(आदेश पारीत व्दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी-मा.अध्यक्ष)
1. तक्रारकर्ताने सदरील तक्रार कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारकर्ताने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ता यांचे मालकीचा प्लॉट नं.63 वृंदावन निवास साईनगरी, एरिगेशन कॉलनी, आलमगिर रिक्षा स्टॉप जवळ, नागरदेवळे, भिंगार ता.जि.अहमदनगर मध्ये असलेला भुखंड क्र.242/1 वर बांधकाम करण्याचे ठरविले. त्या अनुषंगाने सामनेवाला यांनी दिनांक 20.11.2014 रोजी बांधकामाचा करारनामाना करण्यात आला. तक्रारदाराने सामनेवालाला दिनांक 21.11.2014 ते 07.08.2015 पर्यंत 12,05,000/- रुपये रक्कम दिली. सामनेवाला हे कराराप्रमाणे वागले नाहीत. तक्रारकर्ताचे बांधकाम चालू करुन ते अर्धवट ठेवले. तक्रारकर्ता यांनी दुस-या कामगाराकडून सदरचे बांधकाम पुर्ण करुन घेतले व सदर कामाचे तक्रारकर्ताने वरील पैशाची मागणी सामनेवालाकडे केली. परंतू सामनेवाला यांनी तक्रारदारास पैसे दिले नाही. म्हणून तक्रारकर्ताने दिनांक 20.01.2016 रोजी नोटीस देऊन नुकसान भरपाईची मागणी केली. सदर नोटीस मिळाल्यानंतर सामनेवालाने रक्कम दिली नाही. दिनांक 09.02.2016 ला नोटीसचे खोटे व लबाडीचे उत्तर तक्रारकर्तास पाठविले. व तक्रारकर्ताला रक्कम देण्यास नाकारले. सामनेवालाने तक्रारकर्तास न्युनत्तम सेवा देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असल्याने सदर तक्रार तक्रारकर्ताने मंचासमक्ष दाखल केली आहे.
3. तक्रारकर्ताने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाला यांनी तक्रारकर्ता यांना राहिलेले बांधकामाची रक्कम व नुकसान भरपाईची अशी एकुण रक्कम रुपये 3,19,532/- रुपये तक्रारकर्ताला देण्यात यावे तसेच या तक्रारीचा खर्च सामनेवालाकडून मिळण्याचा आदेश व्हावा.
4. तक्रारकर्ताची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीस काढण्यात आली. सामनेवाला यांना नोटीस प्राप्त झाली व ते प्रकरणात हजर झाले व त्यांनी निशाणी 13 वर त्यांची लेखी कैफियत दाखल केली. सामनेवालाने कैफियतीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ताने तक्रारीत सामनेवाला यांचेविरुध्द लावलेले आरोप खोटे असून ते सामनेवालास नाकबूल आहेत. सामनेवालाने पुढे असे नमुद केलेले आहे की, तक्रारकर्ता यांनी दिनांक 20.11.2014 रोजी सामनेवालासोबत 800 चौ.फुट बांधकाम करण्याकरीता करार केलेला होता. त्यानंतर तक्रारकर्ताने सामनेवाला यांचे सोबत दिनांक 05.02.2015 रोजी नवीन करारनामा केला. तसेच पुर्वीच्या करारनाम्याव्यतिरिक्त वाढीव बेडरुम 121 चौ.फुट, दर रुपये 1200/- प्रति चौ.फुट असे एकुण 1,45,000/- व पाण्याचा हौद 1000 लिटर व त्यापोटी वाढीव रुपये 5,000/- असे नवीन करारनाम्यात दाखवून करारनामा करण्यात आला. सदरील दोन्हीही करारनाम्याप्रमाणे बांधकाम साहित्याचे स्वरुप तसेच त्याच्या रकमा निश्चित करण्यात आल्या होत्या. बांधकाम चालू असताना तक्रारकर्ता हे नव्याने पुर्वी ठरलेल्या कामा व्यतिरीक्त सुधारणा करण्याबाबत सामनेवाले यांचेकडे विनंती केली. तसेच त्यापोटी लागणारा वाढीव मोबदला तक्रारकर्ता हे सामनेवालाला देण्याचे मान्य व कबूल केले होते. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारकर्ताचे विनंतीस मान देऊन वाढीव काम करण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे सामनेवाला यांनी वाढीव खर्च करारनाम्याव्यतिरिक्त झाला. सदर बांधकामास राळा (वॉटर प्रुफींग) करण्याचे ठरलेले नव्हते. परंतु तक्रारदार यांनी बांधकामास राळा करुन देण्याबाबत कळविले. त्यामुळे सामनेवालाला अतिरिक्त खर्च आला. अतिरीक्त पत्राचे शेड बनविलेले होते. तक्रारकर्ता हे दुस-या बाजुने डबल कोट प्लास्टर करुन मारुन देण्याची मागणी केली. त्यामुळे सामनेवाला यांना जास्त खर्च आला. तक्रारकर्ता हे बांधकाम चालू असतांना पुर्वीच्या दिनांक 20.11.2014 चे कराराप्रमाणे पेमेंटचे स्टेजेस ठरल्याप्रमाणे कधीही व केव्हाही सामनेवाला यांना पेमेंट अदा केलेले नाही. पेमेंट संदर्भात विचारणा केली असता, तक्रारदार यांनी कर्ज प्रकरणास वेळ लागत आहे. तसेच पैश्याची व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे तुम्ही अॅडजस्ट करा आम्ही नंतर पैसे देतो असे सांगून तक्रारकर्ता हे पेमेंट देण्यास टाळाटाळ केली. सामनेवाला यांनी तक्रारकर्तास पेमेंट मागितल्याबद्दल धमक्या देण्यात आल्या व नवीन वाढीव बांधकाम केलेले पैसे दिलेले नाही. तक्रारकर्ताने तक्रारीमध्ये नमुद केलेले आहे की, अतिरिक्त खर्च हा अवास्तव स्वरुपाचा आहे. तक्रारकर्ता हे करारात ठरल्याप्रमाणे वागलेले नाहीत. बांधकामाचे स्टेजेस प्रमाणे पेमेंट अदा केले व मागणी करुनही रक्कम दिलेली नाही. मोघम खर्च दाखवून सदर तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. म्हणून सदर तक्रार दाखल करण्याचे कोणतेही कारण घडलेले नसल्याने व खोटी तक्रार दाखल केली असल्याने तक्रारकर्ताची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
5. तक्रारकर्ताने दाखल तक्रार, दस्तावेज, सामनेवालानी दाखल केलेली कैफियत /जबाब, दस्तावेज, उभय पक्षकारांतर्फे साक्षीदाराचे अॅफिडेव्हीट, निशाणी क्रमांक 20 वर कमिशन नियुक्त करण्याचा अर्ज, व त्यावर केलेल्या आदेशाचे अवलोकन केले व मंचासमक्ष खालील मुद्दे विचारार्थ येतात.
| मुद्दे | उत्तर |
1. | तक्रारकर्ता हा सामनेवालाचा “ग्राहक” आहे काय.? | ... होय. |
2. | सामनेवाला यांनी तक्रारकर्ता यांना न्युनत्तम सेवा दर्शविली आहे काय. ? | ... होय. |
3. | आदेश काय ? | ...अंतीम आदेशानुसार. |
का र ण मि मां सा
6. मुद्दा क्र.1 – तक्रारकर्ता यांनी सामनेवालाला त्यांचे मालकीचा भुखंड क्रमांक गट नं.242/1 मध्ये प्लॉट नं.63 यावर सामनेवाला सोबत बांधकाम करण्याचा करार केला होता. ही बाब उभय पक्षकारांना मान्स असून तक्रारकर्ता हा सामनेवालाचा “ग्राहक” आहे असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
7. मुद्दा क्र.2 – तक्रारकर्ताने तक्रारीत व शपथपत्रावर असे सांगितले आहे की, सामनेवाला यांनी तक्रारकर्ताचे बांधकाम अर्धवट सोडून गेले. त्यांचे पुर्ण बांधकाम केले नाही. 145 स्क्वेअर फुट स्लाईडींग खिडक्या करीता मटेरियल व मजुरीस आलेला खर्च, घराच्या आतील व बाहेरील तसेच वॉल कंपाउंडला आतून व बाहेरुन कलर देण्यासाठी मटेरियल व मजुरीचा खर्च, घरातील हॉलचे पी.ओ.पी. व त्यास कलर देण्यासाठी मटेरियल व मजुरीचा खर्च, पोर्चच्या खालील हौदाजवळील ओटयाला, स्वयंपाक घरातील भिंतीला स्टाईल्सचा खर्च तसेच घरातील बेडचे दोन दरवाजे संडास व बाथरुम दरवाजे बसविणे त्या दरवाज्यांना कडी, कोंडा बसविणे इत्यादीचा खर्च, तसेच घरात संडास, बाथरुम व किचन इत्यादी ठिकाणी नळ व तोटया बसविणे, बेसिंग भांडे बसविणे, घरातील इलेक्ट्रीक कामासाठी मटेरियल व मजुरीसह झालेला खर्च बल्ब टयुब व फॅन इ.खर्च वजा जाता, करारनाम्याप्रमाणे वाढीव बेडचे क्षेत्र 121 स्क्वे.फुट. असून त्याचे काम केलेले आहे. तक्रारकर्ताचा 2,66,532/- एवढा खर्च करावा लागला. त्याकरीता तक्रारकर्ताने निशाणी क्र.6 वर दस्त क्र.4 ते 26 वर दाखल पावत्या व दस्तावेजावरुन ही बाब सिध्द होते की, तक्रारकर्ताने त्या करारातील बांधकामाकरीता अतिरिक्त खर्च केलेला आहे. याउलट सामनेवालाने निशाणी 20 वर कोर्ट कमिशन नेमणुकीकरताचा अर्ज तसेच अतिरिक्त खर्च झालेबाबत पडताळणी करता विनंती अर्ज दाखल केलेला आहे. सदर विनंती अर्ज मंजुर करण्यात आला आहे. व कमिशनर करीता नाव सुचविण्यास सामनेवालाला निर्देश देण्यात आले होते. परंतू सामनेवालाने कमिशनरचे नांव सुचविले नसल्याने कमिशनरची सदर प्रकरणात नेमणुक करण्यात आली नाही. सामनेवाला यांनी अतिरिक्त किंवा वाढीव बांधकाम तक्रारकर्ताचे केले आहे हे सामनेवालाने सदर प्रकरणात सिध्द करु शकले नाही. याउलट तक्रारकर्ताने निशाणी क्र.25, 26, 27, 28, 29 व 30 वर दाखल सामनेवाला क्र.1 ते 6 यांचे पुराव्याचे शपथपत्रावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्ताचे सामनेवाला यांनी सोडलेले अर्धवट बांधकाम साक्षीदाराकडून करुन घेतले आहे. व त्याप्रमाणे साक्षीदारानी त्यांचे कामाच्या पावत्याही दिलेल्या आहेत. सामनेवालाने तक्रारकर्तासोबत बांधकाम होण्याकरीता करार करुन त्याप्रमाणे बांधकाम पुर्णपणे केले नाही. तक्रारकर्ताने स्वखर्चाने बांधकाम करावे लागले ही बाब सामनेवालाने तक्रारकर्ताप्रति न्युनत्तम सेवा ठरवित आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
8. मुद्दा क्र.3 - मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अं ति म आ दे श –
1. तक्रारकर्ताची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला यांनी तक्रारकर्ताचे बांधकाम अर्धवट सोडले त्यानंतर तक्रारकर्ताने सदर बांधकाम स्वखर्चाने पुर्ण करावे लागले त्यासाठी झालेला खर्च रक्कम रु.2,66,532/- (रक्कम रु.दोन लाख सहासष्ट हजार पाचशे बत्तीस फक्त) सामनेवालाने तक्रारकर्ताला द्यावे.
3. सामनेवाला यांनी तक्रारकर्ता यांना झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- (रक्कम रु.दहा हजार फक्त) व तक्रारीचा खर्च 3,000/- (रक्कम रु.तीन हजार फक्त ) तक्रारकर्ताला द्यावे.
4. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून 30 दिवसाचे आत करावी.
5. या आदेशाची प्रथम प्रत उभयपक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी.
6. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.