::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, उमेश वि. जावळीकर मा. अध्यक्ष
१. सामनेवाले यांनी, तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. सामनेवाले क्र. १ ते ३ विकसीत करीत असलेल्या कन्हैया सिटी फेस २ मौजा वगधारा तह. हिंगना जि. नागपुर येथिल खसरा क्र. १०८ व १०९ प.ह.क. ४६ या मिळकतीवर उभारण्यात येणा-या संकुलातील रो- हाऊस क्र. २४९ जेस्मीन एक बेडरुम, हॉल, किचन प्लॉट आराजी ६४७.०० सुपरबिल्ट अप एरीया ३९०.०० चौ. फुट मिळकतीची खरेदी किंमत रक्कम रु. ६,५१,०००/- निश्चीत करुन दिनांक १३.०९.२०१० रोजी धनादेशाव्दारे रक्कम रु. ११,०००/-, दिनांक २०.०९.२०१० रोजी रक्कम रु. ५१,०००/- व दिनांक २१.१०.२०१० रोजी रक्कम रु. ६८,०००/- अशी एकुण रक्कम रु. १,३०,०००/- तक्रारदारांनी सामनेवाले क्र. १ ते ३ यांना अदा केले. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी दिनांक ०२.१२.२०१० रोजी केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तीप्रमाणे २४ ते ३० महिण्याच्या कालावधीमध्ये रो-हाऊसचा ताबा देण्याबाबत कबुल केले होते. परंतु सदर बाबीची पुर्तता न झाल्याने तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. १ ते ४ यांना वकिलामार्फत दिनांक १४.०७.२०१५ रोजी नोटीस पाटवुन रो-हाऊसचा ताबा देण्याबाबत विलंब केल्याने व्यवहाराची रक्कम परत करावी अशी मागणी करुन देखील सामनेवाले क्र. १ ते ४ यांनी रक्कम परत न दिल्याने तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार दाखल आहे.
३. सामनेवाले क्र. १ ते ३ यांना मंचाची नोटीस पाठविली असता, हजर न राहिल्याने दिनांक १४.०७.२०१६ रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले. सदर आदेश आज रोजी अबाधित आहेत.
४. सामनेवाले क्र. ४ यांना मंचाची नोटीस पाठविली असता, सामनेवाले क्र. ४ यांनी तक्रारीतील मुद्द्याचे खंडन करुन सामनेवाले क्र. १ ते ३ यांचे कंपनीशी व तक्रारदाराशी कुठलाही संबंध नाही. तसेच तक्रारदाराने सामनवाले क्र. ४ च्या माध्यमातुन सामनेवाले क्र. १ ते ३ च्या वतीने कुठलीही रक्कम स्विकारली नसुन सदरहु रक्कम तक्रारदारांच्या वतीने सामनेवाले क्र. १ ते ३ यांना दिली नाही. त्यामुळे सामनेवालेक्र. ४ हे सामनेवाले क्र. १ ते ३ यांचे कंपनीचे प्रतिनीधी होते. हि बाब सिध्द झालेली नाही. त्यामुळे सामनेवाले क्र. ४ यांचे विरुध्द तक्रार अमान्य करण्यात यावी. अशी विनंती सामनेवाले क्र. ४ यांनी केली आहे.
६. तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवादाची पुरशिस व सामनेवाले क्र. ४ यांचे लेखी म्हणने, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवादाची पुरशिस यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दे निष्कर्ष
१. सामनेवाले क्र. १ ते ३ वैयक्तीक व संयुक्तीकपणे
यांनी तक्रारदारास प्लॅाट विक्री कराराप्रमाणे सेवासुविधा
पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार सिद्ध
करतात काय ? होय
२. सामनेवाले क्र. १ ते ३ वैयक्तीक व संयुक्तीकपणे
तक्रारदारास नुकसान भरपाई अदा करण्यास पात्र
आहेत काय ? होय
३. सामनेवाले क्र. ४ यांनी तक्रारदारास प्लॅाट विक्री
कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची
बाब तक्रारदार सिद्ध करतात काय ? नाही
४. आदेश ? अंशतः मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ व २ :
५. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी दिनांक २७.१०.२०१० रोजी तक्रारदारासोबत केलेल्या प्लॉट विक्री करारनाम्यातील अटी व शर्तीप्रमाणे २४ ते ३० महिण्यांच्या कालावधीमध्ये प्लॉट चा वैध ताबा देण्याचे कबुल केले होते. परंतु त्याप्रमाणे पुर्तता न केल्याने तक्रारदाराने दिनांक १४.०७.२०१५ रोजी सामनेवाले क्र. १ ते ४ यांना वकिलामार्फत नोटीस पाठवुन व्याजासह रक्कम परत मिळण्याबाबत विनंती केली. सबब सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी तक्रारदारास सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब सिध्द झाल्याने व परिणामी तक्रारदारास मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झाला आहे ही बाब सिध्द झाल्याने मुद्दा क्रं. १ व २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र. ३ :
६. सामनेवाले क्र. ४ यांनी दिनांक २१.०७.२०१५ रोजी तक्रारदारास सदर नोटीसचे उत्तर पाठवुन नोटीस मधिल मुद्द्याचे खंडन केले. सामनेवाले क्र. ४ यांनी तक्रारदार व सामनेवाले क्र. ३ यांचेमध्ये व्यवहाराची कोणतेही माहिती सामनेवाले क्र. ४ यांना नसुन सामनेवाले क्र. ४ यांनी कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे सामनेवाले क्र. ४ यांनी तक्रारदारास कोणतीहीसेवा सुविधा पुरविण्यास कसुर केला नाही. सबब सामनेवाले क्र. ४ यांचे विरुध्द कोणतेही आदेश पारीत करण्यात येवु नये अशी विनंती केली आहे. सदर वाद कथनाहुन व कागपत्राचे अवलोकन केले असता सामनेवाले क्र. ४ यांची करारनाम्यावर कुठेही स्वाक्षरी नसुन तक्रारदारांनी सामनेवाले क्र. १ ते ३ यांना धनादेशाव्दारे रक्कम अदा केली असल्याने सामनेवाले क्र. ४ यांचे विरुध्द कोणतेही आदेश पारीत करणे न्यायोचीत नाही. असे मंचाचे मत आहे.
मुद्दा क्र. ४ :
७. मुद्दा क्रं. १ ते ३ वरील विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. १७४/२०१५ अंशतः मान्य करण्यात येते.
२. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे तक्रारदार
यांना प्लॉट खरेदी कराराप्रमाणे , ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये
तरतुदीनुसार, सेवासुविधा पुरविण्यात कसुर केल्याची बाब जाहीर
करण्यात येते.
३. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे तक्रारदार
यांना प्लॉट खरेदी कराराप्रमाणे रक्कम रुपये १,३०,०००/- दिनांक
०२.१२.२०१० पासून अदा करेपर्यंत द.सा.द.से. १२% व्याजासह
तक्रारदार यांना अदा करावी.
४. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे तक्रारदार
यांना प्लॉट खरेदी कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसूर करुन
तक्रारदार यांना मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासापोटी व तक्रार
खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. १,००,०००/- या आदेशप्राप्ती
दिनांकापासून ३० दिवसात तक्रारदार यांना अदा करावे.
५. सामनेवाले क्र. ४ यांचे विरुद्ध कोणतेही आदेश नाहीत.
६. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमत श्रीमती.कल्पना जांगडे श्रीमती. किर्ती गाडगीळ श्री.उमेश वि. जावळीकर
(सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष)