(आदेश पारीत व्दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्या)
1. तक्रारदार हिने सदरील तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी सदोष कांदा बियाणे देऊन द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे. म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केलेली आहे.
2. तक्रारदार हिची तक्रार थोडक्यात येणे खालील प्रमाणेः-
तक्रारदार हया मौजे टाकळी खातगांव ता.जि.अहमदनगर येथील रहिवासी असून त्या शेतीचा व्यवसाय करतात. तक्रारदार हिचे नांवे खातगाव टाकळी येथे गट क्रमांक 178 ही शेत जमीन आहे. सदरचे शेत जमीनीतून तक्रारदार ही वेगवेगळया प्रकारचे शेती मालाचे उत्पादन घेऊन स्वतःचा उदरनिर्वाह चालवितात. सामनेवाला नं.1 ही कांदा बियाणे उत्पादन करीत असते. सामनेवाला नं.2 हे बियाणांचे विक्रेते आहेत. तक्रारदार हया सामनेवाला नं.2 यांचे दुकानात प्रत्यक्ष जाऊन बियाणाची चौकशी केली असता, सामनेवाले नं.2 यांनी सामनेवाले नं.1 यांच्या कंपनीचे बियाणे सर्वोत्कृष्ट असून त्यापासुन उत्तम प्रतीचे कांदयाचे पिक मिळेल व त्यास बाजारभाव चांगला मिळून भरघोस उत्पादनामुळे तक्रारदार हिस लाभ होईल असे आश्वासन दिले. त्यामुळे तक्रारदार हिने सामनेवाला नं.1 या कंपनीचे सामनेवाला 2 यांचे कडून नासिक लाल एन.53 हे बियाणे 500 ग्रॅम वजनाचे 8 पुडे प्रत्येकी रुपये 550/- प्रमाणे 4400/- रुपयांचे कांदयाचे बियाणे खरेदी केली. सदरील बिल नं.706 असे आहे. त्यानंतर तक्रारदार हिने सदरचे बियाणे त्यांचे सदर जमीनीमधील दोन एकर क्षेत्रफळामध्ये लागवड केली. सामनेवाला नं.2 यांचे सांगण्याप्रमाणे शेणखत व इतर खते दिली, मशागत केली, रोटा मारला, वेळेत खुरपणी केली, फवारणी केली. त्यासाठी तक्रारदार हिस मोठया प्रमाणात खर्च आला. मात्र सदरील बियाणाचे पिक आल्यानंतर कांदयाला डेंगळे आलेली दिसून आली. त्यामुळे तक्रारदार हिने सामनेवाला नं.1 व 2 यांचेकडे वेळोवेळी तक्रार केली. परंतु त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु दिनांक 19.11.2014 रोजी मा.उप विभागीय कृषी अधिकारी साहेब तथा अध्यक्ष तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती, अहमदनगर यांचेकडे लगेच तक्रार केली. मात्र सामनेवाला नं.1 व 2 यांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही. त्यानुसार समितीने पंचनामा केला व पंचनाम्यामध्ये नमुद केलेले आहे की, पिकांमध्ये 25 ते 30 टक्के डेंगळी कांदा आढळुन आला आहे. त्यामुळे तक्रारदार हिचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. सदरचे बियाणे हे भेसळ, सदोष असल्यामुळे तक्रारदार हिस बाजार समितीमध्ये कांदयाची विक्री करता आली नाही. बाजारभावाप्रमाणे कांदयास रुपये 22 प्रति किलो प्रमाणे भाव मिळणे आवश्यक आहे. मात्र तसे न होता किरकोळ भावाने कांदा विकावा लागला. सदरचे सदोष बियांणामुळे तक्रारदार हिचे 70-80 टक्के नुकसान झाले. तक्रारदार हिस एकुण रु.4,50,000/- अपेक्षित उत्पादन होते. परंतु केवळ रक्कम 30,000/- रुपये मिळाले. सदरचे कांदा पिकासाठी शेणखत, मशागत केली, रोटा मारला, खुरपणी केली, वेळेत फवारणी आणि कांदयाचे बियाणे विकत घेण्यासाठी लागलेला एकुण खर्च रुपये 40,000/- आला. कांदयाचे बियाणे विकत घेण्यासाठी लागलेला खर्च रु.4400/- अशा प्रकारे एकुण रक्कम 4,64,400/- रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. सामनेवाला यांनी त्यासाठी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तक्रारदार हिने परीच्छेद क्र.8 प्रमाणे मागणी केली.
3. सामनेवाला नं.1 व 2 यांनी त्यांची लेखी कैफियत प्रकरणात दाखल केली. त्यामध्ये त्यांनी असे कथन केले आहे की, सामनेवाला नं.1 यांची जिंदल सिडस कंपनी प्रा.लि., या नांवाची जालना येथे कंपनी असून सदर कंपनीमधून ते बि- बियाणे उत्पादीत करुन त्याचे डिलर मार्फत विक्रीचा व्यवसाय करतात. सदर बियाणे हे सिडस अॅक्ट, सिडस रुल, सिडस ऑर्डर मधील तरतुदीनुसार उत्पादीत करुन व शेती शास्त्राकडील माहितगार व्यक्तीचे अधिपत्याखाली उत्पादीत करुन प्रयोग शाळेमध्ये चाचणी केल्यानंतर व बियाणे मार्केटमध्ये विक्री करीता पाठविले जातात. सामनेवाला नं.2 यांची भाळवणी, ता.पारनेर जि.अहमदनगर येथे पोखर्णा कृषी केंद्र या नावाचे दुकान असुन सदरचे दुकानामधून ते नामांकित कंपनीचे उत्पादीत केलेल्या बियांणाची विक्री करणेचा व्यवसाय करतात. दिनांक 19.11.2014 रोजीचा तालुकास्तरीय समितीचा अहवाल व पंचनामा पाहता सदरचा अहवाल व पंचनामा करताना तक्रारदार हिने सामनेवालास कळविले नाही. सामनेवाला यांचे पश्चात अहवाल करण्यात आला आहे. त्यामुळे तो सामनेवालावर बंधनकारक नाही. सदरचा अहवाल महाराष्ट्र सरकारचे परीपत्रकाप्रमाणे नाही. त्यामुळे तो मान्य नाही. कांदा पिकास डेंगळे येण्याची कुठलिही कारणे समितीने दिलेली नाहीत. कांदा पिकास डेंगळा येणे हे बियांणावर अवलंबून नसते, त्यासाठी बियाणे जबाबदार नाहीत. कांदयास डेंगळा येणेस पुर्णपणे हवामान, तापमान, जमिनीचा पोत, कांदा बि-बियाणेची पध्दत, कांदयाची रोपे लावणेची पध्दत, रोपांचा कालावधी, रोपांचे दाने, ओळीमधील अंतर, खतांचे प्रमाण, किटकनाशके, पाण्याचा अनियमितपणा इत्यादी गोष्टीवर अवलंबून असते. डेंगळा हा बियाणेपासून येत नाही. त्यामुळे सदरचे तक्रारदार हिचे कथन हे सामनेवाला यांनी अमान्य केले आहे. तक्रारदार हिचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा अशी मंचाला विनंती केली आहे.
4. तक्रारदार हिने दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र तसेच तक्रारदार हिचे वकील श्री.मुंदडा यांनी केलेला युक्तीवाद तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र व त्यांचे वकील श्री.तिपोळे यांनी केलेला युक्तीवाद यावरुन न्याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
| मुद्दे | उत्तर |
1. | तक्रारदार ही सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय.? | ... होय. |
2. | तक्रारदार ही सामनेवाला यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय.? | ... नाही. |
3. | आदेश काय ? | ...अंतीम आदेशानुसार. |
का र ण मि मां सा
5. मुद्दा क्र.1 ः- तक्रारदार हिचे पतीने तक्रारदार हिचे शेत जमीन गट नं.178 मध्ये कांदा पिकाची लागवड करण्यासाठी सामनेवाला नं.2 यांचेकडून सामनेवाला नं.1 या कंपनीचे उत्पादन केलेली कांदा बियाणे खरेदी केले. सदरचे बियाणे ही नासिक लाल एन 53 हे बियाणे 500 ग्रॅम वजनाचे 8 पुडे प्रत्येकी रुपये 550 प्रमाणे रक्कम 4400/- रुपयाचे कांदयाचे बियाणे खरेदी केले. त्याबाबतचे बिल प्रकरणामध्ये तक्रारदार हिने दाखल केलेले आहे, त्याचे बिल नं.706 असे आहे. त्या बिलाचे अवलोकन केले असता तक्रारदार हिचे पतीने सामनेवाला यांचेकडून बियाणे खरेदी केले ही बाब स्पष्ट होते. तक्रारदार ही बियाणे खरेदी करणा-याची पत्नी आहे, त्यामुळे ती Benificiary असल्यामुळे ती सामनेवाला यांची ग्राहक या सदरात मोडते. सदरचे बिल हे सामनेवाला नं.2 यांचे असून त्यावर विक्रेताची सही आहे. यावरुन ही बाब स्पष्ट होते. तक्रारदार ही सामनेवाला यांचे ग्राहक आहेत. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
6. मुद्दा क्र.2 – तक्रारदार हिने सामनेवाला यांचेकडून कांदा बियाणे खरेदी केल्यानंतर त्यांचे शेत जमीनीमध्ये लागवड केली. त्यानंतर दोन तीन महिन्याने डेंगळे स्वरुपाची कांदे आल्याचे तक्रारदार हिचे निदर्शनास आले. सामनेवाला नं.1 व 2 यांना कळविले. परंतू त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तक्रारदार हिने उपविभागीय कृषी अधिकारी साहेब तथा अध्यक्ष तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती अहमदनगर यांच्याकडे रितसर लेखी तक्रार केली. तसेच तक्रारदार हिने दिनांक 10.11.2014 रोजी पत्र पाठवून तक्रार केली. त्यानुसार उपविभागीय कृषी अधिकारी तथा अध्यक्ष तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती, अहमदनगर यांनी तक्रारदार हिच्या शेत जमीनीमध्ये दिनांक 19.11.2014 रोजी तक्रारदार हिचे प्रादुर्भावित क्षेत्रात येऊन पाहणी केली. आणि रितसर पंचनामा करुन तसा अहवाल तयार केला. त्या अहवालामध्ये त्यांनी नमुद केले आहे की, सदरील कांदा पिकांमध्ये 25 ते 30 टक्के डेंगळी कांदे आढळून आले आहेत. त्यासाठी मंचाने दाखल असलेल्या अहवालाचे अवलोकन केले. त्यावरुन ही बाब स्पष्ट होते की, उप-विभागीय तालुका स्तरीय कृषी अधिकारी हे अहवालाचे वेळी उपस्थित होते. सामनेवालाने त्यांचे लेखी कैफियतीमध्ये कथन केले की, त्यांनी तक्रारदार हिस पंचनामा करतेवेळी कळविले नाही. सदरचे अहवालामध्ये कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित नाहीत, त्यांची सही नाही. त्यामुळे पंचनामा करताना सामनेवाला यांचे प्रतिनिधी नव्हते, यावरुन ही बाब स्पष्ट होते. तक्रारदार हिने सामनेवालाला कळविले नाही. तक्रारदार हिने सदरचे पिक हे डेंगळे स्वरुपाचे आले हे दर्शविण्यासाठी छायाचित्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये नमुद केले की, 25 ते 30 टक्के डेंगळे कांदे आलेत व बाजारभाव रु.4400/- असल्याबाबत दस्त दाखल केले. मात्र किती कांदे चांगले आलेत व ते विकले किंवा नाही, त्यांना काय भाव आला, त्यामधून किती प्रमाणात रक्कम मिळाली तसेच डेंगळे कांदे विकली व त्यांना काय भाव आला या विषयी काहीही नमुद नाही व किती नुकसान झाले व त्याबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा नाही. सामनेवाला यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले की, डेंगळे स्वरुपाचे कांदे येण्यासाठी बियाणे जबाबदार नाहीत. त्यासाठी हवामान, तापमान, जमिनीचा पोत, कांदा बि-बियाणाची पध्दत, कांदयाची रोपे लावणेची पध्दत, रोपांचा कालावधी, रोपांचे दोन ओळीमधील अंतर, खतांचे प्रमाण, किटकनाशके, पाण्याचा अनियमितपणा इत्यादी गोष्टीवर अवलंबून असते. ही बाब स्पष्ट करण्यासाठी सामनेवाला यांनी प्रकरणामध्ये लिटरेचर दाखल केले आहे. त्यामध्ये सुध्दा असे कथन केले आहे की, नोव्हेंबर– डिसेंबर महिन्यात कांदा पोसत असताना रात्रीचे तापमान 10 डिग्री सें.च्या खाली बराच काळ गेल्यास फुलांचे दांडे निघण्यास चालना मिळते. त्यामुळे डेंगळे येण्याचे प्रमाण या हंगामात जास्त असते. तक्रारदाराने आलेले ते पिक सुध्दा ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यात लावलेले आहे. कारण पाहणी अहवाल प्रकरणात दाखल केला आहे व तो दिनांक 11.11.2014 चा आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी घेतलेला बचाव ग्राह्य धरण्यात येतो. सदरचे कथनासाठी सामनेवाला यांनी वरीष्ठ न्यायालयाचे न्याय निवाडे दाखल केले आहेत. मा. राष्ट्रीय ग्राहक आयोग नवी दिल्ली यांचा न्याय निवाडा खालील प्रमाणे
I) 2015 (2) CPR 679 (NC) Indian Farmers Fertilizers Co-Operative Ltd. V/s. Sunder Lal
“ Report of Agriculture Department does not mention about inferior quality of seeds and merely because some of plants were of low height without any fruit, it cannot be presumed that seeds were mixed with low quality of seeds. ”
प्रस्तुतच्या प्रकरणातील अहवालामध्ये सुध्दा बियांणे सदोष होते याबाबत नमुद नाही. फक्त 25 ते 30 टक्के डेंगळे कांदे आले असे नमुद आहे. मात्र कांदयास डेंगळे कशामुळे आले याचे कारण नमुद केलेले नाही.
II) मा.राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई यांचे परीक्रमा खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेला न्याय निवाडयाचे अवलोकन केले.
First Appeal No.FA/13/72 Jindal Seeds V/s. Ramraje Annasaheb Patil & other.
“ No reasons were given by the committee for forming the bolting in the onion. It is only recorded that there is a bolting. No scientific reasons were recorded by committee for formation of bolting in onions. ”
सदरच्या न्याय निवाडयातील निर्णीत बाबी प्रस्तुतच्या प्रकरणात लागू पडतात.
सामनेवाला यांनी दिलेल्या कागदोपत्री पुरावा, मा.वरीष्ठ न्यायालयाचे न्याय निवाडयाचे वाचन केले व त्यातील निर्णीत बाबी प्रस्तुतच्या प्रकरणात लागू पडतात. तक्रारदार त्यांची तक्रार सिध्द करण्यास असमर्थ ठरले. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देणेत येते.
7. मुद्दा क्र.3 – मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मुद्दा क्र.3 चे उत्तरार्थ खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अं ति म आ दे श –
1) तक्रारकर्तीची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2) उभय पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
3) उभय पक्षकार यांना या आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क दयावी.
4) या प्रकरणाची “ ब ” व “ क ” फाईल तक्रारकर्तीस परत करावी.