ग्राहक क्र. 108/2014.
तक्रार दाखल ता.02/05/2014
अर्ज निकाल तारीख: 13/04/2015
कालावधी: 0 वर्षे 09 महिने 12 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) मुरलीधर सदाशिव तागडे,
रा.वाशी, ता.वाशी, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) कनिष्ठ अभियंता,
महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी,
शखा- वाशी.
2) अधिक्षक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.
उस्मानाबाद कार्यालय, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : स्वत:.
विरुध्द पक्षकारा तर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.बी. देशमुख
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही. कुलकर्णी यांचे व्दारा
अ) विरुध्द पक्षकार (विप) विदयूत वितरण कंपनी यांनी अयोग्य व जास्तीचे वीज बिल देऊन सेवेत त्रुटी केली म्हणून बिल दुरुस्त करुन मिळावे म्हणून तक्रारकर्ता (तक) यांनी ही तक्रार दिलेली आहे.
1. तक चे तक्रारी अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
तक हा वाशी जिल्हा उस्मानाबादचा रहिवाशी असून 34 वर्षापुर्वी त्याने विप कडून विदयुत जोडणी घेतली त्याचा ग्राहक क्र.640 आहे. 34 वर्षापासून विप यांनी वेळोवेळी नियमबाहय वीज बिलाची आकारणी करुन तक ची छळवणूक केली आहे. सन 2013 पासून 2014 पर्यंत विप यांनी अनेक वेळा मिटर बदलले. सन 2003 पासून तक यांच्या घरात वीज वापराच्या ज्या ज्या वस्तू होत्या तशाच आहेत. मात्र 2010 पासून बिलामध्ये सहापट वाढ झालेली आहे. याउलट या काळात लोड शेडींग होती त्यामुळे वीज वापर करता येत नव्हता. विप यांनी फॉल्टी मिटर बसवून तक ची फसवणूक केली. त्यामुळे तक ने बिल भरण्यास असमर्थता दाखविली त्यामुळे विप यांनी तक्रार मान्य केली व जून 2012 पासून वीज पुरवठा बंद केला नाही. मात्र दि.25/02/2014 रोजी रु.33,350/- चे बिल देऊन वीज पुरवठा बंद केला. तक ने चौकशी केली असता विप यांनी सागितले की बाहेरची टीम आली होती व त्यांनी वीज पुरवठा बंद केला. तक ने अधिक्षक अभियंता यांना फोन केला असता त्यांनी आधी बिल भरा व नंतर बोला असे सांगितले. घरात अंधार झाल्यामुळे दि.26/02/2014 रोजी तक ने रु.10,000/- बिल भरले व नंतर वीज पुरवठा चालू झाला. मात्र पुन्हा दि.28/02/2014 रोजी विप यांनी तक ला रु.32,400/- चे बिल दिले. विप यांनी अशा प्रकारे तक ची मानसिक व आर्थिक कुचंबणा केली तक ला 2003 ते 2009 मधील सरासरी वीज वापराप्रमाणे बिल मिळणे जरुर आहे. त्यामुळे अशा प्रकारे बिल दुरुस्त करुन मिळावे तसेच निकाल लागेपर्यंत वीज पुरवठा खंडीत करु नये. असे आदेश देण्यासाठी ही तक्रार दि.02/05/2014 रोजी दाखल केलेली आहे.
2. तक्रारी सोबत तक ने दि.26/02/2014 चा बिल रिव्हीजन रिपोर्ट दाखल केलेला आहे. सि.पी.एल. चा उतारा फेब्रूवारी 2003 ते जानेवारी 2014 पर्यंतचा हजर केला आहे. दि.07/03/2014 चे बिल हजर केले आहे. तसेच दि.07/02/2014 चे बिल हजर केले आहे. दि.26/02/2014 ची पावती हजर केली आहे. दि.05/03/2014 चा अर्ज तसेच 2003 ते 2014 पर्यंतचा चार्ट हजर केला आहे.
ब) 1. विप यांनी हजर होऊन दि.12/09/2014 रोजी म्हणणे दाखल केलेले आहे. नियमबाहय वीज आकारणी केली हे अमान्य केलेले आहे. 2009 पासून तक ने वापरापेक्षा कमी युनिटची बिले भरली असे म्हंटलेले आहे. मागील कालावधीत तक ने काही तक्रार केलेली नाही याकडे लक्ष वेधले आहे. तक याला सॅन्क्शन लोड 0.20 के.डब्ल्ूा होता. ऑगस्ट 2010 ते नोव्हेंबर 2011 च्या दरम्यान तक ने जास्त लोड वापरला तसेच वीजेच्या दरात वाढ झाली त्यामुळे देयकात वाढ झाली. तक ची देयके वेळोवेळी दुरुस्त करुन देण्यात आली. त्याचे मिटर मे 2013 मध्ये बदलेले आहे. वीज वापराच्या वस्तूमध्ये तक ने कोणताही बदल केला नाही हे म्हणणे खोटे आहे. 2010 पासून तक विविध उपकरणे वापरत आहे. बिलाचा व लोड शेडींगचा काहीही संबंध येत नाही. ग्राहकास फक्त वापरलेल्या युनिटची बिले दिली जातात. तक चे मिटर फॉल्टी नाही. वापरात झालेल्या वाढीमुळे त्याप्रमाणे बिले देण्यात आलेली आहेत. तक ने कुठलीही कल्पना न देता वीजेचा जादा वापर जादा उपकरणांव्दारे केला. तक ने 2009 पासून संपूर्ण बिले कधीच भरलेली नाहीत. थकबाकीवर नियमाप्रमाणे दंड व व्याज आकारणी केलेली आहे. दि.26/02/2014 रोजी भरलेले रु.10,000/- मार्च 2014 मध्ये देयकात दाखविण्यात आले. तक ने खोटी तक्रार दिली ती रद्द होण्यास पात्र आहे.
क) तक ची तक्रार त्याने दाखल केलेली कागदपत्रे विप चे म्हणणे यांचा विचार करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांचे समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहली आहेत.
मुद्दा उत्तर
1) विप यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनूतोषास पात्र आहे काय ? होय
3) आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे
ड) कारणमीमांसा
मुद्दा क्र. 1 व 2
1. तक ची तक्रार मुख्यत: फेबु्रवारी 2014 मध्ये दिलेल्या बिलाबद्दल आहे. तक चे म्हणणे आहे की त्याच्या घरचे मिटर वारंवार बदलण्यात आले. सि.पी.एल. चे अवलोकन केले असता 2009 मध्ये - मे, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये, 2010 मध्ये ऑगस्ट मध्ये, 2011 मध्ये - फेब्रुवारी व जूलै मध्ये, 2012 मध्ये - जानेवारी मध्ये व 2013 मध्ये - मे महिन्यात मिटर बदलल्याची नोंद आहे. विप ने मे 2013 मध्ये मिटर बदलल्याचे मान्य केले आहे.
2. फेब्रुवारी 2014 चे बिलाचे अवलोकन केले असता असे दिसते की मागील रीडिंग 1258 होते व चालू रीडिंग 1417 होते, वीज वापर 159 युनिट होता, चालू बिल रु.1205 + थकबाकी रु. 31,192/- असे होते. मागील 11 महिन्यात वीज वापर युनिटमध्ये 137, 151, 261, 246, 143, 213, 339, 50, 432, 31, व 205 असा होता. मे 2013 मध्ये मिटर बदलल्यामुळे त्या महिन्यात अॅडजस्टमेंट केली असणार मात्र सर्व महिन्यात तसेच फेब्रुवारी 2014 मध्ये सरासरी वापर सारखा दिसुन येतो मात्र थकबाकी रु.31,192/- दिसून येते.
3. दि.18/03/2015 रोजी तक ने अर्ज दिला की त्याचा विदयूत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे त्यादिवशी आदेश करुन तक ने बिलापोटी रु.10,000/- भरल्यास 24 तासांत विप ने विदयूत पुरवठा सुरु करावा असा आदेश मंचाने दिला.
4. तक ने सिपीएल हजर केल्यामुळे वादाचे मुळाशी जाण्यासाठी त्याचे निरीक्षण करावे लागेल.
जून 2012 पर्यंत थकबाकी भरण्यात तक ने असमर्थता दाखवली कारण अयोग्य मिटर बसूवन तक कडून बिलाची मागणी करण्यात आली असे त्याचे म्हणणे आहे, विप ला हे नाकबूल आहे. बिल रिव्हीजन रिपोर्ट दि.26/02/2014 चा सतरा महिन्यांसाठीचा आहे. म्हणजे ऑगस्ट 2012 पासूनचा त्यामध्ये मागील रीडिंग 1 चालू रीडिंग 3,353 युनिट, वापर 3352 युनिट म्हणजे दरमहा 197 युनिट असा दाखवला मात्र तो दुरुस्त करुन दरमहा 158 युनिट केला. थकबाकी रु.21,574/- वरुन रु.19,398/- वर आणली.
5. सि.पी.एल. फेब्रूवारी 2003 पासून असे दाखवते की रीडिंग 1920 मध्ये कोणताही बदल होत नव्हता. फेब्रूवारी 04 मध्ये रीडिंग 1970 झाले, जून 2004 मध्ये कमी होऊन 1412 झाले, ऑक्टोबर पासून वीज वापर दिसू लागला, ऑक्टोबर 2006 पासून वापर फारसा दिसला नाही, ऑगस्ट 2010 मध्ये एकदम 771 युनिट वापर दिसून आला त्यामुळे सप्टेंबर 2011 मध्ये थकबाकी 1,000 च्या पुढे गेली व रु.6,049/- झाली. यापुर्वी मिटरवर किरकोळ वीज वापर का दिसून आला याचा खुलासा तक ने केला नाही. वीज कर्मचा-याशी संगनमत करुन कमी वीज वापर दाखवणे अगर मिटर बंद किंवा हळू करणे असे प्रकार नागरीक करतात म्हणून तक ने त्याबद्दल खुलासा करणे जरुर होते. ऑगस्ट 2010 पासून सरासरी वीज वापर सामान्य असल्याचे दिसते.
6. ऑक्टोबर 2012 मध्ये थकबाकी रु.3,000/- ते रु.4000/- वरुन रु.9,087/- झाल्याचे दिसते त्यांनतर थकबाकी वाढत गेल्याचे दिसते. वर्षभराचे वीज वापराचा चार्ट तक ने हजर केला. त्याप्रमाणे 2009 पर्यंत वार्षीक वीज वापर 1,000 युनिट पेक्षा खूपच कमी होता. त्यानंतर सन 2010 मध्ये 1982 युनिट, 2011 मध्ये 1,529 युनिट, 2015 मध्ये 2,526 युनिट व 2013 मध्ये 2,387 युनिट झाला. तक चे म्हणणे आहे की त्याने कोणतीही अधीकची उपकरणे लावली नाही त्यामुळे वीज वापरात फरक पडण्याचे कारण नाही मात्र वीज दर वाढत गेले आहेत. ग्रामीण भागात अलीकडील वर्षात टीव्ही फ्रीज पंखे वॉशिंग मशीन कूलर इत्यादी उपकरणांचा वापर वाढला आहे. पुर्वी कोणती उपकरणे होती व आता काय उपकरणे आहेत याबद्दल तक ने काहीही खुलासा केलेला नाही या उलट विप चे म्हणणे आहे की तक ने सॅन्क्शन लोड पेक्षा अधीक वीजेचा वापर केला.
7. तक ने ही तक्रार 02/05/2014 रोजी फेब्रुवारी 2014 मध्ये रु.33,350/- चे बील आल्यानंतर दिली आहे. त्याआधी तक ने याबाबत मौन बाळगले आहे. दि.22/06/2012 नंतर तक ने कोणतेही बिल भरल्याचे दिसून येत नाही. नंतर एकदम दि.26/02/2014 रोजी रु.10,000/- भरल्याचे दिसते. रिव्हीजन रिपोर्ट प्रमाणे विप यांनी आपली सतरा महिन्यांची मागणी रु.2176/- ने कमी केली आहे. त्याचप्रमाणे ऑगस्ट 2012 मध्ये वाढवलेली थकबाकी रु.4,618/- अवास्तव वाटते असे एकूण रु.6,794/- विप ने थकबाकीतून कमी करणे जरुर आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
तक ची तक्रार अंशत: मान्य करण्यात येते
1) विप यांनी दि.07/03/2014 चे बिलातून वर उल्लेख केल्याप्रमाणे रु.6,794/- ( रुपये सहा हजार सातशे चौ-याण्णव फक्त) कमी करुन तक ला वीज बिल दयावे.
2) विप ने यापुढे तक ला वीज वापराप्रमाणे योग्य आकारणी करुन वीज बिल दयावे.
3) विप ने तक ला खर्चापोटी रु.1,000/- (रुपये एक हजार फक्त) दयावे.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.