निकाल
(घोषित दि. 26.08.2016 व्दारा श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदार हिने दि.29.12.2015 पासून नविन मीटर मिळण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे मिळविण्याकरीता प्रयत्न केले त्यावेळी संबंधित अधिकारी यांचेकडून कळाले की, तक्रारदार हिच्या मुलाच्या नावावर वीज बिलाची थकबाकी आहे. त्यानंतर परत तक्रारदार तिच्या मुलासह अंबड कार्यालयात गेली तेव्हा तिला सांगण्यात आले की, तिच्या मुलाच्या नावावर थकबाकी असल्यामुळे तिला मीटर देता येत नाही. शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ज्या कुटूंबातील व्यक्तीकडे वीज बिलाची थकबाकी आहे, त्यांना वीज मीटर देता येणार नाही असे जाहीर करण्यात आले आहे. तक्रारदार यांनी एका लाईनमनला सुध्दा त्यांच्या मीटर बाबत काय झाले याची चौकशी केली असता त्यांनी माहिती नाही म्हणून सांगितले. कालांतराने परत तक्रारदार हिने मीटरबाबत चौकशी केली असता सध्या मार्च महिन्याचा शेवट असल्यामुळे काही करता येत नाही असे सांगण्यात आले. अशा रितीने दि.29.12.2015 पासून, मे 2016 पर्यंत तक्रारदार हिला गैरसोय सहन करुन रहावे लागले. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळया कार्यालयात जाऊन तक्रारदार हिने तिचे गा-हाणे मांडले परंतू त्याचा उपयोग झाला नाही. दि.21.04.2016 रोजी तक्रारदार हिने भरलेला फॉर्म गैरअर्जदार यांना ऑनलाईन मिळाला, तो दि.26.04.2016 रोजी ऑनलाईन उपलब्ध झाला. त्यानंतर तक्रारदार हिला कोटेशन भरण्याबाबत सांगण्यात आले. दि.16.05.2016 रोजी तक्रारदार हिने रु.1550/- ही कोटेशनची रक्कम भरली व आवश्यक तो टेस्ट रिपोर्ट संबंधित कार्यालयात जमा केला. त्यानंतर मीटर जोडणी करण्याकरता तक्रारदार हिने चौकशी केली असता सध्या मीटरचा साठा नाही, तो उपलब्ध झाल्यानंतर जोडणी केली जाईल असे सांगण्यात आले. अशा त-हेने तक्रारदार हिला मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला त्यामुळे तक्रारदार हिने हा तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारदार हिने अशी विनंती केली आहे की, तिला नवीन मीटरची जोडणी करुन मिळावी, तसेच वीज मंडळाकडून भविष्यकाळात तिला त्रास देण्यात येऊ नये, असा आदेश देण्यात यावा. दि.29.12.2015 पासून दि.03.05.2016 पर्यंत तसेच त्यानंतर या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत झालेला खर्च मिळावा, नुकसान भरपाई म्हणून रु.45,000/- मिळावे. तसेच तिला झालेल्या विशेषतः त्रासाबददल प्रत्येकी रु.1,00,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी त्यांचा सामुहिक लेखी जबाब दाखल केला. गैरअर्जदार यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार ही ग्राहक नाही, त्यांना अशा स्वरुपाचा वाद गैरअर्जदार यांच्या विरुध्द दाखल करता येणार नाही, व तो ग्राहक मंचास चालविता येणार नाही. तक्रारदार हिने दि.21.04.2016 रोजी ए-वन फॉर्म दाखल केला. सदर फॉर्म अनुसार दि.26.04.2016 रोजी तिला कोटेशन देण्यात आले. दि.02.05.2016 रोजी तक्रारदार हिने डिमांड नोट च्या रकमेचा भरणा केला. त्यानंतर तक्रारदार हिला दि.09.06.2016 रोजी विद्युत पुरवठा सुरु करण्यात आला. तक्रारदार हिला नियमाप्रमाणे विद्युत पुरवठा देण्यात आलेला आहे, त्यात कोणतीही त्रुटी नाही. गैरअर्जदार यांच्या कृत्यामुळे तक्रारदार हिला कोणताही आर्थिक व मानसिक त्रास झालेला नाही. त्यामुळे तिला नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार नाही. हा तक्रार अर्ज दाखल करण्याकरता कोणतेही कारण घडलेले नाही. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करावा अशी विनंती गैरअर्जदार यांनी केलेली आहे.
तक्रारदार हिने तक्रार अर्जासोबत कोटेशनच्या रकमेचा भरणा केल्याची पावती, कोटेशनची प्रत, टेस्ट रिपोर्टची प्रत, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच दि.18.04.2016 रोजी जिल्हाधिकारी व एक्झक्युटीव्ह इंजिनिअर यांना पाठविलेल्या पत्राची प्रत, तहसिलदार व विद्युत मंडळाचे अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदार यांच्या वकीलांनी तक्रारदार हिला देण्यात आलेल्या वीज बिलाची डुप्लीकेट प्रत ग्राहक मंचाच्या अवलोकनार्थ दाखल केली आहे. त्याचप्रमाणे सदर पावती द्वारे मागणी केलेली रक्कम तक्रारदार हिने भरल्याबाबतची पावती सुध्दा दाखल केली आहे.
आम्ही तक्रारदार यांचा तक्रार अर्ज व गैरअर्जदार यांचा लेखी जबाब काळजीपूर्वक वाचला. तक्रारदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण केले, आणि दोन्ही बाजुंच्या वतीने करण्यात आलेला युक्तीवाद ऐकला. त्यावरुन आमचे असे मत झाले आहे की, या प्रकरणात तक्रारदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये तथाकथित ग्राहक व सेवा पुरविणारा हे नाते उत्पन्न होण्याकरीता ज्या घटना घडल्या त्यावर आधारीत कारण दाखवून हा तक्रार अर्ज दाखल केला आहे. प्रत्यक्षात ग्राहक व सेवा पुरविणारा असे नाते जेंव्हा अस्तित्वात असते त्याचवेळी ग्राहकास या प्रकारची कार्यवाही ग्राहक मंचासमोर दाखल करता येते. त्यामुळे प्रथमदर्शनी ही कार्यवाही ग्राहक मंचासमोर चालू शकेल अथवा नाही याबाबत रास्त संशय उत्पन्न होतो. या प्रकरणी विद्युत पुरवठा सुरुच झाला नव्हता, त्याकाळातील कारण हया कारवाईकरीता दाखवले आहे. त्यामुळे तक्रारदार ग्राहक आहे असे म्हणता येणार नाही.
तक्रारदार हिचे म्हणणे गुणवत्तेवर सुध्दा स्विकारता येणार नाही. कारण तक्रारदार हिचा नवीन वीज कनेक्शन मिळावे या करता दि.21.04.2016 रोजीचा अर्ज गैरअर्जदार यांना प्राप्त झाला, त्या अनुषंगाने गैरअर्जदार यांनी दि.26.04.2016 रोजी तक्रारदार हिला कोटेशन दिले, कोटेशनमध्ये दर्शविलेल्या रकमेचा भरणा तक्रारदार हिने दि.02.05.2016 रोजी केला. त्यानंतर दि.09.06.2016 रोजी तक्रारदार हिला वीज मीटरची जोडणी गैरअर्जदार यांच्याकडून करुन देण्यात आली. याचाच अर्थ असा की, तक्रारदार हिने अर्ज दिल्यापासून 49 दिवसाच्या आत तिला गैरअर्जदार यांच्याकडून वीज पुरवठा सुरु करण्यात आलेला आहे. त्यामुळे युक्तीवादाकरता जरी असे गृहीत धरले की, तक्रारदार व गैरअर्जदार यांच्यामध्ये ग्राहक व सेवा पुरविणारा असे नाते आहे. तरीही, गैरअर्जदार यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी निष्पन्न होत नाही. गैरअर्जदार यांनी तक्रारदार यांना 13 जून 2016 रोजी जे वीजेचे देयक दिलेले आहे त्याची डुप्लीकेट प्रत गैरअर्जदार यांनी दाखल केलेली आहे. सदर डुप्लीकेट बिलामध्ये विद्युत पुरवठा दि.09 मे 2016 रोजी सुरु केल्याचे दिसून येते. याचाच अर्थ गैरअर्जदार यांच्या वकीलांनी लेखी जबाबाच्या परिच्छेद क्र.3 मध्ये दि.09.06.2016 रोजी विद्युत पुरवठा सुरु केल्याचा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात 1 महिन्याच्या आतच म्हणजे दि.09.05.2016 रोजीच तक्रारदारास वीज पुरवठा देण्यात आला असे असे दिसते. अशा परिस्थितीत गैरअर्जदार यांच्या वागणूकीत कोणताही दोष नाही, त्यांच्याविरुध्द कोणताही आरोप सिध्द होत नाही, त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार खारीज करण्यात येते.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्यात येतो.
2) खर्चाबददल आदेश नाही.
श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना