(घोषित दि. 26.03.2014 व्दारा श्रीमती. रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून शेती पंपासाठी वीज पुरवठा घेतला आहे. गैरअर्जदार यांनी वीज बिल न देता थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित केला व काही रक्कम भरल्या नंतर पुनर्रजोडणी करुन दिला. अर्जदाराने याबाबत गैरअर्जदार यांना खुलासा मागितला परंतु गैरअर्जदार यांनी दाद न दिल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांची मौजे दगडवाडी ता.बदनापूर जि.जालना येथे गट क्रमांक 131, 132, 169 वर शेत जमीन असून त्या ठिकाणी गैरअर्जदार यांच्याकडून वेगवेगळा वीज पुरवठा घेतला आहे. सदरील तीन ठिकाणी वीज पुरवठा घेतल्यानंतर गैरअर्जदार यांनी त्यांना एकही वीज बिल पाठविले नाही. दिनांक 22.11.2011 रोजी कोणतीही पुर्व सुचना न देता गैरअर्जदार यांनी त्यांचा वीज पुरवठा खंडित केला. अर्जदाराने याबाबत चौकशी केली असता रुपये 5,000/- भरल्यास वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन देण्यात येईल असे सांगण्यात आले. वीज पुरवठा नसल्यामुळे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे अर्जदाराने तीन वीज कनेक्शन पोटी प्रत्येकी रुपये 5,000/- भरले. दिनांक 07.12.2011 रोजी गैरअर्जदार यांनी विद्युत पुरवठा पुनर्रजोडणी करुन दिला. अर्जदाराने दिनांक 09.12.2011 व दिनांक 23.12.2011 रोजीच्या पत्राव्दारे गैरअर्जदार यांना वीज बिल न देता तसेच पूर्व सुचना न देता वीज पुरवठा खंडित केल्याबाबत खुलासा मागितला. परंतु गैरअर्जदार यांनी त्याची दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत 5,000/- रुपये भरल्याची पावती, गैरअर्जदार यांना दिलेले पत्र इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार त्यांनी अर्जदारास गट क्रमांक 131, 132, व 169 या तीन ठिकाणी शेती पंपासाठी वेगवेगळा वीज पुरवठा केला आहे. अर्जदारास नियमितपणे वीज बिल देण्यात येत नसल्याचे तसेच थकीत वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याचे अर्जदाराचे म्हणणे त्यांना मान्य नाही. अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती त्यांनी मंचास केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणी वरुन मंचास असे दिसून येते की, अर्जदाराची मौजे दगडवाडी ता.बदनापूर जि.जालना येथील गट क्रमांक 131, 132, 169 मध्ये शेतजमिन असून गैरअर्जदार यांच्याकडून तीन स्वतंत्र वीज जोडणी घेतली आहे. दिनांक 07.12.2011 रोजी गैरअर्जदार यांनी कोणतीही पूर्व सुचना न देता वीज पुरवठा खंडित केला असल्याचे तसेच दिनांक 12.12.2011 रोजी रुपये 5,000/- प्रति कनेक्शन रक्कम भरल्यानंतर वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन दिला असल्याची अर्जदाराची तक्रार आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराची तक्रार चुकीची असून त्यांना हे मान्य नसल्याचे म्हटले आहे.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबासोबत अर्जदारास वीज पुरवठा दिल्यानंतर वीज बिल नियमितपणे देण्यात आलेली आहेत या बद्दल कोणताच पुरावा मंचात दाखल केलेला नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा वीज पुरवठा खंडित केला नसल्याचे मान्य केले नसले तरी अर्जदाराकडून रुपये 5,000/- ही रक्कम Unbilled म्हणून स्विकारली असल्याचे दिसून येते. अर्जदाराने याबाबत दिनांक 09.12.2011 व 23.12.2011 रोजीच्या पत्राद्वारे गैरअर्जदार यांच्याकडे या प्रकरणी खुलासा मागितला आहे. या दोनही पत्रात वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आलेला दिसून येतो. गैरअर्जदार यांनी या पत्राचे उत्तर अर्जदारास पाठविलेले दिसून येत नाही. तसेच आपल्या जवाबातही या पत्राबाबत काहीही म्हटलेले नाही. यावरुन अर्जदाराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता व रुपये 5,000/- प्रत्येकी भरल्यानंतर पुनर्रजोडणी करुन देण्यात आला असे मंचाचे मत आहे.
गैरअर्जदार यांनी अर्जदारास तीन वेगवेगळया वीज जोडणीची वेगवेगळी तीन बिले दिली असल्याचे दिसुन येत नाही. तसेच पूर्व सुचना न देता वीज पुरवठा खंडित करणे ही गैरअर्जदार यांची कृती नियमबाहय असून ती सेवेतील त्रुटी मानण्यात येते. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार मान्य करण्यात येत असून अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत.
सबब मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास तीन वीज जोडण्यांची तीन वेगवेगळी वीज बिले नियमितपणे द्यावीत.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास सेवेतील त्रुटी पोटी रुपये 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) व खर्चापोटी रुपये 2,500/- (अक्षरी रुपये दोन हजार पाचशे फक्त) आदेश प्राप्ती पासून 30 दिवसात द्यावे.