::: नि का ल प ञ :::
(आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,)
(पारीत दिनांक ३०/०६/२०२२)
१. प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा २०१९ चे कलम ३५ सह ३८ अन्वये दाखल केलेली असून तक्रारीचा आशय खालिल प्रमाणेः-
२. विरुध्द पक्ष क्रमाक १ ही चिट कपंनी असून विरुध्द पक्ष क्रमांक २ हे कंपनीचे संचालक असून संपूर्ण व्यवहार बघत असून संपूर्ण व्यवहारावर विरुध्द पक्ष क्रमांक २ चे नियंत्रण आहे. विरुध्द पक्ष हे त्यांचे चिट फंड कंपनीमध्ये ग्राहकाकडून ठेवी स्विकारण्याचा व्यवसाय करतात. तक्रारकर्त्यानेसुध्दा चिट फंड क्रमांक जेकेसी-एच-१-५-१६ मध्ये सहभाग घेतला. उपरोक्त चिट क्रमांक व त्यामधील टोकन क्रमांक २९ चे ग्राहकाने सप्टेंबर २०१६ मध्ये चिट फंड सोडून दिल्यामूळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास सप्टेंबर २०१८ मध्ये ऑगष्ट २०१६ पासूनची संपूर्ण रक्कमेचा भरणा करावयास सांगून त्यानंतर चिट मध्ये सहभागी केले. तक्रारकर्त्यास विरुध्द पक्षाकडे दरमहा रुपये १०,०००/- गुतंवणूक करावयाची होती. तक्रारकर्त्याने सहभाग घेतल्यानंतर विरध्द पक्षाचे सुचनेनुसार दरमहा चिटच्या रक्कमेचा भरणा त्यांचेकडे केला व त्यानुसार त्यांना टोकन क्रमांक २९ दिला. उपरोक्त चिट ऑगष्ट २०१६ मध्ये सुरु झाली असून सष्टेंबर २०२० मध्ये संपुष्टात आलेली आहे. तक्रारकर्त्यास विरुध्द पक्ष यांचेकडून दिनांक ०१/१०/२०२० पासून चिटची रक्क्म रुपये ५,००,०००/- मिळणे बाकी आहे. सदर रक्कमेची मागणी केली असता विरुध्दपक्ष यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या जमा असलेल्या उपरोक्त रक्कमेचा वापर त्यांचे व्यवसायात करून तक्रारकर्त्यास त्या रक्कमेच्या उपभोगापासून वंचीत केलेले आहे. तक्रारकर्त्यान ही रक्कम स्वतःचे व्यवसायात गुंतविली असती तर त्यांना कमीत कमी ४० टक्के नफा झाला असता व जर सदर रक्कम बॅंकेत गुंतविली असती तर तक्रारकर्त्यास १८ टक्के दराने वाढ मिळाली असती. विरुध्दपक्ष यांनी त्यांच्या सर्व ग्राहकाकडून सहभाग केलेली रक्कम तक्रारकर्त्यास देण्याकरीता वसूल केल्यानंतरही तक्रारकर्त्यास दिलेली नाही. तक्रारकर्त्याच्या मागणी नंतर ही विरुध्द पक्षांनी उपरोक्त रक्क्म न दिल्यामूळे तक्रारकत्याने दिनांक ०२/०९/२०२१ रोजी अधिवक्ता श्री अभय कुल्लरवार यांचे मार्फत विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांना पंजिबध्द डाकेने नोटीस पाठविली. नोटीस प्राप्त होवून सुध्दा विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांनी त्याची पुर्तता न केल्यामुळे तक्रारकर्त्याने आयोगासमोर प्रस्तूत तक्रार दाखल केली असून त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्यास चिट क्रमांक जेकेसी-एच-१-५-१६ मधील टोकन क्रमांक २९ मध्ये दिनांक ०१/१०/२०२० पासून रुपये ५,००,०००/- या रकमेवर, रक्कम मिळेपर्यंत २४ टक्के दराने नुकसानभरपाईसह रक्कम तक्रारकर्त्यास विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे दयावी. तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई रक्कम रुपये १,००,०००/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये २५,०००/- वैयक्तीक व संयुक्तीकपणे विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्यास दयावी.
३. तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन फक्त विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना नोटीस प्राप्त होऊन ते आयोगासमक्ष दिनांक ०१/१२/२०२१ रोजी प्रकरणामध्ये उपस्थित राहूनही त्यांनी लेखी उत्तर दाखल न केल्यामूळे त्यांचे विरुध्द लेखी उत्तराशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश निशानी क्रमाक १ वर दिनांक ०७/०६/२०२२ रोजी पारीत करण्यात आला.
४. तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, दस्तावेज, शपथपञ आणि तक्रारकर्त्याचा तोंडी युक्तिवाद यावरुन खालिल मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले व त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्षे
१. तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष क्र. १ व २ यांचे होय
ग्राहक आहेत काय ॽ
२. विरुध्द पक्ष क्र. १ व २ यांनी तक्रारकर्त्याप्रति होय
न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ॽ
३. आदेश काय ॽ अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
मुद्दा क्रमांक १ बाबतः-
५. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांकडे ऑगष्ट २०१६ पासून सष्टेंबर २०२० पर्यंत या कालावधीकरिता १०,००० × ५० = रुपये ५,००,०००/- ग्रुप जेकेसीएच-१-५-१६, सबस्क्राईबर/चिट क्रमांक २९ मध्ये सहभाग घेतला. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांकडे दरमहा चिटच्या रकमेचा कमी जास्त प्रमाणात भरणा केला. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याकडून रक्कम स्वीकारुन पासबुक मध्ये नोंद घेवून स्वाक्षरी केल्याचे निदर्शनास येते. तक्रारकर्त्याने सदर पासबुक प्रकरणात निशानी क्रमांक ४ सोबत दस्त क्रमांक अ-१ वर दाखल केले आहे. यावरुन तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांचे ग्राहक आहेत, हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक २ बाबतः-
६. तक्रार व त्यामधिल दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांना विरुध्द पक्षांकडे दरमहा रुपये १०,०००/- प्रमाणे ५० महिण्यात/हप्त्यात रुपये ५,००,०००/- भरणा करायचा होता परंतु तक्रारकर्त्याने सप्टेंबर २०२० पर्यंत विरुध्द पक्षांकडे कमी जास्त प्रमाणात रक्कम जमा केलेली आहे आणि त्या रक्कमेचा विरुध्दपक्षांनी स्विकार करुन तशी नोंद पासबुकमध्ये करुन दिलेली आहे हे दस्त क्रमांक अ-१ वरुन स्पष्ट दिसून येते. उपरोक्त चिट क्रमांक २९ ही सप्टेंबर २०२० मध्ये या कालावधी मध्ये संपुष्टात आलेला आहे. तक्रारकत्याने आपले तक्रारीत असे कथन केले आहे की, तक्रारर्त्याने सप्टेंबर २०१८ मध्ये उपरोक्त चिट क्रमांक २९ मध्ये सहभाग घेतला हा त्यावेळी दुस-या ग्राहकाचा होता परंतु विरुध्द पक्षांनी दिलेल्या प्रस्तावानुसार तक्रारकर्त्याने ऑगस्ट २०१६ पासूनच्या संपूर्ण रकमेचा भरणा केल्यानंतर त्यांना चिट क्रमांक २९ मध्ये सहभागी करुन हा क्रमांक देण्यात आला. या कथनापुष्टर्थ तक्रारकर्त्याने शपथपञ सुध्दा दाखल केलेले आहे. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याचे कथन प्रकरणात उपस्थित राहून खोडून काढले नाही व तसेच आपले बचावाचे समर्थनार्थ कोणतेही दस्तावेज दाखल केले नाही त्यामुळे तक्रारकर्त्याने सप्टेंबर २०१८ मध्ये चिट क्रमांक २९ मध्ये सहभाग घेतला तेव्हा ऑगस्ट २०१६ पासून संपूर्ण रकमेचा भरणा केला हे कथन ग्राह्य धरण्यायोग्य आहे. उपरोक्त चिट क्रमांकाचा कालावधी सप्टेंबर २०२० मध्ये संपुष्टात आल्याने तक्रारकर्त्याने १/१०/२०२० पासून विरुध्द पक्षांकडे चिट फंड मध्ये जमा असलेल्या रकमेची मागणी केली, परंतु विरुध्द पक्षांनी रक्कम परत केली नाही त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक ०२/०९/२०२१ रोजी विरुध्द पक्षांना अधिवक्ता मार्फत नोटीस पाठविली परंतु नोटीस प्राप्त झाल्यावरही त्यांनी त्याची पुर्तता केली नाही. सदर नोटीस, पोस्टाच्या पावत्या व पोच पावती अनुक्रमे दस्त क्रमांक अ-३ ते अ-७ वर प्रकरणात दाखल आहे. तक्रारकर्त्याचे कथन विरुध्द पक्षांनी तक्रारीत उपस्थित राहून खोडून काढलेले नाही तसेच आपल्या बचावाचे समर्थनार्थ कोणतेही म्हणणे प्रकरणात दाखल केले नाही. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षांकडे चिट फंड मध्ये रक्कम जमा केल्याचे पासबुक वरुन स्पष्ट होते. त्यामुळे विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ हे तक्रारकर्त्याला उपरोक्त पासबुक मध्ये जमा असलेली रक्कम देणे लागतात परंतु मागणीनंतर तसेच परिपक्वता तिथीनंतर तक्रारकर्त्याने वारंवार मागणी करुनही विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याला रक्कम परत न करुन तक्रारकर्त्याप्रति सेवेत न्युनता दर्शविली हे दाखल दस्तवेजांवरुन सिध्द होते या निष्कर्षाप्रत आयोग आले आहेत. त्यामुळे तक्रारकर्ता हे विरुध्द पक्षांकडून पासबुक मध्ये जमा असलेली रक्कम व्याजासह तसेच रक्कम परत न केल्याने झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पाञ आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक ३ बाबतः-
७. मुद्दा क्रमांक १ व २ च्या विवेंचनावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार क्र. १७२/२०२१ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्तिक वा संयुक्तरित्या तक्रारर्त्याला ग्रुप जेकेसीएच-१-५-१६ सब्रस्क्राईबर/चिट क्रमांक २९ पासबुक मध्ये जमा असलेली रक्कम व त्यावर निकाल दिनांक ३०/०६/२०२२ पासून ६ टक्के द.सा.द.शे. व्याज तक्रारकर्त्याचे प्रत्यक्ष रक्कम हातात पडेपर्यंत अदा करावे.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्तिक वा संयुक्तरित्या तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये ५,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- द्यावे.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावेत.