सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 125/2012
तक्रार दाखल दि.14-08-2012.
तक्रार निकाली दि.05-08-2015.
सौ. सुनिता सुनिल लोखंडे,
रा. 99, मल्हार पेठ,सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. श्री. जावेद निजाम सय्यद,
2. श्री. वाहीद निजाम सय्यद,
3. श्री. शाहीद निजाम सय्यद,
4. यशया कन्सट्रक्शन तर्फे
प्रोप्रा.श्रीमती भारती रामचंद्र बनसोड,
नं.1 ते 3 रा. 29अ/2, मल्हारपेठ,सातारा
नं.4 रा.3, पारिजात सोसायटी,
अजिंक्य बझार रोड, गोडोली, सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.के.के. शहा
जाबदार क्र.1 तर्फे– अँड.डी.वाय.मुतालीक.
जाबदार क्र.2 व 3 तर्फे- एकतर्फा
जाबदार क्र. 4 तर्फे- अँड.एम.आर.गोरे
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदाराने हे मल्हारपेठ,सातारा येथील कायमस्वरुपी रहिवासी असून जाबदार क्र. 1 ते 3 चे मुखत्यार जाबदार क्र. 4 ने तक्रारदारास ‘विपुल सहवास’ या नावाने ओळखल्या जाणा-या इमारतीमधील तळमजल्यावरील सदनिका जी-1 क्षेत्र 795 चौ.फूट म्हणजेच 73.88 चौ.मी. रक्कम रु.8,00,000/- (रुपये आठ लाख मात्र) या मोबदल्यात विक्री करण्याचे निश्चित करुन नोंदणीकृत करारनामा दस्त क्रमांक 1007/2011 हा करुन दिला आहे. तसेच रक्कम रु.68,000/- (रुपये अडुसष्ट हजार मात्र) इलेक्ट्रीसीटी चार्जेस, लीगल चार्जेस व सोसायटी व इतर चार्जेस म्हणून तक्रारदाराने जाबदारांना देण्याचे मान्य केले होते. प्रस्तुत करारनाम्यात ठरलेप्रमाणे तक्रारदाराने जाबदार क्र. 4 ला त्यांचे यशया कन्स्ट्रक्शन या फर्मचे नावाने जनता सहकारी बँक लि.,सातारा या बँकेवरील चेक नं. 874581 दि.10/2/2011 दि.10/2/2011 रोजी विसारा/अँडव्हान्सपोटी रक्कम रु.50,000/- दिले असून जाबदार क्र.4 चे सांगणेवरुन इमारतीचे कन्स्ट्रक्शन करणारे कॉन्ट्रॅक्टर महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन यांना दि. 11/2/2011 रोजी रक्कम रुपये 4,50,000/-, दि.16/2/2011 रोजी रक्कम रुपये 50,000/- व दि.6/7/2011 रोजी रक्कम रु.28,000/- अशाप्रकारे तक्रारदाराने सदनिकेच्या खरेदीपोटी तक्रारदाराला रक्कम रु.8,30,000/- (रुपये आठ लाख तीस हजार फक्त) अदा केले आहेत. उर्वरीत रक्कम रु38,000/- (रुपये अडतीस हजार मात्र) तक्रारदार जाबदाराला देणेस सदैव तयार आहेत.
वरीलप्रमाणे जाबदार यांना सदनिका खरेदीपोटी तक्रारदाराने वेळोवेळी रकमा अदा करुनही जाबदाराने प्रस्तुत सदनिकेचे खरेदीपत्र पूर्ण करुन देणेस टाळाटाळ केली आहे व खरेदीपत्र करुन द्यावे लागू नये म्हणून दि. 16/6/2012 रोजी अँड संतोष भोसले यांचेमार्फत खोटी नोटीस देवून तक्रारदारकडून आणखी रक्कम रु.7,50,000/- ची मागणी केली. तसेच पुन्हा दि. 1/5/2012 रोजीच दै.पुढारी या वृत्तपत्रात जाहीर नोटीस प्रसिध्द करुन करार रद्द झालेचे कथन केले असून तक्रारदार यांना रक्कम रु.50,000/- (रुपये पन्ना हजार फक्त) परत घेवून जावेत असे नमूद केले आहे. या नोटीसला तक्रारदाराने दै.ऐक्य मध्ये जाहीर नोटीसला उत्तर दिले. प्रस्तुत जाहीर नोटीसला जाबदाराने पुन्हा दि. 8/5/2012 रोजी जाहीर नोटीस उत्तर प्रसिध्द केले. व त्यामध्ये म्हटले की, तक्रारदार बरोबर झालेला करार संपुष्टात आलेने जाबदार त्याप्रमाणे वागणार नाहीत असे स्पष्ट केलेने प्रस्तुत जाबदाराने तक्रारदार यांना सदोष सेवा दिलेने तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार अर्ज मे मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुत कामी तक्रारदाराने जाबदार क्र. 1 ते 4 यांचेकडून संयुक्तीकरित्या तक्रार अर्जातील नमूद सदनिकेचे खरेदीपत्र करुन देणेबाबत आदेश व्हावेत, तक्रारदार यांना झाले मानसीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.10,000/- जाबदारांकडून वसूल होवून मिळावा अशी विनंती केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि. 5/5 कडे अनुक्रमे करारनाम्याची सत्यप्रत, अँड संतोष भोसले यांनी पाठवलेली नोटीस झेरॉक्स, जाबदारातर्फे अँड संतोष भोसले यांनी दैनिक पुढारी मध्ये दिलेली जाहीर नोटीस मुळ, प्रस्तुत जाहीर नोटीसला तक्रारदाराने दिलेले उत्तर, अॅड. संतोष भोसले यांनी पुन्हा जाहीर नोटीसला दिलेले उत्तर, नि. 10 कडे लेखी युक्तीवाद, नि. 13 चे कागदयादीसोबत नि. 13/1 ते नि. 13/4 कडे तक्रारदार यांनी जाबदार यांना देणेसाठी जाबदाराचे बिल्डर यास रक्कम दिलेच्या पावत्या (एकूण 4) , नि. 34 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि. 35 कडे तक्रारदारतर्फे साक्षीदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि. 37 चे कागदयादीसोबत नि. 37/1 ला मुळ नोंदणीकृत साठेखत, नि. 37/2 कडे जाबदार क्र. 4 विरुध्द सुभाष शहा यांनी दाखल केलेल्या स्पे.दि.मु.नं.193/2014 मधील कागदपत्रे, नि. 38 कडे पुरावा संपलेची पुरसिस वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. जाबदार क्र. 1 यांनी नि.32 कडे त्यांची कैफीयत/म्हणणे, नि. 33 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि.19 कडे जाबदार क्र. 4 यांनी त्यांचेविरुध्द झालेला एकतर्फा आदेश रद्द होणेसाठी केलेला अर्ज, नि. 20 कडे अँफीडेव्हीट, नि.21 कडे जाबदार क्र. 4 चे म्हणणे, नि.22 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट वगैरे कागदपत्रे जाबदाराने याकामी दाखल केली आहेत. जाबदार क्र. 1 ने त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदाराचे अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्यांनी प्रस्तुत तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप घेतले आहेत.
तक्रारदार हे जाबदार क्र. 1 ते 3 यांचे ग्राहक नसून ते केवळ जाबदार क्र. 4 यांचेच ग्राहक आहेत. त्यामुळे त्यांना खरेदीपत्र करुन देणेची जबाबदारी जाबदार क्र. 1 ते 3 यांची नसून जाबदार क्र. 4 यांची आहे. कारण विषयांकीत फ्लॅटचा करारनामा हा जाबदार क्र. 4 व तक्रारदार यांचेमध्ये झालेला आहे. तक्रारदाराने वृत्तपत्रात प्रसिध्द केलेले नोटीसचे उत्तर हे फक्त जाबदार क्र. 4 यांना दिले आहे. जाबदार क्र. 1 ते 3 यांना दिलेले नाही. त्यामुळे जाबदार क्र. 1 ते 3 विरुध्द तक्रार दाखल करणेस कोणतेही कारण घडलेले नाही. त्यामुळे प्रस्तुत जाबदार क्र. 1 ते 3 यांचेविरुध्द सदरची तक्रार फेटाळणेस पात्र आहे. जाबदार क्र. 1 ते 3 यांनी मिळकतीचे विकसन करणेसाठी करारनामा व मुखत्यारपत्र जाबदार क्र. 4 यांना दिले होते. त्यामुळे खरेदीविक्रीचे व इतर सर्व प्रकारचे अधिकार जाबदार क्र.4 यांचेकडे मुखत्यारपत्राने आले होते. तसेच जाबदार क्र. 4 यांचेसोबतच इतर फ्लॅट धारकांची करारपत्रे व तक्रारदाराचे करारपत्र झाले आहे. प्रस्तुतचा करारनामा जाबदार क्र. 1 ते 3 व तक्रारदार यांचेत झालेला नव्हता व नाही. त्यामुळे तक्रारदाराला खरेदीपत्र करुन देणेची जबाबदारी जाबदार क्र. 4 यांचीच आहे. तसेच तकारदार हे जाबदार क्र. 1 ते 3 यांचे ग्राहक नव्हते व नाहीत. त्यामुळे जाबदार क्र. 1 ते 3 यांचेवर खरेदीपत्र करुन देणेची जबाबदारी येत नाही. सबब जाबदार क्र. 1 ते 3 यांचेविरुध्द सदर तक्रार अर्ज फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदार क्र. 1 यांनी दाखल केले आहे.
तर जाबदार क्र. 4 ने प्रस्तुत कामी पुढीलप्रमाणे म्हणणे मांडले आहे. तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील मजकूर मान्य व कबूल नाही. जाबदार क्र. 4 हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी सातारा येथील मल्हारपेठ येथील सि.स.नं.29 अ/2 या मिळकतीमध्ये विपुल सहवास या नावाने इमारत विकसीत करीत होते. सदर इमारतीचे तळमजल्यावरील फ्लॅट नं. जी-1, क्षेत्र 795 चौ. फूट या सदनिकेचे रजिस्टर्ड साठेखत दस्त क्र.1007/2011 ने तक्रारदार सोबत जाबदार क्र. 4 ने केले होते. सदर रजिस्टर साठेखताप्रमाणे जाबदार क्र. 4 यांनी सदर सदनिका तक्रारदार यांना रक्कम रु.8,00,000/- (रुपये आठ लाख मात्र) या रकमेस विकणेचे ठरवून सदर साठेखताने सदर व्यवहारापोटी रक्कम रु.50,000/- (रुपये पन्नास हजार फक्त) इतकी रक्कम देवून तक्रारदाराने जाबदार क्र.4 यांचेकडून सदर मिळकतीचे साठेखत करुन घेतले होते.
रजि.साठेखत नं. 1007/2011 पहाता त्यातील कलम नं. 2 प्रमाणे असे दिसून येते की, तक्रारदार यांनी जाबदार क्र. 4 यांना दि. 11/2/2011 या तारखेपासून 6 महिन्याच्या आत उर्वरीत रक्कम रु.7,50,000/- इतकी रक्कम जाबदार क्र. 4 यांना देवून सदर मिळकतीचा खरेदी व्यवहार पूर्ण करुन घेणेचा आहे. परंतु तक्रारदाराने जाबदार यांना प्रस्तुत रक्कम रु.7,50,000/- जाबदाराने वारंवार विनंती करुनही अदा केली नाही. प्रत्येकवेळी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर जाबदाराने अँड. संतोष भोसले यांचेमार्फत तक्रारदार यांना नोटीस पाठवून उर्वरित रक्कम रु.7,50,000/- जमा करुन साठेखताचा खरेदीदस्ताचा व्यवहार पूर्ण करुन घ्यावा असे कळविले. त्यावेळी तक्रारदाराने जाबदार क्र. 4 ला खोटया मजकूराची नोटीस पाठवली व जाबदाराला नाहक त्रास दिला.
तक्रारदाराने श्री. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन इंजिनीयर अँन्ड कॉन्ट्रॅक्टर यांचेकडे रक्कम जमा केलेच्या पावत्या दाखल केल्या आहेत. परंतु जाबदार क्र. 4 व श्री. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन यांचेमध्ये सदर मिळकतीबाबत कोणतेही करारपत्र झालेले नाही. त्यामुळे तका्ररदार यांनी सदर व्यवहाराच्या रकमा श्री. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन इंजिनियर अँन्ड कॉन्ट्रॅक्टर यांचेकडे देणेचा कोणेताही प्रश्नच उद्भवत नव्हता व नाही. तसेच नमूद रजिस्टर साठेखतामध्येही सदर श्री. महालक्ष्मी कॉन्ट्रॅक्टर व इंजिनियर यांचा कुठेही उल्लेख नाही. तसेच प्रस्तुत पावत्यांवर कोठेही यशया कन्स्ट्रक्शन तर्फे प्रोप्रा. भारती रामचंद्र बनसोड म्हणजेच जाबदार नं. 4 ची सही व शिक्का नाही. त्यामुळे सदर पावत्या जाबदार क्र. 4 वर बंधनकारक नाहीत. जाबदार क्र.4 ने रकमा स्विकारल्या बद्दलचा कोणताही पुरावा तक्रारदाराने याकामी दाखल केलेला नाही. जाबदार क्र. 4 यांनी पैसे स्विकारलेवर यशया कन्स्ट्रक्शन तर्फे प्रोप्रा. भारती बनसोड अशा स्वरुपाची पावती देत असतात. परंतू तशी पावती याकामी दाखल नाही. याऊलट तक्रारदाराने जाबदार क्र. 4 बरोबर साठेखत करुनही साठेखताचा व्यवहार पूर्ण न केलेमुळे सदर जाबदार क्र. 4 चे अतोनात नुकसान झाले असलेने तक्रारदाराकडून जाबदार क्र. 4 यांना नुकसानीपोटी रक्कम रु.2,00,000/- (दोन लाख फक्त) मिळावेत व तक्रारदाराचा तक्रार अर्ज फेटाळणेत यावा अशी विनंती जाबदार क्र. 4 ने केली आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे व म्हणणे यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रस्तुत तक्रारअर्जाचे निराकरणार्थ मे मंचाने पुढील मुदद्यांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा
पुरवली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? खाली नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- मल्हारपेठ, सातारा येथील सिटी सर्व्हे नं.29 अ /2 क्षेत्र 287.19 चौ. मी. ही मिळकत जाबदार क्र. 1 ते 3 यांचे मालकीची असून सदर मिळकत विकसन करणेसाठी जाबदार क्र.4 यांना विकसन करारनामा करुन दिलेली होती व आहे. तसेच जाबदार क्र. 1 ते 3 तर्फे मुखत्यार म्हणून जाबदार क्र. 4 यांनी तक्रारदाराला सदर मिळकतीत उभारलेल्या ‘विपुल सहवास’ या इमारतीतील तळमजल्यावरील सदनिका क्र. जी-1 क्षेत्र-795 चौरस फूट म्हणजेच 73.88 चौ.मी. रक्क्म रु.8,00,000/- (रुपये आठ लाख मात्र) या मोबदल्यात विक्री करण्याचे निश्चित करुन करारनामा दस्त क्र. 1007/11 हा नोंदणीकृत करारनामा (साठेखत) करुन दिले होते. प्रस्तुत साठेखतापोटी विसारा म्हणून तक्रारदाराने रक्कम रुपये 50,000/- जाबदार क्र. 4 ला दिले होते. प्रस्तुत बाब जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये मान्य केली आहे. प्रस्तुत रक्कम सदर करारनामा/ साठेखतातील अटी व शर्तीनुसार तक्रारदाराने जाबदार क्र. 4 यांना यशया कन्स्ट्रक्शन या फर्मचे नावाने जनता सहकारी बँक लि.सातारा या बँकेवरील चेक नं. 874581, दि.10/2/2011 रोजी विसारापोटी रक्क्म रु.50,000/- दिले असून जाबदार क्र. 4 यांचे सांगणेवरुन जाबदार क्र. 4 यांचे इमारतीचे काम करणारे कॉंन्ट्रॅक्टर महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन यांना दि.11/2/2011 रोजी रक्कम रु.4,,50,000/- दि.16/2/2011 रोजी रक्कम रु.50,000/- व दि.6/7/2011 रोजी रक्कम रु.2,80,000/- अशाप्रकारे सदनिकेच्या खरेदीपोटी तक्रारदाराने जाबदार क्र. 4 यांना एकूण रक्कम रु.8,30,000/- (रुपये आठ लाख तीस हजार फक्त) अदा केले आहेत. तसेच उर्वरीत रक्कम रु.38,000/- एवढी रक्कम तक्रारदार जाबदाराला देणेस सदैव तयार होते व आहेत. प्रस्तुत बाबतीत महालक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे भागीदार श्री. बी.जे.नाईक यांचे शपथपत्र याकामी तक्रारदाराने दाखल केले आहे. त्यामध्ये स्पष्ट केले आहे की, जाबदार क्र. 4 यांनी इमारतीचे काम करणेचा करारनामा श्री. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन्स यांना करुन दिला होता व श्री. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन यांना रक्कम दिल्याखेरीज ते इमारतीचे काम/कन्स्ट्रक्शन चालू करु शकत नव्हते. प्रस्तुत शपथपत्र नि. 35 कडे दाखल आहे. त्यामध्ये तक्रारदाराकडून रक्कम रु.7,80,000/- रक्कम मिळालेचे नमूद केले आहे. तसेच प्रस्तुत रक्कम सदर श्री. महालक्ष्मी कॉन्ट्रॅक्टर यांना मिळालेचे नमूद केले आहे. तसेच प्रस्तुत रक्कम सदर श्री. महालक्ष्मी कॉन्ट्रॅक्टर यांना मिळालेचा पावत्या त्यांनी तक्रारदाराला दिलेचे शपथपत्रात म्हटलेले आहे. सदरच्या पावत्या तक्रारदाराने याकामी नि. 13 चे कागदयादीसोबत नि.13/1 ते नि.13/4 कडे दाखल केल्या आहेत. त्याचप्रमाणे तक्रारदार यांनी नि. 37 चे कागदयादीने नि.37/1 कडे जाबदार क्र. 4 तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान झालेले मुळ रजि. साठेखत/करारनामा, तसेच प्रस्तुत कामातील जाबदार नं. 4 विरुध्द सुभाष कांतीलाल शहा व बी.जे. नाईक यांनी मा. दिवाणी कोर्टात दाखल केले स्प.दि.मु.नं.193/14 ची दाव्याची प्रत व त्यामध्ये सदर सुभाष शहा व व्ही.जे.नाईक यांनी दाखल केलेने कागदपत्रे – यामध्ये जाबदार क्र. 4 ने सुभाष शहा यांना बांधकाम करणेसाठी करुन दिलेला करारनामा, अँड किरण कांतीलाल शहा यांनी श्री. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार सुभाष कांतीलाल शहा व बी.जे. नाईक यांचेतर्फे जाबदार क्र. 4 यांना दिलेली नोटीस, श्री.संतोष भोसले अँडव्होकेट यांनी श्री. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन यांचे भागीदार याना पाठवलेले नोटीस उत्तर अँड किरण कांतीलाल शहा यांनी जाबदार क्र. 4 यांना दिले नोटीसचे उत्तरास प्रतिउत्तर प्रस्तुत नोटीसमध्ये रक्कम रु.7,80,000/- या तक्रारदाराकडून जमा असलेचे श्री. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार यांनी मान्य केले आहे. वरील सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता, श्री. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन यांचे भागीदार सुभाष शहा व बाळकृष्ण नाईक यांना जाबदार क्र. 4 ने वादातीत मिळकतीवर बांधकाम करणेसाठी नोंदणीकृत करारनामा करुन दिला आहे. व प्रस्तुत कॉन्ट्रॅक्टर यांना तक्रारदार यांनी रक्कम रु.7,80,000/- एवढी रक्कम अदा केलेचे सदर श्री. महालक्ष्मी कॉन्ट्रॅक्टर यांनी मान्य केलेले आहे. या सर्व पावत्या तक्रारदाराने नि. 13 चे कागदयादीसोबत दाखल केल्या आहेत. तसेच रक्कम रु.50,000/- अॅडव्हान्स/विसारा दिलेची पावतीही याकामी नि. 13/1 कडे दाखल आहे. यावरुन तक्रारदाराने जाबदार यांना एकूण रक्कम रु.8,30,000/- अदा केलेचे स्पष्ट होत आहे. तसेच उर्वरीत रक्कम रु.38,000/- तक्रारदार जाबदाराला देणेस तयार आहेत. तसेच श्री. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन यांना करारनामा करुन सदर बांधकाम करणेचे कॉन्ट्रॅक्ट जाबदार क्र. 4 ने दिलेचे सिध्द झाले आहे. जाबदार क्र.4 ने याकामी सदर कॉन्ट्रक्ट श्री. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन यांचेकडे दिले नव्हते ही बाब सिध्द केलेली नाही.
सबब, प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदार यांना त्यांच्या पुढे नमूद सदनिकेचे शहर सातारा येथील मल्हारपेठ येथील सि.सर्व्हे नं.29 अ/2 क्षेत्र 287.19 चौ.मी. या मिळकतीवरील ‘विपूल सहवास’ या इमारतीमधील तळमजल्यावरील सदनिका क्र. 1 क्षेत्र 795 चौ. फेट, म्हणजेच 73.88 चौ. मी. या सदनिकेचे खुष खरेदीखत्र तक्रारदार यांस करुन दिलेले नसलेने तक्रारदार यांस जाबदाराने सदोष सेवा पुरविली आहे ही बाब स्पष्ट सिध्द झाली आहे. सबब जाबदार क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदार यांना वर नमूद सदनिकेचे खूषखरेदीपत्र करुन देणे न्यायोचीत होणार आहे असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. याऊपर तक्रारदाराने जाबदाराला देणे असलेली उर्वरीत रक्कम रुपये 38,000/- (रुपये अठतीस हजार फक्त) अदा करणे न्यायोचीत होणार आहे.
9. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. तक्रारदार यांना जाबदार क्र. 1 ते 4 यांनी सातारा, मल्हार पेठ येथील
सि.स.नं.29अ/2 क्षेत्र 287.19 चौ.मी. या इमारतीतील तळमजल्यावरील
सदनिका क्र.जी-1 क्षेत्र 795 चौ. फूट म्हणजेच 73.78 चौ. मी. या सदनिकेचे
रजिस्टर/नोंदणीकृत खुषखेदीपत्र करुन द्यावे. तसेच तक्रारदाराने जाबदार
यांना देय असलेली उर्वरीत रक्कम रु.38,000/- (रुपये अडतीस हजार मात्र)
अदा करावेत.
3. तकारदार यांस झाले मानसिक त्रासापोटी व अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रुपये
15,000/-(रुपये पंधरा हजार फक्त) जाबदार क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदारांना
अदा करावेत.
4. वरील नमूद आदेशांची पूर्तता तक्रारदार व जाबदार यांनी आदेश पारीत
तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5. विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदाराला ग्राहक संरक्षण
कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची मुभा
राहील.
6. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत
याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 05-08-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.