सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 180/2011.
तक्रार दाखल दि.15-12-2011.
तक्रार निकाली दि.18-9-2015.
छाया नामदेव देशमुख.
रा.गजानन चौक, फलटण,
ता.फलटण, जि.सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. बुलडाणा अर्बन को.ऑ.क्रेडिट सोसा.लि.
बुलडाणा तर्फे अध्यक्ष- श्री.राधेशामजी चांडक,
रा. बुलडाणा अर्बन को.ऑ.क्रेडिट सोसा.लि.
बुलडाणा, ता.जि.बुलडाणा.
2. उपाध्यक्ष- श्री.कांतिलाल मिश्रीलालजी छाजेड.
रा. बुलडाणा अर्बन को.ऑ.क्रेडिट सोसा.लि.
बुलडाणा, ता.जि.बुलडाणा.
3. कार्यकारी संचालक- श्री.मुकेश ब्रिजमोहनजी झंवर,
रा. बुलडाणा अर्बन को.ऑ.क्रेडिट सोसा.लि.
4. सरव्यवस्थापक, राजेश बन्सीलालजी लढ्ढा,
रा. बुलडाणा अर्बन को.ऑ.क्रेडिट सोसा.लि.
5. मुख्य कार्यकारी अधिकारी- श्री.शिरीष दिनकरराव देशपांडे,
रा. बुलडाणा अर्बन को.ऑ.क्रेडिट सोसा.लि.
6. मॅनेजर,
रा. बुलडाणा अर्बन को.ऑ.क्रेडिट सोसा.लि. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.जितेंद्र वाय पिसाळ.
जाबदार क्र.6 तर्फे– अँड.टाळकुटे.
जाबदार क्र.3- वगळणेत आले.
जाबदार क्र.1,2,4,5- एकतर्फा आदेश.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.श्री.श्रीकांत कुंभार, सदस्य यानी पारित केला
1. यातील तक्रारदारानी त्यांची तक्रार ग्राहक संरखण कायदा कलम 12 प्रमाणे जाबदाराविरुध्द सदोष सेवेबाबत दाखल केली आहे.
2. सदर तक्रारदाराचे तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे-
प्रस्तुत तक्रारदार हे फलटण, ता.फलटण, जि.सातारा येथील रहिवासी असून जाबदार क्र.1 ही मल्टीस्टेट कायद्याने स्थापन झालेली असून त्यांच्या अनेक शाखा असून त्यापैकी एक शाखा फलटण येथे आहे. प्रस्तुत तक्रारदारांनी जाबदार क्र.1 च्या जाहीरातीवर विसंबून व नावलौकिक पाहून त्यामध्ये आपला पैसा ठेवल्यास तो सुरक्षित राहील व परत मिळेल या विश्वासाने मुलीच्या शिक्षणाची भावी तरतूद म्हणून जाबदार क्र.1 यांचे फलटण शाखेत खालील तपशीलाप्रमाणे ठेवस्वरुपात रक्कम गुंतविलेली होती.
ठेव पावती क्र. | ठेव रक्कम रु. | ठेव ठेवलेचा दिनांक | मुदत संपलेचा दिनांक | ठेवीचा ठरलेला व्याजदर |
9081 | 25,000/- | 13-9-2006 | 13-10-2007 | 11% |
प्रस्तुत तक्रारदाराच्या ठेवी या मूळ जबरेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या.फलटण या नावाने असलेल्या पतसंस्थेत होत्या. ठेवीची मुदत संपलेवर प्रस्तुत पतसंस्थेकडे या तक्रारदाराने व्याजासह ठेव रक्कम परत मिळणेसाठी वारंवार हेलपाटे मारले, विनंत्या केल्या परंतु प्रस्तुत संस्थेने तक्रारदारांच्या ठेवी तक्रारदाराना दिलेल्या मुदतीत ठेव परतीच्या दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तक्रारदाराना परत केल्या नाहीत त्यामुळे सदर पतसंस्थेविरुध्द तक्रारदाराने नाईलाजाने जाबदारांचे सदोष सेवेबाबत मंचात दाद मागितली व ठेव सव्याज मिळणेसाठी मे.मंचात तक्रारअर्ज दाखल करुन जाबदार संस्थेविरुध्द दाद मागितली, त्याप्रमाणे सदर जाबदाराना मे.मंचाने प्रकरणाच्या नोटीसा रजि.पोस्टाने पाठविल्या, त्या त्यांना मिळूनही यातील जाबदार क्र.1,2,4 ते 6 हे मंचात गैरहजर राहिले. त्यांनी स्वतः वा विधिज्ञांमार्फत त्यांचे आक्षेप दाखल केले नाहीत त्यामुळे मंचाने त्यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारित केले.
दरम्यान मूळ जबरेश्वर पतसंस्था ही सध्याचे जाबदार बुलढाणा अर्बन को.ऑ.क्रेडिट सोसायटी बुलढाणा या संस्थेत विलीन झाली त्यामुळे प्रस्तुत तक्रारदारानी मूळ जबरेश्वरच्या संस्थेला व त्यांचे संचालकांना नि.1 च्या सरनाम्यातून वगळून त्याठिकणी नवीन बुलढाणा सोसायटीला व त्यांचे संचालकांना पक्षकार म्हणून सामील करणेचा अर्ज नि.39 कडे व त्यासोबत प्रतिज्ञापत्रासह दाखल केला. नि.19 कडे मंचाने सदरचा अर्ज मंजूर केला व प्रस्तुत तक्रारदाराने त्याप्रमाणे नि.1 वर दुरुस्ती करुन तक्रार दुरुस्ती प्रत देणेस व नवीन जाबदाराना नोटीस काढणेचे आदेश करणेत आले. त्याप्रमाणे प्रस्तुत तक्रारदारानी प्रकरणी नि.1 मध्ये दुरुस्ती करुन प्रस्तुत संस्था व संचालकाना सामील पक्षकार केले. त्याप्रमाणे प्रस्तुत तक्रारदाराने त्याची तक्रार दुरुस्ती प्रत नि.68 कडे दाखल केली असून ती प्रकरणी नि.1 सोबत आहे. प्रस्तुत दुरुस्तीप्रमाणे प्रकरणातील सर्व जाबदाराना मंचातर्फे रजि.ए.डी.ने नोटीसा पाठविणेत आल्या. सदर नोटीसा संबंधितांना मिळाल्या. प्रस्तुत नोटीस जाबदार क्र.1,2, 4 ते 6 या जाबदाराना मिळूनही ते मंचात गैरहजर राहिले व त्यांनी त्यांचे तक्रारदारांचे अर्जाबाबतचे आक्षेप त्यांचेतर्फे विधिज्ञ नेमून किंवा अन्य प्रकाराने मे.मंचात दाखल केलेले नाहीत, त्यामुळे मंचाने नि.1 वर एकतर्फा आदेश पारित केला. नि.47 वरील आदेशाने जाबदार क्र.3 यांचे नाव चुकीचे असलेने ते तक्रारअर्जाचे सरनाम्यातून वगळावे असा अर्ज तक्रारदारानी दिला, त्यामुळे जाबदार क्र.3 याना मे.मंचाने त्यांना वगळणेचा अर्ज मंजूर केला. प्रस्तुत तक्रारदारानी यापूर्वीही व अर्जदुरुस्तीनंतर दाखल झालेल्या जाबदार सोसायटीकडे वारंवार रकमेची मागणी केली परंतु यातील जाबदारानी आजपर्यंत तक्रारदारास ठेवीची व्याजासह रक्कम परत केली नाही किंवा विषयांकित ठेवीची रक्कम जाबदाराना नोटीस मिळालेवर ती मंचात आणून भरलेली नाही किंवा तक्रारदाराला दिली नाही त्यामुळे प्रस्तुत तक्रारअर्ज या तक्रारदारानी मंचात दाखल करुन जाबदार क्र.1 व 2, 4 ते 6 याना वैयक्तिक व संयुक्तीकरित्या जबाबदार धरुन प्रस्तुत जाबदाराकडून दि.13-9-2006 पासून द.सा.द.शे. 11% दराने ठेव पावतीची व्याजासह होणारी मुदतीची रक्कम रु.27,980/- त्यावर दि.14-10-2007 पासून द.सा.द.शे.11% दराने होणारी व्याजासह संपूर्ण रक्कम व मानसिक, शारिरीक त्रासापोटी रु.20,000/- अर्ज खर्च रु.5,000/- जाबदाराकडून मिळणेबाबतची विनंती मंचास केली आहे.
3. प्रस्तुत कामातील जाबदार क्र.1,2 4 ते 6 यांचेविरुध्द मे.मंचाने नि.1 वर एकतर्फा आदेश पारित केलेने व जाबदार क्र.3 यांना यातील तकारदारानी नि.47 वर जाबदार क्र.3 चे नाव चुकीचे आहे असा पोस्टाचा शेरा आल्याने त्यास सदर तक्रारीतून वगळणेचा अर्ज दिला. त्यामुळे जाबदार क्र.3 याना वगळणेत आले व जाबदार क्र.1,2,4 ते 6 विरुध्द एकतर्फा आदेश केलेने त्यांचेविरुध्द एकतर्फा प्रकरण चौकशीस घेतले. पैकी जाबदार क्र.6 यानी त्यांचेविरुध्द झालेला नि.53 कडील एकतर्फा आदेश रद्द होऊन त्यानी दाखल केलेले नि.55 चे म्हणणे व त्यासोबतचे नि.56 चे प्रतिज्ञापत्र मंचाने दाखल करुन घेतले व त्यातील आक्षेप विचारात घेतले. त्यामुळे प्रस्तुत कामातील तक्रारदारानी प्रकरणी दाखल केलेली त्यांची नि.1 व 68 कडील दावा दुरुस्ती प्रत, नि.2 कडील प्रतिज्ञापत्र, नि.5 सोबत दाखल केलेली ठेवपावती व तक्रारदारानी यातील जाबदाराना पाठवलेली दि.20-9-2011 ची वकील नोटीस, नि.36 कडील माहिती अधिकाराखालील मागवलेली कागदपत्रे नि.37(2) कडील मुखत्यारपत्र, नि.38,39 वरील तक्रार दुरुस्ती अर्ज व प्रतिज्ञापत्र त्याचप्रमाणे नि.64 कडील लेखी युक्तीवाद, जाबदार क्र.6 चे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्र व त्यातील कथने यांचा विचार करता मे.मंचाने सदर तक्रारीचे निराकरणार्थ खालील मुद्यांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. प्रस्तुत अर्जदार ही जाबदारांची ग्राहक आहे काय? होय.
2. प्रस्तुत जाबदारानी तक्रारदारांचे ठेवीची रक्कम जाबदारानी
तक्रारदारास दिलेल्या वचनाप्रमाणे मुदतपूर्ततेनंतर सव्याज
ठेव परत करणेच्या दिले वचनास व विश्वासास अनुसरुन
मुदतपूर्ततेनंतर ठेवी सव्याज परत न करुन तक्रारदाराना
सदोष सेवा दिली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? तक्रार अंशतः मंजूर.
कारणमीमांसा- मुद्दा क्र.1 ते 3-
4. यातील तक्रारदार ही गजानन चौक,फलटण, ता.फलटण येथील रहिवासी असून तिने फलटण येथील जबरेश्वर नागरी सह.पतसंस्था मर्या.फलटण यांचेकडे न्यायनिर्णय कलम 2 मध्ये दाखविल्याप्रमाणे मुदतठेव रक्कम रु.25,000/- ठेव पावती क्र.9081 ने दि.13-9-2006 रोजी एक वर्ष एक महिन्याचे मुदतीने ठेवलेली होती. तिची मुदत दि.13-10-2007 रोजी संपली. सदर ठेवीला द.सा.द.शे.11% व्याजदर होता. मुदतपूर्ततेनंतर सदरची ठेव तक्रारदाराना त्वरीत परत करणेची होती व असा विश्वास जबरेश्वर पतसंस्थेच्या वतीने तक्रारदाराना देणेत आला होता. हे नि.28 सोबतच्या ठेवपावतीवरुन स्पष्ट होते. जबरेश्वर पतसंस्था ही त्यांचे संस्थेच्या भांडवलवृध्दीसाठी संबंधित जनतेतून ठेवस्वरुपात रकमा गोळा करते व ती मुदतबंद ठेवीमध्ये रुपांतर करुन त्यावर प्रतिवर्ष देणेचा व्याजदर नक्की करुन ती सव्याज मुदतपूर्ततेनंतर संबंधित ठेवीदारास परत करणेचे अभिवचन देते. अशा प्रकारची सेवा जबरेश्वर पतसंस्था (यातील मूळ जाबदार) ठेवीदार ग्राहकाना देते. त्यामुळे तक्रारदार ही जबरेश्वर पतसंस्थेची ग्राहक असलेचे निर्विवादरित्या शाबित होते. सन 2012 मध्ये मूळ जाबदार पतसंस्था जबरेश्वर नागरी सह.पतसंस्था फलटण ही बुलडाणा अर्बन को.ऑ.क्रेडीट सोसायटी या मल्टीस्टेट वित्तिय संस्थेत विलीन झाली. मूळ जाबदार पतसंस्था ही बुलढाणा पतसंस्थेमध्ये म्हणजेच नि.68 वरील दावा दुरुस्तीद्वारे जबरेश्वर पतसंस्थेचे मूळ जाबदार रद्द करुन त्याजागी बुलढाणा क्रेडीट सोसायटी व त्यांचे संचालक प्रकरणी दाखल झाले. या बुलडाणा क्रेडिट सोसायटीने मूळ जबरेश्वर पतसंस्थेच्या ठेवीदारांबाबतच्या सर्व कायदेशीर जबाबदा-या व कर्तव्ये स्विकारुन जबरेश्वर पतसंस्थेचे विलीनकरण करुन घेतले होते. उभय पतसंस्थेचे उद्देश, विधेय, व कारभार हा एकच होता. त्या अनुषंगाने विचार करता प्रस्तुत अर्जदारांच्या ठेवी परत करण्याबाबत कायद्याने जबाबदारी येते व यातील जाबदारांमध्ये ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार ही जाबदारांची ग्राहक आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो. जाबदार क्र.6 यांनी तक्रारदाराचे अर्जास आक्षेप नोंदले की ते तक्रारदाराचे ठेवीचे मुद्दल देणेस तयार होते परंतु त्यांनी ते स्विकारले नाही त्यामुळे या जाबदाराने सेवेत त्रुटी केलेली नसल्याचे कथन केले परंतु ही बाब जाबदाराने मंचात पुराव्यानिशी शाबित केलेली नाही.
4.2- नि.1 सोबत जोडलेल्या दावा दुरुस्तीच्या सरनाम्यातील जाबदारांकडे प्रस्तुत तक्रारदार हिने वारंवार भेटून विषयांकित ठेवीची रक्कम देणेबाबत विनंती केली, परंतु प्रस्तुत जाबदारानी तक्रारदारांची विनंती मान्य न करता त्याना धुडकावून लावून त्यांचे विनंतीप्रमाणे त्यांच्या ठेवीची रक्कम सव्याज परत केली नाही व त्यांचे विनंतीकडे दुर्लक्ष केले त्यामुळे तक्रारदार हिला मुदतपूर्ततेनंतर ठेवीची रक्कम सव्याज परत मिळणेसाठी चार वर्षे रखडावे लागले व आजपर्यंत सदर जाबदारांनी ठेवीच्या रकमा तक्रारदार हिला परत दिल्या नाहीत. ही परिस्थिती पहाता जाबदारांनी तक्रारदार हिला अत्यंत गंभीर स्वरुपाची सदोष सेवा दिल्याचे निर्विवादरित्या शाबित होते त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो. तक्रारदारानी तिची तक्रार पुराव्यानिशी शाबित केलेली आहे. त्यामुळेच प्रस्तुत अर्जदारांची तक्रार ही अंशतः मंजूर होणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हा मंच आला आहे. प्रस्तुत अर्जदार हिला तिची मुदतपूर्ततेनंतर मिळणारी रक्कम रु.27,980/- त्यावर दि.14-10-2007 पासून द.सा.द.शे.10% दराने होणा-या संपूर्ण व्याजासह शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- जाबदाराकडून मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हा मंच आला आहे.
5. वरील कारणमीमांसा व विवेचन यांस अधीन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येतात-
-ः आदेश ः-
1. अर्जदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. प्रस्तुत जाबदारानी अर्जदारांच्या मुदत पूर्ण झालेल्या ठेवींची रक्कम अर्जदारानी वारंवार मागणी करुनही तिला सव्याज परत केल्या नाहीत व तिची मागणी दुर्लक्षित करुन ग्राहकाना- अर्जदाराना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे असे घोषित करणेत येते.
3. प्रस्तुत जाबदारानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अर्जदार हिला तिची ठेवपावती क्र.9081 ही रक्कम रु.25,000/- मुदतपूर्ततेनंतर मिळावयाची रक्कम रु.27,980/- त्यावर दि.14-10-2007 पासून द.सा.द.शे.10% दराने रक्कम पदरी पडेपर्यंतच्या होणा-या संपूर्ण व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत अर्जदार हिला अदा करावी.
4. प्रस्तुत जाबदारानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या अर्जदाराना शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत अदा करावी.
5. प्रस्तुत तक्रारीतून जाबदार क्र.3 याना वगळणेत येते.
6. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 18 –9-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.