जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 100/2012 तक्रार दाखल तारीख – 26/06/2012
निकाल तारीख - 14/05/2015
कालावधी - 02 वर्ष , 10 म. 18 दिवस.
श्री बालासाहेब बळीराम डोलारे,
वय – 35 वर्षे, धंदा – शेती,
रा. टाकळगांव ता. जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
- मा. कनिष्ठ अभियंता,
म.रा.वि.वि.कंपनी गाधवड,
ता. जि. लातुर.
- मा. कार्यकारी अभियंता,
म.रा.वि.वि.कंपनी मुरुड,
ता. जि. लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. एम.के.मांडे.
गैरअर्जदारातर्फे :- अॅड. के.जी.साखरे.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हा मौजे टाकळगाव ता. जि. लातुर येथील रहिवाशी असून त्याचा शेती व्यवसाय आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे ग्राहकांना वीज पुरवठा करतात तक्रारदाराची मौजे टाकळगाव व मौजे तांदुळजा येथे वडीलोपार्जीत शेती आहे. तक्रारदाराचे वडील बळीराम डोलारे हे हिंदु एकत्र कुटुंबाचे प्रमुख आहेत. त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडुन 5 एच.पी चे विदयुत कनेक्शन तक्रारदाराच्या वडीलांना दिलेले आहे. त्याचा ग्राहक क्र. 611030036009 असा आहे. मौजे तांदुळजा येथील शेतात तक्रारदाराने ऊस लागवड केली आहे. गट क्र. 227 मधुन गैरअर्जदार क्र. 1 व 2 ची विदयुत वाहीनी दक्षिणोत्तर गेलेली आहे. सदर विदयुत वाहीनीच्या तारामध्ये झोळ पडुन तारांचा एकमेकांना स्पर्श होवून सतत शॉर्टसर्कीट होवून ठिणग्या तक्रारदाराच्या ऊसाच्या पीकामध्ये पडत असल्याबाबत तक्रारदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांना वेळोवेळी सुचना दिली होती. परंतु तक्रारदाराच्या तक्रारीस दाद दिली नाही. डिसेंबर 2011 मध्ये तक्रारदाराचा ऊस कारखान्यामध्ये गाळपाकरीता पाठविण्यासाठी परिपक्व झालेला होता. दि. 05/12/2011 रोजी चार वाजता सदर तारामध्ये एकमेकांना स्पर्श होवून, घर्षण होवून तक्रारदाराचा दोन एकर ऊस व सदर ऊसामध्ये असलेले ठिंबक सिंचनाचे पाईप व इतर साहित्य जळाले. तक्रारदाराचे दोन एकर ऊस जळून पुर्ण नुकसान झाले. त्यासाठी तक्रारदाराने अग्निशामक दलाची गाडी मोक्यावर बोलावणेवरुन आली होती.
सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन मुरुड तलाठी यांना दिली पोलीस स्टेशन मुरुड यांनी दि. 06/12/2011 रोजी एस.डी.ओ नं. 340/11 अन्वये घटनास्थळाचा पंचनामा केला. तक्रारदाराच्या ऊसाचे नुकसान रु. 2,40,000/- तर ठिबक सिंचनाचे 40,000/- नुकसान झाले. म्हणून गैरअर्जदार नं. 1 व 2 च्या निष्काळजीपणामुळे अर्जदाराला शेतीचे येणारे उत्पन्न याचा लाभ मिळाला नाही. म्हणून गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी ग्राहकांना दयावयाच्या सेवेतील त्रुटी केलेली आहे. म्हणून त्यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या रु. 2,40,000/- ऊस जळीताचे दयावेत. ठिबक सिंचनाच्या साहित्याची रु. 40,000/- दयावेत मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु. 20,000/- व तक्रारीचा खर्च रु. 5,000/- दयावेत रु. 2,80,000/- घटनेच्या दिवसापासुन 18 टक्के व्याजाने दयावेत.
तक्रारदाराने तक्रारी सोबत गैरअर्जदार क्र. 1 यांना घटनेची दिलेली माहिती लेखी अर्ज, तलाठी सज्जा तांदुळजा यांनी घटनास्थळाचा केलेला पंचनामा, पोलीस स्टेशन मुरुड यांनी केलेला घटनास्थळाचा पंचनामा, घटनास्थळाचे फोटो एकुण सात, फोटो बील, तक्रारदाराचा 7/12 चा गट क्र. 227 चा उतारा, तक्रारदाराचे वडीलाचे नावे असलेले विदयुत बील, तक्रारदाराने गैरअर्जदाराना विधीज्ञामार्फत पाठविलेली नोटीस, गैरअर्जदाराना पोस्ट केलेली नोटीसच्या पावत्या इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आपल्या म्हणण्यात असे दिले आहे की अर्जदाराचा अर्ज चुकीचा असून दि. 25/10/2013 रोजी अर्जदाराच्या शेतात अशा प्रकारची काही घटना घडलेली नाही. व जे इलेक्ट्रीक बिल दिलेले आहे ते दि. 25/10/2013 चे मौजे टाकळगाव येथील आहे ग्राहक क्र; 611030036009 असा आहे. अर्जदाराचा ऊस वीजांच्या दोन लाईनीमध्ये झोळ आल्यामुळे स्पार्कींग होवून त्याच्या शेतातील ऊस जळालेला आहे. तसेच तक्रारदार हा विज थकबाकीदार आहे. त्याने कधीही विजेच्या बिलाची भरणा केलेली नाही. अर्जदाराने नोव्हेंबर 2010 मध्ये गट क्र. 227 मध्ये ऊस दोन एकर मौजे तांदुळजा येथे उभारलेले आहे. म्हणून विज कंपनीने सदरचे पोल जे भारतीय वीज कायदयाच्या अनुसरुन योग्य ठिकाणी उभारलेले असल्यामुळे अशा प्रकारच्या विजेच्या तारांचा झोळ येणे शक्य नाही. दि. 05/12/2011 रोजी दुपारी 4 वाजता मोठे वादळ आलेले नाही, किंवा पाऊसही पडलेला नाही. त्यामुळे तारेमध्ये घर्षण होवून अग्नि निर्माण होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. म्हणून तक्रारदाराची केस फेटाळण्यात यावी.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक नाही. अर्जदाराने जे वीज बील दिलेले आहे ते विज बील टाकळगाव येथील अर्जदाराच्या वडिलांच्या नावे असलेले 5 H.P ग्राहक क्र. 611030036009 असा टाकळगावचा बळीराम डोलारे याच्या नावचा आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असे असून अर्जदाराची जमीन गट क्र. 227 तांदुळजा ता व जि; लातुर येथील असुन, त्यास 81 आर एवढी शेतजमीन आहे. व अर्जदाराचे शेतात दि. 05/12/2011 रोजी दुपारी 4 वाजता सुमारास शेतातुन गेलेल्या लाईनचे तारेचे शॉर्टसर्किट होवून जळीत झाले आहे. त्यामध्ये ठिबक सिंचन रु. 40,000/- व ऊसाचे रु. 2,40,000/- नुकसान झाले आहे. अर्जदाराने तहसीलदाराचा पंचनामा जोडलेला असून सदर पंचनाम्यानुसार तहसील कार्यालय लातुरचा शिक्का आहे. त्यातील पंचनाम्यानुसार अर्जदाराचे ठिबक सिंचनाचे रु. 40,000/- व ऊस दोन एकर जळाला त्याचे रु. 2,40,000/- असे एकुण रु. 2,80,000/- चे नुकसान झाल्याचे पंचनामा सांगतो त्यावर पंचाच्या सहया आहेत. पोलीस पंचनाम्यानुसार पोलीस स्टेशन मुरुड यांनी तांदुळजा शिवारात गट क्र. 227 ची पाहणीसाठी गेले असता बाळासाहेब बळीराम डोलारे रा. टाकळगाव येथील आहे. मग तांदुळजा शिवारातील ऊस जळालेला आहे. सदरची घटना तांदुळजा शिवारातील व विज बील टाकळगावचे आहे. तांदुळजा व टाकळगावचे अंतर दोन किलोमीटरचे असून शेतीचे शिवार अर्जदाराचे तांदुळजा व त्यांच्या वडिलांचे टाकळगावचे गट क्र. 227 मध्ये काही जास्त अंतर नसल्यामुळे व टाकळगावला राहणारे त्यांचे वडिल श्री बळी बाबा डोलारे यांचे लगतचे व तांदुळजा शिवारालगतच सदर MSEB चे पोल गेलेले आहेत. तसेच सदरच्या शेतामध्ये सर्व्हीस वायर शेतामध्ये पडलेले दिसुन येत आहे. तसेच अर्जदाराच्या शेतातील गाळपाला आलेल्या ऊसाला आग लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे अर्जदाराच्या ऊसाला आग लागल्यामुळे अर्जदाराचा ऊस जळाला आहे. तसेच पोलीसांच्या घटनास्थळ पंचनाम्यावर दि. 05/12/2011 रोजी दुपारी 4.00 वाजण्याच्या सुमारास शेतातुन गेलेल्या विजेच्या तारेचे एकमेकास स्पर्श झाल्याने शॉर्टसर्किट होवून ठिणगी पडून ऊस पेटला ऊसास व ऊसास गेलेले ठिबक सिंचनाचे पाईपच्या नळया जळुन अंदाजे 60 आर ऊस जळून रु. 1,50,000/- (दिड लाख रुपयाचे) नुकसान झालेले आहे. तसेच तांदुळजा शिवारात गट क्र. 227 ऊसाचे पिकातुन मध्यभागातून म.रा.वि.वि कंपनीची 3 फेजची लाईन दक्षिण उत्तर गेलेली आहे. सदर घटनास्थळ पाहता अर्जदाराचे शेत हे तांदुळजाते रांजणी जाणारा डांबरी रस्ता व दोन्ही बाजुने नाना डोलारे यांचे शेत दिसुन येत आहे. तसेच फोटोग्राफ दाखल असून त्यात MSEB चे Service पाय शेतात खाली पडलेले दिसुन येत आहे. तसेच फोटोग्राफ परिस्थितीवरुन तक्रारदाराचे ऊस जळाल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र अर्जदाराचे वडील हे गैरअर्जदार क्र. 1 व 2 चा ग्राहक होतात तो झालेल्या नुकसान भरपाईस पात्र आहे. अर्जदार व त्यांचे वडिल यांचे शिवार जवळ जवळ आहे आपल्या शेतातील विज बिल दिले. म्हणून त्यांच्या वडिलांचे विज बिल दिले आहे. तसेच अर्जदाराचे पीक जळाल्याचे सिध्द होत असल्यामुळे, अर्जदारास 60 आरमध्ये, 60 टन ऊस झाला असता मात्र त्याचा ऊस पुर्णत: जळालेला दिसत नसल्यामुळे आणि त्याचा ऊस साखर कारखान्याला पाठवण्यासारखा दिसत आहे. तसेच त्याचे ऊसाचे पीक अंशत: फोटोवरुन जळालेले दिसत आहे. यावरुन रु. 20,000/- अर्जदारास देण्यात येते. तसेच ठिबक सिंचनाच्या साहित्याचे रु. 10,000/- व मानसिक, शारिरीक त्रासापोटी रु. 3,000/- व तक्रारीचा खर्च रु. 3,000/- देण्यात येतो.
.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रु. 20,000/-(अक्षरी
वीस हजार रुपये फक्त) व ठिबक सिंचनाच्या साहित्याचे रु. 10,000/- (अक्षरी
दहा हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात
यावेत.
3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत
न केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देण्यास
जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 3,000/- (अक्षरी तीन हजार रुपये फक्त)व तक्रारीच्या खर्चापोटी
रु. 3,000/-(अक्षरी तीन हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.