जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक –155/2010 तक्रार दाखल तारीख –28/10/2010
श्रीमती ज्योती भ्र.विलास बहीर
वय 24 वर्षे धंदा शेती व घरकाम .तक्रारदार
रा.शिरापुर (धुमाळ) ता.शिरुर (का.) जि.बीड
विरुध्द
1. जिल्हाधिकारी,
जिल्हाधिकारी कार्यालय, नगर रोड,बीड. .सामनेवाला
2. तालुका कृषी अधिकारी
कृषी कार्यालय, शिरुर (का.) ता.शिरुर (का.)
जि.बीड
3. व्यवस्थापक,
कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस प्रा.लि.
भास्करायण, एच.डी.एफ.सी.लाईफ इन्शुरन्स,
टाऊन सेंटर जवळ, राजमाता जिजाऊ मिशनच्या खाली,
सिडको,औरंगाबाद.
4. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.नागपुर
मार्फत शाखा व्यवस्थापक,
पहिला मजला, छत्रपती सकूल,
सुभाष रोड, बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.ए.बी.लांडगे
सामनेवाले क्र.1 तर्फे :- स्वतः
सामनेवाले क्र.2 तर्फे ः-स्वतः
सामनेवाले क्र.3 तर्फे ः- स्वतः
सामनेवाले क्र.4 तर्फे ः- अँड.व्ही.एस.जाधव
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराचे पती विलास शिवनाथ बहीर यांचे मौजे शिरापुर (धुमाळ) ता.शिरुर येथे गट नंबर 548 मध्ये 46 आर जमीन आहे. ते व अर्जदार हे शेती व्यवसाय करुनच त्यांची उपजिवीका करीत होते.
विलास बहीर यांचा दि.22.01.2010 रोजी वाहन अपघाताने मृत्यू झाल्याने त्यांचा प्रस्ताव सामनेवाले क्र.2 कडे सर्व कागदपत्रासह दि.15.03.2010 रोजी दाखल केला. परंतु सामनेवाला क्र. 1 ते 4 यांचेकडहून नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे तक्रारदार सामनेवाला क्र.1 ते 4 कडून खालील प्रमाणे नूकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत.
1. विम्याची रक्कम रु.1,00,000/-
2. मानसिक त्रासापोटी रु.10,000/-
3. प्रवास खर्चापोटी रु.1,000/-
4. तक्रारीचा खर्च रु.5,000/-
-------------
एकूण रु.1,16,000/-
विनंती की, तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे सामनेवाला क्र.1 ते 4 यांनी नुकसान भरपाई रक्कम रु.1,16,000/- वैयक्तीक अथवा संयुक्तीक देण्याबाबत आदेश व्हावेत. त्यावर तक्रार दाखल दिनांकापासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याज देण्याचे आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1 यांनी दि.09.03.2011 रोजी त्यांचा खुलासा दाखल केला. तक्रारदाराचा प्रस्ताव सामनेवाला क्र.2 यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड मार्फत सामनेवाला क्र.3 कडे पाठविण्यात आला होता.प्रस्तावात असलेल्या त्रुटीची पूर्तता तक्रारदाराने केलेली नसल्याने प्रस्तावावर कार्यवाही झालेली नाही. सामनेवाला क्र.2 चे कार्यालयाद्वारे दि.10.08.2010रोजीचे पत्राद्वारे पाठपुरावा करण्यात आला, मात्र तक्रारदारांनी पूर्तता केली नाही.त्यामुळे दावा मंजूर झालेला नाही.प्रकरण खर्चासह रदद करण्यात यावे.
सामनेवाला क्र.2 यांनी दि.04.01.2011रोजी शपथपत्राद्वारे खुलासा दाखल केला. सदरचा खुलासा सामनेवाला क्र.3 यांचे खुलाशा सारखाच आहे.
सामनेवाला क्र.3 यांनी दि.30.01.2010 रोजी खुलासा दाखल केला. विलास शिवनाथ बहीर रा. शिरापुर यांचा अपघात दि..22.01.2010 रोजी झाला. दावा दि.22.03.2010 रोजी मिळाला. सदरचा विमा हा दि.15.08.209 ते 14.08.2010 रोजी या कालवधीसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी नागपूर यांचेकडे होता. दावा अपूर्ण कागदपत्र उदा.पंचनामा, वाहन चालकाचा परवाना, पोलिस ऑफिसर ने सांक्षाकीत केलेले इत्यादी कागदपत्र नव्हती. त्या बाबत दि.29.03.2010 रोजी संबंधीताना पत्राने कळविले. स्मरणपत्र दि.30.06.2010, 02,10,2010, 3.11.2010 रोजी दिले परंतु आजतागायत कागदपत्राची पूर्तता न झाल्याने दावा पूढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेला नाही.
तक्रारदारांनी सूरुवातीला सदर प्रकरणात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला पार्टी केले होते पंरतु त्यांचा सदर कालावधीतील विमा पत्र नसल्याने तक्रारदारांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला दि.12.11.2011 रोजी पार्टी केले.
सामनेवाला क्र.4 यांनी त्यांचा खुलासा दि.07.07.2011 रोजी दाखल केला आहे. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. त्यांचे पर्यत प्रस्ताव अर्ज आलेला नाही. त्यामुळे नामंजूर करण्याचा प्रश्नच येत नाही. सेवेत कसूरीचा प्रश्नच येत नाही. तक्रार रदद करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाले क्र.1 चा खुलासा,दाखल कागदपत्र, सामनेवाले क्र.2 चा खुलासा,दाखल कागदपत्र, सामनेवाले क्र.3 चा खुलासा,दाखल कागदपत्र, सामनेवाला क्र.4 चा खुलासा, शपथपत्र यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.लांडगे व सामनेवाला क्र.4 चे विद्वान वकील श्री.जाधव यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाला क्र.1 ते 3 यूक्तीवादाचे वेळी गैरहजर.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता विलास शिवनाथ बहीर यांचे मौजे शिरापुर (धुमाळ) शिवारात शेत जमिन असल्याची बाब 7/12 उताररा, 8 अ वरुन स्पष्ट होते.
विलास बहीर यांचा मृत्यू दि.22.01.2010रोजी अपघाताने झाला. त्या बाबतचे एफ.आय.आर,घटनास्थळ पंचनामा, शवविच्छेदन अहवाल इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सदर शवविच्छेदन अहवालात मयताचे उजव्या पायाला दोन्ही बाजूने फ्रंक्चर झाल्याचे व इतरही जखमा झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान केलेले आहे.
या संदर्भात तक्रारदारांनी त्यांचा प्रस्ताव दि.15.03.2010 रोजी सामनेवाला क्र.2 कडे दाखल केला. त्यानंतर सामनेवाला क्र.2 ने सामनेवाला क्र.3कडे प्रस्ताव अर्ज पाठविल्याचे सामनेवाला क्र.3 चे खुलाशावरुन दिसते. परंतु सदर प्रस्ताव अर्जा सोबत पंचनामा आणि वाहन चालकाचा परवाना इत्यादी दोन सांक्षाकीत केलेले कागदपत्रे नसल्याने सदरचा दावा हा त्यांचे स्तरावर प्रलंबित आहे तो त्यांनी संबंधीत विमा कंपनीकडे पाठविला नाही.
तक्रारदाराने सदरचे कागदपत्र सामनेवाला क्र.2 कडे दिल्याचे यूक्तीवादात म्हटले आहे. परंतु सदर कागदपत्रे दिल्या बाबतचा पुरावा दाखल नाही. तसेच या संदर्भात सामनेवाला क्र.2 चा खुलासा अत्यंत महत्वाचा आहे त्यांनी वरील कागदपत्र मागणीसाठी तक्रारदाराकडे पाठपुरावा केल्याचे पत्रे दाखल केलेले आहेत परंतु कागदपत्राची पुर्तता न झाल्याने तक्रारदाराचा दावा निर्णायक होऊ शकला नाही.
तक्रारदारांनी आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करणे ही तक्रारदाराची जबाबदारी आहे.जोपर्यत कागदपत्राची पुर्तता होत नाही तोपर्यत सदरचा प्रस्ताव अर्ज निर्णायक होऊ शकत नाही तोपर्यत प्रलंबित अवस्थेत सामनेवाला क्र.3 यांनी ठेवलेला आहे. ही सर्व वस्तूस्थिती लक्षात घेता सामनेवाला क्र.1 ते 4 यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब कूठेही स्पष्ट होत नाही. तथापि तांत्रिक मूददयावर तक्रारदाराची तक्रार रदद करण्याऐवजी तक्रारदारांनी घटनास्थळाचा पंचनामा व मयत विलास बहीर यांचा वाहन चालक परवाना सामनेवाला क्र.3 कडे पाठवणे. तसेच कागदपत्र मिळाल्यानंतर सामनेवाला क्र.3 यांनी सदरचे प्रकरण सामनेवाला क्र.4कडे 15 दिवसांचे आंत अंतिम निर्णयासाठी पाठवावे. त्यानंतर सामनेवाला क्र.4 यांनी सदरचा प्रस्ताव आल्यावर 30 दिवसांचे आंत त्यावर त्यांचा अंतिम निर्णय घेणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे. सेवेत कसूरीची बाब नसल्याने तक्रारदाराच्या तक्रारीतील कोणतीही मागणी मंजूर करणे उचित होणार नाही.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराने सामनेवाला क्र.3 कडे घटनास्थळाचा पंचनामा व विलास बहीर यांचा वाहन चालक परवाना सांक्षाकीत केलेली कागदपत्रे आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत पाठवावीत.
2. सामनेवाला क्र.3 यांना आदेश देण्यात येतो की, सदरची कागदपत्रे मिळाल्यानंतर त्यांनी सदरचा प्रस्ताव हा सामनेवाला क्र.4 कडे 15 दिवसांचे आंत पाठवावा.
3. सामनेवाला क्र.4 यांना आदेश देण्यात येतो की, वरील प्रस्ताव सामनेवाला क्र.3 कडून प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांचे आंत त्यावर अंतिम निर्णय घ्यावा.
4. खर्चाबददल आदेश नाही.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड