तक्रारदाराने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केलेली आहे. यातील तक्रारदार श्री बळीराम इटनकर यांची गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीविरुध्द थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांची मौजा पारशिवनी, प. ह. नं. 11, भू.क्र.438, आराजी एक एकर ही शेतजमिन असून त्यापैकी 0.28 हे.आर. शेतजमिनित सन 2010-11 या वर्षात गोबी, पालक, चवळी, वांगे व मिरची याप्रमाणे पिक लावले होते. तक्रारदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत व त्यांचा ग्राहक क्रमांक 422060250156 असा आहे. त्यांनी दिनांक 11/5/2010, 12/5/2010, 17/5/2010 व 20/5/2010 रोजी त्याचा विद्युत पुरवठा बंद असल्याची तक्रार नोंदविली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. गैरअर्जदाराने तक्रारदाराचे सदर शेतीमधील विद्युत पुरवठा चालू केलेला नाही, त्यामुळे शेतातील पीक नष्ट झाले व तक्रारदारास नुकसान सहन करावे लागले. परिणामी दिनांक 22/5/2010 रोजी तक्रारदाराने पंचनामा केला, ज्यामध्ये रुपये 50,000/- चे पीक नष्ट झाल्याचे स्पष्ट नमूद आहे. म्हणुन पुढे त्यांनी ही तक्रार मंचासमक्ष दाखल केली आणि तीद्वारे रुपये 50,000/- नुकसान भरपाई मिळावी आणि रुपये 3,000/- तक्रारीच्या खर्चाबाबत मिळावे अशा मागण्या केलेल्या आहेत. सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना मंचाद्वारे नोटीस बजाविण्यात आली, त्यावरुन हजर होऊन त्यांनी आपला लेखी जबाब मंचासमक्ष दाखल केला आहे. गैरअर्जदार यंनी तक्रारदाराने त्यांचेविरुध्द केलेली सर्व विपरीत विधाने नाकबूल केली. आणि असे नमूद केले की, त्यांनी तक्रारदाराच्या तक्रारींची दखल घेऊन त्याचे शेतातील विद्युत मोटार चालू करण्याकरीता प्रयत्न केले, मात्र तक्रारदारानेच या प्रकरणी गैरअर्जदारास सहकार्य केले नाही. यास्तव सदर तक्रार खारीज करावी असा उजर घेतला. तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली असून, सोबत 7/12 चा उतारा, विजेचे बिल, खताचे बिल, ट्रॅक्टरचे बिल, पालक, फुलकोबी इत्यादिची बिले, नोटीस, पोचपावती, पंचनामा इत्यादी दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केले आहेत. गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी उत्तर प्रतिज्ञालेखावर दाखल केले, मात्र अन्य कोणताही दस्तऐवज सादर केला नाही. युक्तीवादाचे वेळी सदर प्रकरणात तक्रारदार व गैरअर्जदार यांचेपैकी कोणीही उपस्थित नव्हते. यातील दाखल दस्तऐवजांवरुन तक्रारदाराकडे शेती आहे व गैरअर्जदार यांचेकडून विद्युत पुरवठा करण्यात आलेला आहे ही बाब स्पष्ट आहे. तक्रारदाराचे निवेदन असे आहे की, त्यांनी 0.28 हे.आर. शेतजमिनीमध्ये भाजीपाल्याचे पीक लावलेले होते. विद्युत पुरवठ्याचे अभावी त्याला योग्य ते पीक घेता आले नाही. त्यांनी विद्युत पुरवठा सुरु करण्याबाबत अनेकदा गैरअर्जदार यांचेकडे तक्रारी केल्या, मात्र गैरअर्जदाराने विद्युत पुरवठा सुरु केला नाही. त्यामुळे त्याच्या भाजीपाल्याच्या पिकांचे नुकसान झाले. याउलट गैरअर्जदाराचे म्हणणे की, ते तक्रारदाराचा विद्युत पुरवठा सुरु करण्याबाबत तक्रारदारास सहकार्य करायला तयार होते, मात्र तक्रारदाराने त्यांना कोणतेही सहकार्य केले नाही. त्यामुळे तक्रारदारावर ही जबाबदारी येते. मात्र त्यांनी तसे केले ही बाब सिध्द करणे गरजेचे आहे. कोण कर्मचारी केंव्हा विज पुरवठा दुरुस्ती करण्यासाठी गेला व त्यास तक्रारदाराने सहकार्य केले नाही याचा प्रतिज्ञालेखही दाखल केला नाही. तक्रारदाराने यासंबंधात दिनांक 25/5/2010 रोजी तक्रारदाराचे शेतातील लाईन बंद आहे अशी तक्रार नोटीसद्वारे नोंदविली, गैरअर्जदार यांना सदर नोटीस प्राप्त झाल्याची पोचपावती दाखल आहे, मात्र गैरअर्जदाराने यासंबंधात कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही आणि नोटीसचे उत्तर न दिल्यामुळे तक्रारदाराचे आरोप अर्थातच त्यांनी मान्य केले आहेत. तक्रारदाराचे शेतात विविध पिके लावली असल्याचे नमूद केले असले तरी त्यांनी केवळ पालक व चवळीचे बियाने दिनांक 17/3/2010 रोजी विकत घेतल्याचे दिसते. तक्रारदाराने इतर प्रकारची बियाणे लावल्याचा उल्लेख केलेला आहे ही बियाणे उन्हाळी हंगामात लावण्याचे कोणतेही प्रयोजन दिसत नाही. कारण ती जुलै महिन्यात खरेदी केली. गैरअर्जदार यांनी विद्युत पुरवठा चालू केलेला नसल्यामुळे तक्रारदाराचे पीक नष्ट झाले यास्तव पंचनामा करुन त्यांनी रुपये 50,000/- ची मागणी केलेली आहे, मात्र त्यांची ही मागणी अवास्तव आहे. तक्रारदाराने नुकसानीबाबत आपली तक्रार कृषी अधिकारी यांचेकडे करणे गरजेचे होते, त्यांनी केवळ स्थानिक लोकांजवळून पंचनामा केला तो विश्वसनिय नाही, मात्र गैरअर्जदाराने विद्युत पुरवठा चालू न केल्यामुळे आंशिक रित्या का हाईना तक्रारदाराचे नुकसान झालेले आहे हे उघड आहे. आणि ही गैरअर्जदाराचे सेवेतील त्रुटी आहे असे आमचे मत आहे. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. -/// अं ती म आ दे श ///- 1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदाराने तक्रारदारास नुकसानीदाखल रुपये 5,000/- आणि तक्रारीचे खर्चाबाबत रुपये 1,000/- याप्रमाणे एकूण रुपये 6,000/- (रुपये सहा हजर केवळ) एवढी रक्कम द्यावी. 3) गैरअर्जदाराने तक्रारदाराचा विद्युत पुरवठा सदर आदेश प्राप्त झाल्यानंतर लगेच चालू करावा. 4) गैरअर्जदार यांनी उपरोक्त आदेशाचे पालन त्यांना आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनाकांपासून 30 दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yangal] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER | |