ग्राहक तक्रार क्र. : 114/2014
दाखल तारीख : 04/06/2014
निकाल तारीख : 19/11/2015
कालावधी: 01 वर्षे 05 महिने 16 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. भागवत देविदास माने,
वय-63 वर्षे, धंदा – सेवा निवृत्त व शेती,
रा.शिंगोली, ता.कळंब, जि. उस्मानाबाद.
ह.मु. बार्शी, जि. सोलापूर ....तक्रारदार
वि रु ध्द
1. कनिष्ठ अभियंता,
महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी.
उप विभाग दहिफळ, ता. कळंब, जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रादारातर्फे विधीज्ञ : श्री.एस.एस.निकम.
विप तर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.बी. देशमूख.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
1) विरुध्द पक्षकार (विप ) विज कंपनीने अवास्तव वीज बिलाची मागणी करुन वीज पुरवठा बंद करुन सेवेत त्रुटी केली म्हणून तक्रारकर्ता (तक) यांनी हि तक्रार दिलेली आहे.
2) तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
तक हा माजी सैनीक असून बार्शी येथे वास्तव्यास आहे शिंगोली ता. कळंब येथे त्याची दोन घरे व शेत जमीन आहे व तो शिंगोलीला गरज पडेल तेव्हा मुक्कामी राहतो. आपल्या घरामध्ये तक ने दि.11/08/2008 रोजी पासून विद्युत कनेक्शन घेतले असून ग्राहक क्रमांक106870618552 असा आहे. विप यांनी कधीही वेळेवर बिल दिलेले नाही तसेच मोघम बिले दिली असून मिटर रिडिंगप्रमाणे दिलेली नाहीत. तक ने वारंवार विनंती केली पण विप ने पूर्तता केली नाही. उलट विद्युत पुरवठा खंडित करण्याची व फौजदारी गुन्हा नोंद करण्याची धमकी दिली. दि.27/08/2011 रोजी तक ने विप कडे बिल दुरुस्तीची मागणी केली. तथापि विप ने चुकीची बिले दिली आहेत. तक चा वीज वापर प्रतिमाह पाच ते सात युनिट आहे. जानेवारी 2013 मध्ये मिटर बदलण्यात आले. आजारी असल्यामुळे तक ऑगस्ट 2013 पर्यंत बार्शी येथे होता. त्यांनतर आल्यावर त्याला दिसले की विप यांनी मिटर काढून नेलेले आहे. तक ला त्यामुळे रॉकेलच्या दिव्याचा वापर करावा लागत आहे. जानेवारी 2013 पासून विप यांनी मिनीमम चार्जस घ्यायला पाहिजे होते मात्र तसे केले नाही त्यामुळे बिल दुरुस्त व्हावे व विद्युत पुरवठा सुरु करुन द्यावा तसेच नुकसानीपोटी रु.20,000/- व तक्रारीचा खर्च रु.7,000/- मिळावा म्हणून तक यांनी ही तक्रार दि.04/06/2014 रोजी दाखल केलेली आहे.
3) तक ने तक्रारी सोबत मार्च 2013 चे बिल दि.29/08/2013 चा अर्ज त्या दिवशीचा दुसरा अर्ज ओळखपत्र व सरकारी परिपत्रक इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यानंतर जुलै 2013 चे बिल पण हजर केले आहे.
4) विप यांनी हजर होऊन दि.29/10/2014 रोजी लेखी म्हणणे दाखल केले आहे.
तक ला विद्युत पुरवठा दिला हे मान्य आहे. मात्र मोघम व अंदाजे बिले दिली हे मान्य नाही. वेळच्या वेळी मिटर रिडिंगप्रमाणे तक ला बिले दिली होती. तक शी उध्दट वर्तन केलेले नाही अगर धमकी दिलेली नाही. तक चा वीज वापर दरमहा पाच ते सात युनिट होता हे मान्य नाही. आजारी असल्यामुळे तक ऑगस्ट 2013 पर्यंत बार्शीत राहत होता हे मान्य नाही. ऑगस्ट 2011 पासून तक थकबाकीदार आहे. त्याने हेतुपुरस्सरपणे बिल भरलेले नाही. त्याचा विद्युत पुरवठा कायमाचा बंद करण्यात आलेला आहे. विद्युत पुरवठा कायमचा बंद झाल्यामुळे तक हा विप चा ग्राहक नाही त्यामुळे ही तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. विप ने तक चे कंझ्यूमर पर्सनल लिजरचा उतरा हजर केलेला आहे.
5) तक ची तक्रार त्यानी दिलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांचे समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) विप यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? नाही.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? नाही.
3) आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 व2
6) दि.11/08/2008 रोजी तक ला विद्युत पुरवठा देण्यात आला याबद्दल कोणताही वाद नाही. तक चे म्हणणेप्रमाणे चुकीची बिले मिळत असल्यामुळे त्याने दि.27/08/2011 पासून बिल भरणे बंद केले व दुरुस्त बिलाची मागणी केली. मात्र त्याला धमकी देण्यात आली. त्याबद्दल कुठेही लेखी तक्रार केली असे दाखवायला कोणताही पुरावा नाही. सि.पी.एल. चे अवलोकन केले असता तक ने जो वीज वापर केला. तो दिसुन येतो. वीज वापर कमी होता व जास्तीत जास्त 20 ते 30 युनिट होता असे दिसुन येते. डिसेंबर 2010 पासून तो दरमहा 30 ते 50 युनिट झाल्याचे दिसुन येते. तक चे म्हणणे आहे की त्याचा वीज वापर फक्त पाच ते सात युनिट दरमहा होता. तक आपल्या घरात किती दिवे लावत होता व कोणती विद्युत उपकरणे वापरत होता याबद्दल चकार शब्द काढलेला नाही. घरामध्ये दोन किंवा अधिक खोल्या असू शकतात तसेच विद्युत उपकरणे असू शकतात त्यामुळे नोंदवलेला वीज वापर चुकीचा आहे हे दाखविण्यास कोणताही पुरवा नाही. तसेच ऑगस्ट 2011 मध्ये तक ने तक्रार केली असे मानता येणार नाही. ऑगस्ट 2011 मध्ये थकबाकी रु.414/- होती.
7) ऑगस्ट 11 नंतर बिल भरले नाही हे तक ला मान्य आहे. मात्र चुकीची बिले दुरुस्त होऊन मिळावी म्हणून बिल भरले नाही असे त्याचे म्हणणे आहे. त्याबद्दल कोणताही अर्ज दिला अशी त्यांचेकडे पोहच नाही. बिलाबद्दल वाद होता हे तक चे म्हणणे काल्पनीक दिसुन येते. सि.पी.एल. प्रमाणे जुलै 2013 अखेर रु.6,336/- बिल येणे होते. ऑगस्ट 2013 मध्ये वीज पुरवठा कायस्वरुपी बंद करण्यात आला. थकबाकी मधून रु.3,577/- कमी करण्यात आले. डिसेंबर 2013 मध्ये डिपॉझिटचे रु.500/- वजा करुन आता रु.2,259/- येणे दाखवले आहे. बिल भरले हे दाखवण्यासाठी तक कडे कोणतीही पावती नाही. उलट ऑगस्ट 2011 पासून बिल न भरल्याचे तक ने लंगडे समर्थन केले आहे. तक चे म्हणण्याप्रमाणे जानेवारी 2013 मध्ये मिटर बदलण्यात आले. विप ला हे म्हणणे मान्य नाही. तसेच सि.पी.एल. अशी गोष्ट दाखवत नाही उलट मिटर रिडिंग नोंदवण्यात आल्याचे दिसुन येते.
8) तक हा बार्शी येथे राहतो असे त्याचे म्हणणे आहे. कधीतरी शिंगोली येथे राहतो असे त्याचे म्हणणे आहे. बहुतेक त्याला शिंगोली येथे राहण्याची आवश्यकता नाही त्यामुळे बिल भरण्याची टाळाटाळ केल्याचे दिसते. विप यांनी नियमाप्रमाणे विद्युत पुरवठा खंडित केला तो आता चालू करुन मागता येणार नाही. असा काही तातडीचा आदेश तक ने मागीतलेला नाही. विप यांनी सेवेत कोणतीही त्रुटी केली असे दिसुन येत नाही त्यामुळे तक अनुतोषास पात्र नाही. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो
आदेश
1) तक ची तक्रार रद्द करण्यात येते.
2) खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.