-निकालपत्र–
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष)
( पारित दिनांक- 18 जुलै,2016)
01. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष जेट एअरवेज आणि जेट लाईट कंपनी यांचे कडून सेवेतील कमतरते बद्दल नुकसान भरपाई मिळावी म्हणून ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हा एक प्रख्यात नेत्रशल्य चिकित्सक असून त्याने नागपूर व्यतिरिक्त मुंबई येथे पण विविध समाजसेवी संघटना/संस्थांच्या माध्यमातून प्रकल्प सुरु केले आहेत, त्यासाठी त्याला बरेचदा मुंबई-नागपूर प्रवास करावा लागतो. प्रवासा सोबत नेत्र शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ती साधने, उपकरणे, औषधी व पुस्तके त्याला आपल्या सोबत न्यावे लागतात. प्रवास करते वेळी उपकरणे, औषधी इत्यादीची बॅग लगेज स्वरुपात विमान कंपनीच्या सर्पुद करण्यात येते व ती बॅग विमानतळावर पोहचल्यावर सुरक्षित परत करण्याची जबाबदारी संबधित विमान कंपनीची असते.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, दिनांक-08/12/2009 ला त्याने मुंबई ते नागपूर हा प्रवास जेट लाईट (इंडीया) एअरवेज लिमिटेडच्या विमान सेवेने केलेला होता. मुंबईला त्याने नेत्रशल्य चिकित्सेसाठी आवश्यक ती उपकरणे, पुस्तके व औषधी इत्यादीची बॅग लगेज स्वरुपात विरुध्दपक्ष क्रं-3) जेट लाईट (इंडीया) लिमिटेडच्या स्वाधीन केले होते व त्यांचे कडून लगेज मिळाल्या बद्दल पावती घेतली होती. त्या बॅग मधील सामानाची अंदाजे किम्मत एकूण रुपये-1,14,034/- एवढी होती. तक्रारकर्ता जेंव्हा नागपूर विमानतळावर पोहचला व बॅग परत घेण्याची वाट पाहत असताना त्याचे लक्षात आले की, सदर बॅग विमानाच्या लगेज मध्ये उपलब्ध नव्हती, तशी चौकशी त्याने विरुध्दपक्षाकडे केली, त्यावेळी विरुध्दपक्षाने हे घोषीत केले की, त्याची सामानाची बॅग गहाळ झालेली आहे, म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाच्या या सेवेतील त्रृटीमुळे नुकसान भरपाई म्हणून त्यांचेकडे रुपये-1,14,034/- रकमेची मागणी केली होती. त्यावेळी विरुध्दपक्षाने ही बाब मान्य केली होती की, तक्रारकर्त्याचे नुकसान त्यांच्या सेवेतील त्रृटीमुळे झाले परंतु प्रत्यक्ष्यात झालेल्या नुकसानीला दुर्लक्षीत करुन विरुध्दपक्षाने केवळ रुपये-4500/- चा धनादेश तक्रारकर्त्याला पाठविला, परंतु त्याने तो स्विकारला नाही. त्यानंतर त्याने बरेच वेळा विरुध्दपक्षाला पत्र पाठवून झालेल्या नुकसानीची भरपाई मागितली परंतु विरुध्दपक्षाने आपली नुकसान भरपाईची जबाबदारी फेटाळून लावली. करीता या तक्रारीव्दारे त्याने झालेली नुकसान भरपाई रुपये-1,14,034/- द.सा.द.शे.9% दराने व्याजासह तसेच झालेल्या मानसिक त्रासाबद्दल भरपाई रुपये-50,000/- व तक्रारखर्च म्हणून रुपये-20,000/- ची मागणी विरुध्दपक्षा विरुध्द केलेली आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांना मंचाची नोटीस मिळून ते वकीला मार्फत हजर झालेत व विरुध्दपक्ष क्रं-1) तसेच विरुध्दपक्ष क्रं-2) आणि क्रं-3) यांनी लेखी जबाब मंचा समक्ष दाखल केलेत.
04. विरुध्दपक्ष क्रं-1) जेट एअरवेज (इंडीया) लिमिटेड यांनी नि.क्रं 9 प्रमाणे लेखी उत्तर दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरा मध्ये त्यांना या तक्रारीमध्ये विनाकारण प्रतिपक्ष बनविल्याचा आक्षेप घेतला आहे. त्यांच्या म्हणण्या नुसार जेट लाईट (इंडीया) लिमिटेड ही कंपनी, जेट एअरवेज (इंडीया) लिमिटेड या कंपनीशी संलग्न नसून स्वतंत्र कंपनी आहे. दोन्ही कंपनीज या कंपनी कायद्दा खालील स्वतंत्र व्यक्ती आहेत. तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं-1) यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा “Privities of Contract” नाही. तक्रारकर्त्याने जेट लाईट (इंडीया) लिमिटेड या विमान कंपनीचे
तिकिट काढले होते. विरुध्दपक्ष क्रं-1) जेट एअरवेज (इंडीया) लिमिटेडचे तिकीट काढलेले नव्हते. तक्रारकर्त्याचे जे काही नुकसान झालेले आहे, त्याची कबुली विरुध्दपक्ष क्रं-3) जेट लाईट इंडीया लिमिटेड यांनी दिलेली होती. म्हणून विरुध्दपक्ष क्रं-1) विरुध्द तक्रार करण्यास कुठलेही कारण उदभवत नाही. या सर्व कारणास्तव तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं-1) जेट एअरवेज (इंडीया) लिमिटेड तर्फे करण्यात आली.
05. विरुध्दपक्ष क्रं-2) व क्रं-3) जेट लाईट इंडीया लिमिटेड (Jet Lite (India) Ltd.) यांनी नि.क्रं-13 प्रमाणे लेखी उत्तर सादर केले. त्यांनी पण नमुद केले की, जेट लाईट (इंडीया) लिमिटेड आणि जेट एअरवेज (इंडीया) लिमिटेड या दोन वेगवेगळया कंपनीज आहेत. ही तक्रार ग्राहक संरक्षण कायद्दा नुसार तसेच कॅरेज बाय एअर एक्ट (“Carriage by Air Act”) या कायद्दा नुसार मुदतबाहय आहे. तसेच ही तक्रार या मंचाचे स्थानीय अधिकारक्षेत्रा (Territorial Jurisdiction) बाहेरील आहे. विरुध्दपक्ष क्रं-2 हे एअरपोर्ट कार्यालय असून, जेट लाईट कंपनीचे शाखा कार्यालय नाही. तिकिटावरील छापील अटी व शर्ती नुसार प्रवाश्यानीं त्यांचे जवळील मौल्यवान वस्तु लगेज म्हणून देण्यापेक्षा स्वतः जवळ ठेवाव्यात अशा सुचना दिलेल्या असतात, त्यामुळे तक्रारकर्त्याचे लगेज गहाळ झाल्या बद्दलची घटना या मध्ये केवळ तक्रारकर्त्याचाच निष्काळजीपणा होता. विमान त्याच्या गंतव्य स्थानावर पोहचल्यावर लगेज ते ट्रालीव्दारे एअरपोर्ट मधील कन्व्हेअर बेल्ट (Conveyor belt) पर्यंत आणल्या जाते आणि ते विमानतळ ऑथारिटी ऑफ इंडीया (Air Port Authority India (AAI)) यांच्या नियंत्रणाखाली असते तसेच ते सी.आय.एस.एफ.च्या सुरक्षेखाली असते. विरुध्दपक्षाचा विमानतळावरील सुरक्षे विषयी काहीही संबध नसतो. स्वतःचे लगेज ओळखणे ही प्रवाश्याची जबाबदारी असते.
तक्रारकर्त्याचे जे सामान गहाळ झाले त्या संबधी विरुध्दपक्ष क्रं-2) व क्रं-3) जेट लाईट इंडीया लिमिटेड (Jet Lite (India) यांचे असे म्हणणे आहे की, “Carriage by Air Act” च्या तरतुदी नुसार कुठलीही जास्तीची नुकसान भरपाईची रक्कम मागण्यासाठी, प्रवाश्यानीं त्यांचे सामान ताब्यात देण्यापूर्वी, सामानाच्या किंमती बद्दल घोषणापत्र देणे जरुरी असते व त्याच बरोबर लगेज विमानतळावर विमान कंपनीच्या कर्मचा-यांच्या ताब्यात देताना, त्या सामानावरील जास्तीचे शुल्क भरणे आवश्यक असते. परंतु या प्रकरणात तक्रारकर्त्याने असे कुठलेही घोषणापत्र दिले नव्हते किंवा जास्तीचे शुल्क पण भरले नव्हते. त्यामुळे कंपनी कायद्दा प्रमाणे रुपये-450/- प्रती किलोग्रॅम या प्रमाणे तक्रारकर्त्याला रुपये-4500/- ची नुकसान भरपाई देण्यात आली. या सर्व कारणास्तव तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं-2) व क्रं-3) जेट लाईट इंडीया लिमिटेड तर्फे करण्यात आली.
06. मौखीक युक्तीवादाचे वेळी उभय पक्षां कडून कोणीही मंचा समक्ष उपस्थित झाले नाहीत. परंतु तक्रारकर्त्या तर्फे एक पुरसिस दाखल करुन कळविण्यात आले की, त्यांचे लेखी युक्तीवालाच मौखीक युक्तीवाद समजण्यात यावा. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्षांचे लेखी जबाब तसेच लेखी युक्तीवाद व उपलब्ध दस्तऐवजाचे अवलोकन केल्या वर मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो.
:: निष्कर्ष ::
07. लेखी युक्तीवाद वाचल्या नंतर असे म्हणता येईल की, तक्रारकर्त्याचे सामान गहाळ झाले होते या बद्दल वाद नाही. विरुध्दपक्ष क्रं-2) व क्रं-3) जेट लाईट इंडीया लिमिटेड यांनी तक्रारकर्त्याला गहाळ झालेल्या सामाना संबधाने नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने ती नुकसान भरपाईची रक्कम फारच कमी असल्याने स्विकारली नाही.
08. विरुध्दपक्षानीं स्वतःच्या बचावार्थ काही कायदेशीर मुद्दे उपस्थित केलेले आहेत म्हणून त्या मुद्दांवर प्रथम विचार करणे जरुरीचे ठरेल. परंतु पुढे जाण्यापूवी आम्ही विरुध्दपक्ष क्रं-1) जेट एअरवेज (इंडीया) लिमिटेड यांनी त्यांना विनाकारण या तक्रारीमध्ये प्रतिपक्ष केल्याचा आक्षेप घेतलेला आहे, त्यामुळे हा मुद्दा पहिल्यांदा विचारात घेण्यात येतो.
09. तक्रारकर्त्याचे तक्रारी नुसार त्याने जेट लाईट इंडीया लिमिटेड या कंपनीच्या विमानाचे तिकिट काढले होते. विरुध्दपक्ष क्रं-1) जेट एअरवेज (इंडीया) लिमिटेड यांनी असे नमुद केले आहे की, जेट लाईट (इंडीया) लिमिटेड आणि जेट एअरवेज (इंडीया) लिमिटेड या दोन वेगवेगळया कंपन्या आहेत, दोन्ही कंपन्या या कंपनीज एक्ट खाली नोंदणीकृत झालेल्या आहेत. या मुद्दावर तक्रारकर्त्या कडून त्याच्या प्रतीउत्तरामध्ये किंवा लेखी युक्तीवादा मध्ये कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण आलेले नाही. परंतु तक्रारकर्त्याने जे दस्तऐवज दाखल केलेले आहेत, ते असे दर्शवितात की, जेट एअरवेजने त्याचे सामान गहाळ झाल्या बद्दलची जबाबदारी स्विकारलेली होती आणि इतकेच नव्हे तर अभिलेखावर असे कुठलेही दस्तऐवज दाखल केलेले नाहीत, ज्यावरुन जेट लाईट (इंडीया) लिमिटेड आणि जेट एअरवेज (इंडीया) लिमिटेड या दोन स्वतंत्र कंपन्या आहेत ही बाब सिध्द होऊ शकेल. म्हणून विरुध्दपक्ष क्रं-1) जेट एअरवेज (इंडीया) लिमिटेड यांचा त्यांना या तक्रारीमध्ये चुकीचे प्रतिपक्ष बनविले आहे, या आक्षेपाशी आम्ही सहमत नाही व तो आक्षेप फेटाळण्यात येतो.
10. आमच्या मता नुसार ही तक्रार प्राथमिक मुद्दावरच निकाली काढता येऊ शकते, म्हणून तक्रारीच्या गुणवत्ते मध्ये जाण्याची गरज वाटत नाही. असे दिसून येते की, ही तक्रार दाखल करण्यास विलंब झालेला आहे. तक्रार दाखल करण्याचे कारण दिनांक-08/12/2009 ला घडले, ज्या दिवशी तक्रारकर्त्याचे सामानाची बॅग गहाळ झाली होती, ही तक्रार जिल्हा ग्राहक मंच, नागपूर येथे दिनांक-20/12/2011 ला दाखल करण्यात आली. ग्राहक संरक्षण कायद्दातील कलम-24(A) नुसार तक्रारीचे कारण घडल्या पासून 02 वर्षाचे आत ग्राहक मंचा समक्ष तक्रार दाखल करता येऊ शकते. हे स्पष्ट आहे की, ही तक्रार, तक्रारीचे कारण, ज्या दिवशी घडले म्हणजे दिनांक-08/12/2009 पासून 02 वर्षाचे नंतर ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे, झालेला विलंब माफ करण्यास कुठलाही अर्ज दाखल केलेला नाही. तसेच तक्रार दाखल करण्याचे कारण सतत घडत आहे असे म्हणता येणार नाही.
11. विरुध्दपक्ष क्रं-2) जेट लाईट व्दारा जेट एअरवेज याला डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट, नागपूर यांचे मार्फत तक्रारीत प्रतिपक्ष बनविण्यात आलेले आहे. असे दिसून येते की, नागपूर विमानतळाला, जेट लाईट व्दारा जेट एअरवेज कंपनीचे शाखा कार्यालय म्हणून दर्शविलेले आहे. विरुध्दपक्ष क्रं-2)ला, नागपूर विमानतळा मार्फत प्रतिपक्ष बनविता येणार नाही कारण नागपूर विमानतळ हे कुठल्याही विमान कंपनीचे शाखा कार्यालय नाही, तसे सिध्द करण्यासाठी कुठलेही दस्तऐवज पण दाखल केलेले नाहीत. जेट लाईट आणि जेट एअरवेज कंपनीचे कार्यालय हे मुंबई येथे स्थित आहे व त्यांना या तक्रारीत विरुध्दपक्ष क्रं-1) आणि क्रं-3) म्हणून प्रतिपक्ष बनविलेले आहे. सबब ही तक्रार विरुध्दपक्ष क्रं-2) विरुध्द नागपूर विमानतळ मार्फत चुकीच्या पध्दतीने दाखल केली आहे.
12. विरुध्दपक्षाचा आणखी एक आक्षेप असा आहे की, विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) हे मुंबई स्थित असल्या कारणाने या मंचाला तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र येत नाही, केवळ विरुध्दपक्ष क्रं-2) ला नागपूर विमानतळ मार्फत प्रतिपक्ष केले म्हणून या मंचाला अधिकारक्षेत्र येणार नाही, विरुध्दपक्षाच्या या म्हणण्याशी आम्ही सहमत आहोत. परंतु ग्राहक संरक्षण कायद्दाचे कलम-17(2) नुसार ज्या ठिकाणी तक्रारीचे कारण पूर्णपणे किंवा अंशतः घडले असेल तेथील मंचाला पण तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र येते. या तक्रारीतील कारण नागपूर येथे घडले असल्याने या मंचाला तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र आहे, सबब हा आक्षेप फेटाळण्यात येतो.
13. ज्याअर्थी, ही तक्रार दाखल करण्यास विलंब झाला असून तो माफ करण्यासाठी कुठलाही अर्ज दाखल केलेला नसल्याने ही तक्रार केवळ याच मुद्दावर खारीज होण्यास पात्र आहे, म्हणून तक्रारीतील इतर मुद्दांना स्पर्श न करता इतकेच सांगणे पुरेसे आहे की, ही तक्रार ग्राहक संरक्षण कायद्दाचे कलम-24(A) नुसार मुदतबाहय असल्या कारणाने खारीज होण्यास पात्र आहे. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश ::
(01) तक्रारकर्त्याची, विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (3) विरुध्दची तक्रार खारीज करण्यात
येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन
देण्यात याव्यात.