ग्राहक तक्रार क्र. 132/2014
अर्ज दाखल तारीख : 08/07/2014
अर्ज निकाली तारीख: 17/04/2015
कालावधी: 0 वर्षे 09 महिने 20 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. गोरोबा पि. साहेब सिरसट,
वय-46 वर्षे, धंदा – शेती,
रा. उपळा (मा) ता. जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. कनिष्ठ अभियंता,
म.रा.वि.वि. कंपनी, तेर.
2. कार्यकारी अभियंता,
म.रा.वि.वि. कंपनी उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्रीमती विदयुलता जे. दलभंजन, प्र.अध्यक्ष.
२) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एस.एस.निकम.
विप तर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.बी. देशमूख.
न्यायनिर्णय
मा. प्र.अध्यक्ष श्रीमती विदयुलता जे.दलभंजन यांचे व्दारा :
अ) 1. अर्जदार गोरोबा सिरसट हे उपळा येथील रहिवाशी आहेत व त्यांनी विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपात महावितरण कंपनी) यांचे विरुध्द तक्रार दाखल केलेली आहे.
2. अर्जदाराच्या मौजे उपळा येथे जमीन गट क्र.754 ही आहे. वितरण कंपनीने अर्जदारास मोबदला घेऊन विदयूत पुरवठा दिला व दिला जातो व त्याचा ग्राहक क्र.591170629581 असा आहे.
3. वितरण कंपनी कडून शेतक-यास विदयूत पुरवठा करण्यासाठी अर्जदाराच्या शेता शेजारी डि.पी. बसवण्यात आली आहे. डि.पी. वरुन अर्जदारास विदयुत पुरवठा दिलेला आहे. डि.पी. बसवल्यापासून डि.पी.ची दुरुस्ती केलेली नाही त्यामुळे डि.पी. ची दुरावस्था झालेली आहे. डी.पी. उघडाच आहे. फयूज व लक्झ तुटलेल्या अवस्थेत आहे त्या ठिकाणी फयूज तारा ऐवजी तारा बसवण्यात आलेल्या आहेत तसेच डि.पी. चे आर्थिंग स्टे वायर लुज अवस्थेत आहे. अर्जदाराने व बाजूच्या शेतक-यांनी अनेक वेळा लाईनमन व विदयुत अभियंता यांच्याकडे वारंवार तोंडी व लेखी तक्रार दिलेल्या आहेत. वितरण कंपनीचे कर्मचारी डि.पी. देखभालीकडे जाणून बूजून दुर्लक्ष करतात. शेतक-यांनी मिळून पैसे जमा करुन बाहेरुन सामान विकत घेऊन बसवून घ्या असे विप चे कर्मचारी उलट उत्तरे देतात.
4. दि.16/08/2013 रोजी अर्जदाराची जनावरे स्वत:च्या शेतात चारण्याकरीता घेऊन गेला असता शेताशेजारी असलेल्या डि.पी. च्या आर्थिंगला जोडणी वायरमध्ये करंट उतरुन अर्जदाराच्या म्हशीला विदयूत प्रवाहाचा धक्का बसून म्हैस जागीच मयत झाली. सदर घटना घडल्यावर अर्जदार यांनी पोलीस स्टेशन विदयुत निरीक्षक व वितरण कंपनी यांना कळवले. विदयुत निरीक्षक यांनी पहाणी करुन पंचनामा केलेला आहे. पशू वैदयकीय अधिकारी यांनी अर्जदार यांच्या मयत म्हशीचे शवविच्छेदन केले असून अर्जदाराची म्हैस शॉक लागून मयत झाल्याचे सांगितले आहे.
5. अर्जदाराची म्हैस ही 7 वर्षाची होती व 9 महिन्याची गर्भवती होती अर्जदाराची म्हैस रु.60,000/- किंमतीची होती म्हैस मरण पावल्यामुळे अर्जदाराचे रु.60,000/- नुकसान झाले. म्हैस पुर्वीच्या वेळाला 9 लिटर दुध दिवसाला देत होती. सदर मयत म्हैस व्यायला झालेली असल्यामुळे अर्जदारास दुधापासून व तिचा वासरापासून मुकावे लागलेले आहे. दुधाचे व वासराचे नुकसान रक्कम रु.30,000/- झालेले आहे व असे एकूण रु.90,000/- चे नुकसान झालेले आहे त्यास वितरण कंपनी जबाबदार आहे असे तक चे म्हणणे आहे.
6. वितरण कंपनीने म्हशीचा पंचनामा केला नाही. डि.पी. ची व्यवस्थित देखभाल केलेली नाही व नुकसान भरपाईही दिली नाही म्हणून अर्जदाराने प्रस्तुत तक्रारीमार्फत म्हशीची नुकसान भरपाई रक्कम रु.90,000/- 15 टक्के व्याजसह वितरण कंपनीकडून मिळावी, तक्रारीचा खर्च रु.5,000/- व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- मिळावेत अशी विनंती केलेली आहे.
ब) 1. वितरण कंपनीने आपले म्हणणे अभिलेखावर दाखल केलेले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार डि.पी. बसवलेला आहे हे मान्य केलेला आहे परंतू तक्रारदारास विदयुत पुरवठा सदर डि.पी. वरुन दिलेला नाही असे म्हंटले आहे. डि.पी. व्यवस्थित होता व त्याबाबत कोणाकडून तक्रार आली नव्हती. आर्थिंग स्टे वायर लूझ नव्हती. डि.पी. च्या आर्थिंग जोडणी वायरमरमध्ये करंट उतरुन म्हशीस विदयूत प्रवाहाचा धक्का लागून म्हैस जागीच मरण पावली ही सदरची घटना वितरण कंपनीच्या चुकीमुळे घडली हे म्हणणे खोटे आहे. घटनास्थळ पंचनामा अर्जदाराच्या सांगण्यावरुन केलेला असून ते विदयुत तज्ञ नाहीत. विदयूत निरीक्षक यांनी कोणत्या तारखेस पाहणी केली, पंचनामा केल्याबाबत कोणाचे जबाब घेतले याबाबत कोणत्याही प्रकारचा उल्लेख नसून घटनेनंतर जवळ जवळ 2 महिने व 1 आठवडयानंतर कळवणे आवश्यक असतांना वितरण कपंनीला न कळवताच सदरचे पत्र अर्जदार यांना दिलेले आहे. तसेच विप चे कर्मचा-यांनी उलट उत्तरे दिलेली नाहीत.
2. म्हैस 7 वर्षाची होती हे खोटे आहे, म्हशीची किंमत वाढवून सांगितलेली आहे. म्हैस 9 लिटर दुध देत होती हे खरे नाही. दुधाचे नुकसान रु.30,000/- झाले हे संपूर्णपणे खोटे आहे. विप तक्रारदाराच्या कोणत्याही नुकसानीस जबाबदार नाही. म्हशीने स्टे वायरला जोराची झोल दिल्यामुळे स्टे वायर 11 केव्ही वायरच्या डंपरच्या संपर्कात येऊन विदयुत प्रवाही झाल्याने धक्का बसला व सदर म्हैस मरण पावली यात अर्जदाराचा निष्काळजीपणा आहे. तक्रारदाराने म्हशीची व्यवस्थित राखण केली असती तर सदरची घटना घडली नसती.
3. सदरची घटना गट क्र.754 मध्ये घडली नसून गट क्र.753 मध्ये घडलेली असल्याने अर्जदारास तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही म्हणून अर्जदारास कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्यास विप जबाबदार नाही म्हणून तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी अशी विनंती वितरण कपंनीने केलेली आहे.
क) अर्जदार यांनी तकारी सोबत लाईट बिल, पोलिस स्टेशनला दिलेला अर्ज, दि.16/08/2013 रोजी चा पी.एम. रिपोर्ट, घटनास्थळ पंचनामा, विदयुत निरीक्षकाचा अहवाल, जनावरांचे नोंद रजिष्टर, इ. मंचाच्या अभिलेखावर दाखल केले आहे. सदर कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले, लेखी युक्तिवाद वाचला, तोंडी युक्तिवाद ऐकला असता सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1) अर्जदार यांना देण्यात येणा-या सेवेत
वितरण कंपनीने त्रुटी केली का ? होय.
2) अर्जदार म्हशीची नुकसान भरपाई मिळण्यासपात्र आहे का ? होय.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
ड) कारणमीमांसा
मुद्दा क्र.1 व 2
2. अर्जदाराची म्हैस इलेर्क्टीक शॉक लागून मयत झाली. वितरण कंपनीने नुकसान भरपाई दिली नाही ही प्रमूख तक्रार अर्जदाराची आहे.
3. वितरण कंपनीचे असे म्हणणे आहे की अर्जदाराची म्हैस ही मयत झाली ती अर्जदाराच्या निष्काळजीपणामुळे झाली. परंतू अर्जदाराला तरी कसे काय माहित असणार की सदर डि.पी. (रोहित्र) च्या स्टे वायर मध्ये विजेचा करंट उतरला आहे व जर अर्जदाराला माहित असते की रोहित्रच्या स्टे वायर मध्ये करंट उतरला आहे तर अशा परीस्थितीत अर्जदाराने आपली म्हैस त्या स्टे वायरच्या आजूबाजूला चारण्यास सोडली नसती.
4. वितरण कंपनीने त्यांच्या लेखी युक्तिवादाच्या परीच्छेद क्र.1 मध्ये तक्रारदाराची तक्रार मान्य केलेली आहे व परीच्छेद क्र.2 मध्ये पुन्हा तक्रार अमान्य केलेली आहे.
5. वितरण कंपनीने अशी हरकत घेतलेली आहे की निंबाळकर डि.पी वर असलेल्या स्टे वायर जवळून जात असतांना म्हशीचे शिंग लूज स्टे वायरला अडकले व ते काढून घेण्याच्या प्रयत्नात म्हशीला करंट लागून ती मयत झाली.
6. पंरतू जर घटनास्थळ पंचनामा पाहिला तर असे निदर्शनास येते की, संजय निंबाळकर यांचे खडी क्रशर इलेक्ट्रीक डि.पी. जवळ असून सदर ठिकाणी डि.पी. ला पूर्व बाजूस दोन आर्थिग जोडणी वायर जमीनीत पुरलेली दिसत असून ओढणीवायरीपैकी उत्तर बाजूचे ओढणीजवळ एक मोठी काळया रंगाची म्हैस वय अंदाजे 7 वर्ष मयत होऊन पडलेली दिसत आहे. मयत म्हशीस डावे शिंगाचे आतील डोक्याजवळ इलेक्ट्रीक शॉक लागून घासलेले व्रण दिसत आहे असे नमूद आहे.
6. तसेच, विदयूत निरीक्षकांचा अहवाल अभिलेखावर दाखल आहे. सदर अहवालामध्ये नमुद केल्याप्रमाणे दि.16/08/2013 रोजी मौज उपळा शिवार येथे गट क्र.753 मध्ये श्री.गोरोबा सिरसाट यांची म्हैस वितरण कंपनीच्या डि.पी.वर स्टे वायर जवळून जात असतांना म्हशीचे शिंग लूज वायरला अडकले व शिंग स्टे वायर पासून काढून घेण्यासाठी प्रयत्न करीत असतांना म्हशीने स्टे वायाला जोराचा झोळ दिल्यामुळे वायरच्या जंपच्या संपर्कात येऊन विदयुत प्रवाही झाला व म्हशीला विजेचा धक्का बसला व ती मरण पावली असे विदयुत निरीक्षकाच्या अहवालात नमूद केलेले आहे.
7. वास्तविक पाहता सदर घटना ही गट क्र.753 मध्ये घडलेली आहे आणि अर्जदाराच्या जमीनीचा गट क्र.754 असा आहे. म्हणजे डि.पी. हया दोन्ही शेतांच्यामध्ये जो बांध आहे त्यावर असणार व अर्जदाराची म्हैस ही त्याने गट क्र.354 मध्ये चरण्यास सोडलेली आहे व ती म्हैस चरत परत गट क्र.453 मध्ये गेलेली आहे. सदर डिपी च्या स्टे वायरला म्हशीचे शिंग अडकून सदर घटना घडलेली आहे ती मान्य करावीच लागेल कारण अर्जदार वितरण कंपनीचा ग्राहक आहे व हया डी.पी. व्यतीरिक्त दुस-या डि.पी. वरुन तक्रारदारस विदयूत कनेक्शन दिले आहे या म्हणण्यासाठी विप ने कोणताही पूरावा दिलेला नाही म्हणून पुराव्याअभावी विप चा हा बचाव मान्य करता येणार नाही तसेच अर्जदाराने ग्राहक असल्याचा पुरावा म्हणून विदयूत बिल अभिलेखावर दाखल केलेले आहे.
8. अर्जदाराची म्हैस गाबण होती असे दर्शविणारा डॉक्टरांचा शवविच्छेदन अहवाल पुरेसा आहे.
9. दाखल कागदपत्रांवरुन वितरण कंपनीच्या डि.पी. चा करंट उतरलेल्या स्टे वायरच्या स्पर्शाने म्हैस जागीच गतप्राण झालेली आहे हे सिध्द होते व त्यास महावितरण कंपनी जबाबदार आहे हे स्पष्ट होते.
10. अर्जदाराने म्हशीची किंमत दर्शविणारी पावती जरी अभिलेखावर दाखल केलेली नाही म्हणून आाम्ही अर्जदाराची म्हैस ही रु.30,000/- (रुपये तीस हजार फक्त) हा बाजारभाव ग्राहय धरुन व ती गाबण होती त्यामुळे म्हशीची संपूर्ण रक्कम रु.40,000/- (रुपये चाळीस हजार फक्त) असे अर्जदाराचे नुकसान झालेले असले पाहिजे असे मान्य करतो.
11. वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे अर्जदाराच्या म्हशीचा मृत्यू झाला व त्याचे आर्थिक नुकसान झाले ही विप च्या सेवेतली त्रुटी आहे आणि अर्जदार सदर म्हशीची नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे म्हणून मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
अर्जदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
1) वितरण कंपनीने अर्जदारास म्हशीची सर्वसाधारण किंमत रु.40,000/- (रुपये चाळीस हजार फक्त) आदेश पारीत दिनांकापासून 30 (तिस) दिवसात दयावी.
2) वितरण कंपनीने अर्जदारास तक्रारीचा खर्च रक्कम रु.2,000/-(रुपये दोन हजार फक्त) आदेश पारीत दिनांकापासून 30 (तिस) दिवसात दयावा.
3) वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता
विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत मंचात अर्ज
दयावा
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (श्रीमती विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य प्र.अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.