रारकर्त्याने पुन्हा दिनांक 20/4/2016 व दिनांक 18/5/2016 रोजी लीखीत तक्रार नोंदविली. यानंतर विरूध्द पक्ष यांनी दिनांक 31/5/2016 रोजी स्वतःचा बचाव करण्याकरीता खोटे उत्तर पाठविले. विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्त्याला अवाजवी देयके पाठवून सदोष सेवा पुरविली असल्यामुळे तक्रारकर्त्याने मंचासमक्ष विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 विरूध्द तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 नी तक्रारकर्त्यांकडे लावून दिलेले मीटर सदोष असल्यामुळे ते मीटर दुरूस्त करून द्यावे अथवा बदलवून द्यावे. नोव्हेंबर,2015 पासूनची अवाजवी आकारण्यांत आलेली देयके रद्द करून एप्रिल,2015 ते जूलै,2015 या कालावधीतील पाणीवापरानुसार त्या कालावधीची सरासरी देयके पाठविण्यांत यावीत. तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या मानसीक व आर्थीक त्रासापोटी नुकसान-भरपाई रू.10,000/- व तक्रारीचा खर्च देण्याबाबत आदेश पारीत करण्यांत यावेत अशी विनंती केली.
3. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करुन विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचेविरुध्द नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष हजर होवून त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले असून त्यात कबूल केले आहे की तक्रारकर्ता हा 1986 पासून त्यांचा ग्राहक आहे. नळ जोडणीचे वेळी मीटर बसवून देण्यांत आले व त्याचे भाडे दरमहा आकारण्यांत येत होते. परंतु सप्टेंबर, 2011 पासून ते मीटर नादुरूस्त असल्यामुळे भाडे आकारणे बंद करण्यांत आले व् महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाचे नोटीफिकेशननुसार व प्रत्येक देयकामागे नमूद अटींनुसार तक्रारकर्त्याला सरासरी तीन मासीक देयके पाठविण्यांत आली. विरूध्द पक्ष यांचेकडे नवीन मीटर उपलब्ध नसल्यामुळे तक्रारकर्त्याला स्वखर्चाने मीटर आणून विरूध्द पक्षाकडून तपासून नोंदणीकृत प्लंबरकडून लावून घ्यावे असे सांगितले. त्यानुसार तक्रारकर्त्याने मीटर विकत घेवून त्याची रीतसर तपासणी व नोंद करण्यास्तव रू.40/- विरूध्द पक्ष यांचेकडे भरले व तपासणी झाल्यानंतर मीटर नोंदणीकृत प्लंबरकडून लावून घेतले. विरूध्द पक्ष हे त्यांच्याकडे जुने मीटर जमा करून घेत नाही. तक्रारकर्त्याने नामदेव शास्त्रकार या कर्मचा-याबाबत लावलेल्या आरोपांबाबत संबंधीताचे स्पष्टीकरण विचारण्यांत आले असता तक्रारकर्त्याने स्वतः त्यांना मीटर आणून दिले व त्यांनी सदर मीटर बसविले असे लेखी कळविले. ग्राहकाने कोणाकडून मीटर खरेदी करावे याचेशी विरूध्द पक्ष यांचा कोणताही संबंध नसून केवळ रीतसर शुल्क भरून सदर मीटर तपासून व नोंदणीकृत करणे आणी नोंदणीकृत प्लंबरकडून बसवून घेणे आवश्यक असते. त्यानुसार तक्रारकर्त्याने नवीन मीटर बसविले असून मीटर वाचनाप्रमाणे तक्रारकर्त्याला नोव्हेंबर, 2015 ला 15 युनिट, डिसेंबर 2015 ला 25 युनिट, जानेवारी 2016 ला 25 युनिट, फेबृवारी 2016 ला 54 युनिट, मार्च,2016 ला 26 युनिट, एप्रिल 2016 ला 40 युनिट, आणी मे, 2016 ला 22 युनिट या मीटर वाचनानुसार पाणी वापराचे देयक पाठविण्यांत आले. तक्रारकर्त्याने सदर मीटर हायस्पीड केल्याबाबत तक्रार केली असता मिटर वाचकाने तक्रारकर्त्याला मीटर वाचनाबाबत समजावून सांगितले होते. परंतु तक्रारकर्त्याने पुन्हा दिनांक 20/4/2016 रोजी तक्रार केल्यामुळे विरूध्द पक्ष यांचे अभियंता श्री० एस.बी.येरणे यांनी मीटरची पाहणी करून मीटर वाचनाबद्दल तक्रारकर्त्यांस सांगितले व सदर बाब तक्रारकर्त्याने मान्यदेखील केली व म्हणून तक्रारअर्जाला लेखी उत्तर पाठविण्यात आले नाही. परंतु तक्रारकर्त्याने दि.18/5/2016 रोजी तक्रार दिल्यामुळे विरूध्द पक्ष यांचे शाखा अभियंता श्री.गुरूमुखी यांनी दिनांक 27/5/2016 रोजी मीटरची पाहणी करून तक्रारकर्त्यांस देयकाबाबत समजावून सांगितले व योग्य मीटर वाचनाप्रमाणे देयके पाठविली असल्यामुळे त्यांचा भरणा करावा अशी विनंती केली. तरीदेखील मीटरबाबत शंका असल्यांस ते आपलेच मालकीचे असल्यामुळे स्वतः ते दुरूस्त करून वा बदलवून घ्यावे अशी सुचना केली.
4. तक्रारकर्त्याकडील जूने मीटर 25 वर्षांपूर्वीचे असल्यामुळे ते नादुरूस्त होत गेल्याने त्याचे वाचन अचूक येत नव्हते असे तक्रारकर्त्याच्या मीटर वाचन शिटवरून दिसून येते. तक्रारकर्त्याचा एप्रिल,2015 ते जूलै,2015 चा विजवापर अत्यल्प दर्शविण्यांत आला असून त्यावरून तक्रारकर्त्याचा पाणी वापर अत्यल्प असल्याचा समज झालेला आहे. सदर नळावरून दोन कुटूंबे पाणी घेत आहेत. सदर मीटर तक्रारकर्त्याने स्वतः बसविले असून ते सीलबंद असून ते उघडल्याशिवाय तक्रारकर्त्याच्या आक्षेपाप्रमाणे त्याचा वेग वाढविणे शक्य नाही. तक्रारकर्त्याला मीटर वाचनाप्रमाणे देयके देण्यांत आली असून सदर तक्रार खोटी असल्याने ती खारीज करण्यात यावी अशी विरूध्द पक्ष यांनी विनंती केलेली आहे.
5. तक्रारदारांची तक्रार, दस्ताऐवज, , तक्रारदारांचे शपथपत्र, तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे तसेच लेखी उ्त्तरालाच रिजॉईंडर व लेखी युक्तिवाद समजण्यात यावे अशी अनुक्रमे नि.क्र.10 व 12 वर पुरसीस दाखल उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) विरूध्द पक्षांनी़ तक्रारकर्त्याप्रति न्युनता पूर्ण सेवा दिली आहे
काय ? : होय
2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 ः-
6. तक्रारकर्ता हा 1986 पासून विरूध्द पक्षांचा ग्राहक आहे याबाबत उभय पक्षांत वाद नाही. तक्रारकर्त्याने तक्रारीत दाखल केलेल्या दस्तावेजांचे अवलोकन केले असता निदर्शनांस येते की तक्रारकर्ता यांनी विरूध्द पक्ष यांच्या सुचनेनुसार स्वखर्चाने मीटर आणून विरूध्द पक्षाकडून रीतसर तपासून नोंदणीकृत प्लंबरकडून माहे नोव्हेंबर,2015 चे पहिल्या आठवडयात बसविले. सदर मीटर बसविल्यानंतर विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांस नोव्हेंबर, 2015 ला 15 युनिट, डिसेंबर 2015 ला 25 युनिट, जानेवारी 2016 ला 25 युनिट, फेबृवारी 2016 ला 54 युनिट, मार्च,2016 ला 26 युनिट, एप्रिल 2016 ला 40 युनिट, आणी मे, 2016 ला 22 युनिट या मीटर वाचनानुसार पाणी वापराचे देयक पाठविले. परंतु जुन्या मीटरनुसार एप्रिल,2015 ते जूलै,2015 या कालावधीत पाणीदेयक सरासरी 140 रूपये असल्यामुळे व नवीन मीटरनुसार अवाजवी जास्त रकमेचे देयक आल्याने तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांचेकडे अनुक्रमे दिनांक 29/3/2016, दिनांक 20/4/2016 व दिनांक 8/5/2016 ला सदर मीटर हायस्पीड असल्याबाबत तक्रार केलेली आहे. परंतु विरूध्द पक्षयांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारींची दखल घेतली नाही व आपले बचावाकरीता दिनांक 31/5/2016 ला उशीरा उत्तर दिले. विरूध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 25/1/1990 मधील पान क्र.2 मधील परिच्छेद 11 मध्ये मीटर तपासणीबाबत करावयाच्या कार्यवाहीचा उल्लेख करण्यांत आलेला आहे. तक्रारकर्त्याचा अर्ज आल्यानंतर विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याकडून त्यानुसार तपासणी शुल्क घेवून वरील परिच्छेद 11 मध्ये नमूद कार्यवाहीनुसार मीटर तपासणीकरणे आवश्यक होते. परंतु विरूध्द पक्ष यांनी त्याप्रमाणे कार्यवाही केलेली नाही.
7. याशिवाय विरूध्द पक्ष यांनी लेखी उत्तरात आपल्या बचावापुष्टयर्थ नमूद केले की, तक्रारकर्त्याने उपरोक्त तक्रार नोंदविल्यानंतर त्यांचे अभियंत्यांनी दोनदा मीटरतपासणी करून तक्रारकर्त्यांस मीटरवाचनाबाबत समजावून सांगितले व सदर माहे नोव्हेंबर,2015 पासूनचे देयक मीटर वाचनानुसार योग्य असल्याचे तक्रारकर्त्यांस पटवून दिले असे नमूद केले आहे. परंतु विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याकडे असलेले नळाचे मीटरची तपासणी केली हे सिध्द करण्यासाठी सदर अभियंत्यांचे शपथपत्र पुरावा दाखल केलेला नाही. शिवाय तक्रारकर्त्याचे नळ कनेक्शन वरून दोन कुटूंबांना पाणीपुरवठा होत असल्यामुळे तक्रारकर्त्याचा पाणीवापर जास्त होता हे कथन विरूध्द पक्ष यांनी पुरावा दाखल करून सिध्द केलेले नाही, त्यामुळे विरूध्द पक्ष यांचे कथन ग्राहय धरण्यायोग्य नाही. तक्रारकर्त्याकडे नवीन मीटर बसविल्यानंतर विरूध्द पक्ष यांचेकडे सदर मिटर वाचनाबाबत वारंवार तक्रार करूनदेखील वरील नमूद राजपत्रात नमूद केल्यानुसार कार्यवाही न करून तक्रारकर्त्याप्रती त्रुटीपूर्ण सेवा दिली हे सिध्द होते. व विरूध्द पक्षाच्या या कृतीमुळे तक्रारकर्त्यांस मानसीक त्रास झाला व त्याकरीता तक्रारकर्ता नुकसान-भरपाई मिळण्यांस पात्र आहे असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
8. वरील मुद्दाचे विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) तक्रारकर्त्याने नियमानुसार सदर मीटरचे तपासणीकरीता प्रस्तूत आदेशाची प्रत मिळाल्यापासून 15 दिवसांचे आंत आवश्यक शुल्क भरून विरूध्द पक्ष यांचेकडे आवेदन करावे व त्यानंतर विरूध्द पक्ष यांनी, महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 25 जानेवारी,1990 चे भाग दोन परिच्छेद 11 मध्ये दिलेल्या तरतुदींनुसार तक्रारकर्त्याकडील पाणी मीटर 30 दिवसांचे आंत तपासून द्यावे व तपासणीत सदर मिटर सदोष आढळल्यांस सदर नोटीफिकेशनमध्ये नमूद केल्यानुसार पुढील कार्यवाही करावी.
(3) विरूध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तीकपणे तक्रारकर्त्यांला शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान-भरपाई व तक्रारखर्च रू.5000/- प्रस्तूत आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
चंद्रपूर
दिनांक – 15/09/2017
( अधि.कल्पना जांगडे (कुटे) ) ( अधि. किर्ती गाडगिळ (वैदय) )( श्री उमेश व्ही.जावळीकर)
मा.सदस्या. मा.सदस्या. मा. अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.