मंचाचे निर्णयान्वये श्री. मिलिंद केदार, सदस्य - आदेश - (पारित दिनांक – 29/03/2011) 1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीने तक्रारीत नमूद केले आहे की, तिने गैरअर्जदार क्र. 1 जे टाटा कंपनीचे वाहनाचे वितरक आहेत, त्यांच्याकडून टाटा व्हिक्टा वाहन क्र. MH 40 / A 3246 गैरअर्जदार क्र. 2 व 3 कडून वित्तीय सहाय्य घेऊन रु.4,92,932/- मध्ये विकत घेतले. त्याकरीता तक्रारकर्तीने रु.90,000/- दिले व उर्वरित रु.4,07,932/- गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने दिले व दि.30.03.2006 रोजी वाहन विकत घेतले. वित्तीय सहाय्य घेतांना गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीच्या वेगवेगळया इंग्रजी भाषेत असलेल्या फॉर्मवर सह्या घेतल्या. सदर कर्जाचा मासिक हप्ता रु.12,250/- होता व त्याप्रमाणे तक्रारकर्ती नियमितपणे सदर कर्जाची परतफेड करीत होती व गैरअर्जदारांनी कधीही तक्रारकर्तीला थकीत रकमेच्या वसुलीबाबत नोटीस दिलेला नव्हता. दि.27.09.2009 पर्यंत रु.4,40,000/- गैरअर्जदारांकडे भरलेले होते. गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीचे वाहन कुठलीही पूर्वसुचना न देता कळमेश्वर येथून दि.27.11.2009 रोजी हिसकावून नेले. त्यासंबंधी विचारणा केली असता कुठलीही माहिती गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला पुरविली नाही. तक्रारकर्तीने प्रत्यक्ष भेटून वाहन परत करण्याबाबत विनंती केली व दि.10.02.2010 रोजी थकीत हप्त्याची रक्कम भरण्याची तयारी दर्शवून वेळ मागितला व कागदपत्रांची मराठीमध्ये मागणी केली. परंतू गैरअर्जदारांनी सदर मागणीस प्रतिसाद दिला नाही. तक्रारकर्तीच्या मते तिचे वाहन परस्पर विल्हेवाट लावून विकून टाकले. परंतू तिची रक्कम परत केलेली नाही. तक्रारकर्तीच्या मते तिने रु.4,40,000/- चा भरणा केल्यानंतरही तिचे वाहन जप्त केलेले आहे. गैरअर्जदारांच्या या कृत्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागला, त्यामुळे तिने मंचासमोर सदर तक्रार दाखल करुन, सदर वाहन परत करण्यात यावे, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.5,00,000/- मिळावे, तक्रारीचा खर्च रु.15,000/- मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत. तक्रारकर्तीचे आपले म्हणण्याचे पुष्टयर्थ एकूण 37 दस्तऐवज दाखल केलेले आहेत. 2. सदर तक्रार मंचासमोर दाखल झाल्यानंतर मंचाने गैरअर्जदारांवर नोटीस बजावली असता गैरअर्जदारांनी सदर तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. 3. गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारकर्तीने खरेदी केलेले वाहन, त्याकरीता घेतलेले कर्ज व वाहनाची किंमत याबाबी मान्य करुन ते गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने केलेले वित्त सहाय्याचे कर्जाचे हप्ते ते स्विकारीत असतात आणि तसा त्यांचा या वित्त सहाय्याच्या वादाबाबत कुठलाच संबंध नाही. तसेच गैरअर्जदार क्र. 1 ने पुढे असे नमूद केलेले आहे की, परत फेडीच्या रकमेबाबत असलेल्या पावत्यांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ती कर्जाची परतफेड वेळेत करीत नसल्याचे दिसून येते व त्याला अनुसरुन गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी कारवाई केलेली आहे. तसेच गैरअर्जदार क्र. 1 ला विनाकारण सदर प्रकरणी विरुध्द पक्ष करण्यात आलेले असल्याने त्यांच्याविरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी. आपल्या उत्तरासोबत गैरअर्जदार क्र. 1 ने एक दस्तऐवज दाखल केलेले आहे. 4. गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने लेखी उत्तरामध्ये तक्रारकर्तीने वाहन खरेदी करण्याकरीता त्यांच्याकडून वित्तीय सहाय्य घेतल्याची बाब मान्य केलेली आहे. त्यांच्या मते वाहनाची किंमत रु.5,75,799/- होती व तक्रारकर्तीने रु.57,932/- त्यांच्याकडे भरले आणि उर्वरित रु.4,40,000/- चे गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने वित्त सहाय्य केले. तक्रारकर्तीने सर्व फॉर्मस मराठीतून समजून घेतल्यावर त्यावर सह्या केलेल्या आहेत. तक्रारकर्तीने कधीही वेळेवर कर्जाचा मासिक हप्त्याचा भरणा केलेला नाही. त्याबाबत वारंवार सुचना देऊनसुध्दा व खाते बाकीबाबत खात्याचे विवरण देऊनसुध्दा नियमितपणे रकमा भरल्या नाहीत, म्हणून कायदेशीर मार्गाने सदर वाहनाचा ताबा घेण्यात आला व वाहन रु.2,32,000/- मध्ये विकण्यात आले. तक्रारकर्तीवर रु.2,07,499/- ची थकबाकी होती. तक्रारकर्ती स्वतः थकबाकीदार असल्याने व गैरअर्जदारांची कारवाई ही कायदेशीर असल्याने सदर तक्रार खारीज करण्याची मागणी गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने केलेली आहे. आपल्या उत्तरासोबत गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने 3 दस्तऐवज दाखल केलेले आहेत. 5. सदर तक्रार युक्तीवादाकरीता दि.16.03.2011 रोजी आली असता मंचाने उभय पक्षांचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. तसेच दाखल दस्तऐवजांचे व कथनांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 6. तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्र. 1 कडून वाहन क्र. MH 40 / A 3246 खरेदी केले व त्याकरीता गैरअर्जदार क. 2 व 3 कडून वित्त सहाय्य घेतले होते. सदर बाब ही दाखल दस्तऐवज व उभय पक्षांच्या कथनावरुन सिध्द होत असल्यामुळे तक्रारकर्ती ही गैरअर्जदारांची ग्राहक ठरते. 7. तक्रारकर्तीने वाहनाची किंमत रु.4,97,932/- असून रु.90,000/- गैरअर्जदाराकडे भरल्याचे व उर्वरित रु.4,07,932/- गैरअर्जदारा क्र. 2 व 3 कडून कर्ज रुपात घेतल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारकर्तीने दाखल केलेले दस्तऐवज क्र. 1 ‘मेमो ऑफ सेल्सचे’ अवलोकन केले असता त्यामध्ये वाहनाची किंमत फ.4,97,932/- दर्शविण्यात आली आहे. परंतू गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने आपल्या उत्तरात वाहनाची किंमत ही रु.5,75,799/- होती असे नमूद केले आहे. ही किंमत त्यांनी कुठून आणली त्याबाबतचे दस्तऐवज दाखल केलेले नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने उत्तरात नमूद केलेली किंमत ग्राह्य धरण्यायोग्य नसल्याचे मंचाचे मत आहे. 8. तक्रारकर्तीने कर्ज म्हणून रु.4,07,932/- घेतल्याचे आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. परंतू सदर रक्कम स्पष्ट करणारे कोणतेही दस्तऐवज दाखल केलेले नाही. यावर गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने रु.4,40,000/- एवढे कर्ज दिल्याचे म्हटले आहे व त्याप्रित्यर्थ आपल्या उत्तरासोबत दस्तऐवज क्र. 2 पृष्ठ क्र. 73 वर दाखल केलेले आहे. त्यामध्ये कर्ज हे रु.4,40,000/- दर्शविण्यात आलेले आहे. यावरुन गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने रु.4,40,000/- कर्जाची रक्कम दिल्याची बाब स्पष्ट होते. 9. तक्रारकर्तीने एकूण कर्जापैकी रु.3,68,303/- भरल्याचे मान्य करुन रु.2,07,499/- ची थकबाकी असल्याचे गैरअर्जदार क्र. 2 व 3 चे लेखी उत्तरात म्हणणे आहे. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या पावत्यांचे अवलोकन केले असता हे सिध्द होते की, तक्रारकर्ती ही वेळेवर कर्जाचा भरणा करीत नव्हती. कारण मासिक हप्त्याची रक्कम रु.12,250/- असतांना तक्रारकर्तीने बहुतांश वेळी थकीत रक्कम ठेवली व नंतर ती एकंदरीत भरल्याचे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत तक्रारकर्तीला अतिरिक्त् व्याज व दंड गैरअर्जदारांनी आकारले असतील. 10. गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीचे वाहन दि.27.11.2009 ला जप्त केल्याचे तक्रारकर्तीने नमूद केले आहे व गैरअर्जदाराचे कथनावरुन ही बाब स्पष्ट होते की, त्यांनी तक्रारकर्तीचे वाहन जप्त केले होते. मा. राष्ट्रीय आयोगाने सीटी कॉर्प फायनांस लि. वि. एस. विजयालक्ष्मी, नॅशनल कंझुमर केसेस पार्ट 212 या निवाडयातून स्पष्ट निर्देश दिले आहे की, जर ग्राहकाचे/तक्रारकर्त्याचे वाहन हे कोणतीही पूर्वसुचना न देता जप्त केले असेल तर ती सेवेतील त्रुटी समजण्यात यावी. सदर प्रकरणात तक्रारकर्तीला वाहन जप्त करण्याकरीता गैरअर्जदाराने पूर्वसुचना दिल्याचे स्पष्ट होत नाही. गैरअर्जदार क्र. 1 ने आपल्या उत्तरासोबत नि.क्र.9 सोबत पृष्ठ क्र. 53 वर दि.19.02.2010 चे पत्र दाखल केले आहे. सदर पत्राच्या आशयावरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्तीला वाहन जप्त केल्यानंतर सुचना देण्यात आली आहे. म्हणजे वाहन जप्त करण्यापूर्वी तक्रारकर्तीस कोणतीही सुचना देण्यात आली नव्हती व सदर वाहनाचा लिलाव करण्यापूर्वी तक्रारकर्तीस कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती. गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने आपल्या उत्तरात सदर वाहन हे रु.2,32,000/- ला विकल्याचे नमूद केले आहे. परंतू सदर बाब सिध्द करण्याकरीता कोणतेही दस्तऐवज दाखल केलेले नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने घेतलेला बचावात्मक मुद्दा अमान्य करण्यात येतो व गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने तक्रारकर्तीला कोणतीही पूर्वसुचना न देता तिचे वाहन जप्त केले ही त्यांच्या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे स्पष्ट होते. 11. ग्राहक जेव्हा कर्जाची रक्कम भरण्यास कुचराई करीत असेल अशा परिस्थितीत अटी व शर्तीनुसार त्यांना नोटीस पाठविणे व कायदेशीर मार्गाचा अवलंब करुन रक्कम वसुल करणे किंवा वाहन जप्त करणे अशी कोणतीही पध्दत गैरअर्जदाराने अवलंबिलेली नसून गैरकायदेशीर मार्गाचा अवलंब केलेला असल्याचे मंचाचे मत आहे, म्हणून गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने तक्रारकर्तीचे वाहन क्र. MH 40 / A 3246 हे तक्रारकर्तीस परत करावे व उर्वरित रकमेपैकी सविस्तर तपशिल तक्रारकर्तीस देऊन कायदेशीर मार्गाने वसुली करावी. जर तक्रारकर्तीस वाहन देण्यास गैरअर्जदार असमर्थ असतील तर गैरअर्जदारांनी आजपर्यंत तक्रारकर्तीने भरलेली रक्कम रु.3,68,303/- आदेश पारित झाल्यापासून 30 दिवसाचे आत परत करावी. तसेच तक्रारकर्तीला झालेल्या मानसीक व शारिरीक त्रासाकरीता गैरअर्जदारांनी रु.20,000/- द्यावे व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे असे मंचाचे मत आहे. 12. तक्रारकर्तीने तक्रारीत केलेली कथने व मागण्या या पुराव्या अभावी सिध्द होत नसल्यामुळे अमान्य करण्यात येतात. उपरोक्त निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येतो. 12. –आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्तीला तिचे वाहन क्र. MH 40 / A 3246 आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत परत करावे व उर्वरित रकमेपैकी सविस्तर तपशिल तक्रारकर्तीस देऊन कायदेशीर मार्गाने वसुली करावी. जर गैरअर्जदार सदर वाहन परत करण्यास असमर्थ असतील तर त्यांनी आजपर्यंत तक्रारकर्तीने भरलेली रक्कम रु.3,68,303/- ही तक्रार दाखल दि.31.07.2010 पासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह आदेश पारित झाल्यापासून 30 दिवसाचे आत परत करावी. 3) मानसिक व शारिरीक त्रासाबाबत गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने रु.20,000/- तक्रारकर्तीला द्यावे. 4) गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने रु.2,000/- तक्रारीच्या खर्चाबाबत तक्रारकर्तीला द्यावे. 5) गैरअर्जदार क्र. 1 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 6) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |