जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/21 प्रकरण दाखल तारीख - 23/01/2009 प्रकरण निकाल तारीख – 29/04/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य विश्वनाथ बाबाराव हंबर्डे, अर्जदार. वय वर्षे 30, व्यवसाय शेती, रा.जोशी सांगवी, ता.लोहा जि.नांदेड. विरुध्द. 1. मे.जिवन ट्रेडींग कंपनी, गैरअर्जदार. नवा मोंढा,नांदेड. 2. बायर क्रॉपसाईल्स लि, बायर झोन्स, सेंन्ट्रल अव्हेन्यु, हिरानंदानी गार्डन्स,पवई, मुंबई. 400076. अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.व्ही.चौधरी. गैरअर्जदार क्र.1 - अड.नरेंद्र धुत. गैरअर्जदार क्र. 2 - एकतर्फा. निकालपञ (द्वारा-मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार यांच्या सेवेच्या त्रुटीबद्यल अर्जदारांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे. अर्जदार हे जोशी सांगवी ता.लोहा येथे गट क्र.329 मध्ये शेती करतात व 2007 व 08 या साली त्यांनी सोयाबीनचे तीन बॅगाची पेरणी केली व लागवडीचा खर्चही केला व पेरल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, पिकाची उगवण ही योग्य प्रमाणात झाली नाही. दि.10/07/2008 रोजी जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा परीषद नांदेड यांचेकडे तक्रार केली, याची दखल घेवुन दि. 29/07/2008 रोजी कृषी अधिकारी यांनी जाय मोक्यावर जाऊन पिकाची पाहणी केली. याबाबत जेएस-335 लॉट नंबर एन.ओ.व्ही.07-13-3706 याचा पंचनामा केल्यानंतर 30 ते 35 टक्केच सोयाबीनची उगवण झाल्याचा अहवाल दिला ? सदोश बियाणामुळे अर्जदाराचे रु.2,600/- प्रमाणे प्रती क्विंटल याप्रमाणे 30 क्विंटल चे रु.95,000/- अर्जदाराचे नुकसान झाले. गैरअर्जदार यांनी दिलेल्या चुकीच्या सेवेबद्यल व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- देण्यात यावे म्हणुन हा तक्रार अर्ज नोंदविण्यात आला. गैरअर्जदार क्र. 1 हे वकीला मार्फत जर झाले त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केलेला आहे. तक्रार अर्जातील तक्रार त्यांना नाकबुल आहे. अर्जदार हा शेतीचा व्यवसाय करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो, अर्जदार यांनी डोळयाने अंध असल्याचे म्हटले आहे मग कोणाच्या मदतीने शेतीचा व्यवसय करतो ? 2007-08 या साला करीता सोयाबीन पिकाची लागवड केली हे गैरअर्जदारांना अमान्य आहे. पेरणी केल्यानंतर त्याची उगवण झाली नाही ही बाब त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना कळविली हे सुध्दा ते नाकबुल करतात. पंचनामा केला हे सुध्दा नाकबुल केले आहे. घटनास्थळी गैरअर्जदार क्र. 1 यांना हजर राहण्यासंबंधी तोंडी सुचना दिली होती हे सुध्दा अमान्य केले आहे. सदोष बियाण्यामुळे अर्जदाराचे नुकसान झाले ही बाब अमान्य केले आहे. बियाण्याची लागवड केल्यानंतर तेथील वातावरणाचा दर्जा,उपलब्ध हवामान, अंतर्गत मशागत,योग्य खते व किटक नाशक फवारणी याचा योग्य प्रकारे वापर झाला का नाही, ही अनेक कारणे जबाबदार आहेत. पिक न येण्याकरीता बियाणे हा एकमेव घटक जबाबदार नाही. बियाणे महाराष्ट्र राज्य बिज प्रमाणीकरण यंत्रणा यांच्या मार्फत प्रमाणीत केलेले बियाणे आहेत. सदरील बियाणे हे कायदा 1966 च्या विवीध कलमाद्वारे आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पुर्तता केल्यानंतरच व ज्याची देखरेख व शहानीशा करण्याकरीता राज्याचे बियाणे अधिकारी यांच्या निरीक्षणाखाली बियाण्याचे उत्पादन व त्यानंतर त्याचे पॅकिंग त्यांच्याच समोर केले जाते. त्यामुळे बियाण्याचा दर्जा उत्तम असतो व सदरील यंत्रणा शासकिय यंत्रणा असल्यामुळे या प्रकरणामध्ये या यंत्रणेला म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणे प्रमाणीकरण यंत्रण ही आवश्यक पार्टी आहे व त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत प्रकरण चालवीणे हे कायदेशिर नाही. सोयाबिन बियाणे नाजुक बियाणे असते त्यामुळे बॅगेची हाताळणी काळजीपुर्वक करावी लागते. बियाणे हे दि.12/06/2008 रोजी खरेदी केले व बियाण्याची पेरणी दि.28/07/2008 रोजी केले म्हणजे 14 दिवसांनी पेरणी केली. अर्जदाराने 7/12 वर त्यांचे नांवे 1.60 आर शेत जमीन असल्याचे म्हटले आहे. अर्जदाराच्या कथनानुसार तीन एकर क्षेत्रामध्ये लागवड केली असे म्हटले आहे. अर्जदार यांच्या कथनात कागदोपत्री तफावत दिसुन येते. शेतक-याची तक्रार आल्यानंतर पीक पाहणी करीता बियाणे जिल्हा स्तरीय तक्रार निवारण समीती गठीत केलेली आहे, या सात तज्ञांची नेमणुक असते, एका व्यक्तिला अहवाल देण्याचा अधिकार नाही त्यामुळे तो अहवाल गैरअर्जदारास मान्य नाही. सोयाबीनचे बॅग विकत घेतले असता त्यावर ट्रूथफुल व प्रमाणीत व टॅग व शिलबंद केल्यानंतरच विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होते. त्यामुळे सदोष बियाणे विक्री करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. एका लॉट मध्ये 400 बॅगाची निर्मीत झाली. संपुर्ण नांदेड जिल्हयामध्ये बियाण्याची विक्री केली आहे, अर्जदारा व्यतिरिक्त कोणाचीही तक्रार नाही. त्यामुळे अर्जदाराचा तक्रार अर्ज हा दिशाभुल करण्याचा प्रयत्न असुन ते खर्चासह खारीज करण्यात यावे असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांना नोटीस पाठविण्यात आली परंतु ते हजर झाले नाही म्हणुन त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करुन प्रकरण पुढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार क्र. 1 यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थीत होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी अर्जदार सिध्द करतात काय? नाही. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचे बियाणे विक्रीचे बिल क्र.609 दि.12/06/2008 चे ज्यावर लॉट नंबर जेएस 335 एनएसएल तीन बॅग घेतल्याबद्यलची नोंद आहे ते बिल दाखल आहे. यासोबत ट्रूथफुल लेबल क्र.635486 सोयाबिन जेएस335 हे दाखल केले आहे. अर्जदाराने त्यांचे नांवे एक हेक्टर 60 आर जमीन असल्याबद्यलचा गांव नमुना 7 दाखल केलेला आहे. तसेच 2006-07 या वर्षासाठी .40 आर जमीनीत सोयाबीनचा पेरा असल्याबद्यल गांव नमुना 12 हे दाखल केलेले आहे. बियाणे सदोष दर्जाचे असल्या कारणाने जिल्हा कृषी अधिकारीकडे दि.10/07/2008 ला तक्रार अर्ज दिला तो अर्ज या प्रकरणांत दाखल आहे. या अर्जानुसार कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी, पंचायत समीती यांनी तपासणी अहवाल दि.29/07/2008 ला दिला तो दाखल केला आहे. त्यांनी जाय मोक्यावर जाऊन अर्जदाराच्या शेताची पाहणी केली व शेतात तीन बॅग सोयाबीनची पेरणी असुन 30 ते 35 टक्केच उगवण झाली असल्याचे म्हटले आहे. बियाणाची उगवण का? कमी झाली याचे कारण दिलेले नाही, या विषयी बियाणांसोबत तज्ञ व्यक्तीचा अहवाल तेही दिलेले नाही. अर्जदार आपल्या तक्रारअर्जात म्हणतात ते अंध आहेत. याबद्यलचे वैद्यकिय प्रमाणपत्र दाखल केले आहे. अर्जदाराची शेती त्याचे भाऊ करीत असतात असे अर्जदाराचे म्हणणे असेल तर भावाचे शपथपत्र दाखल केलेले नाही. विषय असा आहे की, अर्जदार जर अंध असतील तर त्यांनी हे बियाणे कसे तपासले, बियाणाची लागवड त्यांनी कोणाच्या सहयाने केली कोणाच्या सहायाने शेताची मशागत केली याचा उल्लेख केलेला नाही. शिवाय लॉट क्र.जेएस 335 ची बियाणे हे महाराष्ट्र राज्य बिज प्रमाणीकरण यंत्रणा यांच्या द्वारे प्रमाणीत केलेले आहे. याचेवर त्यांचे ट्रुथफुल प्रमाणपत्र, बॅगेला शिल, टॅग असते व त्यांचे समोरच बियाणे तपासुन बियाणे पॅक केले जाते मग बियाणे सदोश कसे ? यासाठी बिज प्रमाणीकरण यंत्रणा यांना पक्षकार करणे आवश्यक असतांना त्यांना पक्षकार केले नाही. महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रण यांनी मुक्तता अहवाल (रिलीज रिपोर्ट) या लॉटबद्यल दिला आहे तो अहवाल दाखल केला आहे. यावर उगवण शक्ती 80 टक्के असे म्हटले आहे हे तपासणीसाठी तो लॉटमधील बियाणे शासकीय प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठवीणे आवश्यक आहे परंतु अर्जदारा मार्फत अशा प्रकारचे स्पेट घेण्यात आलेले नाही. म्हणुन नक्की हे बियाणे सदोष असल्याबद्यलचा ठोस पुरावा या प्रमाणांत उपलब्ध होऊ शकलेला नाही म्हणुन गैरअर्जदार यांचे सेवेतील त्रुटी सिध्द होऊ शकत नाही. बियाणे उत्पादीत कंपनी नुजीवुड सिड लि एनएसएल अशी नोंद आहे. या प्रकरणांत नुजीवुड सिड कंपनीस पार्टी करण्यात आले नाही. I (2004) C.P.J.161 झुआरी अग्रो केमीकल्स लि विरुध्द पी.मल्ला रेडडी, आंध्र प्रदेश राज्य आयोग यांच्या निवाडयात कंपनी ही जबाबदार असते, असे म्हटले आहे. शिवाय गैरअर्जदाराचा आक्षेपानुसार पंचनामा हा जिल्हा स्तरीय समीतीचा नाही. यात मा. महाराष्ट्र राज्य आयोग, यांनी बागायत शेतकरी सहकारी संस्था विरुध्द बाबु कुटटी डॅनिअल III (2006) C.P.J. 269 यामध्ये स्पष्ट केले की, सात लोकांच्या समीतीने पिकाची पाहणी करुन पंचनामा केला पाहीजे. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज खारीज करण्यात येतो. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |