निकाल (घोषित द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्यक्ष) वीज वितरण कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्याने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून ग्राहक क्रमांक 506510204779 द्वारे वीज जोडणी घेतलेली असुन वीज वितरण कंपनीने नेहमीच अंदाजाने जास्तीची देयके दिली म्हणून त्याने वीज वितरण कंपनीकडे देयकाबाबत तक्रार केली असता वीज वितरण कंपनीने त्याचेकडील जुने मीटर काढून घेतले व त्या ठिकाणी नवीन मीटर बसवून रक्कम रु 59680/- चे अतिरिक्त व अवाजवी देयक दिले. वीज वितरण कंपनीने दिलेले सदर देयक चुकीचे असुन सदर देयक रद्द करावे अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. वीज वितरण कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. वीज वितरण कंपनीचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने केलेले सर्व आरोप खोटे असुन तक्रारदाराला देण्यात आलेली देयके योग्य आहेत. तक्रारदाराला देयक दुरुस्त करुन व व्याज कमी करुन योग्य देण्यात आलेले असून त्यास जास्त रकमेची देयके दिलेली नाहीत. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी वीज वितरण कंपनीने केली आहे. दोनही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तरे 1. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला अवाजवी व होय. चुकीचे देयक देऊन त्रुटीची सेवा दिली आहे काय? 2. आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्दा क्र 1 :- तक्रारदाराने स्वत: युक्तीवद केला. वीज वितरण कंपनीच्या वतीने अड आर.टी.दुसाने यांनी बाजू मांडली. तक्रारदाराला वीज वितरण कंपनीने दिलेले जुने मीटर क्रमांक 01281026 हे दिनांक 3/9/2007 रोजी बदलण्यात आले. सदर मीटर बदलले त्यावेळी तक्रारदार हजर नव्हता असे मीटर बदली अहवालावरुन दिसुन येते. मीटर बदलण्यापूर्वी तक्रारदाराचा वीज वापर दरमहा साधारणपणे 32 ते 51 युनीटच्या दरम्यान होता. तक्रारदाराच्या जुन्या मीटरमधील जुलै 2007 मधील सुरुवातीची रिडींग 1250 व शेवटची रिडींग 1290 अशी होती ही बाब सीपीएल निशानी 25 वरुन दिसुन येते. त्यानंतर ऑगष्ट 2007 मध्ये सुरुवातीची रिडींग 1290 अशी नोंदविली, नंतर चालू रिडींग 1166 अशी नोंदविण्यात आल्यामुळे सदर महिन्यात तक्रारदाराला मीटर फॉल्टी दर्शवून 54 युनीटचे सरासरीवर आधारित देयक देण्यात आले. त्यानंतर सप्टेबर 2007 मध्ये देखील सुरुवातीची रिडींग 1290 व चालू रिडींग 1166 अशी दर्शवून 54 युनीटचेच देयक देण्यात आले. त्यानंतर ऑक्टोबर 2007 मध्ये मागील रिडींग व चालू रिडींग 1166 अशीच दर्शवून 54 युनीटचे देयक देण्यात आले. नोव्हेंबर 2007 मध्ये मागील रिडींग 1166 व चालू रिडींग 665 अशी दर्शविण्यात आली व पुन्हा 54 युनीटचेच देयक देण्यात आले. त्यानंतर डिसेंबर 2007 मध्ये देखील मागील रिडींग 1166 व चालू रिडींग 665 अशीच दर्शविण्यात आली. तक्रारदाराचे मीटर जर दिनांक 3/9/2007 रोजी बदललेले होते तर ऑक्टोबर 2007 ते डिसेंबर 2007 या कालावधीत नवीन मीटर मधील रिडींग नुसार देयके का देण्यात आली नाही याचा खुलासा वीज वितरण कंपनीने केला नाही. तसेच मार्च 2008 मध्ये 10999 युनीटचे समायोजन कशामुळे करण्यात आले याचा देखील खुलासा वीज वितरण कंपनीने केलेला नाही. तक्रारदाराचे जुने मीटर बदलले त्यावेळी त्याच्या जुन्या मीटरमधील रिडींग 11664 अशी होती हे वीज वितरण कंपनीने मीटर बदली अहवालात नमुद केले आहे. परंतु सदर रिडींग संशयास्पद असून मीटर बदलल्यानंतरही वीज वितरण कंपनीने ऑक्टोबर 2007 ते डिसेंबर 2007 या कालावधीत वेळोवेळी तक्रारदाराच्या मीटरमधील रिडींग नोंदविली होती. यावरुन सप्टेबर 2007 मध्ये तक्रारदाराचे मीटर बदलल्याची बाब संशयास्पद वाटते व मीटर बदलताना मीटर मधील रिडींग 11664 असल्याचे देखील पटण्यासारखे नाही. वीज वितरण कंपनीने तक्रारदाराचे मीटर दिनांक 3/9/2007 रोजी त्याच्या उपस्थितीत किंवा त्याच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत बदलले नव्हते त्यामुळे मीटर बदलत असताना मीटर मधील रिडींग 11664 अशी होती ही बाब संशयास्पद ठरते. तसेच दिनांक 3/9/2007 रोजी तक्रारदाराचे ज्या अधिका-याने मिटर बदलले त्याचे शपथपत्र किंवा त्याची साक्ष वीज वितरण कंपनीने दिलेली नाही. तसेच ऑक्टोबर 2007 ते डिसेंबर 2007 या कालावधीत ज्या लाईनमनने तक्रारदाराच्या मीटरमधील रिडींग नोंदविली त्याने मीटरमधील रिडींग 1166 किंवा 665 अशी का नोंदविली याचा खुलासा वीज वितरण कंपनीने केला नाही व संबंधित लाईनमनची साक्ष मंचासमोर नोंदविली नाही. त्यामुळे दिनांक 3/9/2007 रोजी मीअर बदलत असताना त्याच्या जून्या मीटरमधील रिडींग 11664 होती हे म्हणणे संशयास्पद वाटते व त्यामुळे स्विकारार्य ठरत नाही व त्यामुळे वीज वितरण कंपनीने जुन्या मीटर मधील साचलेली रिडींग ग्राहय धरुन साचलेले युनीट 10999 बद्दल तक्रारदाराला देयक देणे योग्य ठरत नाही. वीज वितरण कंपनीने तक्रारदाराचे मीटर बदलत असताना योगय व व्यवस्थित रिडींग नोंदवून देयक देणे आवश्यक होते. वीज वितरण कंपनीने दिनांक 3/9/2007 रोजी तक्रारदाराचे मीटर बदलल्याबाबत जो मीटर बदली अहवाल नि 11 सर सादर केला आहे तो आणखी एका कारणामुळे संशयास्पद व खोटा असल्याचे दिसते. सदर मीटर बदली अहवाल नि 11 वर कोणतीही तारीख नाही तसेच वीज वितरण कंपनीने सादर केलेली कार्यालयीन टिपणी दिनांक 14/8/2008 नि 17 मध्ये तक्रारदाराचे मीटर डिसेंबर 2007 मध्ये बदलल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे दिनांक 3/9/2007 रोजी तक्रारदाराचे मीटर बदलल्याबाबतचा अहवाल खोटा असल्याचेच सिध्द होते व म्हणून त्या अहवालात तक्रारदाराच्या जुन्या मीटरमध्ये 11664 अशी दर्शविलेली रिडींग देखील खोटी व चुकीची असल्याचेच सिध्द होते. म्हणून अशा चुकीच्या रिडींगआधारे तक्रारदाराला 10999 युनीटचे अतिरिक्त देयक देण्याचा वीज वितरण कंपनीला काहीही अधिकार नसुन वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला निश्चितपणे चुकीची व अवाजवी देयके देऊन त्रुटीची सेवा दिलेली आहे म्हणून मुद्दा क्र 1 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात आले. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
- गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला (ग्राहक क्रमांक 506510204779) मार्च 2008 मध्ये 12453 युनीट वीज वापराबद्दल दिलेले रक्कम रु 79893.58 चे देयक 10999 युनीटच्या हद्दीपर्यंत रद्द करण्यात येते. सदर 10999 युनीटच्या अनुषंगाने वीज वितरण कंपनीने पुढील देयकामध्ये दर्शविलेली थकबाकी व त्यावरील व्याज देखील रद्द करण्यात येते व वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला मार्च 2008 पासुन नवीन मीटर मधील प्रत्यक्ष मीटर रिडींग नुसारच सुधारित देयके योग्य स्लॅब बेनिफीटसह निकाल कळाल्यापासून एक महिन्याच्या आत द्यावेत.
- गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला त्रुटीच्या सेवेबद्दल नुकसान भरपाई म्हणून रु 2,000/- , मानसिक त्रासापोटी रु 2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु 1,000/- असे एकुण रु 5,000/- निकाल कळाल्यापासून एक महिन्याच्या आत द्यावेत किंवा सदर रक्कम त्याच्या सुधारित देयकामध्ये समायोजित करावी.
- संबंधिताना आदेश कळविण्यात यावा.
(श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री डी.एस. देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |