::: आ दे श :::
( पारित दिनांक : 28/02/2018 )
माननिय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
1) तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, दोषपूर्ण सेवे संदर्भात नुकसान भरपाई मिळण्याकरिता, विरुध्द पक्षाविरुध्द दाखल केली आहे.
तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, सोबत दाखल केलेले सर्व दस्तऐवज, उभय पक्षांचा लेखी युक्तिवाद व विरुध्द पक्षाने दाखल केलेला न्यायनिवाडा, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, मंचाने खालीलप्रमाणे निर्णय पारित केला.
2) सदर प्रकरणात उभय पक्षात वाद नसलेल्या बाबी अशा दिसतात की, तक्रारकर्ते हे शेतकरी आहे व विरुध्द पक्ष हे शेतक-याकडून बियाणे विकत घेण्याचा व्यवसाय करतात. विरुध्द पक्षाने ही बाब मान्य केली की, तक्रारकर्ते यांनी 11 क्विंटल, 8 किलो कांदा बियाणे विरुध्द पक्ष यांच्याकडे विक्री करण्याकरिता दिले होते व विक्री झाल्यानंतर ज्या भावाने विकले जाईल त्या भावाने तक्रारकर्ता यांना रक्कम द्यावयाची होती. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास अग्रीम रक्कम ( उचल म्हणून ) रुपये 2,20,000/- दिली होती.
3) तक्रारकर्ते यांची तक्रार अशी आहे की, ज्यावेळी कांदा बियाणेचे भाव रक्कम रुपये 35,000/- प्रती क्विंटल होते, त्या भावात माल विकण्याची विनंती, त्यांनी विरुध्द पक्षास केली, त्यावेळेस करारानुसार विरुध्द पक्षाने तसा होकार व आश्वासन दिले होते. त्यावर तक्रारकर्त्याने विश्वास ठेवला. तक्रारकर्ते यांच्या 11 क्विंटल, 8 किलो कांदा मालाचे रक्कम रुपये 3,85,000/- होत असतांना व घेतलेली अग्रीम रक्कम वजा जाता, तक्रारकर्त्यास विरुध्द पक्षाकडून रक्कम रुपये 1,65,000/- घेणे निघत होते. परंतु विरुध्द पक्षाने वेगवेगळे कारण सांगून रक्कम दिली नाही. म्हणून तक्रारकर्त्याने वकिलामार्फत नोटीस पाठवून मागणी केली परंतु नोटीस प्राप्त होवूनही, विरुध्द पक्षाने दखल घेतली नाही. म्हणून प्रार्थनेनुसार तक्रार मंजूर व्हावी, अशी तक्रारकर्त्याची विनंती, आहे.
4) यावर विरुध्द पक्षातर्फे करण्यात आलेल्या युक्तिवादाचा उहापोह करण्याआधी, मंचाने विरुध्द पक्षाने दाखल केलेला न्यायनिवाडा . .
1999 (1) CPR 93 (NC)
M/s. Sakthi Sugars Ltd. – Vs.- Sridhar Sahoo & Ors.
तपासला असता मंचाचे असे मत झाले आहे की, सदर न्यायनिवाडयातील निर्देशानुसार ‘‘ A Seller Can not claim the Status of a Consumer ’’ तत्वानुसार तक्रारकर्ता ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत ग्राहक या संज्ञेत मोडत नाही. त्यामुळे या मुद्दयावर, तक्रारकर्ते यांची तक्रार, त्यांनी सक्षम न्यायालयात दाद मागावी, असे सुचवून खारिज करण्यात येते.
सबब, अंतिम आदेश खालीलप्रमाणे पारित केला.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ता यांची तक्रार खारिज करण्यांत येते.
- तक्रारकर्ता यांना आवश्यकता भासल्यास योग्य त्या न्यायालयात दाद मागण्याची मुभा देण्यात येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश पारित करण्यात येत नाही.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निःशुल्क पुरवाव्या.
(श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri