(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 25 जुन 2015)
अर्जदाराने सदर तक्रार, वॉरंटी अवधीमध्ये मोबाईल दुरुस्ती करुन न दिल्याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदाराने दि.15.1.2014 ला वडसा येथील न्यु रिझव्ही मोबाईल सेंटर यांचेकडून सॅमसंग कंपनीचा मोबाईल क्र.जि.टी.एस.7582 रुपये 10,600/- मध्ये बिल क्र.184 अन्वये विकत घेतला, त्यात 1 वर्षाची वॉरंटी असल्याचे लिहून दिले. मोबाईल जवळपास 6 महिने वापरल्यानंतर मोबाईल मध्ये बंद होण्याची समस्या चालु झाली. नवीन मेमोरी खरेदी करुन मोबाईलमध्ये टाकून सुध्दा मोबाईलची समस्या दुर झालेली नाही. दि.29.9.2014 ला वडसा येथील दुकानदाराकडे मोबाईल दुरुस्तीकरीता दिला. सदर मोबाईल 1 महिना आपल्याजवळ ठेवून दि.20.10.2014 ला मला परत केला. दि.23.10.2014 ला वडसा येथील दुकानदाराकडे जावून सदर मोबाईल वारंवार बद पडत असल्याचे सांगीतले. सर्व्हिस सेंटर नागपूर यांनी सुध्दा मोबाईल दुरुस्ती करुन दिलेला नाही. यामुळे गैरअर्जदाराकडून अर्जदारास आर्थिक, शारिरीक व मानसिक ञास झाला. त्यामुळे, अर्जदाराने मोबाईलची रक्कम रुपये 10,600/- परत मिळावे किंवा त्याच कंपनीचा नवीन मोबाई मिळण्यात यावे, तसेच नागपुर येथे जाणे-येण्याचा खर्च, आर्थिक नुकसान, शारिरीक व मानसिक ञासापोटी असे एकूण रुपये 40,000/- अर्जदारास मिळावे, अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 4 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 हजर होऊन नि.क्र.15 नुसार लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 हजर होऊन नि.क्र.13 नुसार लेखीउत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.15 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदाराने दि.15.1.2014 ला वडसा येथील न्यु रिझव्ही मोबाईल सेंटर यांचेकडून सॅमसंग कंपनीचा मोबाईल क्र.जि.टी.एस.7582 रुपये 10,600/- मध्ये बिल क्र.184 अन्वये विकत घेतला, ही बाब मान्य केली. गैरअर्जदार क्र.1 ने बिलावरती हस्ताक्षराने एक वर्षाची वॉरंटी लिहून दिली हे अर्जदाराचे म्हणणे खरे नाही. गैरअर्जदार क्र.1 च्या बिलावरती मोबाईलची एक वर्षाची वॉरंटी मोबार्इल कंपनीची सर्व्हीस सेंटरची असून मोबाईल विक्रेत्याची नाही. गैरअर्जदार क्र.1 मुळे अर्जदाराला कसलाच ञास सहन करावा लागला नाही. सदर तक्रार खोटी असून फक्त गैरअर्जदार क्र.1 ला ञास देण्याचा हेतूने दाखल केली. अर्जदाराला कसल्याच प्रकारचा शारिरीक, मानसिक व आर्थिक ञास झाला नाही. यामुळे अर्जदाराची तक्रार योग्य दंड आकारुन खारीज करण्यात यावी.
4. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.13 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदाराचा मोबाईल दि.24.10.2014 ला आल्यानंतर मोबाईल वॉरंटी कार्डप्रमाणे विनामुल्य त्वरीत दि.25.10.2014 ला बरोबर करुन दिला. दि.24.10.2014 च्या रीटन मेमोवर अर्जदाराची सही असून मोबाईल व्यवस्थीत दुरुस्त करुन दिला या गोष्टीची पुर्तता अर्जदाराने दिली. अर्जदार दि.8.11.2014 ला नागपूर येथे गैरअर्जदाराकडे कधीही आला नाही. अर्जदाराचा मोबाईल दि.17.11.2014 ला गैरअर्जदार क्र.2 च्या सर्वीससेंटर कडे आला होता त्यावेळेस त्याचा मोबाईल वॉरंटी कार्डप्रमाणे विनामुल्य बरोबर करुन दिला होता. गैरअर्जदार क्र.2 ने मोबाईचे वॉरंटी प्रमाणे योग्य ती सेवा विनामुल्य व वेळेवर दिली. अर्जदाराची तक्रार खोटी आहे. गैरअर्जदार क्र.2 वॉरंटी कालावधी संपल्यानंतर कसल्याही प्रकारे जबाबदार राहात नाही आणि म्हणून सदर तक्रार योग्य तो दंड आकारुन खारीज करण्यात यावी.
5. अर्जदाराने नि.क्र.16 नुसार शपथपञ व नि.क्र.24 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना शपथपञ दाखल करण्याची शेवटची संधी देवून सुध्दा शपथपञ दाखल केले नसल्यामुळे गैरअर्जदार क्र.1 व 2 चे शपथपञाशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश नि.क्र.1 वर दि.13.5.2015 पारीत केला. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.23 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच गैरअर्जदार क्र.2 ला लेखी युक्तीवादाकरीता शेवटची संधी देवून सुध्दा दाखल न केल्यामुळे गैरअर्जदार क्र.2 चे लेखी युक्तीवादाशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश नि.क्र.1 वर दि.23.6.2015 ला पारीत केला. अर्जदार व गैरअर्जदारांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्ताऐवज, अर्जदाराचे शपथपञ, अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 यांचे लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय.
व्यवहार केला आहे काय ?
3) अर्जदाराचा तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
6. अर्जदाराने दि.15.1.2014 ला वडसा येथील न्यु रिझव्ही मोबाईल सेंटर यांचेकडून सॅमसंग कंपनीचा मोबाईल क्र.जि.टी.एस.7582 रुपये 10,600/- मध्ये बिल क्र.184 अन्वये विकत घेतला, त्यात 1 वर्षाची वॉरंटी असल्याचे लिहून दिली, ही बाब दोन्ही पक्षाना मान्य असून अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
7. अर्जदाराने दि.15.1.2014 ला वडसा येथील न्यु रिझव्ही मोबाईल सेंटर यांचेकडून सॅमसंग कंपनीचा मोबाईल क्र.जि.टी.एस.7582 रुपये 10,600/- मध्ये बिल क्र.184 अन्वये विकत घेतला, त्यात 1 वर्षाची वॉरंटी असल्याचे लिहून दिले. मोबाईल जवळपास 6 महिने वापरल्यानंतर मोबाईल मध्ये बंद होण्याची समस्या चालु झाली. नवीन मेमोरी खरेदी करुन मोबाईलमध्ये टाकून सुध्दा मोबाईलची समस्या दुर झालेली नाही. दि.29.9.2014 ला वडसा येथील दुकानदाराकडे मोबाईल दुरुस्तीकरीता दिला. सदर मोबाईल 1 महिना आपल्याजवळ ठेवून दि.20.10.2014 ला मला परत केला. दि.23.10.2014 ला वडसा येथील दुकानदाराकडे जावून सदर मोबाईल वारंवार बद पडत असल्याचे सांगीतले. सर्व्हिस सेंटर नागपूर यांनी सुध्दा मोबाईल दुरुस्ती करुन दिलेला नाही, ही बाब अर्जदाराने दाखल तक्रार, शपथपञ व दस्ताऐवजावरुन सिध्द होते. याउलट, गैरअर्जदाराने त्याचे बचाव पक्षात लेखी उत्तरात मांडलेले कथन गैरअर्जदार त्याचे शपथपञ व साक्षीपुरावा अभावी सिध्द करु शकलेला नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराचे मोबाईल वारंवार संपर्क साधून सुध्दा दुरुस्ती करुन दिलेला नाही, यावरुन असे सिध्द होते की, गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती न्युनतम सेवा दर्शविलेली आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
8. मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
(2) गैरअर्जदाराने अर्जदाराला व्यक्तीगत किंवा संयुक्तरितीने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत त्याच कंपनीचे नवीन मोबाईल बदलवून द्यावे.
(3) अर्जदाराला झालेल्या मानसिक व शारिरीक ञासापोटी रु.2000/-
व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- गैरअर्जदाराने अर्जदाराला व्यक्तीगत किंवा संयुक्तरितीने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत द्यावे.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 25/6/2015