::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, किर्ती गाडगिळ(वैदय) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- ०७/०१/२०१६ )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
१. अर्जदाराने आपल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदार हा चंद्रपूर येथिल रहिवासी असून गैरअर्जदाराचा चिटस फंडचा व्यवसाय असून ते ग्राहकाकडून ठेवी स्विकारण्याचा तसेच ग्राहकांना दरमहा रक्कम गुंतवणूक करुन एकदम रक्कम देण्याचा व्यवसाय करतात. हा व्यवसाय करतांना गैरअर्जदार ग्राहकाकडून घेतलेल्या रकमेवर कमिशन घेवून तसेच योजनेच्या पहिल्या महिण्यात जमा झालेली ग्राहकांचीच रक्कम स्वतः ठेवून मोबदला वसूल करतात. गैरअर्जदाराने मे २०१२ मध्ये जे के सी – एच – ०१ -०५ – १२ या क्रमांकाची एक चिटस रु. ५,००,०००/-, ५० महिण्याकरीता सुरु केली यामध्ये अर्जदाराने सुध्दा सहभाग घेतला या योजनेत १०,०००/- रु दरमहा १५ तारखेपर्यंत भरावयाचे होते. ५० सभासदानी प्रत्येकी १०,०००/- रु. प्रमाणे ५,००,०००/- रु. जमा करायचे होते. त्याप्रमाणे अर्जदाराने दि. १७.०२.२०१४ पर्यात गैरअर्जदाराचे सांगण्याप्रमाणे वेळोवेळी रक्कम रु. १,४५,४८०/- रु. जमा केले व तशी पासबुकात नोंद असून ती तक्रारीत दस्त क्रं. अ- १ वर दाखल आहे. मार्च २०१४ मध्यें गैरअर्जदाराने अर्जदाराला काही तांञिक कारणामुळें चिटस बंद झाली आहे रक्कम भरु नका सुरु झाली कि, सुचना देवूअसे सांगून रक्कम घेणे बंद केले त्यावेळी अर्जदाराने जमा असलेली रक्कम परत मागितली असता गैरअर्जदाराने २०,०००/- वळतेकरुन १,२०,४८०/- रु. परत मिळतील असे सांगितले रक्क्म कपात होत आहे असे पाहून अर्जदाराने ती रक्कम जमा राहु दिली. परंतु जानेवारी २०१५ मध्ये अर्जदार पुन्हा रक्कम मागण्याकरीता गेला असता त्याची रकम जप्त करुन वळती केलेली आहे आता कोणतीही रक्क्म गैरअर्जदार देणे लागतनाही असे त्यांनी सांगितले अशा परिस्थितीत गैरअर्जदाराला अर्जदाराचे रक्कम अडकविण्याचा कोणताही अधिकार नाही व सदरची कृती ही अर्जदाराप्रति न्युनतापूर्ण सेवा असून अनुचित व्यापार पध्दती आहे. म्हणून अर्जदाराने गैरअर्जदाराविरुध्द मंचचासमक्ष तक्रार दाखल केली आहे.
२. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, अर्जदाराचे गैरअर्जदाराकडे नमुदखात्यात असलेली रक्कमरु. १,४५,४८०/- व त्यावर दि. १७.०२.२०१४ पासून रक्क्म अर्जदाराचे हातात लागेपर्यंत द.सा.द.शे. १८ टक्के दराने व्याज देण्यात यावे तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
३. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून नि. क्रं. ११ वर आपले लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने आपल्या लेख्खीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत लावलेले सर्व आरोप नाकबुल केलेले आहे. गैरअर्जदार पुढे नमुद करतो कि, अर्जदाराने मंचापासून खरी माहीती लपवून ठेवलेली आहे. गैरअर्जदार ही रजि. चिट कंपनी असून चिट फंड अॅक्ट नुसार चिट कंपनी लिमीटेड चिट मधील ग्रुपच्या सदस्याला चिट ची रक्कम वसूली करुन सुनिश्चित करण्याकरीता योग्य ती जमानत घेण्याचा कंपनीला अधिकार आहे. अर्जदाराने तक्रारीत नमुद केलेली चिटसचा तो सदस्य होता. सदर चिट ही ५० महिण्याकरीता रु. ५,००,०००/- ची होती.व प्रत्येक सदस्याला दरमहा १०,०००/- रु. भरावयाचे होते. सदरहु चिट मध्ये अर्जदाराचे मिञ श्री भगवान पाटील हे सुध्दा सदस्य होते. भगवान पाटील यांनी दि. १०.०९.२०१३ रोजी रु. ३,००,०००/- ची चिट उचल केली. भगवान पाटील हे अर्जदाराचे मिञ असल्यामूळे चिटची रक्कम भरण्याची हमी अर्जदाराने घेतली. त्यानुसार गैरअर्जदाराला भगवान पाटील यांच्या चिटची रक्कम अर्जदाराकडून वसूल करण्याचा अधिकार आहे.व त्यानुसार गैरअर्जदाराने अर्जदाराच्या रकमेतून भगवा पाटील यांची ज्ञिकीत रकमेची पूर्तता केली तरी पूर्ण रक्कम वसूली न झाल्यामुळे भगवान पाटील विरुध्द रकमेच्या वसूलीसाठी न्यायालयात केस दाखल केली. अर्जदार यांना भगवान पाटील यांच्या व्यवहाराबद्दल पूर्ण माहीती होती व त्यांची हमी घेतल्यामुळे थकीत रक्कम आपल्याकडून वसूल होणार याचीमाहीती अर्जदारास होती. व तशी कल्पना ही गैरअर्जदारानी अर्जदाराला दिली होती. म्हणून अर्जदाराने मार्च २०१४ पासून चिटच्या हप्त्यांची रक्कम भरणे बंद केले. अर्जदाराने सदर चिटची रक्कम मध्येच बंद केल्याने गैरअर्जदाराला पुढील रक्कम ग्रुप मध्ये भरावी लागत आहे. व त्यानंतरही अर्जदाराच्या ग्रुप मधील सदस्यांनी चिटची रक्कम उचल केलेली आहे. अर्जदाराचे असे म्हणणे कि, गैरअर्जदाराने चिट मध्येच बंद केली हे साफ चुकीचे आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराला दिलेल्या सेवेत कोणतीही कसूर केलेली नाही. तरी अर्जदाराचा अर्ज खारीज करण्यात यावा.
४. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
१. अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
२. गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? होय.
३. गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ? होय.
४. आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. १ बाबत ः-
५. अर्जदार हा चंद्रपूर येथिल रहिवासी असून गैरअर्जदाराचा चिटस फंडचा व्यवसाय असून ते ग्राहकाकडून ठेवी स्विकारण्याचा तसेच ग्राहकांना दरमहा रक्कम गुंतवणूक करुन एकदम रक्कम देण्याचा व्यवसाय करतात. हा व्यवसाय करतांना गैरअर्जदार ग्राहकाकडून घेतलेल्या रकमेवर कमिशन घेवून तसेच योजनेच्या पहिल्या महिण्यात जमा झालेली ग्राहकांचीच रक्कम स्वतः ठेवून मोबदला वसूल करतात. गैरअर्जदाराने मे २०१२ मध्ये जे के सी – एच – ०१ -०५ – १२ या क्रमांकाची एक चिटस रु. ५,००,०००/-, ५० महिण्याकरीता सुरु केली यामध्ये अर्जदाराने सुध्दा सहभाग घेतला या योजनेत १०,०००/- रु दरमहा १५ तारखेपर्यंत भरावयाचे होते. ५० सभासदानी प्रत्येकी १०,०००/- रु. प्रमाणे ५,००,०००/- रु. जमा करायचे होते. त्याप्रमाणे अर्जदाराने दि. १७.०२.२०१४ पर्यात गैरअर्जदाराचे सांगण्याप्रमाणे वेळोवेळी रक्कम रु. १,४५,४८०/- रु. जमा केले व तशी पासबुकात नोंद असून ती तक्रारीत नि. ४ वरील दस्त क्रं. अ- १ वर दाखल आहे. सदर उपरोक्त बाब ही गैरअर्जदारानी त्यांच्या लेखीउत्तरात मान्य केलेली असल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे असे सिध्द होत असल्याने मुद्दा क्रं. १ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. २ व ३ बाबत ः-
६. अर्जदाराने हा गैरअर्जदार चिटचा सदस्य असून त्याने सुरु केलेल्यार जे. के. सि. एच १५१२ या क्रंमांकाची चिटस मध्ये सहभाग घेतला सदर चिट ५० महिण्याकरीता असून ५,००,०००/- ची होती त्याप्रमाणे अर्जदाराने त्यात जून १२.०६.२०१२ पासून रु. १०,०००/- भरण्यास चालू केले व सदर रक्कम अर्जदाराने २०१४ पर्यंत भरले व त्याप्रमाणे अर्जदाराच्या खात्यात रु. १,४५,४८०/- जमा आहे. असे अर्जदाराने तक्रारीत दाखल केलेल्या नि. क्रं. ४ वरील दस्त क्रं. १ वरुन स्पष्ट होत आहे व त्याबद्दल गैरअर्जदाराचे दुमत नाही. परंतु गैरअर्जदाराने सदर तक्रारीत त्यांच्या लेखीबयाणात स्वतःचा बचाव करण्यासाठी जे विधान किंवा दस्ताऐवज दाखल केलेलें आहे कि, श्री. भगवान पाटील नामक व्यक्तीने सदर गैरअर्जदाराकडून कर्ज घेतले आहे आाणि त्यासाठी प्रस्तुत तक्रारीतील अर्जदार जमानतदार असल्यामुळे अर्जदाराच्या ठेवीतील रक्कम ही कर्ज वसूलीसाठी गैरअर्जदाराने वळते केल्यामुळे अर्जदारास रक्कम परत करण्यात आलेली नाही परंतु गैरअर्जदार यांनी भगवान पाटील या व्यक्तीकडून किती रक्कम वसूल करावयाची होती आणि त्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले याबद्दल त्यांच्या उत्तरात काहीही स्प्ष्ट केलेले नाही उलट गैरअर्जदार यांनी अर्जदार यांची जमा असलेली रक्कम अर्जदार यांना काहीही पूर्व नोटीस न देता वळती करुन घेतली. ही अर्जदाराप्रती गैरअर्जदाराची सेवेत ञुटी आहे तसेच गैरअर्जदार यांनी भगवान पाटील नामक व्यक्ती कडून उर्वरित रक्क्म वसूल करण्याकरीता दिवाणी न्यायालयात केस दाखल केलेली आहे असे त्यांनी बचावात कथन केलेले आहे परंतु त्या केसमधून त्यांना किती रक्कम प्राप्त झाली याबद्दल काहीही खुलासा केलेला नाही. अर्जदाराने तक्रारीत दाखल केलेल्या नि. क्रं. ४ दस्त क्र.१ वर दाखल असलेल्या पासबुकाप्रमाणे रक्कम मान्य करुनही गैरअर्जदाराने वेळेवर ती न देवून अर्जदाराप्रति सेवेते ञुटी व अनुचित व्यवहार पध्दतीचा अवलंब केलेला आहे असे सिध्द होत असल्याने मुद्दा क्रं. २ व ३ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. ४ बाबत ः-
७. मुद्दा क्रं. १ ते ३ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
१. अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. गैरअर्जदाराने अर्जदाराला त्याच्या खात्यात जमा असलेली रक्कम
रु. १,४५,४८०/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसाचे आत दयावे.
३. अर्जदाराला झालेल्या शारीरिक मानसिक ञासापोटी गैरअर्जदाराने रु.
१०,०००/- व तक्रारीचा खर्च रु. ५,०००/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून
४५ दिवसाचे आत दयावे.
४. उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - ०७/०१/२०१६