नि. 17 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 167/2010 नोंदणी तारीख – 16/7/2010 निकाल तारीख – 06/10/2010 निकाल कालावधी - 80 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री नंदकुमार गणपतदास गांधी रा.77, सिध्दनाथवाडी, वाई ता.वाई जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री मिलिंद देशपांडे) विरुध्द जयश्री नायर डिव्हीजनल मॅनेजर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि. सातारा डीव्हीजनल ऑफिस 531/1-अ/अ, सदर बझार, यशोधन कॉम्प्लेक्स, यशवंतराव चव्हाण कॉलेजसमोर, सातारा जि. सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री आर.एन.कुलकर्णी) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांचा पेट्रोल व केमीकल पदार्थ वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांचे मालकीचा टँकर क्र.एमएच 11/एम 5422 या वाहनास पेट्रोलियम पदार्थ वाहतूक करणेचा परवाना प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर यांनी दिलेला आहे. सदरचे वाहनाचा विमा अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे उतरविलेला आहे. सदरचे विमा कालावधीत अर्जदार यांचे सदरचे वाहनास पनवेल मुंबई महामार्गावर अपघात होवून वाहनाचे नुकसान झाले. अपघाताचेवेळी वाहनामध्ये कोणताही माल नव्हता. सदरची बाब जाबदार यांना कळविलेनंतर अर्जदार यांनी वाहनाची दुरुस्ती करुन घेतली त्यास रु.2,16,236/- इतका खर्च आला आहे. अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. परंतु जाबदार यांनी वाहनाचे चालकाने ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतल्याबाबतच्या दाखल्याची मागणी केली. सदरचे काम हे आर.टी.ओ. ऑफिसचे आहे, जाबदार यांचे नाही. जाबदार यांनी पॉलिसी उतरवितेवेळीच सदरच्या दाखल्याची मागणी करणे आवश्यक होते. परंतु जाबदार यांनी अर्जदार यांचा क्लेम खोटे कारण देवून नाकारला आहे. सबब अर्जदार यांनी जाबदार यांना नोटीस पाठविली परंतु जाबदार यांनी त्यास खोटया मजकुराचे उत्तर पाठविले. सबब विमा क्लेमची रक्कम रु.2,16,236/- व्याजासह मिळावी, मानसिक त्रासापोटी रु.2 लाख मिळावेत यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 11 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. अपघातातील वाहन हे धोकादायक मालाची म्हणजे पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणारे असलेने सदर वाहनाच्या बाबतीत मोटार वाहन नियम कलम 9 च्या तरतुदी तसेच अन्य संबंधीत तरतुदी कायद्याप्रमाणे लागू होत्या. सदरच्या तरतुदींची पूर्तता करणेची जबाबदारी अर्जदार यांची होती. विमा पॉलिसीचे अटी व शर्तीनुसार तसेच मोटार वाहन नियम कलम 9 अन्वये सदर वाहनाचे ड्रायव्हरने अपघातापूर्वी धोकादायक पदार्थांची वाहतूक करण्याचे बाबतीत स्पेशल ट्रेनिंग घेवून तसे ट्रेनिंग घेतल्याचा मान्यताप्राप्त संस्थेचा दाखला मिळविणे आवश्यक होते. परंतु अर्जदार यांचे वाहनावरील चालकाने तसे प्रशिक्षण घेतलेले नव्हते व तसा दाखलासुध्दा मिळविलेला नव्हता. त्यामुळे पॉलिसीचे अटी व शर्तींचा अर्जदारने भंग केलेला असल्याने झालेल्या नुकसानीची भरपाईची देण्याची जबाबदारी जाबदार यांची नाही. अपघातानंतर सदरचे वाहनाची तपासणी सर्व्हेअर यांनी केली असता वाहनाचे फक्त रु.62,057/- एवढे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे तसेच सर्व्हेअर यांचे बिलचेक रिपोर्टनुसार नुकसानीची रक्कम रु.91,100/- इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जाबदार यांची फक्त रु.60,062/- इतकीच जबाबदारी आहे. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे वकील श्री देशपांडे यांनी व जाबदारतर्फे वकील श्री कुलकर्णी यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. 4. अर्जदारतर्फे दाखल करण्यात आलेले शपथपत्र नि. 2 ला पाहिले. अर्जदारतर्फे दाखल केलेली नि.5 सोबतची, नि. 14 चे प्रतिउत्तर, नि.15 चे शपथपत्र पाहिले. जाबदारतर्फे दाखल शपथपत्र नि.12 ला पाहिले. तसेच जाबदारतर्फे दाखल नि. 13 सोबतची कागदपत्रे पाहिली. 5. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय. ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही. क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 6. या प्रस्तुतचे अर्जप्रकरणात काही निर्विवाद गोष्टींची पाहणी करणे जरुरीचे आहे. अर्जदार यांचा पेट्रोलियम व केमिकल पदार्थ वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यासाठी आवश्यक परवाना त्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर यांचेकडून घेतलेला आहे. त्यांचे मालकीच्या टँकर क्र.एमएच 11/एम 5422 या वाहनाचा विमा त्यांनी जाबदार यांचेकडे उतरविलेला आहे. सदरचे विमा कालावधीत सदरचे वाहनास अपघात होवून वाहनाचे नुकसान झालेले आहे. केंद्रीय मोटार वाहन नियमावली 1989 चे नियम क्र. 8 व 9 नुसार ज्या वाहनातून धोकादायक पदार्थांची ने-आण केली जाते अशा वाहनावर संबंधीत पदार्थांचे शास्त्रीय व इंग्रजी भाषेतील लिहिलेले नाव वाचन करणे वा तातडीच्या प्रसंगी त्यावर लिहिलेल्या सूचनांनुसार तातडीने कारवाई करणे यासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तसे ज्ञान अर्जदार यांचे संबंधीत मोटार वाहनाचे चालकाकडे होते याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल नाही. आणखी एक महत्वाची बाब याठिकाणी नमूद करणे जरुर आहे ती अशी की, संबंधीत नियमावलीस अनुसरुन संबंधीत मोटार वाहन चालकाने धोकादायक पदार्थांची ने-आण करण्यासाठी वापरले जाणारे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण हे मोटार वाहन कायद्यास अभिप्रेत असलेल्या प्रशिक्षण संस्थेकडून पूर्ण करुन त्यांचेमार्फत अवजड मालाची वाहतूक करण्याची अनुज्ञप्ती प्राप्त करणे जरुर आहे आणि अशा प्रकारे संबंधीत प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेवून वाहन चालविण्याचा परवाना प्राप्त केलेला आहे याची नोंद/शेरा वाहन चालविण्याचे अनुज्ञप्तीवर असणे जरुर आहे व ती नोंद वा शेरा संबंधीत मोटार परिवहन अधिकारी यांचेकडून होणे जरुरीचे आहे. प्रस्तुत तक्रारअर्ज प्रकरणातील तक्रारअर्जदार याचे संबंधीत वाहनचालकास अशा प्रकारची कोणतीही अनुज्ञप्ती नव्हती वा नाही. प्रस्तुत प्रकरणातील मूळ तक्रारअर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता प्रस्तुत तक्रारअर्ज प्रकरणी संबंधीत मोटार वाहनाचे चालकाकडे फक्त हलके वाहन चालविण्याचे अनुज्ञप्ती असल्याचे दिसून येते. 7. वर नमूद केलेल्या निर्विवाद गोष्टी पाहिल्या असता असे स्पष्ट दिसून येईल की तक्रारअर्जदार यांनी दाखल केलेल्या तक्रारअर्जप्रकरणी तक्रारअर्जदार यांनी जाबदार यांचेकडून केलेली विमा रकमेची मागणी कोणत्याही निकषावर योग्य व कायदेशीर नाही व या कारणास्तव जाबदार यांनी तक्रारदार यांची मागणी नामंजूर केलेली आहे, ती योग्य व कायदेशीरच आहे असे म्हणावे लागते व या कारणास्तव तक्रारअर्जदार यांनी दाखल केलेला प्रस्तुंतचा तक्रारअर्ज सकृतदर्शनीच फेटाळणेस पात्र आहे असे या मंचाचे मत झालेले आहे. 8. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की, अपघातातील वाहन हे धोकादायक मालाची म्हणजे पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करणारे असलेने सदर वाहनाच्या बाबतीत मोटार वाहन नियम कलम 9 च्या तरतुदी तसेच अन्य संबंधीत तरतुदी कायद्याप्रमाणे लागू होत्या. विमा पॉलिसीचे अटी व शर्तीनुसार तसेच मोटार वाहन नियम कलम 9 अन्वये सदर वाहनाचे ड्रायव्हरने अपघातापूर्वी धोकादायक पदार्थांची वाहतूक करण्याचे बाबतीत स्पेशल ट्रेनिंग घेवून तसे ट्रेनिंग घेतल्याचा मान्यताप्राप्त संस्थेचा दाखला मिळविणे आवश्यक होते. परंतु अर्जदार यांचे वाहनावरील चालकाने तसे प्रशिक्षण घेतलेले नव्हते व तसा दाखलासुध्दा मिळविलेला नव्हता. त्यामुळे पॉलिसीचे अटी व शर्तींचा अर्जदारने भंग केलेला असल्याने झालेल्या नुकसानीची भरपाईची देण्याची जबाबदारी जाबदार यांची नाही. सदरचे कथनाचे पृष्ठयर्थ जाबदार यांनी मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 9 च्या तरतुदींचा दाखला दिला आहे. सदरचे कलम 9(4) नुसार हेवी गुड्स व्हेईकल चालविणा-या चालकाकडे ड्रायव्हींग स्कूलने दिलेला दाखला असणे आवश्यक आहे. परंतु प्रस्तुत प्रकरणात अर्जदारने असा कोणताही दाखला जाबदार यांना सादर केल्याचे दिसून येत नाही. वरील कारणांचा विचार करता अर्जदार यांचा विमा क्लेम नाकारण्याची जाबदार यांची कृती ही योग्य व संयुक्तिक आहे असे या मंचाचे मत आहे. सबब जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रुटी केलेली नाही असे या मंचाचे मत आहे. 9. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि.6/10/2010 (श्री सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |