अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, जळगाव तक्रार क्रमांक 1405/2009 तक्रार दाखल तारीखः- 19/09/2009
तक्रार निकाल तारीखः- 24/09/2013
कालावधी 04 वर्ष 05 दिवस
नि. 19
श्री. सुनिल नथ्थु पाटील , तक्रारदार
उ.व. 42,वर्ष धंदाः मजुरी, (अॅड. हेमंत अ.भंगाळे)
रा. बहाददरपूर ,ता. पारोळा, जि. जळगांव.
विरुध्द
1. जीवन आधार,
मुख्य कार्यालय- जीवन भवन, रामनगर,
वर्वेगांव, सातारा सामनेवाला क्र.1,2,4,5
2. जीवन आधार, (एकतर्फा)
विभागीय कार्यालय, सुखहर्ता हॉस्पिटल, सामनेवाला क्र.3
शाहुनगर रोड, बालाजी कॉलनी, (अॅड. मुकेश एस.शिंपी)
पुणे-नगर रोड, केडगांव, अ.नगर,
3. श्री. राहुल सुभाष पिसाळ,(संचालक जीवन आधार)
रा. श्री व सौ. अपार्टमेंट, सदर बाजार, सातारा,
4. जीवन आधार,
पत्ता- जनार्दन नगर, प्लॉट नं. 100, गट नं. 6,
कुसुंबा, ता.जि.जळगांव
5. श्री. सुशिलकुमार जगन्नाथ भदाणे,
रा.मु.पो.बोरकुंड, ता.जि.धुळे.
नि का ल प त्र
(मिलिंद सा. सोनवणे, अध्यक्ष यांनी पारित केले)
प्रस्तुत तक्रार तक्रारदार यांनी, सामनेवाला यांनी सदोष सेवा दिल्याच्या कारणास्तव ग्राहक संरक्षण कायदा 1986 (या पुढे संक्षिप्तरित्या ‘ग्रा.सं.कायदा1986’ ) च्या कलम 12 नुसार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात असे की, ते बहाददरपूर, ता.पारोळा येथे राहतात. त्या गावात सामनेवाला यांच्या मार्फत स्वस्त धान्य केंद्र चालविण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. तो व्यवसाय ते स्वतः करतात. त्या व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह व चरितार्थ चालतो. सामनेवाला क्र. 1 व 2 हे अनुक्रमे जीवन आधार या व्यवसायाचे मुख्य व विभागीय कार्यालये आहेत. सामनेवाला क्र. 3 जीवन आधारचे संचालक, क्र. 4 जळगांव कार्यालयाचे व्यवस्थापक, क्र. 5 तालुका प्रतिनिधी/डेपो चालक आहे.
3. सामनेवाला यांनी नोंव्हेंबर 2007 मध्ये वृत्तपत्रात निविदा दिली. त्या अन्वये, साखर व इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी ‘जीवन आधार स्वस्त धान्य केंद्राची’ नियुक्ती करण्यासाठी इच्छुकांकडुन नोंदणी करण्याबाबत आव्हान करण्यात आले होते. त्यानुसार तक्रारदार यांनी दि. 11/03/2008 रोजी पावती क्र. 1969 अन्वये, योजने प्रमाणे रु. 7,700/- अदा करुन नोंदणी केलेली आहे.
अशा रितीने तक्रारदार सामनेवाल्यांचा ग्राहक झालेला आहे.
4. तक्रारदाराचे असेही म्हणणे आहे की, जीवन आधार स्वस्त धान्य केंद्र चालविण्याची पध्दत अशी होती की, केंद्र चालकास ज्या वस्तुंची आवश्यकता असेल, त्याची मागणी करतांना राष्ट्रीयकृत बॅकेत चलनाद्वारे पैसे भरावे व आवश्यक असलेल्या वस्तु मागवाव्यात. सामनेवाला क्र. 5 तालुका प्रतिनिधी या नात्याने रोख स्वरुपात भरणा करुन घेत असे. दि. 08/05/2008 रोजी तक्रारदाराने सामनेवाल्यांकडे रू. 29,606/- चलनाने भरून तसेच दि. 14/08/2008 रोजी रू.17,972.50/- अदा करून आवश्यक त्या वस्तु मागविल्या. मात्र सामनेवाला यांनी त्या पुरविल्या नाहीत. त्यानंतर अनेक वेळा संपर्क करुनही सामनेवाल्यांनी टाळाटाळ व उडावाउडवीचे उत्तरे दिली. सामनेवाल्यांनी तक्रारदारांना भेटण्यास देखील नकार दिला. सामनेवाल्यांनी अशा रितीने तक्रारदारांना सदोष सेवा दिलेली आहे. तसेच, अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब देखील केलेला आहे. त्यामुळे वेळोवेळी अदा केलेले रु. 55,278.50/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह परत मिळावेत, मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 20,000/- नुकसान भरपाई, व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु. 15,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदारांनी मंचास केलेली आहे.
5. तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत दस्तऐवज यादी, नि 03 लगत 13 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात पावती क्र. 1669, अर्जदाराचे मागणी अर्ज (2), रु. 17,970/- चे बॅक चलन, निविदा सुचना, कार्ड वाटप पुर्वीचा नोंदणी फॉर्म, कार्यकारी दंडाधिकारी यांचेकडे दिलेला तक्रारी अर्ज, जिल्हा संघटक यांना दिलेला अर्ज, कुरीअर पावत्या, सामनेवाला यांना दिलेले निवेदन, कार्ड नमुना, इ. कागदपत्र दाखल केलेले आहेत.
6. तक्रारदाराच्या अर्जावर न्यायमंचाने सामनेवाल्यांना बाजु मांडण्यासाठी नोटीसा जारी केल्या, सामनेवाला क्र. 1, 2, व 4 यांची कार्यालये बंद आहेत, अशा पोस्टल रिमार्क सह त्यांची पाकिटे मंचास परत प्राप्त झालीत. सामनेवाला क्र. 5 याने नोटीस घेण्यास नकार दिला. सामनेवाला क्र. 2 यांच्यावर जाहीर समन्सची बजावणी झाली. वरील परिस्थिती लक्षात घेता आमच्या पुर्वाधिकारी मंचाने दि. 28/03/2011 रोजी, सदर सामनेवाले म्हणजेच क्र. 1,2,4,5 यांच्या विरुध्द प्रस्तृत तक्रार अर्ज एकतर्फा चालविण्यात यावा, असा आदेश पारित केला. त्याचप्रमाणे, सामनेवाला क्र. 3 दि. 07/01/2010 रोजी पासुन हजर होवुनही जबाब दाखल करीत नाही, याकारणास्तव आमच्या पुर्वाधिकारी मंचाने प्रस्तृत तक्रार त्यांच्या जबाबाविना चालविण्यात यावी, असे आदेश पारित केले. त्यानंतरही दि. 02/03/2003 रोजी तक्रारदाराच्या अर्जावरुन आमच्या अन्य एका पुर्वाधिकारी मंचाने सामनेवाला क्र. 2 विरुध्द एकतर्फा आदेश पारित केल्याचे दिसुन येते. एकंदरीत सामनेवाला क्र. 1,2,4,5 विरुध्द तक्रारी अर्ज एकतर्फा तर सामनेवाला क्र. 3 विरुध्द विनाजबाब चालविण्यात आला.
7. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय ? -होय.
2. तकाररदार यांना सामनेवाला यांनी सेवा देण्यात
कमतरता केली आहे काय ? -होय.
3. आदेशाबाबत काय ? - अंतिम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा
मुद्दा क्र. 1 बाबत
8. तक्रारदारांनी दि. 11/03/2008 रोजी पावती क्र. 1969 अन्वये रु. 7,700/-अदा करुन सामनेवाल्यां तर्फे संचलित जीवन आधार स्वस्त धान्य केंद्रासाठी नोंदणी केली, असा दावा केलेला आहे. त्या दाव्याच्या आधारावर ग्रा. सं. कायदा, 1986 कलम 2 (1)(ड), अन्वये, ते सामनेवाल्यांचे ग्राहक आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. ती बाब शाबीत करण्यासाठी त्यांनी पावती क्र. 1969 नि 03/1 ला दाखल केलेली आहे. सदर पुरावा सामनेवाल्यांनी हजर होऊन आव्हानीत केलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी सामनेवाल्यांकडे वरील प्रमाणे रक्कम अदा केली, ही बाब शाबीत होते.
9. तक्रारदारांनी सामनेवाल्यांकडे जीवन आधार स्वस्त धान्य केंद्र चालविण्यासाठी नोंदणी केली व त्यापोटी वर प्रमाणे रक्कम अदा केली ही बाब, शाबीत झालेली असली तरी तक्रारदार सामनेवाला यांचे ग्राहक आहेत किंवा नाही, ही बाब ग्रा. सं. कायदा 1986 कलम 2 (1)(ड) च्या अनुषंगाने तपासुन बघावी लागेल. कारण तक्रारदारांच्या कथनानुसार त्यांनी सामनेवाल्यांकडुन व्यावसायिक/पुर्नविक्री उदेदशासाठी वस्तु खरेदी करण्याचा व्यवसाय ते करीत होते, असे नमूद केलेले आहे. सदर कलम 2 (1) (ड) अन्वये, जो कोणी व्यक्ती पुर्नविक्री वा व्यापारी उदेदशाने वस्तु किंवा सेवा घेतो तो ग्राहक समजला जात नाही. मात्र सदर कलमास दिलेल्या स्पष्टीकरणात असेही नमुद करण्यात आलेले आहे की, तशा रितीने वस्तु किंवा सेवा घेणारी व्यक्ती जर तो व्यवसाय स्वयंरोजगार म्हणुन, संपुर्णपणे स्वतः चा चरितार्थ चालविण्यासाठी करीत असेल, तर ती व्यक्ती ग्राहक समजण्यात यावी.
10. प्रस्तृत केस मध्ये तक्रारदाराने त्याच्या तक्रार अर्जात स्पष्टपणे नमुद केलेले आहे की, स्वस्त धान्य केंद्र चालविण्याचा व्यवसाय तो स्वतः करतो. म्हणजेच त्याने तो व्यवसाय चालविण्यासाठी नोकर लावलेले नाहीत वा अन्य व्यक्ती मार्फत ते तो व्यवसाय चालवित नाहीत. तसेच, त्या व्यवसायावरच त्याचा उदरनिर्वाह व चरितार्थ चालतो. तक्रारदारांच्या या कथनास सामनेवाल्यांनी हजर होवून आव्हान दिलेले नाही. आमच्या मते तक्रारदाराने ग्रा.सं. कायदा 1986 कलम 2 (1) (ड) च्या स्पष्टीकरणा अन्वये, तो जीवन आधार स्वस्त धान्य केंद्र स्वयंरोजगार म्हणुन उदरनिर्वाह व चरितार्थ चालविण्यासाठी करतो, ही बाब समाधानकारक रित्या शाबीत केलेली आहे. त्यामुळे तो सामनेवाल्यांचे ग्राहक आहे ही बाब स्पष्ट होते. यास्तव मुदा क्र. 1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत. या संदर्भात आम्ही वरिष्ठ कोर्टांच्या न्यायनिर्णयांचा आधार घेत आहोत.
1. Laxmi Engineering Works Vs. P.S.G. Industrial Institute (1995) 3 S.C.C, 583
2. Shree M.B.Industries Vs. Sushil Bhatar III (2013) C.P.J. 379 (N.C.)
यास्तव मुदा क्र. 1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 2 बाबत
11. तक्रारदारांनी असा दावा केलेला आहे की, सामनेवाला यांच्या कडे वस्तुंची मागणी करावयाची झाल्यास अगोदर चलनाद्वारे बॅकेत मालाच्या दराप्रमाणे एकुण रक्कम अदा करावी व त्यानंतर सामनेवाले यांनी मागणी केलेल्या वस्तुंचा पुरवठा करीत असे. त्यानुसार दि. 08/05/2008 रोजी तक्रारदाराने सामनेवाल्यांकडे रू. 29,606/- चलनाने भरून, तसेच दि. 14/08/2008 रोजी रू.17,972.50/- अदा करून आवश्यक त्या वस्तु मागविल्या. मात्र सामनेवाला यांनी त्या पुरविल्या नाही. मागणी अर्ज क्र. 1 नि. 03/2 स्पष्ट करतो की, दि. 08/05/2008 रोजी एकुण रु. 29,606/- च्या वस्तुंची मागणी तक्रारदाराने केलेली आहे. त्यापैकी रु. 8,130/- ची साखर, रु. 3,000/- चा तांदुळ, रु. 3,900/- चे शेंगदाणे असा एकुण रु. 15,030/- च्या वस्तु सामनेवाल्यांनी तक्रारदारास दिलेल्या नाहीत. तशी त्या अर्जाच्या मागे एर्न्डासमेंट दिसुन येते. वरील पुरावा स्पष्ट करतो की, तक्रारदाराने रु. 29,606/- अदा करुनही त्यास रु. 15,030/- च्या वस्तु मिळालेल्या नाहीत. त्याचप्रमाणे मागणी अर्ज क्र. 3 नि 03/3 स्पष्ट करतो की, दि.14/08/2008 रोजी तक्रारदाराने चलनाने नि. 03/4 रू.17,970/- अदा करून साखर, तेल, व मुगदाळ ची मागणी केली. त्यापैकी कोणत्याही वस्तु सामनेवाल्यांनी तक्रारदारास पुरविलेल्या नाहीत. म्हणजेच सामनेवाल्यांनी तक्रारदारास रू. 15,030 + 17,970 = 33,000/- इतक्या रक्कमेच्या वस्तु दिलेल्या नाहीत, ही बाब सादर पुराव्यातुन शाबीत होते.
12. वरील परिच्छेदात केलेले विवेचन स्पष्ट करते की, तक्रारदाराने दि. 08/05/2008 रोजी रू. 29,606/- चलनाने भरूनही त्यास रक्कम रू. 15,030/- च्या वस्तु सामनेवाल्यांनी दिल्या नाहीत. तसेच दि. 14/08/2008 रोजी रू.17,970/- तक्रारदाराने अदा करूनही सामनेवाल्यांनी आवश्यक त्या वस्तुंचा पुरवठा केलेला नाही. आमच्या मते सदर बाब सेवेतील कमतरताच ठरते. यास्तव मुदा क्र. 2 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 3 बाबत
13. मुदा क्र. 1 व 2 चे निष्कर्ष होकारार्थी दिलेले आहेत, ही बाब स्पष्ट करते की, तक्रारदार सामनेवाल्यांचे ग्राहक आहेत. तक्रारदाराने वेळोवेळी मागणी अर्ज भरुन व मागणी केलेल्या वस्तुंपोटी रु. 47,576/- अदा करुनही सामनेवाल्यांनी रु. 33,000/- च्या वस्तु पुरविल्या नाहीत. सदर बाब सेवेतील कमतरता ठरते. त्यामुळे ग्रा.सं. कायदा 1986, कलम 14 (1)(सी) अन्वये, तक्रारदार रु. 33,000/- या रक्कमेच्या परताव्यास पात्र ठरतात. त्याचप्रमाणे नोंदणी रक्कम रु. 7,700/- च्या परताव्यास देखील तक्रारदार पात्र आहे. त्यामुळे सामनेवाल्यांनी तक्रारदारास रु. 33,000/- + रु. 7,700/- = 40,700/- वैयक्तीक व संयुक्तीक रित्या देण्याचा आदेश न्यायोचित ठरतो. त्याचप्रमाणे तक्रारदार ग्रा.सं.कायदा 1986, कलम 14 (1) (डी) मानसिक व शारीरीक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यास देखील पात्र आहे, असे आमचे मत आहे. शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु. 20,000/- इतकी नुकसान भरपाई मिळावी, अशी तक्रारदाराची मागणी आहे. मात्र प्रस्तृत केसच्या फॅक्टस व व्यवहाराचा विचार करता आमच्या मते त्यापोटी रक्कम रु. 10,000/- मंजुर करणे न्यायोचित ठरेल. त्याच कारणास्तव तक्रारदारास अर्ज खर्चापोटी रक्कम रु. 7,000/- मंजुर करणे अवाजवी ठरत नाही. यास्तव मुदा क्र. 3 च्या निष्कर्षा पोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. सामनेवाल्यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी वैयक्तीक व संयुक्तीक रित्या तक्रारदारांना एकुण रक्कम रु. 40,700/-, दि. 14/08/2008 पासुन प्रत्यक्ष रक्कम हाती मिळे पावेतो द.सा.द.शे. 10 टक्के व्याजाने अदा करावी.
2. सामनेवाल्यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास वैयक्तीक व संयुक्तीक रित्या शारीरीक व मानसिक त्रासापोटी पोटी रक्कम रू. 10,000/- व अर्ज खर्चापोटी रक्कम रू. 7,000/- अदा करावेत.
3. निकालपत्राच्या प्रती उभय पक्षांस विनामुल्य देण्यात याव्यात.
(श्री.मिलींद सा सोनवणे) (श्री. सी.एम.येशीराव )
अध्यक्ष सदस्य