जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 334/2011 तक्रार दाखल तारीख – 22/12/2011
निकाल तारीख - 25/03/2015
कालावधी - 03 वर्ष , 03 म. 03 दिवस.
अनंत गोपाळराव कुलकर्णी,
वय – 53 वर्षे, धंदा – शेती,
रा. नदीहत्तरगा, ता. निलंगा,
जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
1) कनिष्ठ अभियंता,
महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कं. लि.,
किल्लारी सब डिवीजन,
ता. निलंगा, जि. लातुर.
2) कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कं. लि., .
निलंगा, ओ & एम डिवीजन,
ता. निलंगा, जि. लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. ए.के.जवळकर.
गैरअर्जदारातर्फे :- अॅड.एस.एन.शिंदे.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदाराच्या वडीलांच्या मृत्यू पश्चात अर्जदाराच्या कुटुंबातील त्यांचे वडीलांच्या नावे असलेली जमीन गट नं. 31 मौजे नदी हत्तरगा क्षेत्र 4 हेक्टर 91 आर एवढी शेतजमीन वारसा हक्काने अर्जदार व त्यांचे तीन भाऊ नामे गोविंद गोपाळराव कुलकर्णी, श्यामराव गोपाळराव कुलकर्णी, यांची नावे लागली. अर्जदाराचे वडीलांनी त्यांच्या हयातीत गैरअर्जदाराकडुन शेती वापरासाठी पाच एच.पी.एवढा मंजुर भार असलेला विज पुरवठा 2000 साली घेतला होता. अर्जदाराचे शेतीत एकुण सहा लाईटचे खांब असुन त्यावरुन पुढील शेतक-यांना व पुढील गावात गैरअर्जदारांनी विदयुत पुरवठा नेलेला आहे. अर्जदाराने त्यांच्या 4 हेक्टर 91 आर एवढया क्षेत्रातील एक हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड केलेली होती. अर्जदाराचा ऊसाचा पहील्या हंगामाची तोड दि. 05/04/2010 रोजी झाली. मांजरा सहकारी साखर कारखान्याने एका टनास रु. 2,100/- एवढा भाव दिला. अर्जदाराच्या एक हेक्टर क्षेत्रातुन 91.269 टन एवढा ऊस निघाला. त्याप्रमाणे अर्जदारास रु. 1,91,664/- कारखान्याने अर्जदाराच्या लातूर जिल्हा मध्यवती सहकारी बँकेच्या बचत खात्यात जमा केले. अर्जदाराचा ऊस कारखाना गेटकेण या तत्वावर घेऊन जाण्याच्या तयारीत होता. त्यामुळे अर्जदाराने जवळपास 15 ते 20 दिवसापासुन ऊसास पाणी दिले नव्हते.
दि. 21/02/2011 रोजी सकाळी साधारणत: 9 ते 9:30 च्या दरम्यान गैरअर्जदाराने अर्जदाराच्या शेतीत रोवलेल्या खांबावरील विदयुत लाईन सैल झाल्यामुळे वा-यामुळे दोन विदयुत तारा एकमेकाला स्पर्श होऊन आगीच्या ठिणग्या पडल्यामुळे अर्जदाराच्या शेतातील परीपक्व झालेला एक हेक्टर ऊस जळाला व काही ऊस जळुन काळा पडला. सदरची घटना घडली त्यावेळेस सुरेश रावजी कुलकर्णी, दत्तु विठोबा तिप्पनबोने व विठ्ठल प्रेमा घोडके हजर होते. त्यांनी स्वत:ही सदरच्या घटना पाहिली. अर्जदाराने सदरच्या घटनेची माहिती गैरअर्जदार क्र. 1 यांना दि. 22/02/2011 रोजी लेखी स्वरुपात देऊन पोहच घेतली. अर्जदाराने दिलेल्या लेखी पत्राच्या अनुषंगाने तहसीलदार निलंगा यांचे सांगणेवरुन दि. 05/03/2011 रोजी तलाठी यांनी पंचनामा केला व सदरच्या पंचनाम्यात अर्जदाराच्या ऊसाचे क्षेत्र एक हेक्टर क्षेत्रातील ऊसाचे पिकास आग लागुन
नुकसान झाले आहे. परिणामी अर्जदाराने त्याच्या शेतीतील जळालेला ऊस हा स्वखर्चाने काढुन टाकला त्यामुळे अर्जदाराचे आर्थिक नुकसान झाले. अर्जदाराने एक हेक्टर क्षेत्रातील ऊस जोपासण्यासाठी त्याला एकरी रु. 5,000/- या प्रमाणे मेहनत मशागत औषधे, खते, यासाठी खर्च आला. अशा प्रकारे एक हेक्टर क्षेत्रासाठी त्यास रु. 12,500/- एवढा खर्च आला. गतवर्षी अर्जदाराचा ऊस मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना यांनी ऊस नेला होता. अर्जदारास प्रति टन रु. 2,100/- दिला होता. अर्जदारास त्याच्या एक हेक्टर क्षेत्रातुन 91.269 टन एवढा ऊस आजही निघाला असता अर्जदारास रु. 2,100/- दराने रु. 1,91,664/- या वर्षी अर्जदारास मिळाले असते. गैरअर्जदाराच्या चुकीमुळे अर्जदाराचा एक हेक्टर क्षेत्रातील ऊस जळाला व काही ऊस जळुन काळा पडल्यामुळे अर्जदाराचे नुकसान झाले. रु. 1,91,664/- मधुन अर्जदाराने प्रत्यक्ष शेतीत केलेला खर्च रु. 12,500/- वजा केला असता अर्जदाराचे निव्वळ नुकसान रु. 1,79,164/- चे सदरची रक्कम देण्याची संपुर्ण जबाबदारी गैरअर्जदाराची येते. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या शेतीचा पंचनामाही केला नाही व मोबदलाही दिला नाही. म्हणुन अर्जदाराने पुन्हा गैरअर्जदार क्र. 1 यांना दि. 20/04/2011 रोजी लेखी पत्र देऊन नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली. गैरअर्जदाराने वेळोवेळी विदयुत वाहीणीची देखभाल व दुरुस्ती न केल्यामुळे अर्जदाराच्या शेतीतील एक हेक्टर ऊस जळून अर्जदाराचे आर्थिक नुकसान झाले.
गैरअर्जदाराने अर्जदाराचे झालेले नुकसान रु. 1,79,164/- व त्यावर 12 टक्के दराने व्याज घटना घडलेल्या तारखेपासुन संपुर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत देण्याचा आदेश गैरअर्जदारांना करण्यात यावा. अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु. 20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 10,000/- असे एकूण रु. 30,000/- देण्याचा आदेश गैरअर्जदारास करण्यात यावा.
तक्रारदाराने तक्रारी सोबत 7/12, वीज बिल, अर्ज,प्रमाणपत्र, पंचनामा, अर्ज क्रमांक-02, बँक पासबुक, पासबुक, मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.,ऊस वजन पावत्या (08 प्रती), अधिकार पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार अर्जदाराने हे सिध्द करावे की, तो एकत्र कुटुंबात राहतो. व त्यांच्या नावे वारसा हक्काने गट क्र. 31 मध्ये 91 आर एवढी जमीन आहे. व ती अर्जदाराच्या मालकीची व ताब्यात आहे. तसेच गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार सन- 2000 मध्ये अर्जदारास 5 एच.पी इतका विदयुत भार दिला होता व त्यांना ग्राहक क्र. 627270294491 असा आहे. हे कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द करावे तसेच त्यांचा ऊस हा दरवर्षी दरवेळेस रु. 2,100/- प्रमाणे भाव एका हेक्टरला मिळत होता. हे म्हणणे सुध्दा अर्जदारानी सिध्द करावे. तसेच दि. 21/02/11 रोजी अर्जदाराचा सकाळी 9 ते 9.30 च्या दरम्यान विजेच्या तारात घर्षण होवून अर्जदाराचा गट क्र. 31 मधील ऊस जळाला याची तहसीलदाराकडे खबर दि. 22/02/2011 रोजी देण्यात आली. ती 30 ते 36 तसांनी देण्यात आली.तसेच तलाठयाने दि. 05/03/2011 रोजी पंचनामा केला. तसा विदयुत निरीक्षकाला अर्जदाराने कळवलेले नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत कोणतीही कसुर केली नसल्यामुळे व सदरच्या तक्रारीतील घटना ही खोटी व बेकायदेशीर असल्यामुळे अर्जदाराची तक्रार ही फेटाळण्यात यावी. तसेच ऊसाच्या पावती वरुन 77.508 टन एवढा ऊस लिहिण्यात आलेला आहे. व 91269 टन असा नमुद केलेला नाही. तसेच तिथे वीजेचे घर्षणही झाले नाही. व त्यामुळे आग देखील लागलेली नाही म्हणून सदरची केस फेटाळण्यात यावी.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? नाही
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? नाही
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? नाही
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर नाही असून, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक होत नाही. अर्जदाराचे वडील श्री गोपाळराव शामराव कुलकर्णी हे त्यांचे ग्राहक आहेत. सदर केसमध्ये वारस प्रमाणपत्र दाखल केलेले नाही. ज्यामुळे सदरचा विदयुत भार घेण्यासाठी हे सर्वजण हक्कदार आहेत.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर नाही असे असून अर्जदाराचे नदी हत्तरगा येथे गट क्र. 31/अ मध्ये सर्वांची मिळून 4 हेक्टर 91 आर एवढी शेती आहे. त्यात दि. 10/10/2011 च्या सातबारावर ऊस 1=00 मध्ये लावलेला आहे. त्याने म.रा.वि.वि.कंपनी म्हणजेच गैरअर्जदाराला दि. 22/02/2011 रोजीच कळवलेले आहे. त्याचा पंचनामा तलाठयाने केलेला आहे. त्याचा दि. 05/03/2011 असा आहे. गेले वर्षीच हा ऊस दि. 27/03/2010 रोजी 12.200 वजनाचा गेलेला आहे. ऊसाचा प्रकार CO-671 असा आहे. अर्जदाराने सदर केसमध्ये अर्जदारास प्रकरण चालवण्याचे व चार भावांमध्ये एकूण 4 हेक्टर 91 आर एवढी शेतजमीन असल्याचे अधिकार पत्र दिलेले आहे. व त्यात गैरअर्जदाराच्या चुकीने 1 हेक्टर क्षेत्रातील ऊस जळाल्याचे दिसुन येते. सदर केसमध्ये पोलीस पंचनामा झालेला नाही. अर्जदाराने विदयुत निरीक्षकाला पार्टी केलेले नाही किंवा त्यांचा अहवालही मागितलेला नाही. म्हणून सदर केस ही केवळ एका तलाठयाच्या पंचनाम्यावर सिध्द होवू शकत नाही. सदर अर्जदाराने अधिकार पत्रासाठी 4 हेक्टर 91 आर ही जमीन चार भावांच्या मध्ये गट क्र. 31/अ मध्ये असल्याचे सांगते मात्र चारही भावांनी आपले वडील हयात असल्याचा पुरावा दिलेला नाही. त्यामुळे या चौघांच्या नावाने कृषी म्हणून 5 एच.पी भार गोपाळराव शामराव कुलकर्णी यांच्या नावे आहे. व शेतीचा सातबारा हा चार भावांच्या नावे आहे. मग या चारही जणांनी आजपर्यंत आपल्या नावावर विदयुत कनेक्शन का केले नाही. ज्यामुळे चारही भाऊ हे ग्राहक या संज्ञेत बसलील. जर कागदोपत्री पुराव्यानुसार स्वत: अर्जदार आपल्या तक्रारी अर्जात आपले वडिल मृत्यू पावले आहेत असे सांगतो तर त्याचे विज बिल कसे काय चालेल ? अर्जदार कसे ग्राहक होवू शकतील, त्यासाठी अर्जदारास वारस प्रमाणपत्र दयावयास पाहिजे होते किंवा चार पैकी एकाच्या नावे वीज ग्राहकाची नोंद व्हावयास पाहिजे होती. तसेच 31/अ गट क्रमांकावर गोपाळराव शामराव कुलकर्णी यांचे नाव नाही. त्यामुळे अर्जदारास गैरअर्जदाराने ग्राहक होण्यासाठी गैरअर्जदार विदयुत भाराच्या नावे आपल्या नावाने असायला पाहिजे होते. अशा अर्धवट कागदोपत्री पुराव्यावर ऊस जळीताला रक्कम कशी देता येणार ? विदयुत निरीक्षकाचा अहवालही, पोलीस पंचनामा घटनेची नोंदही नाही. तसेच 7/12 वर चारही जणाचे नाव असून त्यांनी अधिकारपत्र अर्जदाराच्या नावे लिहून दिले. मात्र विदयुत बिल ग्राहकाच्या क्रमांकाच्या मालकीबाबत 627270294491 अथवा वडिलांचे नावे आजपर्यंत आहे. ज्याचा मृत्यू झालेला आहे अशा बिलास महत्व देता येईल का ? तसेच वडिलांचे आम्ही सर्व भावंडे वारसदार आहे असा कागदोपत्री पुरावा देखील नाही. त्यामुळे सदरची केस ही योग्य कागदपत्रांअभावी सिध्द होवू शकली नाही. म्हणून हे न्यायमंच अर्जदाराचा अर्ज फेटाळत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
2) खर्चाबाबत काही आदेश नाही.
(श्री. अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते)
सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.