जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक –138/2010 तक्रार दाखल तारीख –12/08/2010
महादेव पि.सटवा कागणे
वय 45 वर्षे धंदा शेती .तक्रारदार
रा.धुनकवळ पो.पहाडी पारगांव
ता.धारुर जि.बीड
विरुध्द
1. महाराष्ट्र शासन,
मा.जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय,
नगर रोड, बीड. .सामनेवाला
2. आयुक्त (कृषी)
कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-411001
3. तहसिलदार,
तहसिल कार्यालय, धारुर ता.धारुर जि.बीड.
4. विभागीय व्यवस्थापक,
आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
झेनिथ हाऊस, केशवराव खाडे मार्ग, महालक्ष्मी, मुंबई-400 034
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.एस.आर.राजपुत
सामनेवाला क्र.1 तर्फे :- स्वतः
सामनेवाला क्र.2 तर्फे ः-स्वतः
सामनेवाला क्र.3 तर्फे ः- स्वतः
सामनेवाला क्र.4 तर्फे ः- अँड.आर.व्ही.देशपांडे
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार मौजे धुनकवड ता.धारुर येथील रहिवासी असून त्यांचा सदर शिवारात सर्व्हे गट नंबर 52/1,73/2,73/01 मध्ये एकूण 9 हेक्टर 61 आर शेत जमिन आहे.
सन 2005-06 मध्ये तक्रारदाराचे शेतीमध्ये ऊस लावला होता. ऊस तोडणी करिता झालेला असताना तक्रारदार सदर ऊसाचे गूळाचे गु-हाळ करणेकामी चरक लावला होता. त्यामध्ये दि.15.02.2006 रोजी ऊस टाकत असताना चरकामध्ये ऊसासहीत तक्रारदाराचा उजवा पंजा गेला. पंजा तुटला व उजवा हात हा काम करणे योग्य राहिला नसून त्यास शेतातील कामे स्वतःकरता येत नाहीत.त्यामुळे त्यांचे अतोनात नूकसान झाले. हात बरा व्हावा म्हणून काळे अपघात दवाखाना परळी वैजनाथ येथे दि.15.02.2006 ते 02.03.2006 या कालावधीत भरती होते. तक्रारदाराची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना बराच खर्च दवाखानामध्ये झाला. तक्रारदारानी दि.28.02.2006 रोजी विमा प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे दाखल केला. त्यांनी मंजूरीसाठी पाठविला.
तक्रारदारास 40 टक्के कायम अंपगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सक बीड यांनी दि.14.06.2006 रोजी दिले. तक्रारदाराच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला.
तक्रारदारानी दि.16.7.2007 रोजी सामनेवाला क्र.4 यांना खालील प्रमाणे दावा मंजूर करण्यासाठी विनंती अर्ज पाठविला. सामनेवाला क्र.2 यांचे दि.31.10.2007 रोजी पत्र प्राप्त झाले.त्यात विमा सल्लागाराचे मताप्रमाणे प्रकरण विमा पत्रातील अटी व शर्ती मध्ये बसत नाही. अंपगत्व 50 टक्के पेक्षा कमी असल्याने तक्रारदार नूकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही.विमा कंपनीला पूर्ण अवलोकनासाठी वेळोवेळी विनंती केली असता त्यांनी आश्वासने दिली. तक्रारदार जूलै 2010 मध्ये दावा बाबत चौकशी कामी गेलाक असताना त्यांनी स्पष्टपणे नकार दिला.
विनंती की, तक्रारदारांना विमा रक्कम रु.50,000/- सामनेवाला क्र. 1 ते 4 कडून दाखल केल्यापासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने दयावेत. मानसिक,शारीरिक त्रासापोटी आणि तक्रारीचा खर्चापोटी रक्कम देण्या बाबत आदेश व्हावेत.
तक्रारदारांनी नि.16 चा विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला आहे. सोबत त्यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे.
सामनेवाला क्र.1 व 3 यांचे खुलाशा नि.15 दि.12.11.2010 रोजी दाखल झाला. सामनेवाला क्र.1 आणि 3 यांचे विमा बाबत फारसा वाद नाही. तक्रारदार यांना विमा कंपनीने त्यांचे सल्लागाराचे मतानुसार मुदत देण्यास अपात्र ठरवले. त्यासाठी सामनेवाला क्र.1 व 3 जबाबदार नाहीत. विमा कंपनीकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर तक्रारदारांना दि.31.10.2007 रोजी केलेला आहे. तक्रारदार सामनेवाला क्र.1 व 3 च्या हददीपर्यत खारीज करण्यात यावा.
सामनेवाला क्र.2 यांचा खुलासा नि.10 दि.31.10.2007 दाखल झाला. सदरचा खुलासा हा सामनेवाला क्र 1 व 3 चे खुलासा सारखा आहे.
सामनेवाला क्र.4यांनी दि.28.10.2010 रोजी नि.13 वर खुलासा दाखल केला. सामनेवाला यांनी तक्रारीतील सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. तक्रारदारांना कायम स्वरुपात अंपगत्व 40 टक्के आल्या बाबतचे प्रमाणपत्र आहे. परंतु नियमानुसार 50 टक्के अंपगत्व असल्याशिवाय दावा मंजूर होत नाही. या कारणाने सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा योग्य रितीने नाकारलेला आहे. सदरचा दावा नाकारल्याचे तक्रारदारांना कळविले आहे. तक्रारदारास बराच विलंब झालेला आहे. सदर विलंबाची योग्य सबळ कारणे विलंब अर्जात दाखल नाहीत. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केलेला नसल्याने तक्रार विलंबाचे अर्जासह खर्चासह रदद करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र. 1 व 3 यांचा खुलासा,शपथपत्र, सामनेवाला क्र.2 चा खुलासा, सामनेवाला क्र.4 चा खुलासा व शपथपत्र, दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.राजपुत व सामनेवाला यांचे विद्वान वकील श्री.देशपांडे यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे दि.15.2.2006 रोजी अपघात झाल्यानंतर त्या बाबतचा प्रस्ताव दि.28.02.2006 रोजी सामनेवाला क्र.3 कडे दाखल केला. त्यांनी सामनेवाला क्र.4 कडे सदरचा प्रस्ताव पाठविला आहे. सदरचा प्रस्ताव दि.31.10.2007 च्या पत्रान्वये 50 टक्के पेक्षा अंपगत्व कमी असल्याचे कारणावरुन दावा नाकारण्यात आलेला आहे. सदरचे पत्र तक्रारदारांना प्राप्त झालेले आहे.
या संदर्भात दि.31.10.2007 रोजी पासून दोन वर्षाचे आंत तक्रारदारांनी तक्रार दाखल करणे आवश्यक होते परंतु तक्रारदारांनी सदरची तक्रार दि.12.08.2010 रोजी दाखल केलेली आहे. यात विलंबा बाबत तक्रारदारांनी त्यांचे विलंब अर्जात जी कारणे नमूद केलेली आहेत ती योग्य व सबळ नाहीत. त्यामुळे तक्रारीत झालेला विलंब माफ करणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे. तसेच सेवेत कसूरीचे संदर्भात विचार करता तक्रारदाराचा दावा प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनीने त्यावर त्यांचा निर्णय घेतलेला आहे व सदरचा निर्णय तक्रारदारांना प्राप्त झालेला आहे. त्यामुळे या संदर्भात सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याचे स्पष्ट होत नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. विलंब अर्ज आणि तक्रार रदद करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर ) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड