जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 158/2007 प्रकरण दाखल तारीख - 27/06/2007 प्रकरण निकाल तारीख – 19/09/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य बालाजी पि.महादजी शिंदे, वय वर्षे 65, व्यवसाय शेती, अर्जदार. रा.शेणी, ता.अर्धापुर जि.नांदेड. विरुध्द. 1. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि, मार्फत – कनिष्ठ अभियंता, शाखा क्र.1 व 2, गैरअर्जदार. अर्धापुर विभाग,ता.अर्धापुर जि.नांदेड. 2. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि, मार्फत – कार्यकारी अभियंता, नांदेड विभाग, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.रघुविर कुळकर्णी. गैरअर्जदार 1 ते 2 - अड. व्हि.व्हि.नांदेडकर. निकालपञ (द्वारा-मा.श्री.सतीश सामते,सदस्य) अर्जदार बालाजी पि.महादजी शिंदे यांची गैरअर्जदाराकडुन सेवेत त्रुटी झाल्याच्या आरोपावरुन नुकसान भरपाई रक्कम रु.1,50,000/- लागवडीचा खर्च रु.10,000/- व दावा खर्च रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे. अर्जदार यांची अर्धापुर येथे गट क्र.88 व 89 मध्ये शेत जमीन आहे व सदर शेत जमीन मध्ये अर्जदाराने सन 2006-07 या वर्षात गट क्र.88 मध्ये क्षेत्रफळ 20 आर व गट क्र. 89 मध्ये 40 आर क्षेत्रफळ एवढे ऊसाचे पिक घेतले. अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन कृषी पंपासाठी विद्युत पुरवठा घेतला आहे व ते त्यांचे ग्राहक आहेत. दि.09/05/2007 रोजी दुपारी 5.30 वाजता गट क्र.89 मधील शेतातील विद्युत डि.पी. ते खांब यांच्यावरील लुज वायराचे वा-याच्या झोताने घर्षण होऊन ठीणग्या उडाल्या व अर्जदाराचे 40 आर ऊस आगीत जळाला. तसेच दि.10/05/2007 रोजी दुपारी 3.00 च्या सुमारास गैरअर्जदाराचा लाईनमन गट क्र.89 मधील विद्युत डि.पी.वर फयुज बसवत असतांना शॉर्ट सर्कीटमुळे लाईनमन समक्ष वायरवर आगीच्या ठीणग्या उडाल्या व त्यात गट क्र.89 लगतचा गट क्र.88 मधील 20 आर क्षेत्रावरील ऊस जळाला. गैरअर्जदारावर डि.पी.व खांब तसेच त्यांचे वायर तांत्रिक दृष्टया योग्य आहेत किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी आहे व अर्जदाराने डि.पी. व खांबावरील वायर लुज असल्याबद्यलची सुचना गैरअर्जदारास दिली होती. परंतु गैरअर्जदाराने त्याकडे दुर्लक्ष केले व त्यामुळे अर्जदाराचा 60 आर व 20 आर क्षेत्रफळातील ऊस जळाला आहे व सदर ऊसाचा पंचनामा महसुल व पोलीस विभागाने केला आहे. ऊस जळाल्यामुळे अर्जदारास अपेक्षित असलेले उत्पन्न रु.1,50,000/- चे नुकसान झाले आहे. अर्जदाराचा ऊस हा गैरअर्जदारांच्या निष्काळजीपणामुळे जळाला आहे व अर्जदाराने गैरअर्जदाराकडे वेळोवेळी नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु सदरील मागणीची पुर्तता गैरअर्जदाराने केलेली नाही. अर्जदाराचे संपुर्ण कुटूंब शेतीवर अवलंबुन आहे. वरील सर्व परिस्थितीचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन अर्जदाराची तक्रार मान्य करण्यात यावी. गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले, त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराची तक्रार ही काल्पनिक मुद्यावर आधारीत असुन त्यांनी अवास्तव रक्कमेची खोटी कार्यवाही केली म्हणुन ती खारीज होण्या योग्यतेची आहे. अर्जदाराने ज्या क्षेत्रफळातील त्यांचे तथाकथीत ऊसाचे पिक जळाल्याचे आरोप केले आहेत. गट क्र.88 व 89 यात 2 व 3 मालक आहेत. अर्जदाराने सन 2006-07 या हंगामाचे गट क्र.88 मध्ये 20 आर व गट क्र.89 मध्ये 40 आर क्षेत्रफळामध्ये ऊस पिक घेतले होते, ही बाब खोटी आहे. दि.09/05/2007 रोजी दुपारी 5.30 वाजता कोणत्याही वेळेस गट क्र.89 मधील अथवा अन्य कोणत्याही शेतातील विद्युत डी.पी. ते खांब यांचेवरील लुज वायरचे वा-याचे झोताने घर्षण होऊन ठीणग्या पडले व अर्जदाराचे 40 आर ऊस जळालेला आहे तसेच दि.10/05/2007 रोजी दुपारी 3.00 च्या सुमारास गैरअर्जदाराचे लाईनमन हा गट क्र. 89 मधील विद्युत डि.पी. वरील फयुज बसवत असतांना शॉर्ट सर्कीटमुळे लाईनमन समक्ष आगीचे ठीणग्या पडुन गट क्र.88 मध्ये 20 आर क्षेत्रातील ऊस जळालेले आहे हे म्हणणे खोटे आहे. अर्थात अर्जदाराच्या स्वतःच्या कागदपत्रावरुन सिध्द होते. दि.11/05/2007 रोजी फक्त एकाचा शेताबाबतचे आहे. अर्जदाराने डि.पी. व खांबावरील वायर लुज असल्याची सुचना गैरअर्जदारास दिली होती, त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही, हे त्यांचे म्हणणे खोटे आहे. जळालेल्या ऊसाचा महसुल खात्याने व पोलिस खात्याने केलेला पंचनामा गैरअर्जदारास मान्य नाही. पोलिसांचा पंचनामा हा केवळ गट क्र.89 बाबतचा आहे. त्यात गट क्र.88 चा उल्लेख नाही. इतकेच नव्हे तर अर्जदार यांच्या अर्जात देखील केवळ एकाच शेताचा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे अर्जदाराची दुस-या कोणत्याही शेताचे नुकसान झालेले नाही. अर्जदाराच्या शेतातील ऊस हा गैरअर्जदाराच्या निष्काळजीपणामुळे जळाला नाही. अर्जदाराने रु.1,50,000/- एवढया ऊसाचे नुकसान झाले हे त्यांचे म्हणणे खोटे आहे. अर्जदाराने ऊसाचे उत्पन्नाची रक्कम उकळण्यासाठी प्रकरण दाखल केले आहे त्यात गैरअर्जदारांचा दोष नाही त्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे. अर्जदाराने पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदारांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईन तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडुन सेवेत त्रुटी झाल्याचे सिध्द करतात काय? होय. 2. काय आदेश.? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1. अर्जदाराने त्यांचे अर्धापुर येथील शेत जमीन गट क्र.88 व 89 मध्ये अनुक्रमे 20 आर 40 आर 2006-07 या हंगामासाठी ऊसाचे लागवड केली होती याबद्यल त्यांनी पुरावा म्हणुन शेताचा 7/12 दाखल केलेला आहे. गट क्र.88 मध्ये अर्जदाराच्या नांवे एक हेक्टर 49 आर एवढे शेत जमीन आहे व ऊसाचा पेरा 60 आर मध्ये दाखविण्यात आलेला आहे, असे असतांना अर्जदाराने आपल्या तक्रारअर्जात ऊसाचा पेरा 20 आर म्हटले आहे. तसेच गट क्र.89 मध्ये अर्जदाराच्या नांवे एक हेक्टर 01 आर जमीन आहे यात ऊसाचा पेरा 80 आर दाखविण्यात आले आहे परंतु अर्जदाराने आपल्या तक्रारअर्जात 40 आर पेरा केल्याचे म्हणतात. म्हणुन अर्जदाराच्या तक्रार अर्जाप्रमाणे क्षेत्रफळ लक्षात घ्यावे. गैरअर्जदार दि.08/10/2008 च्या निकालपत्रात एकतर्फा दाखविलेला आहे व गैरअर्जदारांना त्या वेळेस देखील नोटीस प्राप्त झाली त्यांना म्हणणे देण्याची संधी असतांना ते हजर झाले नव्हते व आपले म्हणणे दिले नव्हते म्हणुन अर्जदाराने दाखल केलेल्या पंचनामाप्रमणे त्यांना ऊस जळालेल्या नुकसानीबद्यल रक्कम देण्यात आली होती. यानंतर गैरअर्जदार हे अपीलामध्ये गेले व मा.राज्य आयोग यांच्या आदेशाप्रमाणे गैरअर्जदारांना परत म्हणणे देण्याची संधी देण्यात येते व प्रकरण परत चालविण्यात यावे. या आदेशा प्रमाणे गैरअर्जदार हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दिले, यात त्यांनी अर्जदाराने दि.10/05/2007 च्या तहसिदार व पोलिस निरीक्षक यांना लिहीलेली तक्रारअर्ज दाखल केलेली आहे. यात त्यांनी गट क्र.89 मध्ये 40 आर ऊस जळाला, आग ही 5.45 व 6.00 च्या दरम्यान लागली व रु.1,50,00/- चे नुकसान झालेले आहे, असे म्हटलेले आहे. यावर गैरअर्जदाराने आपल्या लेखी म्हणण्यात आक्षेप घेऊन या अर्जात फक्त गट क्र.89 चा विचार व्हावा कारण अर्जदाराने गट क्र.88 चा उल्लेख केलेला नाही असे म्हटलेले आहे. परंतु गैरअर्जदार कंपनीस लिहीलेल्या तक्रारअर्जात अर्जदाराने गट क्र.88 व 89 या दोन्ही गटाचा उल्लेख केलेला आहे. पोलिस पंचनामा यात गट क्र.89 याचा पंचनामा दाखल केलेला आहे व यात 40 आर ऊस जळाल्याचे म्हटले आहे. परंतु दि.11/05/2007 रोजीच्या मंडळ अधिकारी अर्धापुर यांनी जो पंचनामा केलेला आहे, यात गट क्र.88 व 89 मधील ऊस अनुक्रमे दि.09/05/2007 व त्यानंतर दि.10/05/2007 ला आग लागुन ऊस जळाला त्यामुळे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. दि.09/05/2007 ला गट क्र.89 या क्षेत्रफळाला आग लागल्यावर दि.10/05/2007 ला अर्जदारांनी पोलिसांना सुचना दिली याप्रमाणे ऊस जळाल्याचा पंचनामा हा सकाळी करण्यात आला व 10 तारखेला दुपारी आग लागल्यामुळे नंतर त्यांना शेतीचा एकत्रित पंचनामा मंडळ अधिका-यांनी केलेला आहे. त्यामुळे फक्त गट क्र.89 मधीलच ऊस जळाला हे गैरअर्जदाराचा आक्षेप विचारात घेता येणार नाही. यानंतर या प्रकरणांत कारखान्याचे ऊसाचे बिल दाखल करण्यात आलेले आहे ते दि.01/05/2007 ते दि.15/05/2007 रोजी 24 टनाचे आहे व यापुर्वी दि.16/04/2007 ते दि.30/04/2007 या कालावधीत 37.5 मॅट्रीक टन ऊस घातल्याचे म्हटले आहे. अर्जदाराची रक्कम अनुक्रमे रु.20,457/- व रु.31,857/- मिळालेली आहे, हा ऊस ऊस जळालेल्या तारखेच्या आधी घातलेला आहे व अर्जदाराने तक्रारअर्जात ऊसाचा पेरा याचा उल्लेख केलेला आहे म्हणुन त्याच क्षेत्रातील ऊस कारखान्यास गेला व तेवढया ऊसाची रक्कम कमी करावी हा गैरअर्जदाराचा आक्षेप विचारात घेण्या जोगा आहे. विद्युत निरीक्षक यांनी त्यांचा अहवालाद्वारे अशा प्रकारची आग विद्युत तारा लुज असल्या कारणाने घर्षण होऊन लागण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे व दि.10/05/2007 ला गैरअर्जदार यांचे लाईनमन डि.पी.वर काम करत होता व त्या वेळेस लाईनमनच्या समक्ष आग लागली असा देखील उल्लेख अर्जदारानी केला आहे परंतु गैरअर्जदारांनी याचा आक्षेप घेऊन आमचा कोणताही लाईनमन तेथे काम करीत नव्हता असे जरी म्हटले असले तरी त्या दिवशी काम करणारे संबंधीत लाईनमनचे नकार देण्यासाठी पुरावा म्हणुन त्यांचा जबाब व शपथपत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे शॉर्ट सर्किटने आग लागली हे स्पष्ट होते शिवाय कारखानाने दिलेल्या प्रमाणपत्रात अर्जदाराचे नांवे 40 व 80 आर म्हणजे एकंदरीत तीन एकर ऊसाचा पेरा होता, असे प्रमाणपत्र दिलेले आहे. त्यामुळे गैरअर्जदाराचा आक्षेपाप्रमाणे ऊसाचा पेरा नव्हता हे म्हणणे ग्राहय धरले जाऊ शकत नाही. अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन दि.21/12/1987 ला एजी 344 याद्वारे विद्युत पुरवठा घेतलेला आहे. या अनुषंगाने गैरअर्जदार यांचा आक्षेप की, अर्जदार हे त्यांचे ग्राहक नाहीत हे म्हणणे खोटे ठरते. अर्जदाराने रु.1,50,000/- नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. परंतु ऊसाचा क्षेत्र लक्षात घेतले असता, एकरी 112 टन ऊस होईल हे कदापी शक्य नाही. म्हणुन जास्तीत जास्त ऊसाचे उत्पन्न लक्षात घेतले तर ते एकरी 60 टन पेक्षा जास्त होऊ शकत नाही. म्हणुन गट क्र.88 मध्ये 20 आर व एकरी 60 टन उत्पन्न गृहीत धरले असता एकुण उत्पन्न 30 टन होते, त्या वेळेचा भाव रु.850/- याप्रमाणे एकुण रु.25,500/- होतात. गट क्र. 89 मध्ये एकरी 60 टन उत्पन्न भरल्यास ते रु.51,000/- चे होते, असे एकुण रु.76,500/- चे उत्पन्न होऊ शकले असते परंतु याच कालावधीत त्याच क्षेत्रातातुन दि.16/04/2007 ते दि.30/04/2007 या दरम्यान 37.5 टन म्हणजेच रु.31,857/- व दि.01/05/2007 ते दि.15/05/2007 या कालावधीत 24 टन म्हणजेच रु.20,457/- हे ऊस घालण्याच्या आधी व नंतर एवढे ऊस कारखान्यास घातलेला आहे म्हणजे रु.52,314/- एवढे ऊस गेलेला आहे . एकुण उत्पन्न रु.76,500/- यातुन रु.52,300/- वजा केल्यास उरलेली रक्कम रु.24,200/- एवढया रक्कमेचे अर्जदाराचे नुकसान झाले हे सिध्द होते. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्या पासुन 30 दिवसांच्या आंत अर्जदार यांना ऊसाच्या नुकसानीबद्यल रु.24,200/- व त्यावर ऊस जळालेल्या तारीख दि.10/05/2007 पासुन 9 टक्के व्याजाप्रमाणे पुर्ण रक्कम मिळेपर्यंत व्याजासह द्यावे. 3. दावा खर्च म्हणुन रु.2,000/- व मानसिक त्रासाबद्यल रु.5,000/- मंजुर करण्यात येतात. 4. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार. लघूलेखक. |