तक्रार अर्ज क्र. 34/2015.
तक्रार दाखल दि.12-02-2015.
तक्रार निकाली दि.21-11-2015.
श्री. राजेंद्र सुभेदार जगदाळे,
रा.मु.पो. पिंगळी बुद्रुक,
ता. माण, जि. सातारा. ... तक्रारदार.
विरुध्द
1. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद,सातारा.
2. जिल्हा पशु संवर्धन अधिकारी,
जिल्हा परिषद, सातारा.
3. पशुधन विकास अधिकारी (विस्तार)
पंचायत समिती, माण,
ता. माण, जि.सातारा. .... जाबदार.
तक्रारदारातर्फे –अँड.ए.आर.कदम.
जाबदार क्र. 1 ते 3 तर्फे – अँड.ए.ए.जोशी.
अँड.डि.व्ही.देशपांडे.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे पिंगळी बुद्रुक, ता.माण, जि.सातारा येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. त्यांचेकडे कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने ते मोलमजूरी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवित असतात. जाबदार क्र. 1 हे जिल्हा परिषद,सातारा येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असून जाबदार क्र. 2 हे जिल्हा परिषद, सांतारा येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असून जाबदार क्र. 2 हे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तसेच जाबदार क्र. 3 हे पशुधनविकास अधिकारी म्हणून पंचायत समिती,माण येथे कामकाज पहात आहेत. सदर जाबदार हे प्रामुख्यांने महाराष्ट्र शासनाने अंमलात आणलेल्या विविध प्रकारच्या योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा व त्याची अंमलबजावणी करुन त्या अनुषंगाने लोकांच्यामध्ये रोजगार निर्माण करण्याचे कामकाज पहात असतात. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने एकदिवशीय पिलांची निर्मीती करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये अनुदानावर लघुअंडी उबवणूक करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. त्या अनुषंगाने सदरची लघुअंडी उबवणूक करण्यासाठी लागणारे यंत्राचा पुरवठा लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम हे प्रामुख्याने जाबदार क्र. 1 ते 3 हे महाराष्ट्र शासनाच्या वतीने पहात होते व आहेत. त्यानुसार यंत्राव्दारे अंडी उबवणी केलेनंतर त्यातून निर्माण होणारी पिल्ले संबंधीत लाभधारक स्वतःकडे ठेवून वाढवू शकतो किंवा इतर स्थानिकांच्या मागणीनुसार व उपलब्धतेनुसार त्याची विनंती करु शकतील. मात्र त्यासाठी संबंधीत लाभधारकांनी अंडी उबविण्याच्या संदर्भाने तसेच एकदिवशीय पिल्ली संगोपन करण्याच्या संदर्भाने होणारा संपूर्ण खर्च स्वतः सोसावयाचा आहे अशी योजना महाराष्ट्र शासनाने अंमलात आणली होती व आहे. प्रस्तुत बाबतीत तक्रारदाराला माहिती मिळाल्यावर व सदर अंडी उबवणूक करणारे यंत्राच्या खरेदीवर महाराष्ट्र शासनाचे 75 टक्के अनुदान व 25 टक्के रक्कम स्वतः लाभार्थीने घालावयाची होती अशाप्रकारे जाबदार क्र. 1 ते 3 हे सदर यंत्राची विक्री लाभार्थींकडून यंत्राच्या किंमतीच्या 25 टक्के रक्कम स्विकारुन करत होते व आहेत. प्रस्तुत तक्रारदाराने महाराष्ट्र शासनाचे योग्य त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन सदर अंडी उबवणूक करणारे यंत्राची मागणी केली. सदरची मागणी महाराष्ट्र शासनाने मंजूर करुन तक्रारदाराला प्रस्तुत अंडी उबवणूक करण्याचे यंत्र पुरविण्याचे मान्य व कबूल केले होते. त्याअनुषंगाने तक्रारदाराने त्यांना आवश्यक असणारे अंडी उबवणूक करण्यासाठी आवश्यक असणारे पत्र्याचे शेड रक्कम रु.80,000/- खर्च करुन शेड उभे केले व तक्रारदाराने जाबदारांकडे अंडी उबवणूक करणा-या यंत्राची मागणी केली. त्यावेळी जाबदाराने तक्रारदाराकडून तक्रारदाराचे हिश्याची 25 टक्के रु.41,000/- ची मागणी केली त्यावेळी तक्रारदाराने दि. 24/12/2013 रोजी जाबदार क्र. 2 यांचे नावचा बँक ऑफ महाराष्ट्र, दहिवडी शाखेचा डी.डी. नं. 699072 ने रक्कम रु.41,000/- चा डी.डी. जाबदाराला दिला होता. सदर डी.डी. मिळाल्याची पोहोच जाबदाराने तक्रारदाराला त्याचदिवशी दिली आहे. तक्रारदाराने प्रस्तुत रकमेचा डिडि जाबदाराला अदा केलेनंतर जाबदाराने अंडी उबवण्याचे यंत्र ताबडतोब तक्रारदार यांना देणे बंधनकारक होते. तथापी तक्रारदाराने रक्कम अदा करुनही जाबदाराने अंडी उबवण्याचे यंत्र तक्रारदाराला अदा करणेस टाळाटाळ केली व खोटी आश्वासने देऊन वेळ मारुन नेत होते. तक्रारदाराने प्रस्तुत यंत्रासाठी जाबदाराकडे वारंवार तगादा लावला असता जाबदार क्र. 2 ने दि. 20/2/2014 रोजी पत्र पाठवून राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सन 2011-12 मध्ये श्रीमती रत्नाबाई बाळासाहेब शिंदे, रा. निढळ, ता. खटाव, जि.सातारा यांना लघुअंडी उबवणी यंत्र दिले होते. सदरचे यंत्र चालवण्यास रत्नाबाई शिंदे यांना असमर्थता दर्शविलेने सदरचे यंत्र तक्रारदार यांनी मागणी केलेप्रमाणे मंजूर झाले आहे व सदरचे यंत्र रत्नाबाई शिंदे यांचेकडून परस्पर घेऊन शेडमध्ये कार्यान्वीत करावे असे पत्र पाठवले. तथापी तक्रारदाराने जाबदार यांचेकडे लघुअंडी उबविणारे नवीन यंत्राची मागणी केली होती. त्याअनुषंगाने तक्रारदाराने जाबदार यांना भेटून नवीन यंत्राची मागणी केली असता, तुम्हास नवीन यंत्र मंजूर झालेले नाही. त्यामुळे श्रीमती रत्नाबाई शिदे यांचेच यंत्र घ्यावे लागेल असे सांगितले. वस्तुतः तक्रारदाराने नवीन यंत्राचे प्राप्तीसाठी जाबदारांकडे भरावी लागणारी 25 टक्के रक्कम रुपये 41,000/- (रुपये एक्केचाळीस हाजर मात्र) जाबदारांकडे जमा करुनही जाबदाराने तक्रारदाराला नवीन अंडी उबविण्याचे यंत्र दिलेले नाही तर रत्नाबाई शिंदे यांचे जुने मशिन घ्यायला भाग पाडले. तक्रारदाराने त्याचे उदरनिर्वाहासाठी साधन नसलेने प्रस्तुत रत्नाबाई शिंदे यांचे अंडी उबविण्याचे यंत्र मार्च 2014 मध्ये शेडमध्ये आणून बसवले. परंतू प्रस्तुत मशिन शेडमध्ये आणून लावलेवर सदरचे मशिन बंद पडलेचे व खराब, नादुरुस्त असलेचे तक्रारदार यांचे निदर्शनास आले. सदर मशिनचा अंडी ठेवणेचा ट्रे सडलेचे दिसून आले. तसेच सदर मशिनचे बॅटरी व इन्व्हरर्टर पूर्णपणे खराब झालेचे निदर्शनास आले. तसेच सदर यंत्रामधील मोटारीचा धडधड असा प्रचंड आवाज येत असून इंडिकेटरसुध्दा बंद स्वरुपात आहे. एकंदरीत सदरचे अंडी उबविण्याचे यंत्र हे पूर्णपणे निष्प्रभ व निरुपयोगी झाले असून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे सदर यंत्राचा तक्रारदाराला अंडी उबवण्याकरीता वापर करता येत नाही व आलेला नाही. त्यासंदर्भात तक्रारदाराने जाबदारांकडे चौकशी करुन त्यांना परिस्थितीची कल्पना दिली असता सदर जाबदार यांनी तक्रारदार यांना, शासनाने नियुक्त केलेले मशिन ऑपरेटर्समार्फत मशिन दुरुस्त करुन मिळेल असा भरवसा व खात्री दिली. तथापी, तक्रारदाराने वारंवार हेलपाटे मारुनही जाबदाराने तक्रारदाराचे सदोष यंत्रामधील दोष काढून दुरुस्त करुन देणेची कोणतीही तजवीज केलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराने दि. 3/6/2014 रोजी जाबदार क्र. 3 ला लेखी पत्र देऊन मशिन दुरुस्त करुन देणेबाबत कळविले. सदरचे पत्र जाबदाराने स्विकारुनही जाबदाराने कोणतीही पूर्तता व तजवीज केली नाही त्यामुळे तक्रारदाराने दि. 8/7/2014 रोजी सदर दोषयुक्त मशिन परत घेऊन त्या मशिनऐवजी दुसरे नवीन मशिन तात्काळ बदलून द्यावे अथवा मशिनपोटी तक्रारदाराने जाबदारांकडे जमा केलेली रक्कम रु.41,000/- परत करावेत असे लेखी पत्र हस्त पोहोचीने जाबदाराला दिले व त्याचे स्थळप्रतीवर जाबदार क्र. 2 ने सही शिक्क्यानिशी सदर पत्र पोहोचल्याची पोहोच दिली आहे. परंतू तदनंतरही जाबदार यांनी मशिन नवीन बदलून दिले नाही अथवा तक्रारदाराने मशिनपोटी जाबदाराला दिलेली रक्कम रु.41,000/- तक्रारदाराला जाबदाराने परत अदा केलेली नाही. अशाप्रकारे तक्रारदाराला जाबदाराने सदोष सेवा पुरविली आहे. त्यामुळे जाबदारकडून सदोष मशिन बदलून मिळावे अथवा मशिनसाठी तक्रारदाराने जाबदारांकडे जमा केलेली रक्कम परत मिळावी तसेच नुकसानभरपाई मिळणेसाठी तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुत कामी तक्रारदाराने जाबदार यांचेकडून दोषयुक्त अंडी उबवण्याचे यंत्राचे बदल्यात दुसरे नवीन अंडी उबविण्याचे यंत्र/मशिन एक महिन्याच्या आत बदलून मिळावे, प्रस्तुत नवीन मशिन जाबदाराला देणे अशक्य असलेस जाबदाराने तक्रारदारकडून मशिनपोटी घेतलेली रक्कम रु.41,000/- तक्रारदाराला जाबदाकडून मिळावी. प्रस्तुत रकमेवर दि.24 डिसेंबर,2013 पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याज जाबदारांकडून मिळावे, तक्रारदाराचे झाले आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु.2,40,000/- जाबदारांकडून मिळाले, तक्रारदाराने पत्र्याचे शेड उभे करण्यासाठी केलेला खर्च रक्कम रु.80,000/- जाबदारांकडून मिळावा, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख मात्र) तक्रारदार याना जाबदारानी द्यावेत तसेच अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.15,000/- जाबदारांकडून अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि. 4 चे कागदयादीसोबत नि. 4/1 ते नि. 4/6 कडे अनुक्रमे महाराष्ट्र शासनाचे लघुअंडी उबवणूक यंत्राचे माहितीपत्रक, तक्रारदाराने जाबदार क्र. 2 ला दिले पत्राची स्थळप्रत, तक्रारदाराने जाबदार क्र. 2 कडे जमा केले डी.डी.ची झेरॉक्स प्रत, जाबदार क्र. 2 ने तक्रारदाराला पाठवले पत्राची प्रत, तक्रारदाराने जाबदार क्र. 3 जा दिले पत्राची स्थळप्रत, तकारदाराने जाबदार क्र. 2 ला दिले पत्राची सत्य प्रत, नि.19 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि. 20 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि. 24 कडे लेखी युक्तीवाद, नि.26 चे कागदयादीसोबत सरपंच, ग्रामपंचायत, पिंपळी बुद्रुक यांनी दिलेला दाखला सत्यप्रत वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार नं. 1 ते 3 यांनी नि. 16 कडे म्हणणे, नि. 17 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि. 18 चे कागदयादीसोबत नि. 18/1 ते नि. 18/11 कडे अनुक्रमे महाराष्ट्र शासन क्र. रा.कृ.वि.-2010/प्र.क्र.362/पदुम-4, मंत्रालय, मुंबई शासननिर्णय, मे. कमिशनर, अँनिमल हजबंडरी यांनी मे. तिरुपती ट्रेडलिंक, नागपूर यांचेबरोबर केलेला करार, लाभार्थींचे बंधपत्र, रत्नाबाई शिंदे, निढळ यांना अंडी उबवणी यंत्र मंजूर झाल्याचा आदेश, राजेंद्र सुभेदार जगदाळे (तक्रारदार) यांनी अडी उबवणी यंत्र मिळावे म्हणून केलेला प्रस्ताव, अंडी उबवणी यंत्र ताब्यात घेऊन जाणेबाबत कमीटीने दिलेली मान्यता, तक्रारदाराने अंडी उबवणी यंत्र ताब्यात घेणेबाबत दिलेले पत्र, तक्रारदार यांनी यंत्राबाबत जाबदार यांचेकडे केलेली तक्रार, जाबदार यांनी तक्रारदार व इतर यंत्रधारकांच्या यंत्रांची दुरुस्ती करणेबाबत मे.तिरुपती ट्रेडलिंक, नागपूर यांना दिलेले पत्र, मे. तिरुपती ट्रेडलिंक यांनी जागेवर पाहणी करुन दिलेला रिपोर्ट, तिरुपती ट्रेडलिंकचा सर्व्हीस रिपोर्ट, नि. 22 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि. 24 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे जाबदार यांनी याकामी दाखल केली आहेत. जाबदार क्र. 1 ते 3 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथन फेटाळलेली आहेत. त्यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप घेतलेले आहेत.
i तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील मजकूर मान्य व कबूल नाही. जाबदार हे अंडी उबविण्याचे यंत्राचे उत्पादक नाहीत किंवा सप्लायरही नाहीत व अशा उत्पादक कंपनीचे एजंटही नाहीत म्हणून तक्रारदार व सदर जाबदार यांचे दरम्यान विक्रेता/त्याचा एजंट व ग्राहक असे नाते नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार अर्ज या मे. मंचात चालू शकत नाही, या तक्रारीतील व्यवहार कसा झाला याची तपशीलवार माहीती पुढीलप्रमाणे,
अ. अंडी उबवणी मशिन शेतक-यांना पुरविण्याबाबत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत “ लघु अंडी उबवणी यंत्रवाटप ” अशी एक योजना आहे. या योजनेची थोडक्यात माहिती व्हावी म्हणून या म्हणाण्यासोबत महाराष्ट्र शासन, कृष, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, व मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचा शासन निर्णय क्र.रा.कृ.वि.-2010/प्रक्र. 362/पदुम-4, मंत्रालय, मुंबई दि.28/7/2010 चा शासन निर्णय प्रत दाखल केली आहे. यातील उपाययोजना-2 मध्ये अनुदानावर लघुअंडी उबवणी यंत्राचा पुरवठा करावा याचा उल्लेख आहे. कुक्कुटपालकाने 25 टक्के रक्कम भरावी व 75 टक्के रक्कम शासकीय अनुदानातून हे यंत्र कुक्कुटपालकास/बचतगटांना देण्यात यावे अशी ही योजना आहे.
ब. अशी लघु अंडी उबवणी यंत्रे पुरविणा-या “मे. तिरुपती ट्रेडलिंक”, नागपूर यांचेबरोबर या संबंधीत करार मे. कमिशनरसो, अँनिमल हजबंडरी,पुणे-1 यांनी दि. 4/1/2012 रोजी केला आहे. या यंत्राचा पुरवठा कसा करावयाचा, त्याची क्वॉलीटी, नंतरची दुरुस्ती इत्यादी सर्व बाबींचा समावेश आहे.
क. प्रस्तुत जाबदार यांचेकडे सदरचे काम सोपविले आहे. मंजूर लाभार्थ्यांनी अनुदानाच्या अटीनुसार 25 टक्के रक्कम जिल्हा परिषदेकडे भरल्यावर ती रक्कम प्रस्तुत कामी तक्रारदाराने केलेली नुकसानभरपाईची मागणी तसेच मशीन रिप्लेसमेंट करुन देणेची मागणी केलेली आहे. परंतू तक्रारदाराने मे. तिरुपती ट्रेडलिंक, नागपूर यांना पक्षकार करणे कायद्याने बंधनकारक व आवश्यक असतानाही सदर मे. तिरुपती ट्रेडलिंक यांना आवश्यक पक्षकार म्हणून सामील केले नाही. प्रस्तुत नुकसानभरपाई देणेची जबाबदारी सदर मे. तिरुपती ट्रेडलिंक, नागपूर यांची आहे. तसेच तक्रारदाराने शेडची नुकसानभरपाई रक्कम रु. 80,000/- ची मागणी केली आहे. परंतू तक्रारदाराने यंत्र अनुदानावर मिळणेसाठी अर्ज केला त्यापूर्वीच तक्रारदाराचे 400 पक्षांचे शेड होते व आहे. त्यामुळे प्रस्तुत शेडची नुकसानभरपाई तक्रारदाराला मागता येणार नाही. यातील सर्व नुकसानभरपाई देणेची जबाबदारी प्रस्तुत जाबदारांची नाही तर मे. तिरुपती ट्रेडलिंक या कंपनीची आहे. तरी जाबदार यांना या जबाबदारीतून वगळणेत यावे व तक्रारदाराचा तक्रार अर्ज फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदार क्र. 1 ते 3 यांनी दिले आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाच्या निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदार यांचेदरम्यान ग्राहक
व सेवापुरवठादार असे नाते आहे काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश? खालील आदेशात
नमूद केलेप्रमाणे
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराने महाराष्ट्र शासनाच्या सदर अंडी उबवणूक करण्याच्या योजनेची माहिती मिळाल्यानंतर व सदर अंडी उबवणूक करण्याच्या यंत्राच्या खरेदीवर महाराष्ट्र शासन हे 75 टक्के रक्कम लाभार्थीस अनुदानाची रक्कम तसेच 25 टक्के रक्कम ही लाभार्थीकडून स्विकारुन सदर यंत्रांची विक्री ही लोकांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने वर नमूद जाबदार क्र. 1 ते 3 करीत होते व आहेत. त्या अनुषंगाने सदर तक्रारदार यांनी महाराष्ट्र शासनाकडे योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करुन सदर अंडी उबवणूक करणा-या यंत्राची मागणी केली. सदर मागणी महाराष्ट्र शासनाने मंजूर करुन तक्रारदार यांना अंडी उबवणूक यंत्राची मागणी केली. सदरची मागणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाबदार यांनी मंजूर करुन तक्रारदाराला अंडी उबवणूक करण्याचे यंत्र देण्याचे मान्य व कबूल केले. त्यानुसार तक्रारदाराकडून रक्कम रु.41,000/- ही 25 टक्के रक्कम मागणी केली. प्रस्तुत रक्कम तक्रारदाराने दि.24/12/2013 रोजी जाबदार क्र. 2 यांचे नावाचा बँक ऑफ महाराष्ट्र, दहिवडी शाखेचा डि.डि. ने जाबदाराला अदा केली आहे. व त्यानुसार महाराष्ट्र शासनामार्फत 75 टक्के रक्कम अंडी उबवणूक यंत्राच्या खरेदीसाठी देऊन सदर अंडी उबवणूकीचे यंत्र तक्रारदाराला देणेत आले. या सर्व बाबी जाबदाराने मान्य व कबूल केल्या आहेत. संदर्भीय कागदपत्रेही तक्रारदाराने नि. 4 चे कागदयादीसोबत नि. 4/1 ते नि.4/6 कडे दाखल केली आहेत. यावरुन तक्रारदार व जाबदार यांचेदरम्यान सदर अंडी उबवणूक यंत्राबाबतचा करार झाला असून तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असून जाबदार क्र. 1 ते 3 हे तक्रारदाराचे सेवापुरवठादार आहेत हे निर्विवादपणे सिध्द होत आहे. सबब आम्ही मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे..
7. वर नमूद मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराने जाबदार यांचेकडे मागणीप्रमाणे आवश्यक असलेली रक्कम डी.डी.नं जमा केल्यानंतर सदर जाबदार यांनी तक्रारदार यांना अंडी उबविण्याचे यंत्र तातडीने देणे बंधनकारक होते. तथापी जाबदाराने तक्रारदार यांना प्रस्तुत यंत्र तक्रारदाराने वारंवार मागणी करुनही लवकर अदा केले नाही. केवळ आश्वासने देऊन वेळ मारुन नेत होते व नंतर दि. 20/2/2014 रोजी पत्र पाठवून राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सन 2011-2012 मध्ये श्रीमती रत्नाबाई बाळासाहेब शिंदे, रा. निढळ, ता. खटावे, जि.सातारा यांना लघुअंडी उबवणी यंत्र दिले होते. सदर यंत्र चालवण्यास रत्नाबाई शिंदे यांनी असमर्थता दर्शविलेने प्रस्तुत यंत्र तक्रारदार यांना मागणी केलेनुसार मंजूर झालेले आहे व सदरचे यंत्र तक्रारदार यांना मागणी केलेनुसार मंजूर झालेले आहे व सदरचे यंत्र तक्रारदार यांना मागणी केलेनुसार “तक्रारदाराने श्रीमती शिंदे यांचे घरातून परस्पर घेऊन शेड मध्ये कार्यान्वित करावे” असे पत्र पाठवले. तथापी, तक्रारदाराने जाबदार यांचेकडे नवीन लघुअंडी उबविणारे यंत्राची मागणी केली होती. त्याअनुषंगाने तक्रारदाराने जाबदार क्र. 1 व 2 यांचेकडे प्रत्यक्ष भेटून तक्रारदाराने नवीन यंत्राची मागणी केली असता जाबदार क्र 1 व 2 यांनी तुम्हास नवीन यंत्र मंजूर झाले नाही. त्यामुळे तुम्हास श्रीमती शिंदे यांचे जुनेच यंत्र घ्यावे लागेल असे सांगितले. वास्तवीक तक्रारदाराने नवीन यंत्रासाठी भरावे लागणारी 25 टक्के रक्कम जाबदारांकडे भरली होती. परंतू जाबदाराने तक्रारदाराला जुने यंत्र देऊन घेणेस भाग पाडले व प्रस्तुत सदोष अंडी उबविण्याचे यंत्र तक्रारदाराचे शेडमध्ये जोडले व सदरचे यंत्र हे मशिन बंद पडलेले खराब झालेले असलेचे तक्रारदाराचे निदर्शनास आले. तसेच सदरचे यंत्र हे अनेक दिवस बंद असलेने सदर मशिनचे अंडी ठेवण्यासाठी असलेला ट्रे सडलेला दिसून आला. तसेच सदरचे मशीनचे बॅटरी व इन्र्व्हर्टर खराब असलेचे तक्रारदाराचे निदर्शनास आले. तसेच यंत्रामध्ये मोटारीचा धडधड आवाज येत असलेचे लक्षात आले, इंडिकेटर बंद होता, ते अंडी उबवणुकीसाठी पूर्ण निष्प्रभ व निकामी झाले होते. त्याचा कोणताच उपयोग अंडी उबविण्यासाठी करता येत नव्हता याची पूर्ण कल्पना तक्रारदाराने जाबदाराला दिली. जाबदाराने शासनाने नियुक्त केलेले ऑपरेटर्स देऊन मशिन दुरुस्त करुन देणेची खात्री दिली. परंतू मशिन जाबदाराने दुरुस्त करुन दिले नाही. ते बंद अवस्थेतच आहे. या सर्व बाबी तक्रारदाराने नि. 4/1 ते नि.4/6 कडे दाखल केले सर्व कागदपत्रांवरुन स्पष्ट होत आहे. प्रस्तुत कामी तक्रारदार व जाबदार यांचेदरम्यान व्यवहार झाला आहे. तसेच करार पण झाला होता. त्यामुळे तक्रारदाराला सेवा पुरविण्याची सर्वस्वी जबाबदारी ही जाबदार क्र. 1 ते 3 यांचीच होती व आहे. परंतू जाबदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदार यांना नवीन अंडी उबवणूक करण्याचे यंत्र न देता जुने यंत्र देवून तसेच सदर यंत्र हे सदोष बंद अवस्थेत असून निरुपयोगी असतानाही याची सर्व कल्पना तक्रारदाराने जाबदार यांना देवूनही जाबदाराने प्रस्तुत अंडी उबविण्याचे यंत्र तक्रारदाराला दुरुस्त करुन दिले नाही. तसेच तक्रारदाराचे मागणीप्रमाणे तक्रारदाराला नवीन यंत्र उपलब्ध करुन न देता जने सदोष/नादुरुस्त यंत्र तक्रारदाराला जाबदाराने दिले आहे ही बाब प्रस्तुत कामातील तक्रारदार व जाबदाराने दाखल केले सर्व कागदपत्रांवरुन सिध्द झाली आहे. सबब तक्रारदार यांना जाबदार यांनी सदोष सेवा पुरविली आहे हे सिध्द झाले आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिलेले आहे.
वरील सर्व विवेचनाचा, कागदपत्रांचा, लेखी तोंडी युक्तीवाद पुरावे यांचा सखोल अभ्यास करता तक्रारदार यांना जाबदार यांनी सदोष सेवा पुरविली आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार हे जाबदार यांचेकडून नवीन अंडी उबविण्याचे यंत्र मिळण्यास पात्र आहेत. तसेच नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहेत.
9. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदार यांना दिलेले अंडी उबविण्याचे मशिन
बदलून त्याच किंमतीचे/मॉडेलचे नवीन मशिन बदलून द्यावे.
3. जाबदार यांनी तक्रारदारास यास वर नमूद नवीन मशिन बदलून देणे अशक्य
असलेस तक्रारदाराने प्रस्तुत अंडी उबवणूक मशिनचे किंमतीपैकी जाबदाराकडे
जमा केलेली 25 टक्के रक्कम रु.41,000/- अर्ज दाखल तारखेपासून रक्कम
प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने तक्रारदाराला
अदा करावी.
4. तक्रारदाराला झाले आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु.20,000/- (रुपये वीस
हजार मात्र) जाबदारांनी अदा करावेत.
5. तक्रारदाराला झाले मानसिक व शारिरीक त्रासापोटी जाबदारांनी तक्रारदाराला
रक्कम रु.10,000/- (रुपये दहा हजार मात्र) अदा करावेत.
6. जाबदारानी तक्रारदारास अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.5,000/- (रुपये पाच
हजार मात्र) अदा करावेत
7. वरील सर्व आदेशांची पूर्तता जाबदारानी आदेश पारीत झाले तारखेपासून 45
दिवसात करावी.
8. विहीत मुदतीत आदेशाचे पालन जाबदार यांनी न केलेस तक्रारदार
यांना जाबदारांविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 प्रमाणे कारवाई
करणेची मुभा राहील.
12. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
13. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 21-11-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.